Login

प्रवास एकटीचा भाग - 15

प्रेम आंधळं असतं पण ते निभावणं आपल्यावर असतं


विषय - प्रेमकथा

प्रवास एकटीचा भाग - 15

 

          संक्रांतीचा सण तर छानच झाला आज , पण आता मला उद्या ऑफिसला जायला लागेल . वेदिकाला सुधाकर बोलला तेव्हा ती बिचारी उदास मनाने त्याचा निरोप घेत होती .
 
      ती काही बोलत नव्हती पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव आई आणि तात्यांना कळत होते .

           सुधाकर रात्रीच्या गाडीने मुंबईला जायला निघाला होता . त्याला सोडवायला किरण आणि तात्या दोघेही स्टॅण्ड वर आले होते .

         " मी काय म्हणतो सुधाकर , तू ही आता वेदिकाला घेऊन जा मुंबईत . इथे किती दिवस अशी एकटी राहणार ती . तू असा कधी मधी येतोस घरी , ती पोर बिचारी वाट बघत असते तुझी डोळे लावून ".

        तात्या म्हणाले तसा किरणही बोलला " हो दादया , आता वहिनीला घेऊन जा मुंबईला तू . दोन महिने होत आले तुझ्या लग्नाला पण अजून काहीही कुरबुर न करता त्या सगळ्यांच सगळं करताय . बरं कुठे फिरायला ही घेऊन गेला नाहीस तू तिला ".

 "  एकटी कुठेय तात्या ती , आई आणि तुम्ही आहात की सोबत ."

        " पण तरीही , नवरा बायको सोबत राहिलेले बरे असतात . तू आता पुढच्या वेळी येतांना सगळ्या तयारीतच ये आणि घेऊन जा तिला तुझ्या सोबत मुंबईत . ती बिचारी काही बोलत नाही म्हणून , पण आपल्याला कळायला नको का तिच्या मनातलं ".

      " दरवेळी तू निघताना रडवेली होते ती , डोळ्यात पाणी आणत नाही आमच्या समोर पण जाणवतंच ना आम्हांला ते ".

         " हो तात्या , मी घर शोधायला लागतो आता गेलो की " मग पुढच्या वेळेस घेऊनच जाईन तिला मुंबईला ".

" बरं येतो मी , बस आली माझी ".

" चला तात्या येतो ".

" किरण येतो रे .... फोन करतो तुला सकाळी ".

        " हो , पोहोचला की फोन कर रे . माझ्यापेक्षा ही जास्त तुझी वाट बघणार आहे म्हटलं आता कोणीतरी घरात . तिला फोन कर नंतर ".

           किरण तर सध्या खूप खुश होऊन एकटाच गालातल्या गालात हसत होता .

            आईने किरणला असे बघितल्यावर , तिला तर खूप हसू यायचं त्याच . खरंच प्रेमात लोकं इतके वेडे होतात हे तिला तिच्या मुलाकडे बघून समजलं होत .

      तात्यांना कायम घाबरणारा , त्यांचा शब्द कधी खाली न पडू देणारा , त्यांचं सगळं ऐकणारा , कधीही तोंड वर करून न बोलणारा मुलगा , काल चक्क भांडला त्यांच्याशी . फक्त आणि फक्त त्याच्या प्रेमासाठी .

त्याच कौतुक करावं कि ओरडावं त्याला , काही कळत नव्हतं . पण खुश होतं पोरगं . काही का असेना सगळे तयार झाले आनंदाने हे महत्वाचं होत . आईने डोळे मिटून मनोमन देवाचे आभार मानत हात जोडले .

      सकाळ झाली तरी अजूनही झोपूनच होता किरण .

" उठ रे , आठ वाजून गेलेत . किती झोपतोस अजून ".

" आई , बस पाच मिनिटं . मग लगेच उठतो मी . थोडा वेळ अजून झोपू दे ना प्लिज . रात्री एकतर उशिरा झोपलोय मी ".

" का रे , रात्रीच कशाला जागरण करत होतास . काय कामं करत होतास रात्री , कि तुझ्या लग्नाची तयारी करत होतास झोपेत तू ".

