प्रवास एकटीचा भाग - 18

प्रेम आंधळं असतं पण ते नातं निभावणं आपल्यावर असतं


विषय - प्रेमकथा

प्रवास एकटीचा भाग - 18

    

        आई आणि तात्यांचा विमान प्रवास छान झाला . टॅक्सी मधून जात गप्पा मारत मारत जवळपास अर्ध्या तासाने सगळे प्रियाच्या घरी पोहोचले . तिचे आई वडील बाहेरच उभे होते सगळ्यांच्या स्वागतासाठी .

          प्रियाचे घर अगदी छान होते दुमजली , अवतीभोवती छोटी छोटी फुलझाडे लावली होती . त्यांची नाजूक फुले स्वागताला उभी आहे असेच वाटत होते जणू काही , त्यामुळे अगदी फ्रेश वाटत होते . घरात प्रवेश करताच आपल्या इतक्या उंचीच्या पितळाच्या मोठं मोठ्या समया ठेवल्या होत्या . बाजूलाच पितळाची बरीचशी वेगवेगळी भांडी सजवून ठेवली होती . एका भांड्यात भरगच्च झेंडूची फुले सजवलेली होती , खूप सुंदर दिसत होते ते . दाराला छान रंगीबेरंगी फुलांचे तोरण लावले होते आणि फुलांचीच रांगोळी देखील काढलेली होती . हॉलमध्येच छान लाकडी मंदिर बनवून घेतलं होतं . त्यात देवी देवतांच्या मूर्ती ही अगदी हसऱ्या चेहर्याने स्वागत करत आहे असेच वाटत होते . तिथला अगरबत्तीचा मंद सुवास संपूर्ण घरात दरवळत होता . हे सगळं बघून प्रवासातला थकवा नाहीसा झाला होता .

     एकमेकांना हसून नमस्कार करत सगळे सोफ्यावर एकत्र बसले . प्रिया सगळ्यांसाठी पाणी घेऊन आली . त्यांना एकमेकांनी ओळख करून देण्याची सुद्धा गरज नव्हती , कारण त्यांनी फोटोत बघितले होतेच . आणि किरण तर हुबेहूब त्याच्या आईसारखा दिसत होता .

त्यांना प्रवास कसा झाला ते विचारून झाले . थोडं फ्रेश होण्यासाठी त्यांना प्रियाच्या बेडरूममध्ये पाठवले .

       थोडा वेळाने चहा पाणी झाला , एकमेकांची चांगली ओळख करून घेतली मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . तात्यांना आणि आईला थोडं अवघडल्या सारखं वाटत होतं त्यांच्याशी बोलायला , पण माणसं चांगली होती . ते दोघेही अगदी हसतमुखाने बोलत होते . अगदी आदराने त्यांनी सगळ्यांचे स्वागत केले होते . सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांच्या भावना समजायला त्यांना कुठल्याही भाषेची गरज भासत नव्हती . सगळे इतके खुश होते की त्यांच्या चेहऱ्यावर ते अगदी स्पष्ट दिसत होते .

         जेवायला सगळ्यांसाठी प्रियाच्या आईने खास मेन्यू बनवले होते . केळीच्या पानावर जेवण वाढण्यात आले , पूर्ण पान भरून पदार्थ होते . जेवणाचं पान पाहूनच आईला अगदी छान प्रसन्न वाटले . टिपिकल केरळी लोकं जेवतात अगदी तसेच सगळे पदार्थ बनवण्यात आले होते आणि सोबत केळी पण वाढली होती छोटीशी छान . सर्व पदार्थ साधेच पण चवदार होते . खूप दिवसांनी आईला वेगळी चव चाखायला मिळाली होती .

     जेवणं उरकल्यावर सगळे थोडा वेळ बसले गप्पा मारायला . प्रियाच्या पप्पांना गप्पा मारायला खूप आवडायचे , बडबडे होते ते अगदी त्यामुळे तात्यांना काही सोडले नाही त्यांनी . भरपूर गप्पा झाल्या दोघांच्या . अगदी दोघांनी एकमेकांना स्वतःबद्दल सगळं सांगितलं , जसे काही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आधीपासून ओळखतात एकमेकांना असेच बोलत होते दोघेही .

      त्या दोघांना असे बघून आईला ही नवल वाटले . तिने किरणला खुणावल तर तो ही बघतच राहिला दोघांकडे . दोघांची एव्हाना चांगली मैत्री जमली होती .

      आई ही प्रियाच्या मम्मी सोबत बोलत बसली होती . बायकांच्या गप्पा तरी काय असणार म्हणा , ही भाजी कशी केली किंवा हा अमुक पदार्थ कसा बनवला .  नवनवीन पदार्थ आज चाखायला मिळाले होते . त्यामुळे आईने तेच विचारले असेल . 
 
  " घर छान सजवलं आहे तुमचं , प्रियाकडे बघत आई बोलली ".

" सुंदर आहे हो प्रिया तुमची , असे म्हणून आईने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला ".

