प्रवास... सुरूवात नात्याची भाग ४

लग्न झालेल्या जोडप्याचा देवदर्शनाचा प्रवास... सोबत मस्ती धमाल आणि रोमान्स
समोर बघितलं तसे सगळे शॉक झाले....
आज जोतिबाचा डोंगर म्हणजे जणू माणुसमय झाला होता...
मुंगी सारखे माणसे... खूप गर्दी... इतकी की पाय ठेवायला जागा नव्हती..

संपूर्ण मंदिराला वेढा घालून भक्तांची रांग होती.. आता जर रांगेत उभे राहिले तर दर्शन भेटायला त्यांना दुसराच दिवस उजाडला असता...
अवनी आणि सागर मनातून खुपचं निराश झाले..

" आररररर... काय लेका... समद्यास्नी याच वर्षाला लगीन करायचं व्हतं व्हयं... आता कवा दर्शन व्हायचं जोतिबाचं?? अयं दादा कसं करायचं आता??"

सागर कडे बघून अजा बोलला... सगळी गँग गर्दी‌ बघूनच विचारात पडली....कसे बसे सगळी गँग.... दरवाजा जवळ पोहचली.. पण आता... आत जाऊ का नको हाच विचार करत होती....

शेवटी विलास मामानेच शांतता आणि सगळ्यांची तंद्री भंग केली‌...

" आरं लेका... सागऱ्या..... आता रांगत उभं राहून काय बी होणार नाय... त्यापरास‌ इथंनच दोघांस्नी नमस्कार करा जोतिबाला... पुढंच्या वक्ताला येतो बोला...."

" ठिक आहे मामा..." सागर

अवनी आणि सागरने... दरवाज्यातील उंबऱ्यावर माथा टेकवून नमस्कार केला....

दोन मिनिटे दोघांनी मनोभावे साद दिली जोतिबाला...

यमाईच दर्शन पण पायऱ्यांवरूनच घेतलं सगळ्यांनी....

" मामा आता कुठे तीनच वाजले आहेत... जोतिबाच दर्शन नाही झाले पण..... गाडी आहे तर... पन्हाळ्याला तरी जाऊया का??" सागर

मामा मोठा माणूस ( मोठा म्हणजे वयस्कर.. उगाच मोठा म्हणजे पैसेवाला समजू नका बरं) एकच असा त्यांच्या सोबत त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी घरातून आला होता... त्यामुळे सागरने त्यांनाच विचारून घेणं योग्य समजले....‌

" ठिक हाय... जाऊया की समदी जन.... पण इथंवर आलोय तर थोडी  इथली हवा लागू द्या समदास्नी आन् खास करून सुनबाईला बघू द्या इथला परीसर....." मामा

सागरला मामाच म्हणणं पटलं... कारण एकदा मुंबई मध्ये परत गेले की त्यांना दिवाळी किंवा मे महिन्यात सुट्टी मिळेल तेव्हाच यायला भेटेल... आता वेळ आहे तर देवदर्शन नाही मिळालं तरी निसर्ग बघून घ्यावा.. असा विचार करून सागरने ड्रायव्हर ला गाडी डोंगराच्या थोडं वर नेण्यासाठी सांगितली...

गाडी मोकळ्या मैदानात पार्क करून सगळे डोंगरावर फिरू लागले...

फिरून फिरून... सगळा परिसर बघून झाल्यावर.. सगळे दमले होते... आराम करायला आणि ताजी हवा खायला सगळे मस्त बसले होते... आपापले ग्रुप बनवून..
पूजा... महेंद्र.. एकत्र आणि सिद्धू आपला वॉकमेन ( त्याकाळी कॅसेट टाकून गाणी ऐकण्याचे साधन) कानाला लावून बसला होता... एका बाजूला.... तर अजा... गण्या...‌ आणि धनु दुसऱ्या बाजूला गप्पा मारत बसले होते.... सागर अवनी लांब लांब बसले‌ असले तरी एकमेकांना बघणं चालू होतं त्याचं... मामा आणि सरू एका साइडला बसून समोरचा निसर्गाने नटलेले मनमोहक दृश्य बघत होते... आणि सोबतच आणलेल्या कॅमेरा तून सगळं काही त्यात कैद करत होते.... सोप्या नेहमी सारखा गाडीत होता... गाडी अवनीच्या पप्पांनी पाठवली होती पण आता जणू‌ सोप्या तीचा मालक झाला होता... अजिबात गाडी सोडत नव्हता...  ड्रायव्हर सोबत तर त्यांने एक शब्द पण बोलला नसेल... पण ना तो गाडीतून बाहेर निघत होता... ना कोणात मिक्स होत होता.. बस गाडीवर कब्जा करून बसला होता..

