Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रवास एकटीचा भाग - 33 बोनस भाग

Read Later
प्रवास एकटीचा भाग - 33 बोनस भाग


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 33


संगीत कार्यक्रम इतका भारी झालेला की दुसऱ्या दिवशी पर्यंत ते गाणे सगळ्यांच्या तोंडात होते .

         अखेर आज लग्नाचा दिवस उगवला , ज्या दिवसाची वाट किरण प्रिया गेले तीन वर्षे बघत होते . पण त्याआधी हळद लागणार होती , सगळ्यात पहिले मुलाला हळद लावतात मग त्याची उष्टी हळद मुलीला लागते . वेदिका प्रियाच्या पाहुण्यांना तिच्या परीने जमेल तसं सगळं सांगत होती .

त्यांचे पाहुणे काय बोलत होते तिला तर काहीच कळत नव्हते . त्यांची केरळी भाषा येत नव्हती पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून प्रिया समजून जायची .

प्रियाने त्यांनी घरी दळलेली हळद घेतली आणि ती फुलांनी सजवलेल्या पितळाच्या भांड्यात पाणी घालून तयार केली . बाजूने आंब्याच्या पानांनी अजून छान सजवले .

किरणला बोलवायला आई आणि वेदिका गेली , तो ही छान पांढरा कॉटनचा कुर्ता पायजमा घालून तयार होता . हॉल मध्ये एका बाजूला दोन पाट मांडले होते , त्याच्या बाजूने सुंदर पिवळ्या फुलांनी सजवले होते . तिथे किरण आणि प्रियाला बसवायचं होत . किरण तर आताच जाऊन बसला होता पाटावर प्रियाची वाट बघत .

      पाच मिनिटांनी तयार होऊन प्रिया पण आली . तिने लिंबू ककरचा पिवळ्या रंगाचा घागरा घातला होता . प्रियाला सगळे फिकट रंग आवडत होते त्यामुळे तिने सगळे ड्रेस तसेच घेतले होते . अंगावर नाजूक गुलाबी फुलांचे दागिने घातले होते . हे दागिने तर अलीकडे सगळीकडेच मिळायला लागलेत आहेत . गळ्यातील हार , बांगड्या , कानातले , माथ्यावरची बिंदी , हातातले कडे आणि कंबरपट्टा . आणखी अजून बरेच काही दागिने मिळतात . ते सगळे घालून प्रिया खूप सुंदर तयार होऊन आली होती .

     पहिले वेदीकाने किरणला पाच वेळा हळद लावली मग तीच हळद प्रियाला सुद्धा लावली . तीच बघून सगळ्यांनी तसेच दोघांना लावले . नंतर आईंनी पण दोघांना हळद लावली . खूप सारे फोटो काढले , किरण प्रियाचे एकमेकांना हळद लावतांना . भरपूर हळद लावून झाल्यावर आता दोघेही उठले होते पुढच्या कार्यक्रमासाठी तयार व्हायला , कारण लग्न आजच होते . मराठी पद्धतीने आणि केरळी पद्धतीने सुद्धा . त्यामुळे खूप गडबड होणार होती .


पहिले लग्न केरळी पद्धतीने करणार होते . त्यामुळे स्टेजवर त्यांच्यात ठेवतात तसे मोठं मोठाले पितळी भांडी ठेवण्यात आले . ते उखळ सारखे पण थोडे वेगळे आणि वरतून पाकळ्या असलेले भांडे ठेवले त्याला परा असे म्हणतात आणि त्या एका भांड्यात सालीसकट तांदूळ भरलेले असतात म्हणून त्याला निरपरा म्हणतात . तसेच दुसऱ्या भांड्यात नारळाच्या झाडाला जे फुलं येतात ते सगळ्यात महत्वाचे असतात म्हणे  आणि त्याला तेंगूपुकुला असे म्हणतात . बाजूने साधारण आपल्या उंचीच्या समया लावल्या होत्या त्याला निलवेळख म्हणतात आणि त्याच्या भोवती मोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या . इतकी सगळी सुंदर तयारी करण्यात आली होती , वेदिका अगदी बारकाईने सगळं बघत होती . 

वेदिका ही सगळी तयारी बघत बसली होती , तिला आईंनी उठवले आणि सांगितले " लग्नाला तयार व्हायचे आहे ना तुला . मग उठ लवकर आणि रूममध्ये जाऊन तयार हो ". तेव्हा कुठे वेदिका उठली आणि गेली .


केरळी पद्धतीने लग्न होणार होत , मग त्यासाठी लुंगी तर पाहिजेच . प्रियाच्या भावाने किरणला एका बॅगमध्ये कपडे पाठवले होते . प्रियाने त्याच्यासाठी एक ड्रेस घेऊन ठेवला होता खास लग्न लावतांना घालण्यासाठी . त्यात एक लाल रंगाचा प्युअर सिल्कचा कुर्ता होता आणि सिल्कचीच लुंगी पण होती .

किरणने कुर्ता तर घातला पण लुंगी काही त्याला घालता येईना . आता काय करावं , म्हणून किरण विचार करत बसला होता . प्रियाच्या भावानेच त्याला लुंगी कशी नेसतात ते दाखवले , कारण त्यांनी पण लुंगीच घातली होती . आता तो खरा केरळी दिसत होता .

