नाव : सौ. शगुफ्ता ईनामदार- मुल्ला
विषयः ती हसली ( राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा )
उपविषय : परिचा जन्म
टीम : सोलापूर जिल्हा
--------------------------
भारत देश जो आपल्या स्वातंत्र्याचा ७४ वा आझादी का अमृतमहोत्सव साजरा करत होता. याच आपल्या भारतात काही बुरसटेलेले विचार , धुळ साचलेल्या प्रथा, पद्धती ज्याच्यातून कदाचित आज देखील देश अजून स्वतंत्र्य झाला नसावा. चंद्रावर पाय ठेवून देशाचा झेंडा चंद्रावर रोवून येणाऱ्या मुली ज्या देशात आहेत. त्याच देशात गर्भलिंग चाचणी चा प्रकार देखील दुर्लक्ष करण्यासारखा नाही. घरातील खर्चाचा हिशोब करता करता कधी काय एक स्त्री आर्थिक सत्ता सांभाळू लागते. काल जिने मार सहन करून स्त्री शिक्षणा करिता पुढाकार घेतला तर आज त्यांच्या मुली उच्चशिक्षित झाल्या. भारताच्या लेकी डॉक्टर, वकील, राष्ट्रपती , संसद भवन मधील खुर्च्या या लेकिंनी सांभाळल्या, कलेक्टर झाल्या. पण आपल्या याच देशात जिथे मुलींच्या जन्माचा सोहळा होतो का? कदाचित तुमचे उत्तर होय असेल. पण खरच जी आकडेवारी आपण पाहतो जो टक्का आपल्याला दिसतो काय मनाचा दुय्यम दर्जा जो लेकिला मिळतो. तो या आकडेवारीत दिसतो का? लोकसंख्या निर्मुलन राबविले मात्र सरकार विसरले कायदा बनवताना कि \"हम दो हमारे दो\" नाही तर यापुढे आणखी एक वाक्य अधोरेखित करावे \" हम दो हमारे दो , फिर चाहे कुछ भी हो\" कारण ज्या घरात प्रथम मुली जन्म घेतात त्या घरांत त्याचे स्वागत धन कि पेटी म्हणून जरी होत असले तरी आज देखील समाजात एखाद्या स्त्रिला प्रथम मुलीला जन्म दिल्यानंतर दुसरा मुलगा व्हावा या अपेक्षा आहेतच. असतील ना तुमच्या अवती भोवती घरात ? बरं मला पहिला मुलगा झाला यानंतर भेट देण्यास येणाऱ्यांमधे माहेर - सासर सोडल्यास बाकी आप्तेष्टांच्या तोंडी हे वाक्य आवर्जुन ऐकलं आहे मी "जिंकलीस बाई एकदा ". ते कोणाला उद्देशून बोलायचे ते कळाल. आता मुलींसाठी नवस मागणारे लोक असले तरी मुलींना जन्मानंतर आपल्या अधिकारासाठी आता विधात्यालाच साकडं घालण्याची वेळ आली आहे. ही कथा ही अशाच दोन कुटूंबाची आहे.
स्थळ : सोलापूर शहर व सोलापूर कर्नाटक सिमा येथीलच दोन कुटूंब. कुटूंब तसे चांगलेच होते दोन्ही ही. वंजारी कुटूंब हे कर्नाटक महाराष्ट्र सिमेवर वास्तव्यास होते. तर धोडमनी हे कुटुंब शहरात वसलेले होते. धोडमनी या कुटूंबात नावाप्रमाणे कुटूंब मोठे होते. पाच मुले चार पुढे यातील फक्त तीन मुले उरतात व या तिघांना दोन- दोन असे मिळून नऊ मुल होती. फक्त एकच मुलगी नऊ जणांत. तरी लाड इतके नव्हते कारण ; या कुटूंबात मुलगी नसणे सौभाग्य यात ही मुलगी घरातील शेंडफळाने प्रेम - विवाह केल्या नंतर ची होती. आधीच सर्व नाराज त्यात ही एक. म्हणून घरातून बाहेर काढण्यात आले. तर वंजारी कुटूंब हे खेड्यात ज्यांना चार मुली व दोन मुले होते. मुलींची लग्न झाली होती. दोन मुलांपैकी एक मुलगा अपंग असल्याने लग्न न झालेला. तर लहान मुलगा श्रेयस हा शिकत होता. श्रेयस चे शिक्षण पूर्ण होताच त्याने गावातच व्यवसाय सुरू केला. कॉलेज मधीलच एका मुलीशी नशिबाने त्याचे विवाह संपन्न झाले. लग्नाच्या दोन वर्षांनी पाळणा हलणार याची चाहूल लागली.
