Feb 22, 2024
प्रेम

प्रीती पर्व दुसरे! भाग -११

Read Later
प्रीती पर्व दुसरे! भाग -११

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -अकरा.


'हिला पाहिले की सारखी शैली का आठवते? कोणताच अनुभव नसताना का हिला मी अपॉइंट केले माझा निर्णय चुकला तर नाही ना?' तो स्वतःलाच विचारत होता.

सोनियाच्या कामात चोखपणा होताच. प्रीतीच्या आठवणीने मात्र मधेमध्ये उमाळून येत होते. तिला सोडून आपण कामावर आलोय ही अपराधीपणाची बोचणी लागत होती. डोक्याला थोडा ठणका लागला तसा तिला चहाची आठवण झाली. 'या क्षणी राधामावशीच्या हातचा फक्कड चहा मिळाला असता तर किती बरं झालं असतं ना.' तिच्या मनात आले आणि तेव्हाच चहाचा ओळखीचा सुगंध तिच्या नाकात भिनायला लागला. तिला हसूच आले. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' असेच घडतेय की काय असे वाटत असतानाच "ओ, मॅडम चहा घ्या." तिथल्या प्यूनचा कोरडा आवाज तिच्या कानावर येऊन आदळला.

तिने दचकून त्याच्याकडे पाहिले. चहा हवा होताच. निमूटपणे तिने कप ओठांना लावला. तो सुगंध आणि जिभेपर्यंत पोहचलेला पहिलाच घोट..! हा चहा राधामावशीच्या हातचा आहे हे ओळखायला तिला वेळ लागला नाही. चहा पिऊन मनातली मरगळ झटकन दूर झाली. चेहऱ्यावर प्रसन्नता पसरून ती जोमाने कामाला लागली. आपल्या घरचा चहा इथे येतो या विचाराने तिला भारी वाटत होते. 'मिहीर दिसतो तसा नाहीये. माणसाला पारखण्याची नजर त्याच्यात आहे.' ती स्वतःशीच हसली.

मिहीरचे निरीक्षण चालूच होते. चहा पिऊन तिचा फुललेला चेहरा पहिल्यावर त्याच्याही चेहऱ्यावर नकळत हास्याची लकेर उमटली.


ऑफिस सुटल्यानंतर ती घरी आली तेच मोठया आनंदाने.

"दिवस मस्त गेला म्हणायचा." तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत राधामावशीने विचारले. "कामाची जागा बरी आहे ना गं?" तिच्या उत्तराआधी दुसरा प्रश्न हजर.

"हो गं मावशी. सगळं मस्त आहे. तुझी सोबत असल्यावर मस्तच राहील ना." ती हसत उत्तरली.

"आता हे काय? तिथे मी कुठे होते?" राधामावशीच्या चेहऱ्यावर गोंधळ.

"अगं, तू नसलीस तरी तुझ्या हातचा चहा तर होता ना." तिच्याकडे हसून बघत ती म्हणाली.

"म्हणजे? म्हणजे सोना आपला चहा जिथे जातो त्या ऑफिसमध्ये तू कामाला जातेस होय?" राधामावशी.

"हो गं मावशी, तिथेच जाते. मलाही माहिती नव्हतं. पण दुपारी चहाची गरज असताना तो ओळखीचा चहा प्याले नि मग सगळा शीण निघून गेला बघ." सोनिया.

"सोनिया, ते साहेब खूप चांगले आहेत गं. त्यांना खऱ्या कष्टाची कदर आहे. मन लाऊन तिथे काम कर नि कष्टाचे चीज कर." राधामावशी भारावून बोलत होती.

"हो गं मावशी. आता मागे वळून बघणार नाही." प्रीतीला कडे घेत ती म्हणाली. "आता प्रत्येक पाऊल यशाच्याच दिशेने जाणार बघ." तिचा चेहरा उजळून निघाला होता, जणू काही काळवंडलेल्या सोन्याची काजळी हळूहळू निघू लागली होती. 

*******

रात्री झोपताना मिहीरच्या डोळ्यासमोर निळ्या साडीतील सोनिया पिंगा घालत होती. अंगावरची साडी हलक्या प्रतीची असली तरी तिच्या चेहऱ्यावरून मात्र ती एक घरंदाज मुलगी भासत होती.

'एक वेगळाच स्पार्क आहे तिच्यात. तिला अपॉइंट करून मी चुकलो नाही हे मात्र निश्चित आहे.' तो स्वतःलाच सांगत होता.

