Mar 02, 2024
प्रेम

प्रीती पर्व दुसरे! भाग -10

Read Later
प्रीती पर्व दुसरे! भाग -10


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग - दहा.


"नोकरीचे बाजूला राहू दे. आधी ही भजी खा." राधामावशीचे प्रेमाचे शब्द आणि तो बशीतला सुगंध!
न राहवून तिने राधामावशीला मिठी मारली. त्या प्रेमळ मिठीत तिला आपण आपल्या लाडक्या आप्पा आणि आईसाहेबांच्या सानिध्यात आहोत असे वाटले.

दुसरा दिवस असाच उजाडला. राधामावशीची सकाळची चहाची ऑर्डर पोहचती झाली होती. दुपारी सोनिया प्रीतीला कुशीत घेऊन निजली होती. मनात मात्र हिशोब चालला होता. या महिन्यात जरा जास्तच खर्च झाला होता. प्रीतीचा वाढदिवस.. प्रीतीबरोबरच त्या दोघींसाठी केलेली खरेदी आणि कालचे रिक्षाला लागलेले पैसे. काल काही काम तर झाले नाही पण नाहक खर्च मात्र झाला. तिच्या मनात आता वाईट वाटत होते.

'कसला खडूस बॉस होता तो? एवढी मोठी कंपनी चालवत असूनही त्याला साधी माणसं ओळखता येत नाही. काय तर म्हणे अनुभवी माणसं हवीत. प्रत्येकवेळी अनुभव असला तरच काम होतात का? ही मोठी लोकंच असं वागतील तर मग नवोदितांचे कसे व्हावे? आमच्यासारख्यांना कोण काम देईल?' मिहीरचा चेहरा आठवला की तिला राहून राहून त्याचा राग येत होता.

'नुसते चांगले मार्क्स मिळवून होत नाही.' तो म्हणाला होता. आप्पांच्या कंपनीत जाऊन कधीकाळी केलेली मदत तिला आठवली. ते नेहमी म्हणायचे, 'आमची सोनिया म्हणजे अस्सल सोना आहे. त्या जिथे जातील तिथे स्वतःचे नाव लख्ख कोरतील.'

'आप्पांचा हा विश्वास सार्थकी लागेल का? खरंच मी काहीतरी करू शकेन ना?'  दारावरच्या टकटकीने तिचे विचार बाजूला सरले.

"सोनिया, चहाची ऑर्डर घेणारे असतील. दार उघड गं." म्हणत आतून राधामावशी चहाचे थर्मास घेऊन बाहेर आली.

चहा घेऊन ते गेल्यावर पंधरा एक मिनिटांनी पुन्हा दारावर टकटक झाली. "आता कोण?" म्हणून राधामावशीने दार उघडले.

"सोनिया इथेच राहते ना?" एक पंधरा सोळा वर्षांचा पोऱ्या विचारत होता.

"हो. का रे? आणि तू रे कोण?" राधामावशीचे प्रश्न सुरू झाले. तेवढ्यात सोनिया दारात आली. त्याच्याकडे पहिल्यावर तिला आठवले की हा तर त्या दिवशी फोन करायला गेले तिथल्या बूथवरचा मुलगा आहे.

"काय झाले?" तिने प्रश्न केला.

"तुम्ही सोनिया आहात का? तुमच्यासाठी एक फोन आलाय. पाच मिनिटांनी पुन्हा करणार म्हणून बोलवायला आलो. चला लवकर." तो जरा त्रागानेच बोलत होता.

"माझ्यासाठी फोन? मावशी आलेच गं मी." खांद्यावरचा पदर नीट सावरत ती त्याच्यासोबत निघाली.


"हॅलो, नायकर अँड ग्रुप्स मधून मी रीना बोलतेय. कालच्या मुलाखतीत तुमची निवड झालीय. उद्या सकाळी दहा वाजता मेन ब्रँचला तुम्हाला बोलावलेय." पलीकडून मिहीरच्या ऑफिसमधून रिसेप्शनिस्ट रीना बोलत होती.

"मेन ब्रँच? कुठे आणि तिथे का?" सोनिया.

"बॉसची ऑर्डर मी फॉलो करतेय. त्यांनी जे सांगितले तेच तुम्हाला सांगितले आहे. मेन ब्रँचचा पत्ता लिहून घ्या आणि हो, पुन्हा एक. तिथे गेल्यावर पहिले बॉसला भेटा. त्यांनी हे स्ट्रिक्टली सांगितलेय." पत्ता सांगत रीना.

सोनियाने फोन ठेवला पण तिचा स्वतःच्या कानावर अजूनही विश्वास बसत नव्हता. 'मला नोकरी मिळाली. इतक्यात? त्यांना तर अनुभवी कॅन्डीडेट हवा होता ना?' ती आनंदाने हवेतच होती.

