प्रवास एकटीचा भाग - 13

प्रेम आंधळं असतं पण ते निभावणं आपल्यावर असत


विषय - प्रेमकथा

प्रवास एकटीचा भाग - 13


" प्रिया नायर " नाव ऐकताच तात्या शॉक बसल्यासारखे किरणकडे बघू लागले .

" अरे निदान मराठी मुलगी तरी बघायचीस ...! "

" प्रेम जात धर्म बघून नाही होत तात्या ."

         आईने प्रिया विषयी सगळी माहिती तात्यांना सांगितली . तिच शिक्षण , वय , कुठे राहते , तिच्या आवडीनिवडी आणि घरच्यांबद्दल ही सगळं सांगितलं .

किरणच्या मोबाईल मधला तिचा सुरेख फोटोही दाखवला तात्यांना .

           तात्यांनी सर्व शांतपणे ऐकून घेतले होते . काहीही न बोलता त्यांनी अंथरुणाला पाठ टेकली . आणि आता कसलाच विचार न करता शांत झोपी गेले .

    त्यांना आता कळून चुकले होते , कि आपल्या बाजूने बोलणार कुणीच नाहीये घरात . आपलेच पोरं आता आपल्याला शिकवायला लागले होते . आपण एकटे पडलो , त्यामुळे सगळ्यांच ऐकावं लागणार होतं आणि त्यांच्या मनाप्रमाणे करावं लागणार होतं . ही गोष्ट कुठेतरी मनाला खोलवर खूप बोचत होती त्यांच्या .

    सकाळी नेहेमीप्रमाणे लवकर उठून तात्यांनी आवरले . आईने तात्यांसमोर चहाचा कप धरला , पण त्यांचं लक्ष दुसरीकडेच होत . नजर एक ठिकाणी स्थिरावून उदासपणे बसून कुठल्यातरी विचारात हरवले होते ते .

" अहो , चहा घेताय ना ? "

" हा ...!"

" काय झालं ?" 
"कुठे हरवला होता ?"
" कसला इतका विचार करताय तुम्ही ?"


     " हरलो ग मी वसुधा , ह्या पोरां पुढे हरलो मी .
अस म्हणून तात्या उदास होत होते ".

     " अस का म्हणताय , मुलांच्या सुखापुढे अजून दूसर काही महत्वाचं असत का ?"

" नाही ना , मग कशाला मनाला लावून घेताय .
झालं गेलं ते विसरून जा सगळं ".

" त्यांच्या आनंदात आपण नाही सामील व्हायचं तर कोणी ?"

" देव न करो , पण उद्या उठून पोरानी काही वेडंवाकडं पाऊल उचललं तर ?"

" वसुधा , खूप घाबरता तुम्ही . माझा विश्वास आहे पोरांवर . असलं काहीही करणार नाही किरण ."

" पण तरीही , तुम्ही आता हट्ट सोडा तुमचा आणि आपल्या मुलांच्या सुखात सामील व्हा ".

" ह्यांना आज प्रेम झालं , आणि उद्या उठून ते भांडायला लागले तर काय करायचं आपण ? "

" अहो प्रेम करतात ते एकमेकांवर , मग भांडण कस होईल . आणि कोणामध्ये भांडणं होत नाही सांगा मला . थोडफार तर होणारच ना . पण आपला किरण समजूतदार आहे , तो कधीच अस वागणार नाही ."

" तुम्ही फक्त आपल्या मुलाच्या बाजूने बोलताय , मुलीबद्दल पण तितकंच माहिती नको का आपल्याला ".

" होईल हो हळूहळू सगळी माहिती ".

" काय होईल , आग पण आपल्याला बघायला नको का ?"

" आणि ती केरळी मुलगी . तिला आपलं बोलणं कळणार नाही आणि आपल्याला तीच . ते सगळं जाऊ दे , ती मुलगी किरण पेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे , हे तुला तरी कसं मान्य झालं . कस व्हायचं .
आणि हा म्हणतो आम्ही गेले तीन वर्षे एकत्र आहोत . त्यांच्यात मैत्री झाली ते ठीक आहे , पण प्रेमात पुढे जाऊन त्यांच्यात काही झालं तर नसेल ना ...!"

" अहो अस काय बोलताय तुम्ही , आपला किरण आहे तो . त्याच्याबद्दल तरी तुम्ही असा विचार नका करू ."

