प्रवास एकटीचा भाग - 14

प्रेम आंधळं असतं पण ते शेवटपर्यंत निभावणं आपल्या हातात असत


विषय - प्रेमकथा

प्रवास एकटीचा भाग - 14

     

     " तात्या तयार झालेत किरण प्रियाच्या लग्नाला , देवाचे आभार तर मानायलाच पाहिजे . म्हणून आई सगळ्यांना सांगत होती कि देवळात जाऊन येऊ सगळेच महादेवाच्या . आणि आज संक्रात पण आहे त्यामुळे देवाला तिळगुळ ठेवायलाच हवेत .

       गावात एक खूप जून महादेवाचं मंदिर होत . तिथं गेलं की मनाला एकदम शांत आणि प्रसन्न वाटायचं .

        कालपासुन घरातल्याचं एकमेकांशी बिनसलं होत , त्यामुळे आईने नंदीच्या कानात सगळं काही ठीक होऊ दे अस सांगत पुढे जाऊन पिंडीवर बेल वाहून डोकं टेकवलं .
काल जे नको व्हायला होतं ते झालं घरात पण आज सगळं काही छान झालंय म्हणून महादेवाचे आभार मानले .

      बाहेर किरणच्या हाताने नारळ फोडून घेतला आणि तिथे असणाऱ्या प्रत्येकाला नारळ साखरेचा प्रसाद वाटून मग घरी आले सगळे .

किरण अजूनही गप्प गप्पच होता . कोणाशी काही बोलत नव्हता , त्याच त्याच शांत गाडी चालवत होता .

वेदिका बोलली , "भाऊजी गाणी तरी लावा ना . खूपच शांत शांत वाटत आहे ".

तेव्हा किरणने रेडिओ लावला आणि गाणं लागलं ,
" बिछड़े अभी तो हम , बस कल परसों
जियूंगी मैं कैसे , इस हाल में बरसों "

गाणं ऐकताच किरणने रेडिओ पुन्हा बंद केला कारण घर आता जवळच आलं होतं . पण वेदिकाला समजलं होत सगळं किरणच्या मनातलं . ती सुद्धा मनातल्या मनात बोलली ," बस अजून थोडा वेळ धीर धरा भाऊजी मग तुम्हांला आनंदाची बातमी तर देणारच आहोत आम्ही ".

     किरणला अजूनही काहीच सांगितलं नव्हतं . दुपारी सांगूया म्हणून आईने सगळ्यांना गप बसवलं होत .

        मस्त मऊसूत पुरणाची पोळी त्यावर भरपूर साजूक तुपाची धार आणि सोबत गुळवणी , झणझणीत कटाची आमटी , गरम गरम इंद्रायणीचा भात , कांद्याची कुरकुरीत भजी , कुरडई पापड आहाहा , काय मेन्यू केला होता आईने जेवायला . संपूर्ण घरात घमघमाट सुटला होता .  आज पहिला सण होता वहिनीचा ह्या घरात .

       चला रे जेवायला पोरांनो , आईने हाक मारताच सुधाकर आणि किरण किचनमध्ये आले . जेवणाचं ताट पाहून सुधाकर तर खूपच खुश झाला . पण किरणला कळत नव्हते कि इतकं सगळं वाद होऊनही आईने आज गोडाधोडाच का बनवलं असेल जेवायला . त्याला तर बिलकुल ईच्छा होत नव्हती जेवायची .

       " किरण , अरे जेव कि ... ताटाकडे काय बघत बसलाय नुसता ".
आई गरम गरम पोळी वाढत होती सगळ्यांना . तात्या पण ताट बघून खुश झाले .

त्यावर " भरपूर तूप घाल आई ", सुधाकर मुद्दाम किरणला चिडवत अजून पुरणपोळी मागून घेत होता .
तात्यांच जेवण उरकून ते बाहेर जाऊन बसले .

      किरण चुपचाप जेवून उठणारच होता तितक्यात सुधाकरला वेदिका बोलली , " अहो पुरे झालं आता तुमचं , सांगा बघू भाऊजींना आता . बिचारे जेवले सुद्धा नाहीत नीट पोटभर . आणि तुम्ही चार चार पोळ्या खाल्ल्यात त्यांच्याच बाजूला बसून ".

" अरे हो हो , थांब की जरा . काय घाई आहे . त्याला थोडा अजून चिडवू तर दे . काय तू पण ... ".

" म्हणजे काय बोलताय तुम्ही मला कळत नाहीये ". त्यांच काहीही कळत नाही म्हटल्यावर किरण बोलला .

    "  किरण , कधी घेऊन जाणार आहेस आम्हांला प्रियाला बघायला .... "
आईने एकदम असे विचारल्या वर किरणला तर हसू की रडू असे झाले होते .