      " मुझे ना एक प्लेट चाहीए , बडीसी थाली ".
आईने प्रियाच्या मम्मीला सांगितले . पण त्यांना काही समजलेच नाही प्लेट कशासाठी पाहिजे म्हणून .

        त्यांनी प्लेट आणून दिल्यावर आईने त्यात तिने आणलेली साडी आणि तांदळाची पिशवी काढली , त्यात सुपारी खारीक खोबर रुपयाचं नाण , हळकुंड हे सर्व होत . आणि हळदी कुंकू पण आणलं होतं थोडंस . सोबत मोतीचुर लाडुचा मिठाईचा बॉक्स पण होता . किरणची आवडती मिठाई होती ती म्हणून आईने तेच आणले होते .
तिथेच टेबलवर ठेवलेल्या केळ्यांचा घड उचलला आणि तो साडीवर ठेवला .

आईची ही तयारी प्रियाची मम्मी बारकाईने बघत होती . त्यांनाही कळाले होते त्या काय करताय ते . पद्धती सारख्याच असतात फक्त थोडाफार बदल असतो .
 
   सगळ्यांना बाहेर हॉल मध्ये बोलवून घेतलं , किरणला बोलावलं आणि त्याच्या शेजारी प्रियाला बसायला सांगितले . प्रियाने साधा पंजाबी ड्रेस घातला होता . पण तिच्या मम्मीने लगेच तिच्या डोक्यावर ओढणी घातली आणि बसवले तिला . हे बघून किरणच्या आईला नवल वाटले त्यांचे . काहीही म्हणा पण संस्कार जाणवत असतात .

आईने किरणला कुंकुवाचा टिळा लावला आणि प्रियाला हळदीकुंकू लावलं .
प्रियाच्या ओटीत आईने पिवळ्या रंगाची सुंदर जरी काठपदराची साडी घातली . तिला काही समजेना आता पुढे काय करायचं .

     किरणने तिला आईच्या पाया पडायला सांगितल्या .
आईने प्रियाची ओटी भरली , म्हणजे मुलगी पसंत आहे आम्हांला , असा त्याचा अर्थ होतो .
हे त्यांना हिंदीतून किरणने सांगितले , आमच्याकडे हे अस सगळं करतात .

हे समजताच प्रियाने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं , आई तिला उभं करत बोलली .

" अब अकेले नहीं , दोनोंको साथ मे पैर छुने चाहीए ".

प्रियाने हसून किरण कडे बघितले आणि दोघांनी सोबत पाया पडल्या त्यांच्या दोघांच्या आई वडिलांच्या .

     " हम अपने बच्चों की खुशी के खातीर ये सब कर रहे हैं ! "

" वो दोनों खुश तो हम सब भी खुश , हैं ना बेहेनजी ? "

" जिहां बिलकुल , सही कहां आपने . इन दोनोंको तो हमने पेहेले ही समझ लिया था . बस हम सबको मिलना बाकी था और ये सब करना बाकी था ".

       सगळेच खुश होते . किरणच्या आईने इतकं सगळं आणलं होतं प्रियाला त्यामुळे ते सगळं बघून प्रियाच्या आईने देखील लगेच किरणला टिळा लावला आणि आहेराच पाकीट त्याच्या हातात देऊन आशीर्वाद दिला .

एकमेकांना लाडू खाऊ घालत सगळे तोंड गोड करत होते .

       किरण आणि प्रियाचे दोघांचे सोबत फोटो काढले , तसेच संपूर्ण फॅमिली सोबत पण काढले . ते दोघे इतके खुश होते की त्यांची नजर काढायला पाहिजे असे किरणच्या आईने सांगितले .

        प्रियाच्या डोळ्यात नकळत पाणी तरळले , ती इतकी हळवी होती की डोळ्यात लगेच पाण्याच्या धारा लागायच्या तिच्या .
तिला आईने विचारले , " साडी आवडली का ते ".

" हा आई , मुझे बोहोत आवडली ये साडी ". बोहोत ज्यादा . और ये पिला कलर तो मेरा फेवरेट हैं .

" अरे वाह , ये साडी तुम्हारे जेठाणी के पसंद की हैं . उसे भी फोन करके जरूर बोलना ".

" हा आंटी , सॉरी .... आई ".

तिने आई म्हटलेलं खूप आवडलं किरणच्या आईला .

       दोघेही असेच कायमस्वरूपी सोबत रहा . ही साथ कधीच सोडू नका आणि प्रेम कमी होऊ देऊ नका एकमेकांवरचे . घरच्यांशी भांडून संमती मिळवली आणि तुमचा संसार थाटताय तुम्ही , त्यामुळे दोघेही छान रहा . एकमेकांना समजून घ्या , तुमच्या आनंदासाठी हे सगळं चाललंय इतकं लक्षात ठेवा आणि असेच खुश रहा .आम्ही आहोतच तुमच्या पाठीशी .
आईने जवळ येत किरण प्रियाला आशीर्वाद दिला . 



सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all