  " हो मग , आता तयारी करायला लागणारच ना लवकर . वेळ कमी आहे आपल्याकडे आई , आता लवकरच मुहूर्त काढायला लागणार बहुतेक ".
वहिनी हसून उगाच चिडवून बोलत होती किरणला .

" काय वहिनी , सकाळी सकाळी मीच सापडलो का तुम्हांला दोघींना ".

" बरं आई , मी पण आज संध्याकाळी निघेन ग . खूप सुट्ट्या झाल्या माझ्याही एव्हढ्यात . नंतर पुन्हा जेव्हा हव्या असतात तेव्हा सुट्ट्या मिळणार नाहीत मग जास्त मला ".

" अस म्हणतोस , बरं ठीक आहे . पण मुहूर्त काढायचा म्हटल्यावर प्रियाची कुंडली नको का आपल्याकडे .
तिला विचारून घे फोनवर , आणि तिला काही माहिती असेल तर सांग म्हणाव लगेच . म्हणजे मी आणि वेदिका आजच जाऊन बघून येतो गुरुजींकडे ".

    " हो आई , विचारतो मी तिला . आता पहिले आवरून घेतो मी मग बोलू ".

     प्रियाला मेसेज करून तिची कुंडली मागवून घेतली . पण तिला काहीही सांगितलं नव्हतं अजूनपर्यंत किरणने .

तिला गेल्यावर सरप्राईज द्यायचं म्हणून तो इतका उत्सुक होता . तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला स्वतःला बघायचे होते .

           " किरण .... ए किरण , तुमचे छत्तीस पैकी तीस गुण जुळताय रे . गुरुजी म्हणाले जोडा अगदी छान आहे दोघांचा . मुहूर्त ही लवकरचा काढा म्हणाले मी त्यांना . आता नंतर जाईन तेव्हा सांगतील ते ".

आई घरात येत बोलत होती , तिला बसवून पहिले पाणी आणायला गेलो .

" थांबा भाऊजी घेते मी , म्हणून वेदिका आली ".

" अहो वहिनी तुम्ही यायच्या अगोदर मीच करत होतो ही सगळी छोटी मोठी कामं ".

" हो पण आता मी आलेय ना , मग मी असताना तुम्ही कशाला करताय ".

" अस कस , मदत तर केलीच पाहिजे ना ".

" हो , ते ही आहेच म्हणा ".

     " आम्ही तर आईला भांडी घासून द्यायचो , कपडे पण स्वतःचे स्वतः धुवायचो . केर काढायचो आणि पाणी सुद्धा भरायचो ".

" हो ग वेदू , पोरं आहेतच माझी गुणाची " ... आई बोलली तसे किरण तिच्याजवळ जाऊन बसला .

" आई , काय सांगताय मग तुमचे गुरुजी ".

  
" अरे छत्तीस पैकी तीस गुण जुळताय तुमचे . सगळं कसं छान होईल बघ आता ".

           " अरे वाह , पण आई मी हे सगळं नाही मानत ग . तुला तर माहितीच आहे ना . मला नाही विश्वास ह्या सगळ्यावर . पण फक्त तुझ्यासाठी मी तयार होतो हे सगळं करायला . कारण बाकी कोणावर नाही पण माझा तुझ्यावर विश्वास आहे ".

" मग झालं तर , मी म्हणतेय ना मग सर्व काही ठीक होईल . तू बस आता त्यांच्या घरी कधी जायचं ते सांग . म्हणजे आम्ही पुढची तयारी करायला मोकळे ".

" हो आई , मी आधी जातो मग तुम्हांला घेईन बोलवून तिकडेच . मग पुढचं सगळं तुम्हीच बघा , मी आपला कामाला लागतो माझ्या ".

आई गुरुजींकडून आल्यापासून किरण भलताच खुश होता . लग्नाची तारीख ठरणार होती त्याची . गालातल्या गालात काय हसायचा , मनातल्या मनात काय बोलायचा . त्याच तर काही कळतंच नव्हतं . प्रेमात लोकं वेडे होतात हे माहिती होत , पण हा तर ठार वेडा झाला होता .

आई आणि वहिनी त्याला चिडवायला एक सुद्धा संधी सोडत नव्हत्या . त्यालाही हे सगळं अनुभवतांना खूप मजा यायची . आईचा लाडका किरण आता बोहल्यावर चढणार होता .



सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all