प्रवास एकटीचा भाग - 26

प्रेम आंधळं असतं पण ते आपल्या निभावण्यावर असत


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 26


         दोन दिवसांनी प्रिया घरी जायला निघाली . किरण तिला एयरपोर्ट वर सोडायला आला होता . दोघांनी लवकरच पुन्हा भेटू म्हणून एकमेकांचा हसत हसत निरोप घेतला .

तिकडे गावी आई आणि वेदिका ह्यादोघींची तयारी खूप जोरात चालली होती . घरातल्या घरात त्या दोघीच सगळं बघत होत्या .
कारण तात्यांनी सांगितलं होतं , " कोणत्याही नातेवाईकाला आपण इथून घेऊन नाही जाणार आहोत ".

" पण अस का , इथे घरी किरण आणि प्रिया आल्यावर तर कळेलच की सगळ्यांना त्याने लग्न केलंय म्हणून ".

" जेव्हा कळायचं तेव्हा कळू द्या , पण लग्नाला आपण फक्त पाचच जण जाणार आहोत . सांगून द्या मुलीकडच्याना ".

" पण मी काय म्हणते ...."

" आता पण नाही आणि बिन नाही , जे सांगतोय ते करा . पत्रिका वैगरे छापायची काही गरज नाही . आपण सगळी तयारी करूया आणि निघुया दोन दिवस आधी लग्नासाठी तिकडे ".

       तात्यांना कोणालाच काही सांगायचं नव्हतं .  किरणच्या लग्नासाठी ते तयार तर झाले होते , पण मनातून त्यांना भीती वाटत होती हे खरे .

मुलासाठी ते सगळं करताय पण गावातल्या लोकांचं काय , कोणाच तोंड थोडीच बंद करता येणार होत . ह्याच त्यांना टेंशन आलं होतं बहुतेक . सगळ्यांना ज्ञान देणारे गुरुजी , आज त्यांच्याच मुलाने अस करावं हे त्यांच्या मनाला पटलं नसावं . त्यामुळेच त्यांनी असा निर्णय घेतला .

कोणाच्या घरात एखादी गोष्ट घडली की आख्ख्या गावात त्याची चर्चा होते . गाव लहान असल्यामुळे तिथली लोकं अजून इतकी आधुनिक विचारांची नव्हती . त्यामुळे तात्यांना कोणालाच काही कळू द्यायचं नव्हतं . आणि हे त्यांनी वसुधा ताईंना चांगलं समजावून सांगितलं होतं . त्यामुळे त्यादेखील शांत होत्या .

पण त्यांनी घरातल्या घरात सगळी तयारी अगदी आवडीने केली होती . वेदिका ही त्यांना भरपूर साथ देत होती .

" अहो मी काय म्हणते , वेदिकाच्या घरी तरी सांगायला हवं ना आपल्याला ".

" तुम्ही सांगून द्या फोन करून , आपल जे ठरलंय तेच सांगा . तुम्हांला त्यांना बोलवायचं असेल तर लग्नानंतर पूजा घालणार आहोत घरातल्या घरात तेव्हा बोलवा त्यांना ".

" बरं ठीक आहे , बोलते मी तस त्यांच्याशी ".

आईला वाटत होतं , निदान त्यांना तरी लग्नाचं आमंत्रण द्यावं . पण तात्यांनी सगळंच ठरवून घेतलं होतं , की कोणालाच घेऊन जायचं नाही . त्यामुळे त्या आता काहीच करू शकत नव्हत्या , मनात असूनही त्यांना शांत रहावं लागत होतं .

      पण वेदिका समजूतदार होती , ती आता ह्या घरची थोरली सून होती . त्यामुळे तिला सगळं कळतं होत .

आईने किरणला फोन लावला , खूप वेळा सांगूनही किरण घरी लवकर येणार नव्हता . तो तरी काय करणार म्हणा , सुट्ट्या मिळत नव्हत्या त्याला . नाहीतर आलाच असता तो घरी लगेच . तरी सुद्धा आई त्याला रोज फोन करून आज काय काय केलं आणि काय काय राहिलंय ते सगळं सांगायच्या .

वेदीकाने तर प्रियासाठी खूप सुंदर असा मोठा मेकअप बॉक्स घेतला होता . त्यात सगळं साज शृंगाराच्या किमती वस्तू होत्या . कपडे तेव्हढे घ्यायचे राहिले होते , किरण आणि सुधाकर अजून यायचा बाकी होता म्हणून त्या थांबल्या होत्या . पण दोघींनी तशी बरीच छोटी मोठी खरेदी करून ठेवली होती .

