Jan 28, 2022
प्रेम

प्रवास... प्रेमाचा...प्रेमापर्यंतचा

Read Later
प्रवास... प्रेमाचा...प्रेमापर्यंतचाप्रवास...प्रेमाचा...प्रेमापर्यंतचा (लघुकथा)


भर दुपारची वेळ. छोट्या तन्मयला कुशीत घेऊन नेहा जरा पडली होती. झोप कुठली येणार? डोळ्यात कित्येक महिने झाले आसवांशिवाय दुसऱ्या कोणाचा मुक्काम नव्हता. दारावरची बेल वाजली. अगदी नकोशा भावनेनं ती दार उघडायला गेली. नकोशा भावनेनेच. सगळ्यांचं दुःख मोठं होतं. जो तो आला, आपलं दुःख हलकं होईपर्यंत राहिला. त्यानंतर प्रत्येकालाच आपला प्रपंच होता, सगळेजण पुन्हा आपल्या आपल्या प्रपंचात व्यस्त. हीचं दुःख कुरवाळायला वेळ कोणाकडे होता.  म्हणूनच आता कुणाच्याच सहानुभूतीच्या नजरा नको होत्या.

दारावर पोस्टमन होता. तिने सही करून त्याच्याजवळचा स्पीड पोस्टचा लिफाफा घेतला. शासन मुद्रित लिफाफा होता. थरथरत्या हाताने तिने तो लिफाफा उघडला. डोक्यात विचारांच्या ढगांची गर्दी, अन् बाहेर वातावरणातही ढगांची गर्दी, सगळंच अंधारून आलेलं, सगळंच अस्पष्ट, त्यात आतमधल्या पत्रावरची अक्षरं कशी वाचता येणार होती.
"दुःख करावं की अजून काही. स्वतःपुरता विचार केला तर दुःखच होतं आणि तुझा विचार केला तर तो अभिमान होता. म्हणूनच या दुःखाला अभिमानाची झालर चढवली आणि आता तेच दुःख तुझ्या विचाराने माझी मान गर्वाने उंच करतंय." स्वतःलाच समजावत, डोळ्यातलं पाणी पुसत नेहा खिडकीजवळ येऊन उभी राहिली. बाहेर पाऊस पडत होता पण डोळ्यातला पाऊस मात्र तिने जाणून बुजून दूर सारला होता. अश्रूंची गर्दी कमी झाली तसा डोळ्यासमोर भूतकाळ स्पष्ट दिसत होता.

नेहाने अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. वर्गात पहिल्या तासाला सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. सरांनी सगळ्यांना \"आपापली नावं सांगा आणि पुढे काय करायची इच्छा आहे ते पण सांगा\" असा प्रश्न विचारला. प्रत्येक जण उठून उत्तर देत होता. कोणाला डॉक्टर बनायचं होत तर कोणाला इंजिनिअर, कोणाला आर्किटेक्ट तर कोणाला शास्त्रज्ञ व्हायच होतं.

"मी अखिलेश देशमुख, मला सैनिक व्हायचंय. भारतीय लष्करात सामील होऊन मला या देशाची सेवा करायची आहे." एका मुलाच्या उत्तराने सगळ्या वर्गाने त्याच्याकडे कुतूहलाने पाहिलं. एक वेगळीच चमक त्याच्या डोळ्यात होती. अखिलेश खूप मोकळ्या स्वभावाचा होता, हुशारही होता. सगळ्या वर्गातल्या मुलामुलींसोबत त्याची लवकर मैत्री झाली होती, शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी झाला होता. नेहासोबतही त्याची चांगली मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही नव्हतं कळलं.  दोघांचं वय तसं अवखळच होतं. पण अखिलेश मात्र वयाच्या मानाने खूप समजूतदार होता, अखिलेशचे आईवडील त्याच्या लहानपणी वारले होते, आपल्या मामा-मामी जवळ राहून तो शिक्षण पूर्ण करत होता. नेहाने व्यवस्थित शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी त्याची होती.


"अखिलेश तुझं पहिलं प्रेम कोणावर आहे?" नेहा त्याला नेहमी हा प्रश्न विचारायची.
"देशावर." अखिलेशच उत्तर ठरलेलं असायचं. आपलं नाव अखिलेशने कधीतरी घ्यावं अशी नेहाची भाबडी इच्छा होती. पण अखिलेशला ती चांगलं ओळखून होती.

काळ पुढे गेला. अखिलेशने भारतीय लष्करात भरती होण्यासाठी लागणारं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि तो लष्करात दाखल झाला होता. वर्षातून एक दोन वेळा तो सुट्टीसाठी गावी येत होता तेव्हा त्याची आणि नेहाची भेट होत होती. नेहाने सुद्धा विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली होती. नेहाच पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचे आई वडील तिच्यासाठी वरसंशोधन करत होते. अखिलेश सुट्टीत आल्यावर तिने त्याच्याजवळ ही गोष्ट सांगितली. दोघांनी मिळून दोघांच्या घरी ही गोष्ट सांगितली. अखिलेशच्या घरून लग्नाला विरोध नव्हता पण नेहाच्या घरून विरोध होता. नेहाच्या घरचे लोकं थोड्या जुन्या विचारांचे, जात-पात मानणारे होते. नेहाच लग्न आपल्या जातीतल्याच मुलाशी करायचं असा त्यांचा अट्टाहास होता. पण नेहा दुसऱ्या कोणत्या मुलासोबत लग्न करायला तयार नव्हती. घरच्यांचा विरोध पत्करून तिने अखिलेश सोबत लग्न केलं होतं.

