प्रवास... सुरूवात नात्याची भाग ३

लग्न झालेलं जोडप्याचा देवदर्शनाचा प्रवास... सोबत मस्ती धमाल आणि थोडा रोमान्स
" स्वप्निल राव... आम्ही काय म्हणतो.. जरा वाईच या अंगाला येताय काय... नाय जरा लईच महत्त्वाचं सांगायचं व्हतं.. बग म्हन्जी तुमच्या साठी एक काम हाय... या की वाईच जरा...."

गण्या सोप्याला गाडीत बसायच्या आधी बोलला..

महालक्ष्मीचे दर्शन झाल्यावर सगळे पुढे जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी निघाले... आधी बसले तसेच परत सगळे गाडीत बसत होते.. गण्या काय हुक्की आली काय माहित तो सोप्या कडे जाऊन त्याला बोलावू लागला...

" मी का येऊ... मला ठावूक हाय.... तु मला कशापायी बोलवायला लागला हायसं... म्या नाय यतं तुझ्या संग.." सोप्या

" आरं लेका‌‌... आम्ही काय खातूय व्हय तुला.. ये की जरा..." गण्या थोडा मस्का मारत बोलत होता..

स्वप्निलने विचार केला.. आणि गण्याच्या मागे गेला.. गण्या त्याला घेऊन गाडीच्या विरूद्ध बाजूला गेला...

" अयेक म्या काय म्हणतू... तु मागं बस की आता.. म्या म्होरं बसतो की.... मागं मला बसता नाय येत ना... तुला म्या गावात गेल्यावर रातच्याला घेऊन जातू की.. ते काय ते ते.... ते असतय ना.. आरं लेका काय खातूस तु.. ते .."

गण्या डोक्याला जोर लावून विचार करत सोप्याला मनवत होता मागे बसण्यासाठी...

" ते चायनीज खातो म्या... पण आता नगं मला.. म्या म्होरंच बसणार... काय करशील तू??" सोप्या पण गण्याला नडत होता...

" अयं... भुसनळ्या.. जास्ती डोक्यात जावू नगसं.. नायतर इथल्या इथं बांबू मोडीन तुझा... कळलं का रताळ्या..." गण्या

" पप्पाssssss ह्यो गण्या बगा मला काय म्हणतूयाssss" सोप्या ने विलास मामाला आवाज दिला..

" काय रं पोरांने काय झालं..." मामा

" काय नव्हं मामा... असंच गंमत करत व्हतो म्या.. काय नाय...."

मामाचा आवाज ऐकूनच गण्याने माघार घेतली आणि सोप्याला एक जळजळीत ठशन देऊन मागे बसायला निघून गेला...

सोप्या अगदी वर्ल्ड कप जिंकला असं समजून पुढे जाऊन ऐटीत बसला...

" चला निघायचं का... दख्खनचा राजा जोतिबा देवाचं दर्शन घ्यायला..." सागर सगळ्यांना उद्देशून बोलला...

" हो भाऊजी.... पण देवा जोतिबा बद्दल सांगा काही तरी... तेवढाच पोहचेपर्यंत टाईमपास.." पुजा

" सांगतो की..." सागर

" जोतिबा मंदिर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरा पासून जवळ जवळ चाळीस किलोमीटर लांब आहे... महालक्ष्मीचे दर्शन झाले की आपोआपच ओढ लागते ती तीच्या मानसपुत्र जोतिबाची...

ज्योतिबा मंदिर  हे महाराष्ट्राच्या पन्हाळा रांगेत कोल्हापूरपासून १७ किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून ३१२४ फूट उंचीवर आहे. 

लोकं म्हणतात... भगवान ज्योतिबांनी देव ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या आत्म्याचा उपयोग करून राक्षस रत्नासुरशी लढण्यासाठी केले होते. 

इतिहासानुसार, नवजीसयाने आपले मंदिर बांधले. सन १७३० मध्ये राणोजी सिंधिया यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली जे त्याचे सध्याचे स्वरूप आहे. केदारेश्वराचे मंदिर दौलतराव सिंधिया यांनी १८०८ मध्ये बांधले. मलजी निलम पन्हाळकर यांनी १७८० रामलिंगचे तिसरे मंदिर त्याच्या घुमटासह बांधले...

जगभरातील मोठ्या संख्येने भाविक जोतिबा मंदिराला भेट देतात. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाविकांची मोठी संख्या पसरलेली आहे. 

दरवर्षी "एकादशी" ला हजारो भक्त जोतिबा टेकडीवर जमतात आणि सासनकाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या काठ्यांनी नाचत जोतिबाच्या दर्शनाचा आनंद साजरा करतात.
आणि प्रचंड प्रमाणात 'गुलाल' उधळल्याने संपूर्ण डोंगर गुलाबी झाला आहे. जो आनंद आणि उत्साह निर्माण झाला त्याचे वर्णन करणे कठीण आहे...."

