प्रीती पर्व दुसरे! भाग - ६

सुरू होतेय सोनियाच्या संघर्षाची कथा!

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -सहा.


"बरं, उद्या परत भेटूया. तुम्ही नक्की विचार करा." म्हणून तो कारमध्ये बसून निघून गेला.


"तुला काय वाटतं बाळा? त्या साहेबांची ऑर्डर घ्यायची का?" राधामावशीसोनियाला विचारत होती.


सोनियाने क्षणभर विचार केला."मावशी एवढया मोठया साहेबांनी स्वतःहून विचारलं म्हणजे तुझ्या हातच्या चहाची चव त्यांना फार आवडली असावी. त्यांना तू होकार तर दे पण दर जरा चढा ठेव." ती.


"अगं, एवढी मोठी ऑर्डर आहे, असाही आपला फायदा होईल की. पुन्हा का दर वाढवायचा?" राधामावशी बुचकाळ्यात पडली.


"मावशी, हे बघ त्यांनी स्वतःहून विचारले आहे म्हणजे त्यांना गरज आहे आणि त्यांना हवी तशी क्वालिटी तुझ्या चहात आहे मग दर वाढवला तर काय हरकत आहे? तू त्यांना उद्या तसे विचार आणि होकार दिला तरच तयार हो." सोनिया.


"अगं पण?" राधामावशी.


"मावशी ते एक मोठे बिझनेमन आहेत, आपल्याला सुद्धा बिझनेसच करायचा आहे की! आणि बघशील तू, ते नाही म्हणणार नाहीत आणि हो, त्यांना अर्धी रक्कम आगाऊ मागशील." ती विश्वासाने म्हणाली.


दुसऱ्या दिवशी पुन्हा मिहीर भेटला. राधामावशीने होकार तर दिला. दराबद्दल बोलली आणि आगाऊ रकमेबद्दल पण. तो किंचित हसला.


"मावशी हे तुमचं डोकं नक्कीच नाही. नाहीतर कालच बोलला असता." ॲडव्हान्सची रक्कम तिला देताना तो म्हणाला.


"मला तेवढं कुठे कळते साहेब. लेक जे बोलली तेच मी सांगितले." राधामावशीचा प्रामाणिकपणा त्याला भावला.


"मावशी तुमची मुलगी पुढे जाऊन मोठी उद्योजिका होणार बघा."


"तेच तर व्हायला हवे." ती खिन्न हसून म्हणाली.


"उद्या सकाळी चहा रेडी ठेवा. मी माणूस पाठवेन." तिच्याकडून तिचा पत्ता लिहून घेतल्यावर तो निघालाही.

******

"तुला गं कसं कळलं की जादाचा दर लावला तरी ते साहेब नाही म्हणणार नाहीत?" सोनियाच्या हातात ॲडव्हान्सची रक्कम जमा करत राधामावशी आश्चर्याने विचारत होती.


"मावशी, माझे आप्पा मोठे बिझनेसमन होते. त्यांचे काही तरी माझ्यात असतील की नाही?" सोनिया हसत उत्तरली.


"म्हणूनच ते साहेब अगदी खरं तेच म्हणाले."


"काय?"


"पुढे जाऊन तू मोठी उद्योजिका होशील ते." मावशी.


"ते तर व्हायचेच आहे. तुला असं या वयात किती दिवस दुसऱ्यांच्या दारात काम करू देणार मी?" तिच्या गळ्यात हात गुंफत सोनिया.


"आणि हे पैसे तूच ठेव. तुला मिळालेली ही पहिली ऑर्डर! त्याचे साहित्य घ्यावे लागेल ना?" तिने पैसे राधामावशीकडे परत केले.

राधामावशीने पैश्याचे पाकीट देवापुढे ठेवले.

