प्रवास एकटीचा भाग - 17

प्रेम आंधळं असतं पण ते शेवटपर्यंत निभावणं आपल्या हातात असत


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 17


          प्रिया आणि किरण ज्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होते , तो दिवस शेवटी आज उगवलाच . दोघांच्या घरचे आज एकमेकांना भेटणार होते प्रत्यक्ष . 

ते निघायच्या एक दिवस आधीच हे दोघे पोहोचले होते प्रियाच्या घरी . प्रियाच्या घरच्यांना ही खूप आनंद झाला किरणच्या घरचे येत आहे म्हटल्यावर . त्यांच्या स्वागतासाठी बरीच तयारी करून ठेवली होती त्यांनी घरी . किती दिवसांनी हा योग जुळून आला होता , ज्याची सगळे जण अगदी आतुरतेने वाट बघत होते .

    तात्या आणि आई आज निघणार होते प्रियाच्या घरी केरळला यायला . केरळमध्ये इतक्या लांब जायचं म्हणजे भीती वाटत होती त्यांना आणि ते ही विमानाने . पण मुलाचा हट्ट होता की विमानाने एकदा तरी तुम्हांला दोघांना प्रवास घडवून आणायचा आहे .

         सुधाकर काल सकाळीच गावी पोहोचला होता .
त्याला कालच फोन करून तिकिटं प्रिंट करून घ्यायला सांगितली होती . अजून काय लागेल ते नीट व्यवस्थीत चेक करून घ्यायला सांगितले होते . वेळेवर गडबड नको व्हायला म्हणून .

       आधार कार्ड , पॅन कार्ड अजून लागतील ते महत्वाचे सगळे कागदपत्र एकाच ठिकाणी ठेवले होते हॅन्ड बॅगमध्ये . म्हणजे सोबत असतील ते सगळे आणि हरवणार नाही . 

     बॅग तर वहिनीने आधीच भरली होती . त्यात बरंच काय काय सामान भरलं होत प्रियासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी .

      आईला तर पर्स पण आणली होती वेदीकाने .
" आई ही पर्स मी खास तुमच्यासाठी आणलीय , आता ही हातातच ठेवायची . कुठेही विसरून जाऊ नका ".

" कशाला आणलीस वेदू , मला ते ओझं खांद्यावर घेऊन सगळीकडे मिरवावं लागेल आता ."

" असू द्या आई , चांगली तर दिसतेय ती तुमच्या हातात . आणि मी यात तुमचं सगळं सामान ठेवले आहे , जस की तुमच्या रोजच्या गोळ्या , कंगवा आणि टिकलीची पाकीट ."

    पण आईला ते सतत हातात टांगून फिरायला जमायचं नाही म्हणून ती नको नको म्हणत होती . पण त्यात जेवणाचा डब्बा आणि आईच्या गोळ्या वैगेरे सगळे छोटे मोठे सामान होते , त्यामुळे ती सोबत ठेवावीच लागणार होती .

      वेदीकाने आईला छान साडी नेसवून दिली आणि पदराला व्यवस्थित पिन लावून कधी नव्हे ते आई तयार झाली होती .

  घरातून निघतांना आईने वेदिकाला सांगितले ," काळजी घे , मी येईपर्यंत घर तुझ्या ताब्यात आहे . दोघेही नीट रहा , असे म्हणून आई निघाली ".

"आई , काही काळजी नका करू तुम्ही इकडची , आम्ही दोघे आहोत इथे तुम्ही येईपर्यंत . त्यामुळे छान निवांत प्रवास करा ".

     अखेर निघाले ते घरातून . पहिल्यांदाच विमानात बसणार त्यामुळे थोडी भीती वाटतं होती आईला . भल्यामोठ्या विमानतळावर आई तात्या एकटेच आतमध्ये गेले होते . सुधाकर बाहेर पर्यंत पोहोचवायला गेला पण आतमध्ये जाऊ शकत नव्हता . त्यामुळे तिथूनच त्यांचा निरोप घेऊन परतला .
पण फोनवर सतत बोलत होता तो , कुठून कुठे जायचे याची माहिती देत होता .

       शेवटी बसले एकदाचे ते विमानात , आईने तर डोळे गच्च मिटून घेतले आणि देवाच नाव घेऊ लागली . कधी नव्हे ते तात्यांचा हात पकडून बसली होती .
अखेर आई तात्या विमान प्रवास करून केरळला उतरले . तिथे त्यांना घ्यायला एयरपोर्टच्या बाहेर किरण प्रिया उभेच होते .