          " तस मी किरण कडून आधीच वचन घेतलं होतं . लग्नाआधी तुम्ही तुमची हद पार नाही करायची आणि आम्हांला सोडून तू परस्पर काहीही करणार नाही याच . आणि पोराने ऐकलं हो माझं ".

" मग त्याच्या सुखासाठी आपण होऊया ना तयार . आणि हो , खरंच मुलगी देखील चांगली आहे ती . मी स्वतः भेटलेय ना तिला सुधाकरची लग्नात , आम्ही बोललो आहे एकमेकांशी . चांगली वाटली मला ती पोरं , जोडा अगदी शोभून दिसेल दोघांचा ".

    " तू म्हणतेस म्हणून मी तयार आहे वसुधा . सगळ्यांची हीच ईच्छा असेल तर मी तरी विरोध करून काय करणार आता ".

" अस नका हो बोलू तुम्ही . मुलांच्या सुखासाठी आपण माघार घ्यायला हवी . आत्ताची मुलं ती , आपला काळ गेला आता . त्यामुळे मनात राग धरू नका तुम्ही ".

" त्यांनी उद्या उठून उगाच रागाच्या भरात काही करण्यापेक्षा आपणच आनंदाने त्यादोघांचं लग्न लावून देऊ ".

" बरोबर म्हणतेय तू , चल रानात जाऊन येतो मी . आल्यावर बोलू " .
अस म्हणून तात्या निघून गेले .

     आई मात्र खूप खुश झाली होती . किचनमधून वेदिकाने सगळं ऐकलं होतं . ती हातात साखरेची वाटी घेऊन तयारच होती .

" आई ही घ्या साखर , देवापुढे ठेवा आता तुमच्याच हाताने ".

दोघींनी देवासमोर हात जोडून आभार मानले आणि एकमेकींना साखर खाऊ घालून तोंड गोड केलं . इतक्यात सुधाकर ही तयार होऊन आला .

" अरे , आज काय सासू सुना सकाळी सकाळी एकमेकांचं तोंड गोड करताय . मलाही सांगा काय चाललंय तुमच्या दोघींचं ".

   " सुधाकर , अरे तात्यांनी लग्नाला होकार दिलाय . आता सकाळीच बोलत होतो आम्ही ".

    " अरे वाह आई , आजचा दिवस खूप छान आहे . किरणला आत्ता उठवून सांगतो थांब . तो तर काय करेन काय माहिती हे ऐकून ".

" अरे अरे थांब , त्याला इतक्यात कोणीही काहीही सांगू नका . सरप्राईज का काय म्हणतात ते तुम्ही , ते देऊया त्याला . तोपर्यंत गप रहा तुम्ही नवरा बायको ".

" वेदिका , चहा दे ग तुझ्या नवऱ्याला ".

आई वेदिकाला सांगून बाहेर निघून गेली .

" वेदिका , देतेस ना चहा मला . सुधाकर तिच्या जवळ येत बोलला ".

" हो देते ना , आणखी साखर घालून थोडा गोड करते , तात्यांना कमी साखरेचा बनवला होता ना ".

" त्याची काही गरज नाही म्हणत सुधाकर तिच्या अगदी ओठांजवळ जात बोलला ".
बिचारी घाबरून गेली एकदम आणि त्याला धक्का देत बोलली ," अहो किचनमध्ये आहोत आपण . अस काय करताय तुम्ही ".

मागून किरण उगाच खोकलल्याचे नाटक करत आत आला तसे वेदिकाने सुधाकर कडे सर्रकन पाठ फिरवली .

      " वहिनी मला पण चहा द्या , पण जास्त गोड नकोय मला . बहुतेक दादयाला जास्त गोड हवाय चहा . असे म्हणून किरण हसत हसतच बाहेर जाऊन बसला ".

" काय हो तुम्ही पण , वेळ काळ काही बघत नाही ".

" त्याला काय होतंय , आपलंच घर आहे आणि घरातली आपलीच माणसं आहेत . इतकं काही कोणी अडाणी नाहीये इथे . तू उगाच घाबरत असते . फ्री आहेत घरातले सगळे आपल्या ".

खरंच घरातले सगळे एकमेकांना समजून घेणारे असले की वाद होत नाही आणि सगळे एकमेकांच्या आनंदाचा विचार करतात . अगदी आपुलकीने हक्काने सगळं करतात .


सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all