नैवेद्य म्हणून सायंकाळी साजूक तुपातील शिरा बनवला. तो सुगंध सोनियाच्या नाकात भिनला. किती दिवसांनी असा दरवळ ती अनुभवत होती. साजूक तुपातील लुसलुशीत दाणेदार शिरा म्हणजे तिच्या आप्पासाहेबांची आवडती डिश होती. घरातून ती बाहेर पडली त्याला वर्षभराहून जास्त काळ लोटला होता.

'एवढया दिवसात आप्पांना माझी एकदाही आठवण आली नसेल का? का तेही आईसाहेबांसारखे जगाच्या भीतीला घाबरले असतील? आप्पांची विचारसरणी तशी नाहीये. म्हणजे आईसाहेबांनीच त्यांना मला शोधण्यापासून रोखले असेल का? वीरेनदादा, रजतदादा.. कोणालाही माझयाविषयी काही वाटत नसेल का? की तेही आईसाहेबांमुळेच गप्प बसलीत?'

मावशीने देवापुढे दिवा लावला. तेवणाऱ्या त्या मंद प्रकाशात सोनियाचे काठोकाठ भारलेले डोळे दिसले.


"तिन्ही सांजेला असे डोळ्यात पाणी आणू नये गं बाळा. आजचा दिवस आपल्यासाठी खूप शुभ आहे. तोंड गोड कर." शिऱ्याची बशी तिच्यासमोर ठेवत ती म्हणाली.


"मावशी कधी आप्पा भेटलेच तर करतीला का गं मला माफ?" सोनियाने कातर स्वरात विचारले.


"का नाही करणार? त्यांची लाडाची लेक आहेस ना तू? नक्की करणार." मावशी.


"आणि आईसाहेब? त्या मला माफ करू शकतील?" तिच्या डोळ्यातला थेंब खाली ओघळला.


"त्या तुझ्या आई आहेत. प्रत्येक आईला आपलं मुल चुकू नये असं वाटतं. त्यांच्या मतानुसार त्यावेळेस तू चुकली होतीस म्हणून त्या रागावल्या. आईच्या मनात राग जास्त काळ टिकत नाही हो. मोठया मनाने त्याही तुला माफ करतील बघ." राधामावशी.


"मावशी, मला बरं वाटावं म्हणून मुद्दाम बोलतेस ना हे? माझ्या आईसाहेबांना तू कधी भेटली नाहीस म्हणून असे बोलते आहेस." विषण्ण मनाने ती म्हणाली.


"नाही गं. आई ही आई असते. तेव्हा भलेही त्यांनी तुला घराबाहेर जायला सांगितले असेल पण आता तू तिथे जाशील तर नक्कीच तुला त्या घरात परत घेतील." राधामावशी.


"नाही गं मावशी, आता मी नाही जाणार. जोपर्यंत ही सोनिया आपल्या कर्तृत्वाने कोणीतरी मोठ्ठी बनणार नाही तोपर्यंत ती कोल्हापुरात पाऊल सुद्धा टाकणार नाही. हा शब्द आहे माझा." डोळ्यातील थेंब पदराने वेचत ती म्हणाली.


"तुझ्या प्रयत्नांना देव लवकर यश मिळवून देवो." राधामावशीने देवाजवळ हात जोडून तिला राखेचा अंगारा लावला. सोनियानेही डोळे मिटून घेत आपले हात जोडले.


सहा महिन्यांचा काळ लोटला होता. राधामवशीच्या चहाचे काम व्यवस्थित सुरू होते. घरात दोनवेळचे जेवण, घराचा किराया हे सगळे खर्च निभू लागले होते. राधामावशीच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची लकेर दिसू लागली होती. आता तिला लोकांकडे काम करायला जावे लागत नव्हते की चहाच्या गिऱ्हाईकांची वाट बघावी लागत नव्हती. सकाळ सायंकाळी मिहीरच्या ऑफिसमधला माणूस येऊन चहा घेऊन जायचा. महिना संपला की पैशांचे पॉकेट देऊन जायचा. या सहा महिन्यात या गोष्टीला एकदाही खंड पडला नव्हता. राधामावशी खूष होती. ते तिच्या चेहऱ्यावर झळकत होते त्याबरोबरच तिच्या केसातील डोकावणारी पांढऱ्या केसांची बट सुद्धा आताशा दिसायला लागली होती. सोनियाला या सगळ्याचा त्रास व्हायचा. आपल्यामुळे राधामावशीला काम पडतात, माझ्यासाठी मुंबई सोडून ती इथे आली ही मनातील सल तिला स्वस्थ बसू देईना.