लग्नाच्या पंधरा वीस दिवसांत अखिलेशला पुन्हा नोकरीवर रुजू व्हावं लागलं होतं.
"माझं आयुष्य खूप बेभरवशाचं आहे गं नेहा. तू तुझ्या पायावर उभं असणं खूप गरजेचं आहे." अखिलेश असा बोलायला लागला की नेहा खुप रागे भरत होती. आपण इथे नसताना नेहाने पुढचं शिक्षण घेऊन नोकरी करावी अशी त्याची इच्छा होती. आणि नेहाने ती पूर्ण केली होती. लग्नानंतर अर्ध वेळ नोकरी करत तिने बी. एड. ची पदवी मिळवली होती. एका सैनिकी शाळेत तिला विज्ञान शिक्षिकेची नोकरी मिळाली होती.

वर्षातून एक-दोन वेळेस अखिलेश सुट्टी घेऊन येत-जात होता. बाकी नेहा सोबत फोन वर बोलणं होतं आणि पत्र पाठवणं होत होतं. दोघेही एकमेकांच्या पत्राची चातक पक्ष्याप्रमाणे वाट बघत होते. तन्मय येण्याची चाहूल लागली आणि ही गोष्ट सुद्धा अखिलेशला फोनवरच सांगायचं काम पडलं म्हणून नेहा नाराज झाली होती. या काळात तरी अखिलेश सोबत असावा अशी तिची इच्छा होत होती पण त्यावर ती काही करू शकत नव्हती. तन्मयच्या जन्मानंतर जवळपास पंधरा दिवसांनी अखिलेश सुट्टीसाठी आला होता. तन्मयच्या पहिल्या वाढदिवसाला अगदी वेळेवर येऊन अखिलेशने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनतर अखिलेश गेला तो तिरंग्यात लपेटून वापस आला.

नेहा तिच्या हातातलं पत्र वाचत होती. भारत सरकारने अखिलेशला मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान केले होते. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या समारंभात सामील होण्यासाठी ते पत्र होतं. नेहा समारंभात गेली होती. पांढऱ्या शुभ्र साडीतली नेहा आणि तिचा हात धरून भारतीय सैनिकाचा वेष घातलेला छोटा अडीच वर्षाचा तन्मय सगळ्यांच लक्ष वेधून घेत होता. निवेदक अखिलेशची शौर्यगाथा वाचत होती पण नेहाचा कंठ दाटून आला होता, तिला त्यातला एक शब्दही ऐकवल्या जात नव्हता. अश्रूंच डोळ्यांसोबत युद्ध सुरू होतं, त्यांना बरसायचं होतं. पण डोळ्यांच्या कडांनी त्यांना थोपवून धरलं होतं. माननीय राष्ट्रपतींच्या हातून पदक स्वीकारून ती बाहेर पडली होती. तन्मयचा हात हातात घेऊन चालत चालली होती. मघाशी निवेदकांनी अखिलेशची वाचलेली शौर्य गाथा कानात घुमत होती.

अखिलेशला जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सीमेवर रात्री गस्त घालत असताना चार-पाच सशस्त्र आतंकवादी घुसखोरी करताना दिसले होते. आपल्या तुकडीतल्या सैनिकांना सोबत घेऊन त्यांनी सगळ्या आतंकवाद्यांना यमसदनी पोहोचवलं होतं. अखिलेशच्या तुकडीतील बरेच सैनिक जखमी झाले होते, त्या सैनिकांना सुरक्षित ठिकाणी नेताना दबा धरून बसलेल्या एका आतंकवाद्याने मागून त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. रक्तबंबाळ अखिलेश खाली कोसळला होता, शंभर हत्तींचं बळ आणून तो कसाबसा पाठीवर वळला आणि त्याने त्या आतंकवाद्याला समोरून गोळ्या झाडल्या.


"समोरून वार करतो तोच शूरवीर असतो." अखिलेश त्या आतंकवाद्याकडे बघत म्हणाला. मोठ्या गर्वाने अखिलेशने प्राण सोडला होता. त्याच्या या शौर्यासाठी त्याला शौर्यचक्र मिळालं होतं.

नेहा तन्मयचा हात हातात घेऊन चालत जात होती, इतक्यात तिचा दुसरा हात कोणीतरी पकडला. नेहाने दचकून पाहिलं
"अखिलेश". नेहा पुटपुटली. त्याने इशाऱ्यानेच तिला रडू नको आणि चेहऱ्यावर हसू ठेव असं सांगितलं.
तिने तिचा तोच भाबडा प्रश्न परत विचारला," अखिलेश, तुझं पहिलं प्रेम कोणावर?"
"देशावर." त्याने तसच हसून उत्तर दिलं. इतक्या वेळ अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला होता.

"आई, मी पण मोठ्ठा झालो की बाबांसालखा शत्लूला ढिशुम ढिशुम कलून मालनाल." छोट्या तन्मयच्या आवाजाने नेहाची तंद्री भंग झाली. तिने बाजूला पाहिलं अखिलेश तिथे नव्हता.


"हो बेटा.. वीरपत्नी झाले.. वीरमाताही आनंदाने होईल." नेहाने तन्मयला उचलून मिठीत घेतलं. सुरू झाला होता एक नवीन प्रवास.. प्रेमाचा... प्रेमापर्यंतचा.

समस्त वीरमाता, वीरपत्नींना समर्पित..

फोटो-गुगलवरून साभार

© डॉ. किमया मुळावकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न