प्रियाने त्यांना दोघांना बघताच वाकून नमस्कार केला . आणि प्रवास कसा झाला ते विचारले , पण हिंदीत .

सगळे टॅक्सी करून प्रियाच्या घरी जायला निघाले .
आता हिच्याशी मराठीत बोलावं की हिंदीत , हे आईला समजले नाही .

" किरण ,अरे मराठीत बोललेलं कळते काय रे हिला , की मी आपलं तोडक मोडक हिंदी मधेच बोलू ".

" आई , हिंदीतच बोल तू तिच्याशी . मराठी पण कळत तिला , पण अगदी थोडंसच ".

" बरं , म्हणजे आजपासून आपली हिंदीची प्रॅक्टिस सुरू झाली म्हणायची ." असे म्हणून सगळेच हसायला लागले .

" आई , मला कडते थोडी थोडी मराठी . फक्त बोलायला येती नाही ." प्रिया आपल्याला जमेल तसं मराठी बोलण्याचा प्रयत्न करत होती . पण तिच्या तोंडून ते ही छान वाटतं होत . प्रयत्न करत होती ती , हे बघून कौतुक वाटलं तीच .

    " मराठी येत की रे हिला , निदान आपण बोललेलं समजेल , इतकं ही बास झालं ."

" हो आई , बऱ्यापैकी समजत तिला . फक्त हळूहळू बोललं की कळतं , लवकर पटकन बोललं की कळत नाही . बरं ते राहू दे , मला सांग काही त्रास नाही ना झाला तुम्हांला दोघांना विमानात ".

     " नाही रे , उलट छान वाटत होतं . सुरुवातीला वाटली थोडी भीती मला पण नंतर बसले मी नीट . अधून मधून त्या पोरीं येत होत्या , काही हवं नको ते बघायला . पण त्या हवाई सुंदऱ्या तर किती लाली लावतात ओठांवर आणि तोंड कस पांढर पांढर रंगवून येतात , एकदम तोंडावर पेंटिंग केल्यासारखं ."
आईच्या ह्या वाक्यावर तर किरण सोबत प्रिया आणि तात्या पण हसायला लागले .

" आग आई , त्यांच कामच तस आहे . त्यामुळे त्या अशाच तयार होऊन येतात ".

" अरे पण इतकं भडक .  पण त्यातली एक मुलगी खरंच खूप सुंदर दिसत होती . छान बोलत होती सगळ्यांशी , एकदम अदबीने . आवडली मला ती ".

     " विमानातून खाली बघितल्यावर सगळं किती छोटं छोटं दिसत होतं . ढग तर जणू मऊ मऊ दुलईच अंथरली आहे बाजूला असंच भासत होतं . मला तर खूप उंच उंच झाल्यासारखं वाटत होतं . आपले हात जणू आभाळाला टेकले आहे अस जाणवत होत ".

" अरे वाह आणि तात्या तुम्हांला कस वाटलं ".

"मला तर तुझ्या आईकडे बघूनच मज्जा वाटतं होती . ही एकदम लहान मुलीसारखं करत होती " .


" अहो काहीही काय बोलताय "

" कशाला काहीही काय , आणि तूला सांगतो हिला ते कमरेचा पट्टा बांधता येत नव्हता मग शेवटी मीच लावून दिला ".

    " हो , मग त्यात काय एव्हढे ", आई थोडं नाराज होत बोलली . पण किरणला त्यादोघांकडे बघून हसू येत होतं .

" पण काहीही म्हणा , विमानातून प्रवास किती लवकर होतो . इतक्या लांबून यायला रेल्वेने जवळजवळ दोन दिवस लागले असते आपल्याला . तेच विमानाने यायला फक्त काही तासच लागले . पण तिकीट जास्त असेल ना किरण ".

" काही नाही ग आई , तुला आवडलं ना . मग बास , तिकिटाचे पैसे वसूल झाले असे समजेन मी ".

" हो रे बाळा , आवडलं मला आणि छान वाटलं . प्रत्येक अनुभव पण घ्यायलाच हवा की .

" जग किती पुढे गेलंय ना , हे आपल्याला गावात राहून कधी समजलेच नाही ".



सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all