आता आपणही हातपाय हलवायला सुरुवात केली पाहिजे, कुठेतरी नोकरी शोधायला हवी असे विचार सारखे तिच्या डोक्यात यायला लागले होते. तसेही हातावर हात मारून बसणाऱ्यातील नव्हतीच ती. पण सुरुवात कुठून करावी हे कळत नव्हते.


चिमणी प्रीती हळूहळू मोठी होत होती. तिच्या बाललिलांनी घर कसे भरून जाई. ती आता वर्षभराची होत आली होती. अंगाने चांगले बाळसे धरायला सुरुवात केली होती. तिचे बोबडे बोल घरात घुमू लागले होते. तिचा पहिला वाढदिवस येऊ घातला होता.


"मावशी गं, मला जरा पैसे हवे होते." सोनिया अडखळत म्हणाली.


"अगं सगळी मिळकत तर तुझ्याचकडे असते ना, घे की त्यातले." राधामावशी.


"हो गं. पण ते तुझे पैसे आहेत ना म्हणून मागितले." सोनिया.


"सोना, आपल्यात हे तुझे माझे कधीपासून व्हायला लागले गं? आणि प्रीतीसाठीच तुला पैसे हवे आहेत ना? लक्षात ठेव प्रीती जेवढी तुझी लेक आहे तेवढीच माझीही आहे. ह्यापुढे असे बोलून मला परकं करू नकोस." मावशीचा पदर डोळ्याजवळ गेला.


"मावशी, तसे नव्हते गं मला म्हणायचे. पण बघ ना इथे येऊन इतके दिवस उलटली मी अजुनदेखील एखादे काम शोधू शकले नाही." खिन्न मनाने ती म्हणाली.


"अगं, प्रीती अजून लहान आहे. का तू कामाच्या मागे लागलेली असतेस?" मी तुला कधी काही म्हणालेय का?" राधामावशी.


" नाही गं. मलाच अपराधीपणाची सल टोचत असते." ती.


"हे बघ सोनिया उगीच भलते विचार मनात आणू नकोस. आता पैसे घे तुला जी खरीददारी करायची असेल ती कर. ठीक आहे ना? आता जे तुझे तेच माझे आहे गं." राधामावशीचा स्वर हळवा झाला तसे सॉरी म्हणून सोनियाने आपले कान पकडले.

********

आज किती दिवसांनी ती अशी बाजारात खरेदीला आली होती. शिल्लकीच्या पैशातून तिने प्रीतीसाठी एक मऊसूत कॉटनचा फ्रॉक घेतला. फुगे, क्लिपा, टिकल्यांची खरेदी केली. राधामावशी आणि स्वतःसाठीही साडया घेतल्या. सगळी खरेदी झाल्यावर निघताना वळणावर तिला मोगऱ्याच्या सु्वासाने अडवलंच. एक बेरकी पोरगी गजरे विकत होती. तिच्याकडे बघून गजरा घ्यायला तिला गळ घालू लागली. तिच्या नजरेसमोर मुंबईची चौपाटी उभी राहिली. तिथे असताना मोहनसोबत चौपाटीवर फिरायला गेल्याचा क्षण. तिथे दोघांनी केलेली पाण्याची उधळण. मिळून खाल्लेले खारे शेंगदाणे अन तिच्या केसांत माळलेला मोगऱ्याचा गजरा!

तिने कसलाही विचार न करता त्या मुलीकडून दोन गजरे घेऊन टाकले.

.

.

क्रमश:

*********

पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

********

फोटो गुगल साभार.




🎭 Series Post

View all