त्याच्या नजरेसमोर पुन्हा शैली उभी राहिली. सोनिया आणि शैलीशी नकळत मन तुलना करू लागले. शैली त्याचे प्रेम होती. ती गेल्यापासून आजवर तिच्या आठवणीने त्याला केवळ त्रासच होत होता. सोनिया भेटल्यापासून मात्र असा त्रास केव्हाच झाला नाही.

'का आठवते शैली सारखी? सोनियामध्येच ती का जाणवते? ती परत आली का? की ते प्रेम परत आलेय?' स्वतःच्या विचाराने तो भांबावला.

कॉलेजमध्ये असताना शैलीला पाहताक्षणीच तो तिच्यावर भाळला होता. आत्ताही काहीसे तसेच वाटत होते.

'मी पुन्हा प्रेमात पडलोय का?' त्याने स्वतःला पुन्हा पुन्हा विचारले. आज विचारांच्या गर्तेने त्याचे डोके दुखत नव्हते. तरीही स्वतःच स्वयंपाकघरात जाऊन तो कॉफी घेऊन आला. 

कॉफीच्या प्रत्येक घोटासरशी दुपारी चहा पिऊन चेहऱ्यावर समाधान पावलेली सोनिया त्याला दिसत होती.

बाहेर अचानक रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊसवेडा नव्हताच तो तरीही त्याने हात बाहेर काढून पाऊस झेलायला सुरुवात केली. पावसाच्या प्रत्येक थेंबाच्या स्पर्शासरशी त्याला शैलीचा स्पर्श जाणवत होता. डोळ्यासमोर मात्र दोन दिवसांपूर्वी पावसात ओलीचिंब भिजणारी सोनिया झळकत होती.

"काय सालेसाहेब, पुन्हा डोके उठले का काय?" कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले. तो हेमंत होता. त्याच्या लाडक्या बहिणीचा नवरा आणि त्याचा जीजू कम दोस्तच!

"नाही हो, आज डोकेदुखीशिवाय कॉफी प्यावीशी वाटली. पाऊस पडल्यावर मातीचा गंध मनाला मोहवतो ना त्यासारखाच कॉफीचा सुगंधसुद्धा मनात साचवू पाहत आहे." तो हसून बोलला.

"अरे वाह! तिकडे बिनमौसम बारिश का पाणी आणि इकडे तुझी एक वेगळीच कहाणी! काय? माजरा काय जरा समजावशील का?" आज हेमंत फुल्ल मुडमध्ये होता.

"हेमंत यार, मला ती पुन्हा भेटलीय." कॉफीचा मग खाली ठेवत मिहीर म्हणाला.

"कोण भेटलीय? काहीतरी सिरीयस दिसतेय." हेमंत सावरून बसत म्हणाला. जेव्हा मिहीर जीजू वरून हेमंतवर उडी टाकायचा तेव्हा त्याचा मूड एकतर एकदम आनंदी किंवा मग एकदम विरुद्ध हे त्याला माहिती होते.

"सोनिया. सोनिया नाव तिचं. आजच आपल्या ऑफिसला नवीन अपॉइंट केलेय. हेमंत तिच्यात मला शैली दिसते. असं वाटतं की तीच परत आलीय, एका वेगळ्या रूपाने." बोलताना त्याच्या डोळ्यात चमक जाणवत होती.

"मित्रा, पहिल्यांदा मूव्हऑन व्हायला बघतो आहेस त्याचा मला फार आनंद आहे. पण त्या सोनियाला शैलीमध्ये अडकवू नकोस ना. तिला सोनिया म्हणूनच बघ आणि मग ठरव खरंच ती तुला आवडते का ते." त्याच्या खांदयाला थोपटत हेमंत म्हणाला. 

"बहुतेक प्रेमात पडलोय तिच्या." मिहीर आपल्याच धुंदीत बोलत होता.

"एकाच दिवसात?" हेमंतचा प्रश्न.

"पहिल्याच भेटीत." मिहीर उत्तरला. "प्रेमात पडायला एक क्षणही पुरेसा असतो ना रे?"त्याने हेमंतकडे आशाळभूत नजरेने पाहिले.

"जर हे खरेच प्रेम असेल ना तर आय एम सोऽऽ हॅपी फॉर यू!" त्याला आलिंगन देत हेमंत म्हणाला.

"पण शैली…? तिच्यावर अन्याय होईल ना हा. ती माझे पहिले प्रेम आहे. असे कोणी दुसऱ्यांदा प्रेमात पडू शकतो का? तिच्याशी प्रतारणा तर करत नाहीये ना मी?" त्याने ओल्या डोळ्याने विचारले.