" भैया... काय कामाची नाय बघ ती‌... इतकं  नगं बगूस.... मेकअपच दुकान हाय... तूझ्याच्यानं नाय पेलवायचं बघ हे.... अवघड काम हाय हे लेका.."

धनू पुजा कडे एकटक बघणाऱ्या अजाला म्हणाली...

" गपं बसती का गं तु धने... आसं काय बी नाय.. फकस्त बगत होतो.. तिलाच बगाया मला काय गरज हाय... अश्या लय जणीं इथं हायत्या... हिलाच काय सोनं लागलंय व्हयं..." अजा

" व्हयं काय... मग बरं हाय... पण आदुगरच सांगते हे खुळ्या डोसक्याचं पाखरू आपल्या घरात नगं हाय... उगीच पीरपीर करती नुसती येताजाता... माझी भावजय अशी निघाली तर म्या... तर म्या काय तुला या जन्मात जीता सोडणार नाय बग..."

धनू बत्तिशी दाखवत अजाला म्हणाली...
त्यावर अजाने डुकार मुसंडी मारतात तशी धडक मारली धनूला..

बिचारी धनू कळवळली...

इकडे नवं दाम्पत्य बरोबर अजून एक जोडी लग्ना आधीच सराव करत होती लग्न झाल्यावर देवदर्शनाला जाण्याची...

पूजा आणि महेंद्र....

महेंद्र जरी अवनीला बहिण मानत असला तरी पूजा वर जीवापाड प्रेम करत होता... अवनीला बहिण मानल्या वरून पूजा आणि महेंद्र मध्ये खूप वाद पण झाले होते.. पण दर वेळी त्याचा एकच ठेका... अवनी माझी बहिण आहे आणि तु माझी होणारी बायको... विषय संपला....

" अरे माही... हे बघ!! किती छान आहे रे इथे सगळं... खूप मस्त वाटतेय.. असं वाटतंय इथेच राहावं... तुला काय वाटतंय..." पूजा

" मला ना... मला वाटतंय तो अजिंक्य फारच बघतोय तुझ्याकडे... त्याला बघावं लागेल एकदा.." महेंद्र

" ओय हॅलो... अवनी दी चा दीर आहे तो... उगाच काही बोलू नकोस त्याला... आणि तसं पण आपण लगेच जाणार आहोत.. तो आता बघत असेल तर बघू दे.. इकडे काही ड्रामा करू नकोस... प्लीज!!" पूजा

" नाही गं... तेवढं कळतं मला... पण तो काही बोलला तर मग मी त्याला बरोबर सांगिन काय सांगायचे ते..." महेंद्र

" अयं भावड्या... निसताच बघणार हायंस की काय बोलणार बी हाय??"

गण्या अजाला बोलला...

" कशाचं... अन् काय बोलायचं हाय.." अजा

" आरं ती वहिनीची बहिण आवडती ना तुला.. मग बोल की तीच्या संग..." गण्या

" नगं... ती शिकलेली हाय.... मला का पसंत करील‌... अन् मला वाटतंय तो महेंद्र... त्याच आन् तीच झंगाट हाय... उगा कशापायी राडे करायचे... जाऊ दे..." अजा

" लेका त्यो... भाऊ हाय ना व्हं.. वैनीचा... मग तो तीचा बी भावच लागलं की... तु फकस्त एकवार इचारून घे... नाय म्हनाली तरी ठिक हाय... पर व्हयं म्हणाली तर मग पुढच्या वरसाला बार उडवू कि तुझा बी..." गण्या अजाला डोळा मारत म्हणाला

" असं म्हणतुयासं... मग चल इचारू तीला बघू काय म्हणती..." अजा लगेच पूजाला विचारण्यासाठी गेला... त्याच्या मागून गण्या पण पूजा महेंद्र होते तिथे गेला!!!!


________________________________________

अजिंक्य आपल्या मनातलं पूजाला सांगू शकेल कि त्या आधीच महेंद्र त्याचा बॅंड वाजवेल...

बघूया काय होत पुढच्या भागात....
"एक प्रवास... अंतरंगी"
धन्यवाद ☺️


🎭 Series Post

View all