धोडमनी कुटूंब देखील वंजारे कुटुंबाच्या गावा शेजारील गावाचेच होते. शहर सोडून, काही वाव विवाद झाल्याने ते पुन्हा गावी स्थायिक झाले. त्यांचे शेडफळ वगळता दोन मुले सुना नातवंडे सर्व गावी स्थायिक होतात. गावी सर्व भावकीतील लोक एकत्र होती. यांच्याच एका सुनेला पुन्हा दिवस गेले. रसिका धोडमनी यांची सून. पुन्हा कोणी तरी येणार या आशेने जितकी खुश होत त्याहून जास्त काळजीत होती. जर मुलगी झाली तर ? धाकट्या जावेला काढल तस आपले हाल होतील या भितीने ती अस्वस्थ होत होती. पुन्हा लिंग चाचणी यावर तिला घाम फूटत होता. परत जाप, तप, नवस, टोटके सुरू. रसिकाला आधी दोन मुल होती म्हणून यावेळी इतका त्रास नव्हता. तरी रसिका जीव मुठीत धरून होती. एकेदिवशी सासू चे बोलणे ती ऐकते " रसिका ला आधी दोन मुलच आहेत, मग यावेळी मुलगाच ". सासू ची जाऊ विचारते जर "समजा झालीच मुलगी मग?"
यावर रसिकाची सासू अगदी सहजतेने म्हणते " मग काय करायच बंदोबस्त ".
हे ऐकून रसिका घाबरली. तिने नवऱ्याला विनवणी केली की आपण गर्भपात करून घेऊ उगाच जर मुलगी झाली तर तिला काही होणार हे मी बघू शकत नाही. विनवण्या फोल ठरल्या मग स्वतःच दवाखान्यात जाऊन रसिका विचारपूस करते तर उशिर झाला होता आता. यापुढे काळजी , भिती यातच दिवस उजाडत व मावळत होता.
एकेदिवशी रसिका तपासणी करिता दवाखान्यात आली असता शेजारच्या गावातील वंजारे कुटूंबाची सून म्हणजेच श्रेयस ची बायको पूजा तिथे आली होती. योगायोगाने रसिका व पूजा यांच्यात चांगलाच बंध निर्माण झाला. दोघींना सारखेच दिवस गेले होते. पूजा साठी आई होणे तेवढे सोपे नव्हते कारण तिच्या ट्यूब मध्ये प्रॉब्लम होती. पण देवाने दिल तर त्याला कोण टाळणार. पूजा खूपच खूश होती. तिच्या जिवाला धोका असल्याचे कळूनही.
