Login

प्रवास एकटीचा भाग - 12

प्रेम आंधळं असत पण ते आपल्या निभावण्यावर असत


विषय - प्रेमकथा

प्रवास एकटीचा भाग - 12

      

             किरण आणि तात्यांच्या कालच्या अशा बोलण्यामुळे घरातले सगळेच चुपचाप होते . वातावरण एकदम गंभीर झाले होते . तात्या त्यांचं लवकरच आवरून सकाळपासून रानात निघून गेले होते .

किरण तर आतल्या खोलीतच बसून होता , तो काल रात्री पासुन बाहेर आलाच नव्हता . बाहेर गेल की पुन्हा तेच तेच बोलणं करून वाद होणार त्यापेक्षा आतल्या खोलीत शांत बसलेल बरं म्हणून तो तिथेच बसून पुढचा विचार करू लागला .

वेदिका जेवणाचं ताट घेऊन आली , पण तरीही तिला भूक नाही म्हणून सांगियले . रात्री कुणीच नीट जेवलं सुद्धा नाही .

         ह्या दोघांना सांभाळून घ्यायला आईला अवघड जात होते . वेदिका तर बिचारी बावरून गेली होती . तिला आईने सगळे सांगितले होते रात्रीच . किरण आणि प्रिया विषयी तिला नव्यानेच समजले होते सारे काही . पण काहीही न जाणता त्यांच्या मध्ये बोलणं तिला बरोबर वाटत नव्हतं , म्हणून ती सुद्धा दोघांचं सगळं म्हणणं फक्त ऐकून घेत होती .

       आज किरणने सुधाकरला फोन करून गावी बोलवून घेतले होते . तो आज संध्याकाळ पर्यंत पोहोचणार होता .
वाहिनीचा फोन तर झालाच होता सुधाकरला काल रात्री त्यामुळे आल्यानंतर त्याला पुन्हा काही सगळं सांगायची गरज नव्हती .


        सुधाकर घरी पोहोचला . त्याला बघून आईला जरा हायस वाटलं .
" सुधाकर , तू आलास ते फार बरं झालं . ह्या दोघांच्या मध्ये मी बोलायला कमी पडतेय रे . दोघेही अगदी हट्टाला पेटले आहेत . तूच समजावून सांग आता दोघांना ".

         सुधाकर रूममध्ये गेला , किरण जवळ जात त्याला काय बोलावे कळत नव्हते . पण इतकं माहिती होत , कि तो लग्न करणार तर फक्त प्रिया सोबतच  . हे त्या दोघांचं ठरलेलं होत .

              वेदिका रूममध्ये दोघा भावांसाठी चहा घेऊन आली .
" भाऊजी , तुम्ही काही काळजी करू नका . आम्ही आहोत सगळे तुमच्या सोबत . आणि राहिला प्रश्न तात्यांचा , तर ते ही तुमच्या भल्यासाठीच विचार करतील . तुम्ही अगदी चिडून नका बोलू त्यांच्यासोबत . वय झालंय त्यांचं आता , आणि जुन्या लोकांना आत्ताच्या पिढीशी जमवून घेताना थोडं अवघड जाणारच ना . भलेही ते लवकर तयार होणार नाहीत , पण मान्य तर करतीलच . कितीही झालं तरी वडील आहेत ते तुमचे , आपल्या मुलांच चांगलंच बघतील ".

" आणि तुम्ही काही काळजी करू नका , आम्ही आहोतच सगळे तुमच्या सोबत ".

       वेदिका अगदी थोडंच पण मुद्द्याचं बोलून गेली होती . सुधाकरला तिला अस बोलतांना बघून आणखीनच छान वाटलं .
    
           किरणला समजावं आता कठीण जाणार होत . कारण तो आता खूप पुढे गेला होता . राहता राहिला प्रश्न तात्यांचा , तर त्यांना समजावणं म्हणजे आपल्याच पायावर कुर्हाड पाडून घेण्यासारखं होत . पण त्यांच्याशी बोलावं तर लागणारच होत .

        सुधाकरला बघून किरण थोडा नॉर्मल झाला . काय करायचं आता , पुन्हा तेच तेच बोलणं मला आवडत नाही . आणि माझं ठरलंय हे सगळ्यांना ठाऊक आहेच .