बोलता बोलता तर प्रियाने एकदा सांगितले होते वेदिकाला , की तिला मराठी पध्दतीने सुद्धा लग्न करायचं आहे , त्यांच्या लग्नात जेव्हा प्रिया आली होती त्यावेळी तिला ते सगळं बघून खूप छान वाटलं होतं . त्यामुळे वेदीकाने प्रियासाठी एक नऊवारी साडी शिवून घेतली होती , आणि त्यावर सगळे दागिने सुद्धा घेतले . नाकातली प्रेस करायची मोत्याची नथ , गळ्यातील ठुशी , राणीहार , कमरपट्टा , कानातले झुबे त्याला मोत्याचे वेल , चंद्रकोर टिकली , कपाळावरची बिंदी , आंबाडा घालून त्याला सजवायला मोत्यांचा गजरा आणि अजून बरंच काय काय घेतलं होतं तिने .

      आईला तर वेदिकाची तयारी बघून नवलच वाटले . किती समजदार होती वेदिका , तिला न सांगताही सगळं काही जमायचं . घराला शोभेल अशीच थोरली सून होती ती . आल्या गेल्याचं , पै पाहुण्यांच सगळ्यांच अगदी हसत मुखाने करायची . आजूबाजूच्या बायका देखील तीच कौतुक करायच्या आणि वसुधा ताईंना खूप छान वाटायचं तीच कौतुक ऐकून .

         "  आई , आपल्याला अजून बरंच काही करायचं आहे . भाऊजी आणि हे आले की आपण सगळे मिळून जाऊया एकदा मोठ्या मार्केटला त्यामुळे सगळ्यांचे कपडे एकदाच घेऊन होतील आणि राहिलेला बाजार पण घेऊन होईल ".

" हो ग वेदू , तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे . पण हे पोरं कधी येताय काय माहिती . किरण तर म्हणतोय त्याला सुट्ट्या कमी मिळाल्या आहेत . फक्त आठच दिवस सुट्ट्या मिळाल्या आहेत . मग तो चार दिवस आधी येईल कारण पुढे दोन दिवस आपल्याला मुलीकडे जावे लागेल लग्नासाठी . मग तिकडून इकडे यायचं .... किती धावपळ होईल पोराची ".

" हो आई , धावपळ तर होणारच आहे . कारण प्रवास लांबचा आहे , तरी सुद्धा त्यांनी आधीच तिकिटं काढून ठेवलीत विमानाची सगळ्यांची . आपण बघूया वेळेवर काही राहायला नको म्हणून आपल्याकडून जितकं होईल तितकं सगळं करूनच ठेवुयात ".

" चला मग आपण जाऊया का मार्केट मध्ये , निदान तुझी आणि माझी साडी तरी घेऊन होईल . कारण तिला तयार करावं लागेल पुन्हा आणि ब्लाऊज शिवून मिळायला हवं वेळेवर ".

     " हो आई , ते तर आहेच . पण मी काय म्हणते , माझ्याकडे आहे साडी आधीचीच ती नेसली नाहीये मी अजून कधी . मी तीच साडी नसली तर चालेल ना ...!"

" वेडी आहेस का वेदू तू , मला माहितीये तू का नको म्हणतीय ते , कारण जास्त खर्च होईल म्हणून . आग पण एकुलता एक दिर आहे तुझा तो , उलट तू हक्काने मागायला हवं . आणि तुला एक साडी घ्यायला नाही म्हणणार आहे का तो . मग चल माझ्याबरोबर , आपण जाऊन येऊ दुकानात आणि तुला आवडेल तीच साडी घ्यायची आपण ".

      अस म्हणून आई आणि वेदिका शहरातल्या मोठ्या शोरूममध्ये गेल्या , तिथे इतक्या साड्या होत्या की दोघींना ही घेऊ की ती घेऊ अस झालं होतं .

       एक एक करून ती बाई सगळ्या साड्या दाखवुन बाजूला करत होती . आवडल्या तर खूप होत्या पण मुलाच्या लग्नात घालून वरमाय शोभली पाहिजे अशी एकही दिसली नाही .

        शेवटी त्यांच्यासमोर पैठणी टाकली एकदम सुंदर मोरपंखी रंगाची . त्या साडीला बघताच आईला खूप आवडली ती . आता आईची पसंत करून झाली होती फक्त वेदिकाची बाकी होती . इतक्या साड्या बघूनही तिला काही पसंत पडत नव्हत्या . शेवटी आईचं बोलल्या तिला

" वेदू , तू पण घे की अशीच एखादी पैठणी . ताई माझ्या सुनेला पण दाखवा ह्यातलीच अजून चांगली ". 

वेदिकाला त्यांनी पैठणीतले वेगळे प्रकार दाखवले . डिझाइनर पैठणी , मग वेदीकाने पण पैठणीच घेतली . दोघींच्या साड्या थोड्या वेगळ्या होत्या . आईची साडी ओरिजनल पैठणी होती तर वेदीकाच्या साडीवर खड्यांची डिझाइन होती . अगदी तिला शोभून दिसेल अशीच साडी निवडली होती तिने .




सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all