"ओ, कमऑन मिहीर! कसली प्रतारणा? इनफॅक्ट तुला आनंदी बघून तिलाही आनंदच मिळेल. हे बघ, जे झालं तो भूतकाळ होता. वाईट भूतकाळ. आता वर्तमानात आनंदाचे दार उघडत आहे तर नाकारू नकोस. बिनधास्त आत प्रवेश कर. काही लागलं सवरलं तर मी आहे ना? आय एम अल्वेज विथ यू!"

"थँक यू हेमंत! तुझ्याशी बोलून मन हलके झाले." तो हसून म्हणाला.

"अरे मग यारी दोस्ती असते कशासाठी? मी तर जाम खूष आहे बाबा. पण काय रे हे तू त्या सोनियाला बोललाहेस का?" हेमंत.

मिहीरने नकारार्थी मान हलवली.

"मग लवकरच सांगून टाक. चांगली माणसं हरवण्याचे चान्सेस फार असतात बाबा.नॉऊ गो टू स्लीप विथ रिलॅक्स्ड माईंड!" आपल्या खोलीत जात हेमंत म्हणाला.

मिहीर 'हो' तर म्हणाला पण काहीवेळ पुन्हा तिथेच बाल्कनीत रेंगाळत राहिला. 'सोनियाशी खरेच बोलावे का? पण इतक्यात..? कशी रिॲक्ट होईल ती?' विचार करतच तो झोपून गेला.

हा आठवडा सर्वांसाठी फार मस्त गेला. कधीकधी अचानक वसकन ओरडणारा मिहीर स्टॉफशी आता जरा सौम्यपणे वागत होता. सोनियाशी फटकून वागण्याचा चान्स नव्हताच. ती कुठे कधी चुकत नव्हती.

आज रविवार.. सुट्टीचा दिवस! मिहीर अगदी सैरभैर झाला होता. रोज सोनियाचा चेहरा बघण्याची सवय असलेले डोळे कुठेतरी ती दिसेल म्हणून आसूसले होते. तिचा आवाज ऐकायला कान अधीर झाले होते. तिला एक फोन तरी करावा म्हणून त्याने फोन हातात घेतला पण फोन करणार तरी कुठे? तिच्याकडे फोन नव्हताच. घरी त्याची चिडचिड सुरू झाली. खूप दिवसांनी मायग्रेनने पुन्हा दस्तक दिली.

'तू पुरता गुंतलाहेस तिच्यात.' त्याचे मन त्याला ओरडून ओरडून सांगत होते.

"मिहीर, काय सुरू आहे? कॉफीचा तिसरा कप पितो आहेस. अशाने दुसरा त्रास सुरू होईल." माही, त्याची लडकी ताई त्याच्याजवळ येत म्हणाली.

त्याने तिच्याकडे नजर वर करून पाहिले.

"हेमंतशी मी बोललेय अरे. तुझ्या मनाची अवस्था कळतेय मला. तू म्हणशील तर आपण तिच्या घरी भेटायला जायचे का?" माहीच्या बोलण्यावर त्याने चमकला.

"असा काय बघतोस? सोनिया तुझ्या आयुष्यात आल्यापासून तुझा डोक्याचा त्रास कमी झालेला जाणवतोय रे मला. एक दिवस का भेटला नाहीस तर कसा अस्वस्थ झालाहेस. धिस इज ट्रू लव्ह माय ब्रदर! मी तुझ्यासाठी फार आनंदी आहे." त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली तसा तो हसला.

"ताई मलाही याची जाणीव झालीय. मी उद्याच तिला माझ्या मनातील भावना सांगण्याचा विचार करत आहे." तिच्या हाताला घट्ट पकडत तो म्हणाला.

******

दुसऱ्या दिवशी तो खूप खूष होता. मस्तपैकी तयार होऊन तो ऑफिसला गेला. चेहऱ्यावर एक आनंद, ती काय म्हणेल याची हुरहूर! डोळे तिच्या वाटेकडे आस लाऊन असलेले आणि तेवढ्यात ती समोर आली. केबिनच्या काचेतून त्याचे न्याहाळणे सुरू होते. आज गुलाबी साडीचा नंबर. त्या गुलाबी रंगात जणू गुलाब फुललाय असे त्याला वाटले. उगाचच हृदयाची स्पंदने वाढलीत हे जाणवत होते. पंधरा मिनिटांनी तिच्या टेबलवरच्या फोनची रिंग वाजली.

"सर, मला बोलवलत?" केबिनच्या दारातूनच सोनियाने विचारले.

"हम्म. प्लीज कम इन!" मुखावरची अस्वस्थता लपवत त्याने तिला आत बोलावले.

:

क्रमश :

********

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )


मिहीर आपल्या भावना सोनियाला सांगू शकेल का? ती त्याचा स्वीकार करेल का? कळण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग.


*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

********

फोटो गुगल साभार.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//