प्रीत नव्याने बहरली..

प्रेम कधीच संपत नाही..

प्रीत नव्याने बहरली..

 प्रेमकथा

©® आर्या पाटील

" मला भीती वाटते अमेय.. माझ्याने नाही होणार." शंतनु दीर्घ सुस्कारा सोडत म्हणाला.

" यु जस्ट चिल.. काहीच होत नाही. ती तुला खाणार नाही. आणि आज नाही तर पुन्हा कधीच नाही ही गोष्ट लक्ष ठेव.." शंतनुची टाय निट करत अमेय म्हणाला.

" तुला काय जातय बोलायला. माझी अवस्था मलाच माहित. आज कितीतरी वर्षांनी तिच्याशी बोलणार आहे असं. शब्द साथ देतील असे नाही वाटत.." त्याने पुन्हा एकदा लढायच्या आधीच तलवार टाकली.

" यु आर ब्रेव माय बॉय. मनातील भावनांना ओठांवर आण. तुझ्या प्रीतीच्या रंगात रंगू दे तिलाही. प्रेमाचा इंद्रधनुष्य बनून तिचं आयुष्य रंगीत कर. तिलाही गरज आहे या सोबतीची.." अमेयने पुन्हा एकदा त्याच्या मनाला उभारी दिली.

अमेयच्या शब्दांनी त्याच्या हृदयात खोल कालवाकालव झाली. एकटेपणाचा अंधार आता असह्य झाला होता. जीवनप्रवासात आता फक्त तिची प्रीतीने उजळलेली सोबत हवी होती. तिच्याही अंधारलेल्या आयुष्य आभाळी त्याला सोबतीचा चंद्र बनून चमकायचे होते. आपल्या शीतप्रकाशाने तिचीही पाऊलवाट प्रकाशित करायची होती. या जाणिवेसरशी मन खंबीर बनले आणि 'ती काय बोलेल' या विवंचनेचं रुपांतर 'ती जे बोलेल ते बोलेल' एवढ्या खंबीरपणात झाले.

आता अमेयनेही सुस्कारा टाकला.गेल्या वर्षभरापासून शंतनुच्या आयुष्यात प्रीतीचा बहर यावा म्हणून तो प्रयत्नशील होता. शंतनुचं जिच्यावर प्रेम होतं तिला भेटण्यापासून ते तिचा पक्का मित्र बनण्यापर्यंत त्याने सारच केलं होतं. थोडक्यात शंतनुला आणि त्याच्या तिला जोडून ठेवणारा एक आश्वासक दुवा होता अमेय.

तिच्या मनात दडलेल्या शंतनुविषयीच्या प्रेमभावनाही त्याने बरोबर हेरल्या..

अपूर्ण राहिलेली त्यांची प्रेमकहाणी पूर्ण करण्याची हिच ती वेळ होती.

आणि त्या दृष्टीने सगळ्याच योजना पठ्याने आखल्या होत्या.

शंतनुच्या कॉलेज बॅचच्या रियुनियनचा प्लॅन आखून आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला.

त्यात ती ही होतीच. किंबहुना ती होती म्हणूनच ही युक्ती सुचली त्याला..

ती अनघा. आधी शाळा आणि मग कॉलेजातही सोबत असलेली शंतनुची जवळची मैत्रीण.खरं तर त्यांच नातं मैत्रीची सीमारेषा कधीच पार करून गेलं होतं. सहवासातून मैत्रीला प्रीतीचा रंग चढून ती कधीच गोडगुलाबी झाली होती. एकमेकांशिवाय दिवस सरत नव्हता. तर रात्रीच्या स्वप्नावरही एकमेकांचेच अधिराज्य गाजत होते. शंतनुच्या मनाच्या जाणीवा ओरडून ओरडून प्रेमाची कबूली देत होत्या पण ओठांपर्यंत येता येता भीती आणि जबाबदारीच्या सावटाखाली विरून जात होत्या. भीती नातं सांभाळण्याची,आयुष्यभर ते टिकविण्याची.अन् जबाबदारी विधवा आई आणि वडिलांविना पोरक्या झालेल्या बहिणीची ओंजळ प्रेमाने भरण्याची.. प्रेमाचा नितळ प्रकाश कोणत्याही भीतीला नामोहरण करू शकतो आणि प्रत्येक जबाबदारीत खंबीरपणे सोबत राहू शकतो याचा विसर त्याला पडला. या सुंदर नात्याचा स्विकार करणे त्याला शक्य झाले नाही. अनघा प्रत्येक वेळी अप्रत्यक्षपणे आपल्या प्रेमाची कबुली देत होती आणि तो मात्र जाणिवपूर्वक सारच टाळित होता.