"मावशी,मावशी, मावशीऽऽ" धावतच घरी येऊन राधामावशीचे हात पकडून ती तिला गोल गोल फिरवू लागली.


"अगं हो,हो. झाले काय ते तर सांगशील की फक्त गोल गोलच फिरवशील?" राधामावशीने विचारले.

"मावशी अगं काय सांगू?" सोनियाचा चेहरा फुलला होता.

"नोकरी मिळाली ना?" राधामावशीनेच विचारले.

"तुला गं माझ्या मनातलं लगेच कसं कळतं?" आश्चर्याने सोनिया.


"मनातलं काय कळायचं? तुझा चेहराच सांगतोय बघ. मी म्हणाले होते ना की तुला नोकरी मिळेल ते. बघ मिळालीच की नाही. आपल्या प्रीतीचा पायगुणच शुभ आहे गं." प्रीतीचा मुका घेत राधामावशी.


"हो गं. आपली प्रीती आहेच गुणी!" सोनियाने प्रीतीला जवळ घेतले.


दुसऱ्या दिवाशी सकाळी ती लवकर तयार झाली. ठेवणीतल्या दोन साड्यापैकी तिने आकाशी रंगाची साडी घातली होती. माई बाहेर जातेय हे लहानग्या प्रीतीने लगेच ओळखले. तिने आपले रडू सुरू केले.

"अरे पिल्लू, मी लवकर परत येणार आहे." तिला समजावता समजावता सोनियाला आपले रडू आवरता येत नव्हते. बाहेर कामाला जायचं हे इतक्या दिवसापासून तिने मनाला समजावले होते पण आज लाडक्या लेकीला सोडून जाताना तिच्या जीवाची घालमेल होत होती.

"मी नीट सांभाळेन गं तिला. तू निश्चिन्त जा बघू." सोनियाचा हात हातात घेऊन राधामावशीने तिला आश्वस्त केले.

*******

"सर मी आत येऊ का?" दोन दिवसापूर्वीचाच मंजुळ स्वर पुन्हा एकदा कानावर आला. मिहीरने मंद स्मित करत दाराकडे नजर टाकली. सोनेरी किनार असलेली आकाशी साडी अन आत्मविश्वासाचे तेज असलेला चेहरा. नाही म्हणायला थोडा गोंधळ होताच चेहऱ्यावर पण त्या तेजाने त्यावर मात केली होती.

ती दारात उभी होती. त्याने नजरेनेच तिला आत बोलावले.

"सीट." त्याचा मृदू स्वर ऐकून तिला नवल वाटले. परवाचा जमदग्नी आणि आजचा हा दोघात फार अंतर होते.

टेबलवरची बेल वाजवून त्याने आपल्या सेक्रेटरीला बोलावून घेतले.
"स्निग्धा.."

"येस सर?" ती लगेच हजर झाली.

"या मिस सोनिया. आपल्या नव्या एम्प्लॉयी. यांना त्यांचे काम समजावून दे आणि आपल्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्टवर सही देखील घे." तो.

"कॉन्ट्रॅक्ट? मला समजले नाही." सोनिया मध्येच बोलली.

"लेट मी एक्सप्लेन. आपल्या कंपनीत एकदा जॉईन झाल्यावर किमान तीन वर्ष तरी जॉब सोडता येत नाही. असा इथला नियमच आहे. तो कॉन्ट्रॅक्ट." स्निग्धा.

"सॉरी सर. ह्या कॉन्ट्रॅक्टवर मी सही करू शकणार नाही. मी हा जॉब फार फार तर दोन वर्षापर्यंत करेन. नंतर नाही जमणार मला."
तिचे असे डायरेक्ट बोलणे ऐकून स्निग्धा शॉक झाली. आजवर बॉसला इतके स्पष्टपणे कोणीच नकार दिला नव्हता.

"दोन वर्ष इथला अनुभव गाठीशी आला की मी दुसरीकडे जाणार आहे." चेहऱ्यावरची रेघ हलू न देता ती म्हणाली.


"कुठल्या कंपनीत?" त्याला बोलण्यात इंटरेस्ट वाटू लागला.

"स्वतःच्याच. दोन वर्षांनी मी माझं स्टार्टअप करणार आहे."
तिचे बोलणे ऐकून स्निग्धा खी खी करून दात दाखवायला लागली.

"ओके! पण तेव्हा मला पार्टनरशिप द्यायला विसरू नका बरं." त्याच्या बोलण्यावर सोनियाने चमकून त्याच्याकडे पाहिले.

"आणि दोन वर्ष इथल्या ऑफिसमधून हलणार नाही असे लिहून द्या." त्याने हसून कॉन्ट्रॅक्ट पेपर तिच्या समोर ठेवले.