दिवस सरत गेले. प्रसूतीचा काळ जवळ आला. पूजा व रसिका यांची प्रसूतीची तारीख देखील मागे - पुढेच होती. पूजा ला प्रसूती कळा सुरू होतात व दवाखान्यात दाखल करण्यात येते. डॉक्टर पूर्ण रात्र वाट पाहतात नॉर्मल प्रसूतीची कारण प्रसूती वेदना सुरु होताच दवाखान्यात आणले गेले होते. दिवस भरायला तरी अजून चार दिवस बाकी होते. दिवस अजून उजाडत होता तोच बाळाच्या रडण्याने सर्वत्र आनंद पसरतो. त्याच रात्री रसिका देखील ॲडमिट होते तिची प्रसूती फार त्रासदायक व धोक्याची नव्हती म्हणून लगेच बाळ जन्माला आलं आणि ज्याची भिती होती तेच घडले यावेळी मुलगी होती. प्रसूती नॉर्मल होती. मुलगी आहे ऐकताच रसिका चा जीव तेवढा जायचा राहिला. रसिकाने हिम्मत केली व डॉक्टरांना विनंती केली. आईच काळीज शेवटी व तिच्या विनंती ला डॉक्टरांची साथ मिळाली. डॉक्टरांनी रसिकाच्या कुटुबियांना मुलगा झाला असून तो क्रिटीकल आहे. कोणालाही पाहता येणार नाही असे कारण देऊन त्या गोंडस जीवाला एक संधी जगण्याची मिळवून दिली. पुजा ला मुलगा झाला होता व त्याला काचेत ठेवण्यात आले होते. १५ दिवसांनी पुजा ला घरी सोडण्यात आले व रसिकाला बाळाविनाच घरी सोडले गेले. डॉक्टर तसे खूप चिंतेत होते. जर खरं काय ते कळाल तर मुलीचा जीव जाणार व खोटं बोलून काही दिवस निघतील पण किती दिवस लपणार हे सर्व? रसिकाचे लाड फार होत होते मुलगाच झाला म्हणून. रसिकाने माहेरी हे सत्य सांगितले त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यावेळेस मुलगी जिंकणार होती म्हणून नशिबाने पुन्हा साथ दिली माहेरच्यांनी पुढील काही महिने त्यांच्याकडे मुलगी व नातू यांना नेण्याकरिता विनवणी केली व होकार ही मिळाला . रसिका मग आपल्या बाळासोबत तीन महिने माहेरी राहिली. जो पर्यंत माहेरी होती तो पर्यंत ती मुलगी असल्याचे कळू दिले नाही. तीन महिने झाले व बाळ - रसिका परत सासरी आले. आता मात्र जीव हातात आला रसिकाचा. एके दिवशी ही बाब घरातील मोठ्यांच्या निर्दशनास आली व सर्वांनी चांगले राहण्याचे ठोंग रचून मुलगी ६ महिन्यांची होण्याची वाट पाहिली.
दुसरीकडे पुजा वर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिचे बाळ २ महिन्यातच दगावले. ती स्वतःला सावरु शकत नव्हती. घरातील सदस्यांनी पूर्ण साथ व हिम्मत दिली. एकेदिवशी पहाटे घरातील कुत्रा हा श्रेयस ला रस्त्याच्या कडेला घेऊन जातो. तिथे एक बाळ जीवाच्या आकांताने रडत होते. त्या बाळाला नीट झाकले देखील नव्हते हे पाहून श्रेयस त्या गोंडस जीवाला उचलून जवळ घेतो. इतक निरागस ते बाळ पाहताक्षणी श्रेयस चे डोळे भरून येतात. तो त्या बाळाला घरी आणतो. घरातील सदस्य बाळाला पाहतात तर काय ? ती मुलगी होती. श्रेयस ला व त्याच्या कुटूंबाला जे कळायच होत ते कळत. श्रेयस तिला आपली मुलगी म्हणून वाढवण्याचा निर्णय घेतो. पुजा च्या ओटीत पुन्हा बाळ येताच मायेचा झरा पाझरतो व बाळ न जाणे कधी पासून भूकेने व्याकूळ झाले होते. त्या परिला तिची आई कळाली व ती हसली. तिचे निरागस मृदु हसणे पाहून पुजाच्या चेहऱ्यावर एक चमक आली.