सागरने सर्वांना माहिती दिली... सर्वच जण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.. फक्त सागरच्या बोलण्याचा आवाज, गाडीचा भुर्रररररर आवाज एवढाच काय तो येत होता...

सागरच बोलून झालं तसा तो शांत बसला... दोन तीन मिनिटे... कशालाच आवाज नाही.. सगळे भारावून गेले होते....

" आरं दादा.... कसली भारी माहिती दिली तु... एवढ्या येळेस आम्ही आलोय इकडं पण कवा इतकं नाही कळालं... फकस्त आपला कुलदेवत हाय म्हणूसान टकूर पायावर ठेवाया येत व्हतू... पर आता येक येगळचं बग वाटतया... अशी एकदम छाती फुगून आलीया..." अजा

" हो ना भाऊजी... खुप छान वाटतेय ऐकायला.. पण तुम्हाला इतकी कशी माहिती... म्हणजे तुम्ही मुंबईला राहता ना.." पुजा

" अरे ते..." सागर

" माझा भाऊ लयं हुशार हाय.. डोस्कं सुपरफास्ट हाय त्याच... मागच्या वक्ताला आला व्हता त्या वक्ताला खापर तोंडाच्या माकडाला घेऊन आलाता... त्यानं हे समदं सांगितलं आन् दादूने समदं टकूऱ्यात बसवलं... तेच आता सांगतुया.. व्हयं की नाय दादूस..." गण्या

सागर काही बोलणार त्या आधीच गण्याने नेहमी सारखा मध्येच बोलून गेला...

" काय बोललास तुझं तुला तरी कळलं का?? माकड.... भाऊ... हुशार... एवढंच काय ते कळालं मला..." पुजा त्रस्त होऊन गण्याकडे बघत बोलली....

" अगं पुजा... लास्ट टाईम भाऊजी आले होते कोल्हापूरला कामातून पिकनिकला तेव्हा गाईड हायर केला होता त्यांनी... त्यानेच माहिती दिली होती तेव्हा भाऊजीच्या ती कायमची लक्षात राहिली... म्हणून त्यांनी आपल्याला ती आता शेअर केली..." महेंद्र

"हो... म्हणूनच गणेश भावजी तुझ्या भावजीला हुशार म्हणाले..." इतका वेळ गप्प बसलेली अवनी सागर कडे कौतुकाने बघत पुजाला म्हणाली... तीच्या कडे बघून सागर ही गालात हसला... त्यावर अवनी लाजली...

घाटातुन गाडी चालली होती...
वळणावळणाचा रस्ता आणि गाडीत बसलेली आपली नविन कोरी जोडी...
ते हि इतक्या शेजारी...
अवनी... सागर..
दोघांचा एकत्र पहिलाच प्रवास.... एका नविन ओळखीचा... काही दिवसांपूर्वी कोणाचा मुलगा.. कोणाचा पुतण्या.... कोणाचा नातू... भाऊ... भाचा... आणि आता कोणाचा तरी नवरा... तसंच अवनी... कोणाची तरी मुलगी... बहिण आणि आता बायको.... दोघेही एकमेकांना चोरून बघत होते... हळूच लाजत होते... नजरेला नजर मिळाली कि गालात हसत होते... एकमेकांना हळूच नकळत होणारा छोटासा स्पर्श हि अनुभवत होते... हाताला हाताचा स्पर्श... पायाला पायाचा होणारा स्पर्श... गाडी हालली की खांद्याचा खांद्याला झालेला स्पर्श... सगळं त्या दोघांना मोहरून टाकत होते... एक ओढ... एक भिती... एक संकोच... काही तरी वेगळीच भावना.... त्यावेळी ते अनुभवत होते ते दोघे...
सगळ्यांमध्ये असून एका वेगळ्याच विश्वात रमत होते...

एकमेकांना बघता बघता... आणि बाकीची गॅंग झोपा काढताना... हो झोपाच.... आपापसात भांडून... चिडवून... पोटभर खाऊन... झोप लागली त्यांना... फक्त आपले न्यूली कपल... आणि ड्रायव्हर एवढेच जागे होते...

थोड्याच वेळात सगळे पोहचले जोतिबाच्या डोंगरावर... आजूबाजूचा परिसर मस्त हिरवळीने नटलेला... मे महिन्यातला पाऊस पडून गेला होता... हवेत गारवा पसरला होता.. मंदिराजवळ गाडी आली तसं सागरने सगळ्यांना हाक मारून उठवले...

सगळे गाडीतून उतरले... पण समोर बघितलं तसं सगळेच आ वासून उभे राहिले....

आपलं नवं विवाहित दाम्पत्यांनी तर डोक्याला हात मारून घेतला!!!

----------------------------------------------

काय झालं असेल... जोतिबा मंदिरात...

कसा होईल पुढचा प्रवास त्यांचा...

वाचत रहा...
एक प्रवास... अंतरंगी ?☺️


🎭 Series Post

View all