मुहूर्ताची वेळ जवळ येत होती , वेदिका ही तयार व्हायला वेळ लावत होती . त्यामुळे सुधाकर तिच्या मागे लागला होता आवर लवकर म्हणून . पण ती तरी काय करणार , कारण तिला मेकअप वाली मुलगी तयार करत होती . प्रियाने तिची पैठणी नसली होती , खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होती वेदिका . जणू काही आज लग्न सुधाकर आणि वेदीकाचच आहे असे तयार झाले होते दोघेही .

आई आणि तात्याही खूप मस्त तयार झाले होते . आईने वेदू ला सांगितले , " माझ्या किरणला काजलाची तीट लाव ग , खूप छान दिसतोय आपला नवरदेव ".

वेदिका ही लगेच तीच काजळ घेऊन आली आणि किरणच्या कानामागे छोटीशी तीट लावली आणि सोबतच त्याच्या गळ्यात मोठी मोत्यांची माळ पण घातली .

गोरापान सहा फूट उंचापुरा किरण , तयार होऊन बाहेर आला . कुर्ता आणि लुंगी मध्ये इतका हँडसम दिसत होता की सगळ्या मुली त्याच्याकडेच बघत होत्या . पण प्रिया मात्र अजून आलेली नव्हती . बायकांना लागतोच म्हणा वेळ तयार व्हायला . असे म्हणून किरण तिची वाट बघत बसला .

सगळ्यांच्या नजरा मागे वळल्या म्हणजे नक्कीच प्रिया आली असणार , म्हणून किरणने सुद्धा वळून बघितले .

समोरून प्रिया तिच्या मम्मी पप्पांचा हात धरून चालत येत होती गुलाबाच्या पाकळ्यांवरून . मागे केरळी संगीत सुरू होते . तिने खूप सुंदर लाल रंगाची साडी नेसली होती , त्यावर खूप सारे किमती सोन्याचे दागिने घातलेले . अगदी मानेपासून ते बेंबीपर्यंत एका खाली एक असे संपूर्ण दागिने घातले होते . कानात मोठे झुबे घातलेले , माथ्यावर सोन्याची बिंदी , नाकात सोन्याची नथनी , कंबरपट्टा ही सोन्याचा , तिचे पूर्ण हात सोन्याच्या बांगडयांनी भरलेले होते ,तिची पूर्ण टेम्पल ज्वेलरी होती . त्यात लक्ष्मीचे डिझाईन कोरलेले होते . मेकअप खुप साधा होता पण प्रिया मुळात खूप सुंदर होती दिसायला त्यामुळे किरण तिच्याकडे आ वासून बघतच राहिला . जणू काही अप्सराच अवतरली आहे या धर्तीवर , अशी चालत येत होती प्रिया .


प्रिया त्याच्या बाजूला येऊन बसली तरीही किरणची नजर तिच्यावरून हटत नव्हती . प्रियाने त्याला समोर बघ म्हणून सांगितले तरी तो तिलाच बघत होता .
" प्रिया ये मेकअप का कमाल हैं ना , सच्ची बताना ".

त्याच्या अशा विचारण्याने प्रियाला तिथेही खूप हसू आलं होतं , कसबस तिने ते आवरलं आणि किरणला पुढे बघ म्हणून सांगितलं .

       किरण प्रिया हात जोडून बसलेले होते . भटजी त्यांच्या केरळी भाषेत मंत्र म्हणत होते . त्यांनतर प्रियाच्या गळ्यात बांधायला एका पिवळ्या धाग्यात ताली बांधायला दिली , " ताली " म्हणजे त्यांचं मंगळसूत्र असत . ते एक पानासारखा आकार असतो आणि त्यात ओम कोरलेला असतो . तो किरणने प्रियाच्या गळ्यात बांधले आणि हलकेच तिच्या कपाळाचे चुंबन घेतले ते ही सगळ्यांसमोर . प्रियाने लाजेने मान खाली झुकवली . सगळ्यांनी त्यादोघांवर फुलांचा वर्षाव केला . त्यानंतर त्यांचे तिथेच सात फेरे झाले आणि तिच्या भांगेत कुंकू भरले .

बसल्या बसल्याच दोघांनी एकमेकांना वरमाला सुद्धा घातल्या . वरमाला ही खूप सुंदर होत्या , नाजूक कमळाच्या कळ्यांच्या वरमाला . किरण प्रियाच्या गळ्यात त्या खूपच शोभून दिसत होत्या . दोघांचा जोडा अगदी लक्ष्मी नारायण सारखा दिसत होता .

ही लग्न पद्धती सुद्धा खूप छान होती . आता मराठी पद्धतीने लग्न लागणार होते पण ते एक तासांनी . त्याआधी किरण प्रियाचे भरपूर फोटो काढायचे होते . आजकालचे फोटोग्राफर तर फारच हुशार असतात . काय काय सांगून वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो काढायला सांगतात .

किरणला तर एका पायाने लुंगी वर कशी घ्यायची याच ट्रेनिंग चालू झालं होतं . आणि विशेष म्हणजे त्याने ते करूनही दाखवलं होत , त्यांची ती स्टाईलच असते एका पायाने लुंगी वर घेऊन कमरेत बांधणे . किरण प्रिया प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत होते , दोघांच्या चेहर्यावरचे हसू सगळ्यांना ग्वाही देत होते की ते दोघे किती खुश आहेत .


सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Trupti Koshti

मांजर प्रेमी ? पुस्तक प्रेमी ? आणि लिहायला थोडंफार जमत ✍️

//