शेवटी जे घडायचं तेच घडलं.

बारावीची परिक्षा दिल्यानंतर अनघाच्या लग्नाचा घाट घातला गेला..

त्या दिवशी नेहमीप्रमाणे नदीकाठी भेटल्यावर अनघा स्वत:ला रोखू शकली नाही. त्याच्यापासून दूर जायची भीती तिला अगतिक करून गेली. समाजाचं बंधन टाळित ती सरळ त्याच्या कुशीत शिरली.

" माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी कुठेही आणि कशीही राहेन पण तुझ्याशिवाय राहणार नाही. मला फक्त तुझ्यात जिवंत रहायचे आहे." त्याला गच्च बिलगत ती म्हणाली.

त्यासरशी त्याच्या खोल काळजात अघटित घालमेल झाली. अघटितच म्हणावी लागेल कारण त्या एका निर्णयाने प्रेमाचा गुलमोहर बहरण्या आधीच करपून गेला.

" अनघा, माझंही खूप प्रेम आहे तुझ्यावर.

सुखाचा चंद्र बनून तुझ्या आभाळी सजायचे होते..

निळं आभाळ बनुन तुला व्यापायचे होते..

इंद्रधनुष्य बनुन तुझे आयुष्य रंगीत करायचे होते

अन् तुझ्यात जिवंत राहून मलाही जगायचे होते पण ते शक्य नाही गं..बाबा गेले आणि माझ्यातील अल्लडपणा संपला. आज माझ्या घराचा मी एकमेव आधार आहे. आईला सांभाळणं आणि छोट्या बहिणीचं उज्ज्वल भविष्य घडवणे हीच माझी एकमेव जबाबदारी.

आपल्या प्रेमाच्या शेल्याखाली मला ही जबाबदारी नाही झाकायची. तु खूप चांगली आहेस. तुला तेवढाच चांगला साथीदार मिळेल. माझ्या सोबत राहून फक्त परिस्थितीचे चटके सहन करावे लागतील.जीवनसंगिनी बनवून आयुष्यभराचं दु: ख नाही द्यायचं तुला.आपलं प्रेम एक गोड आठवण म्हणून मनात साठवून ठेवूया. एकमेकांचे होणे म्हणजे प्रेम नाही तर एकमेकांना सुखात ठेवणे हीच प्रेमाची परिभाषा. आणि मला खात्री आहे तु माझ्या सुखाचाही विचार करशील जे तुझ्या आनंदी जगण्यात आहे.. लग्नाला होकार दे. मुलगा चांगला आहे तुझ्या आयुष्याचा सोहळा होईल त्याच्या सहवासात.." शंतनु बोलत होताच की तिने त्याच्या तोंडावर हात ठेवत शांत केले.

" माझं सुख फक्त तुझ्या सहवासात आहे. मी देईन प्रत्येक अंधाऱ्या वाटेवर प्रेमाची पणती बनून तुझी सोबत.. फक्त मला तुझ्यात सामावून घे.." ती गयावया करित म्हणाली.

आता तो मात्र आक्रमक झाला.

" अजिबात नाही. मी नाही सामावून घेवू शकत तुला. तुझ्या आयुष्यावर माझं चांदणं कधीच उतरणार नाही. तुला लग्न करावे लागेल. माझ्या प्रेमाची शप्पथ आहे तुला." तिला मिठीतून दूर काढित तो म्हणाला आणि मागे वळला.

" थांब शंतनु मला सोडून नको जावूस. नाहीतर जिवंतपणी मरेन मी.." लहान बाळागत रडत ती म्हणाली.