        " बरं आधी जेवून घे नीट , कालपासून जेवला नाहीये तू ".
आई त्याला आपल्या हाताने भरवत बोलली . किरणला मात्र आनंदाच्या भरात जेवण ही जात नव्हते .

सुधाकर ही बोलला , "आई आता याला आणखी एक पोळी वाढ ग  ... प्रियाच्या नावाची . मग बघ कसा खातोय ते ".
असे म्हणून सगळेच हसू लागले . किरणला मात्र ओशाळल्या सारखे झाले होते .

            जेवून उठल्यावर तात्या त्यांचा नेहमीचा पानाचा पितळी डब्बा घेऊन बसले होते . किरण त्यांच्यापुढे जाऊन उभा राहिला .

" तात्या , माफ करा मला . काल जरा जास्तच बोललो मी ". असे म्हणून त्याने तात्यांच्या पायाला हात लावला .

तात्या लगेच उठून उभे राहिले , किरणने लगेच त्यांना मिठी मारली . आणि सगळे वातावरण आनंदी झाले . आईने तर डोळ्याला पदर लावला त्यांना अस बघून . आज किती दिवसांनी घर आनंदाने भरलेलं होत .

त्यादोघांना बघून सुधाकर ही जवळ जात बोलला , " मी कुणाचं घोड मारलंय " मलाही घ्या की मिठीत .

" असेच खुश रहा आणि एकत्र रहा ", म्हणत तात्यांनी दोघांना आशीर्वाद दिला .

" बरं मग कधी नेतोस आम्हांला मुलीला बघायला ? "

" तुम्ही म्हणाल तर उद्याच जाऊया तात्या " ... किरण एकदम उत्साहात बोलून गेला .

         " अरे अरे , तू जाशील लगेच उद्या . पण इथल बघावं लागेल मला त्याच काय . मला आता पुढच्या आठवड्यात सुट्ट्या मिळतील , लगेच नाही मिळणार . त्यामुळे तुम्ही पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जा . म्हणजे मी इकडे घरी येईन वेदिका सोबत राहायला आणि तू आई तात्यांना घेऊन तिकडे जा ".

" हो बरोबर बोलतोय सुधाकर , असच करूया आपण ". आईनेही लगेच होकार दिला .

         ही आनंदाची बातमी प्रियाला कळलीच पाहिजे . म्हणून किरणने तिला संध्याकाळी फोन करून सांगितले . ती सुद्धा खुप म्हणजे खूप खुश झाली होती . आता दोघांना कधी एकदा भेटतोय असे झाले होते .

      आज संक्रात म्हटल्यावर बायकांची खास पूजा असते , सकाळी आईने आणि वहिनीने पूजा तर केलीच होती . पण संध्याकाळी सगळ्या बायका येणार होत्या हळदीकुंकूला . त्यामुळे घरात आवरा आवर चालली होती .

      आईने हलव्याचे सगळे दागिने तयार करून आणले होते वहिनीसाठी . आम्हांला बहीण नाही त्यामुळे आई वहिनीचे सगळे लाड पुरवत असे .

    काळ्या रंगांची लाल काठाच्या साडीत वेदिका खूप सुंदर दिसत होती . त्यात हलव्याचे सगळे दागिने अगदी उठून दिसत होते तिच्या अंगावर . नथ , बांगड्या , अंगठी , गळ्यातील हार , कानातले आणि माथ्यावर बिंदी सुद्धा हलव्याचीच सजली होती .

वेदिका तयार होऊन बाहेर आल्यावर सुधाकर तर तिला आ वासून बघतच राहिला होता .

" दादया तोंडात माशी जाईल रे ", असे म्हणून किरण त्याला चिडवू लागला . वेदिका लाजून आतल्या खोलीत पळून गेली .

" वेदू , बाहेर ये बाळ . बायका येतील आता हळदकुंकूला ". असे म्हणताच चार पाच बायकांचा घोळका घरात आला .

       वेदीकाने सगळ्यांना हळदीकुंकू लावून कुंकुवाचा करंडा वाण म्हणून दिला आणि सगळ्यांना वाकून नमस्कार केला . मसाला दूध जे आईने करून ठेवल होतं ते ही दिलं . बायका खुश होऊन पुन्हा पुढच्या घरी गेल्या .

       बायकांचा हा हळदीकुंकूचा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजेपासून सुरू झाला की रात्री नऊ वाजेपर्यंत सुरूच होता . त्यामुळे तात्या किरण आणि सुधाकर आतल्या खोलीत बसले होते टीव्ही बघत .

       सगळं आटोपल्यावर आई आणि वेदीकाने जेवायला पानं वाढली . गप्पा मारत मारत सगळ्यांची जेवणं झाली . आज खऱ्या अर्थाने संक्रात गोड झाली होती सगळ्यांचीच  .


सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा
      

🎭 Series Post

View all