स्निग्धाला पुन्हा धक्का बसला. 'काय झालंय बॉसला? असं आजवर कधी झाले नव्हते ते आज घडतंय. हिच्या सौंदर्यावर फिदा तर नाही ना झालेत?' सोनियाला न्याहाळताना तिच्या मनात आले.

'हिचे लग्न झालेय असं बघून तरी वाटत नाहीये. सुंदर तर आहेच ही, पण बॉस तसे नक्कीच नाहीत. मग हिला का एवढी स्पेशल ट्रीटमेंट देत आहेत?' विचारात असताना तिच्या कानावर त्याचा आवाज आदळला.

"स्निग्धा, लक्ष कुठेय? गो अहेड अँड शो हर वर्किंग प्लेस."

"येस.. येस बॉस! चला मॅडम." म्हणत ती सोनियाला केबिनबाहेर घेऊन आली.


तिचा कामाचा डेस्क अगदी त्याच्या केबिनबाहेर होता. त्यामुळे केबिनच्या काचेतून ती त्याला स्पष्टपणे दिसत होती. राधिका तिथली एक्स एम्प्लॉयी, तिचा तो डेस्क होता. आठवड्याभराने तिचे लग्न होते त्यानंतर ती नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरात जाणार होती. त्याने कालच तिला महिन्याभराचा पूर्ण पगार देऊन कामावरून कमी केले आणि भावी आयुष्याच्या मंगलकामना सुद्धा दिल्या. अशी सुट्टी मिळाली म्हणून राधिका खूष होती. लग्नापूर्वीचे हे आठ दिवस तिला घरच्यांसमवेत घालवता येणार होते.

आजपासून त्याने सोनियाला तिच्या ठिकाणी रुजू केले. नव्या ब्रँचमध्ये त्याला अनुभवी उमेदवारच हवी होती पण आता त्याला त्याच्या आयुष्यात सोनियाही हवी होती. म्हणून घातलेला हा घाट!

केबिनच्या काचेतून त्याचे निरीक्षण चालले होते. तिची कामाची लकब, मध्येच गालावर येणारी केसाची अवखळ बट. कुठे काही अडलेच तर सहकाऱ्यांकडून समजू घेण्याची वृत्ती आणि ओठावर सतत असणारे गोड हसू! विसरू पाहणाऱ्या शैलीकडे ती त्याला अलगद घेऊन जात होती.

"हेय मिहीर, टुडे आय एम सो, सो सो हॅपी!" लग्नाची तारीख निघाली तेव्हा आनंदाने बेभान होऊन शैलीने त्याला मारलेली मिठी त्याला पुन्हा आठवली.

"फायनली आपण लाईफ पार्टनर्स बनत आहोत. कॉलेजमध्ये प्रत्येक प्रोजेक्ट करताना आपण पार्टनर होतो. आता जीवनातल्या खऱ्याखुऱ्या प्रोजेक्टचे पार्टनर होणार." तिच्या काळ्याभोर डोळ्यात आनंद ओसंडून वाहत होता.

"आपली पार्टनरशिप कायम राहील. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत." त्याच्या मिठीत स्वतःला झोकून देत ती म्हणाली. एक उष्ण थेंब त्याच्या खांद्यावर स्पर्शून गेला.

"अगं राणी, ह्या आनंदाच्या क्षणी अशी रडू नकोस ना." तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवत तो म्हणाला.

"मिहीर तुझ्या या प्रेमाला कोणाची नजर तर लागणार नाही ना रे?"

"वेडीच आहेस तू. असं काही नसतं. चल आज मस्त पिक्चरला जाऊ." तिच्या मस्तकावर आपल्या ओठांचा विश्वासपूर्ण स्पर्श करत तो म्हणाला.

"आणि झालंच असं काही तर तू विसरशील मला?" तिने आर्त स्वरात विचारले.

"आणि मला काही झाले तर? तर तू विसरशील का मला?" त्याने तोच प्रश्न तिला विचारला तसे आवेगाने तिने त्याला मिठी मारली.

"मिहीर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तूच असशील… माझ्या मनात, माझ्या हृदयात, माझ्या जगण्यात! वी आर पार्टनर्स फॉरएव्हर!" तिची मिठी अधिकच घट्ट झाली होती.

******

'पण तेव्हा मला पार्टनरशिप द्यायला विसरू नका बरं!' सोनियाला न्याहाळताना तिला म्हटलेले शब्द त्याला आठवले आणि त्याला ओशाळवाणे वाटले.

'हिला पाहिले की सारखी शैली का आठवते? कोणताच अनुभव नसताना का हिला मी अपॉइंट केले? माझा निर्णय चुकला तर नाही ना?' तो स्वतःलाच विचारत होता.
:
क्रमश :
********

पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
********
फोटो गुगल साभार.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//