" आणि जर मी थांबलो तर माझा श्वासही कायमचा थांबेल. मी जिवंत राहणे महत्वाचे कि तुझा हट्ट हे तुच ठरव.." हृदयातील दु:खावर खंबीरपणाचा मुखवटा चढवित तो म्हणाला.

" नाही अजिबात नाही.माझं प्रेम एवढं स्वार्थी नाही की त्याच्या मोबदल्यात तुझ्या श्वासांची गणती लागेल. मी लग्न करावे हिच तुझी इच्छा आहे ना. मग तुझ्या प्रेमासाठी करेन ती पूर्ण." ती निर्धाराने म्हणाली.

पाठमोऱ्या वळलेल्या शंतनूचा हात पकडत तिने त्याला तिच्या बाजूने वळवले..

पायांच्या टाचा उंच करित ओंजळीत त्याचा चेहरा पकडला. आपल्या अधरांना त्याच्या कपाळावर, गालावर विसावत तिने शेवटची निरवानिरव केली. डोळ्यांतील पाणी थांबत नव्हते.. तिला ते थांबवायचेही नव्हते. भावना दुथडी भरून वाहत होत्या. ओलेती स्पर्शखूण सोबत घेवून ती क्षणात मागे वळली आणि निघून गेली ती कायमची.

त्या दिवशी नदीकाठी तो आयुष्यभराचा रडला. तिच्या साऱ्याच आठवणी अश्रू बनून पाझरत होत्या..

आज या घटनेला तब्बल चाळीस वर्षे पूर्ण झाली.. सुटलेली सोबत पुन्हा एकदा त्याच वाटेवर नव्याने एकत्र येवू पाहत होती.

दरम्यानच्या काळात अथक परिश्रमाच्या जोरावर शंतनुने आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि एका चांगल्या कंपनीत जॉबही मिळविला. आपल्या आईच्या आणि बहिणीच्या आयुष्यात सुखाची बरसात केली.

" शंतनू या म्हातारीला आता तुला सुखात पाहायचे आहे. लग्न कर आणि तुझा फुललेला संसारमळा याची देही याची डोळा पाहण्याचे महत्‌सुख घाल ओंजळीत.." आईचं आर्जव नाही टाळता आलं त्याला.

शेवटी एका समजूतदार मुलीशी लग्न करून त्याने आईची इच्छा पूर्ण केली.. राधिका खूपच समजूतदार होती. अगदी सुखाचा संसार केला तिने. याच संसाराच्या वेलीवर अमेयच्या रुपाने सुखाचे फुल उमळले.. आणि आयुष्यात नव्या पर्वाची नांदी झाली. यासाऱ्यांत अनघा आठवण बनून त्याच्या सोबत कायमची राहिली. आठवणींच हे आभाळ त्याने राधिकासाठीही खुलं केलं. त्यांच्या नात्यातील पवित्रपणा एक पत्नी म्हणून तिच्या मनातील वेदनांवर गुणकारी ठरले.आणि तिनेही त्या आठवणी जपण्याचे ठरवले.

सुख दारी पाणी भरत असतांना दु:खाने मागोवा घेतला अन् क्षणात चिमणा चिमणीचा संसार अर्ध्यावरच संपला. अमेय पंधरा वर्षांचा असतांना एका अपघातात राधिका गेली. दोघेही मायेच्या सुंदर पर्वाला कायमचे मुकले.

नियतीने असा काही निशाणा साधला की सारच संपलं..

पण अमेयसाठी उभं राहणं गरजेचं होतं. आयुष्यभराचं दु:ख लपवित शंतनु अमेयची आईही झाला.

मात्र अमेयच्या निरागस नजरेतून वडिलांच्या वाट्याला आलेला एकाकीपणा सुटला नाही.

दरम्यानच्या काळात शंतनुने आपल्या कर्तव्यासोबतच कामावरील निष्ठाही ढळू दिली नाही. याची परिणिती म्हणून एका कंपनीचं सी.ई.ओ पद त्याला मिळालं..

समाजात प्रतिष्ठा वाढली आणि नावलौकिक मिळाला.

अगदी वर्षभरापूर्वी एका वृद्धाश्रमाच्या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून त्याला बोलावण्यात आले. अमेयही सोबत होता. आणि याच वृद्धाश्रमात विरलेल्या मनाच्या जाणिवा पुन्हा एकदा जाग्या झाल्या जेव्हा अनघा समोर आली.