रसिका आपल्या परिसाठी दिवसरात्र प्रार्थना करत होती. धड मरण येत नव्हत की जगू वाटत नव्हते. पुजा व श्रेयस च्या बाळाची चर्चा संपूर्ण गावभर पसरली. सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले व परिसारख्या त्या चिमुकलीला परी हे नाव दिले . चर्चे गावाबाहेर पडले व कुठूनतरी रसिका ला घडलेला प्रकार कानी पडतो. आपली मुलगी जीवंत असल्याचे रसिकाला कळाले. आज तिच्या तील मातृत्व खऱ्या अर्थाने सुखावले. मुलगी सुखरूप व योग्य हातात असल्याचे कळताच रसिका मागील वर्ष भरात आज हसली होती.
परिच्या जिवाला कसलाच धोका नको म्हणून श्रेयस ने संपूर्ण कायदेशीर कारवाई करून परिला आपली लेक म्हणून ओळख दिली. यानंतर तो शहरात स्थायिक झाला. २६ वर्ष तो आपल्या कुटुंबासोबत शहरात होता. परी २६ वर्षांची झाली स्पर्धा परिक्षा पास होताच आयपीएस अधिकारी म्हणून तिची निवड करण्यात आली. गावातील प्रथम मुलगी आयपीएस आजवर गावातून कोणी मुलगा देखील एवढ्या मोठ्या पदावर नव्हता. १५ ऑगस्ट रोजी तिचा गावात सत्कार सोहळा होता. प्रमुख अतिथी म्हणून स्वातंत्र्य दिनी उपस्थित राहणार होती. धोडमनी कुटूंब देखील याच गावाच्या शेजारी होते. परी च्या येण्याची खबर सर्वत्र एका सुंगधा सारखी दरवरळी होती. रसिका ला कळत ही आपलीच मुलगी आहे जी पुजा ने सांभाळली. संपूर्ण ग्रामस्थ तसेच खास महिलांना या कार्यक्रमाचे आमंत्रण होते. परिला देखील मोठी होईपर्यंत या गोष्टीचा सुगाव लागला होता की ती श्रेयस- पुजा ची मुलगी नाही. पण परी ने त्यांना आपले आई - वडील म्हणून मनाने स्विकारले होते. यांच्यात कधीच परकेपणाची भावना नव्हती.
परी जेव्हा सरकारी गाड्याच्या ताफ्यात , सरकारी गाडीतून जेव्हा रुबाबात खाली उतरली. रसिकाला आपली लहानशी ६ महिन्यांची गोंडस परी आठवली. आज ती परी पोलिसाच्या वर्दीत गावकऱ्यांसमोर उभी होती. याच गावातील रस्त्याच्या कडेला २५-२६ वर्षापूर्वी टाकून दिलेली मुलगी. आज सन्मानाने फुलांच्या वर्षावात जल्लोषात गावात प्रवेश करत होती. प्रत्येक गावकऱ्यांची नजर तिच्यावर होती. जशी परी पुढे चालून येत होती गर्दीतून एक बाई कडेला येऊन तिला सॅल्यूट करते व भरल्या डोळ्यांनी हात जोडते. संपूर्ण गर्दीत या बाईने परीचे लक्ष वेधले ती बाई दुसरी कोण नसून परीची जन्मदात्री रसिका होती. परी तशीच स्मित हास्य देत पुढे चालत राहिली. झेंडा फडकवून राष्ट्रगान झाल्यानंतर परी चा सत्कार होतो. श्रेयस - पुजा चे डोळे पाणावतात. परी जशी भाषणा करिता स्टेज वर माईक समोर पोहोचते तशी नमस्कार करून संपूर्ण स्त्रियांकडे एक नजर टाकून आई म्हणून संबोधते व स्मित असे हसते. संपूर्ण स्त्रिया टाळ्या वाजवतात व एकीकडे रसिका आणि पुजा दोन्ही मागे पुढे उभ्या असतात. त्या दोघी परीला पाहून स्मित हसतात.
-----------
समाप्त
लेखिका : सौ. शगुफ्ता ईनामदार - मुल्ला.