पती गेल्यानंतर तिच्या मुलाने आणि सुनेने भार म्हणून तिला वृद्धाश्रमात आणून सोडले होते. सुखासाठी आणि आनंदासाठी जिच्यासोबत नातं तोडलं होतं तिला अश्या अवस्थेत पाहून शंतनु कमालीचा अगतिक झाला. डोळ्यांतून घळाघळा अश्रू ओघळू लागले. पण ती मात्र भग्नमूर्तीसारखी अचळ राहिली.

" नको रडूस शंतनु, जेव्हा मला सोडून गेलास तेव्हाच माझ्या दु:खात सहभागी व्हायचा हक्कही गमावलास तु.." तिचे ते शब्द धारदार शस्त्राप्रमाणे त्याच्या जिव्हारी लागले.

कार्यक्रम अर्धवट सोडून तसाच तो घरी परतला. शंतनुला असे अगतिक पाहून अमेयही भांबावला.

मनात साठवून ठेवलेल्या जुन्या प्रेमाच्या आठवणी त्याने आपल्या बेस्ट फ्रेण्ड सोबत अमेय सोबत शेयर केल्या.. आणि या साऱ्यांत अमेयला मात्र वडिलांच्या आयुष्यातील एकांतवास संपवण्याचा मार्ग सापडला. अनघाच्या रुपात.

मग सुरु झाला त्याच्या प्रयत्नांचा प्रवास. तिच्या मनात साठलेलं मळभ दूर करण्यापासून ते त्याच्या प्रेमाची जाणिव तिच्या हृदयात नव्याने निर्माण करण्यापर्यंत.

आणि आज या प्रयत्नांना आनंदांच गाव सापडलं होतं फक्त एक संध्याकाळ आणि शंतनुने प्रेमाची कबुल देत तिची भरलेली ओंजळ एवढच बाकी होतं..

शेवटी तो क्षण आलाच..

मनाच्या गाभाऱ्‍यातून खोल जाणिव उठली आणि त्याच्या निर्धाराला व्यापून गेली.

" अनघा, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.. मला पर्वा नाही समाजाची. मला फक्त तुला सुखात ठेवायचं आहे.. आणि तुझ्या सोबत सुखात राहायचं आहे.पिकलेल्या या पानाला तुझ्या आयुष्याच्या वहीत जागा देशील..? मी परतलो आहे त्या नदीकाठी जेथे आपली साथ सुटली होती. तु ही परतून येशील..? तुझ्याशिवाय अपूर्ण होतो मला पूर्णत्व देशील..? अनघा सांग तु माझी होशील..?" गुलाबाचं फुल तिच्या पुढ्यात धरत दुखरे गुडघे टेकवित शंतनु खाली बसला.

" वाह..!बाबा.जिंकलस आज तु.. याला म्हणतात प्रप्रोज करणं.." अमेय शिट्टी वाजवित म्हणाला.

तशी चंदेरी बटा ल्यालेली अनघा गालात हसली.

" बोल अनघा बोल.. ज्याची तु आतुरतेने वाट पाहिली तो क्षण तुझ्या समोर उभा आहे.. त्याला ओंजळीत घे.." अमेयने तिच्याही मनाला उभारी दिली.

" तु ज्या नदीतीरावर मला सोडून गेलास मी आजही तिथेच आहे आणि तशीच आहे. तुला चंद्रापरी जीवन आभाळी सजवून घ्यायला आजही आतुर आहे. माझंही खूप प्रेम आहे तुझ्यावर.." म्हणत तिने पुन्हा एकदा त्याचा चेहरा तसाच आपल्या थरथरत्या ओंजळीत धरला.. आणि अधरांनी त्याच्या कपाळावर स्पर्शखूण ठेवली..

एका अपूर्ण राहिलेल्या प्रेमाची पूर्ती त्यांच्या दुसऱ्या लग्नात झाली. आयुष्याच्या उतरणीचा प्रवास एकमेकांच्या सहवासात सुकर झाला.

©® आर्या पाटील.

कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.