" हे बघ किरण , तू आधी शांत हो बघू . आपण करू काहीतरी ".
सुधाकरला तर काय बोलावं कळत नव्हते इतकी बिकट परिस्थिती झाली होती .

         हट्टाला पेटलेले दोघे जण , एकही माघार घ्यायला तयार नाहीत . अशा वेळेस बोलणार तरी कुणाशी . कारण दोघांपैकी एकही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते .

          मीच बरोबर असे दोघेही धरून चालले होते . पण इथं घरच्यांना त्यांच्या अशा वागण्यामुळे किती त्रास होतोय हे कोणालाच कळत नव्हते .

       आई तर बिचारी कालपासुन रडकुंडीला आली होती . वेदिकाने कसेबसे दोन घास खायला लावले तिला . पण तिची अवस्था बघवत नव्हती .

      सगळे जण पुन्हा एकत्र आले रात्रीच्या जेवणाला .
" आता जेवतांना काही काढू नका ", वेदिकाने आधीच सांगून ठेवलं होतं सुधाकरला . कारण कालपासुन कोणीही नीट जेवलेलं नव्हतं . निदान आज तरी जेवू द्या सगळ्यांना . म्हणून सगळे चुपचाप जेवण करत होते .

       जेवण आटोपल्या नंतर मात्र सुधाकरला बोलणं गरजेचं होतं . त्याने किरणला समजावून बाहेर बोलावलं . तात्या ही समोरच बसलेले होते . त्यामुळे बोलतांना थोडं शांततेत बोलावं लागेल .

" काय म्हणतोय किरण ? "
" तुला लग्न करायचं आहे हे माहितीये आम्हांला , आणि त्या मुलीला सुद्धा बघितली आहे मी . तूझी पसंत चांगलीच असेल ही खात्री आहे मला ".
सुधाकरने बोलायला सुरुवात केली .

" पण तात्या काय म्हणताय हे एकदा नीट ऐकून तरी घे . मग नसेल पटत तर तसे सांग नंतर .... सुधाकर अगदी शांतपणे बोलत होता ".

     " त्याला मी बघितलेल्या मुलीशी लग्नच नाही करायचं आहे . कोण कुठली पसंत करून ठेवलीये आधीच देवजाणे ".
तात्या पुन्हा जोरात बोलले .

    " तात्या त्या मुलीला तुम्ही न ओळखता , न बघता जज नाही करू शकत . आम्ही दोघे गेले तीन वर्ष एकत्र काम करतोय . मला सगळी माहिती आहे तिच्याबद्दल आणि तिच्या घरच्यांबद्दल ही ".

     " माहिती आहे तुला सगळी तिच्याबद्दल , म्हणून काय लग्न करायचं असत का ?"

" आणि एकत्र काम करता तुम्ही , म्हणून लगेच प्रेम होतं असत का ? "

" आता बोल ना , आता का शांत तू ? "

" आम्ही कधी बघितलं नाही पोरीला , कधी बोललो नाही तिच्याशी , काही माहिती नाही आम्हांला तिच्या विषयी आणि तिच्या घरच्यांविषयी . मग कस काय लग्न ठरवायचं आम्ही तुमचं तिच्यासोबत ".   

       " प्रिया आली होती भाऊच्या लग्नात तात्या ..!
     
" काय ..!"
" आली होती ती पोरगी .
मला तर कुठे दिसली नाही .
आणि कुणी सांगितली कस नाही मला तिच्याबद्दल ".

       " माझ्याजवळ जी चंदेरी रंगाचा ड्रेस घालून बसली होती , तीच तर ह्याची प्रिया होती . तुम्ही आले तेव्हा तर तिने उठून तुमच्या पाया सुद्धा पडल्या होत्या . पण तुमचं लक्ष नव्हतं त्यावेळी ".

" ते काहीही असो , पण मला हे लग्न मान्य नाही ".

      " तात्या , पण तुम्ही ऐकूण तरी घ्या माझं . मी भाऊच लग्न झाल्याशिवाय नव्हतो करणार स्वतः लग्न . आणि तिला लग्नाला बोलावलं ते फक्त आपल्या घरातल्यांना तिने बघावं आणि ओळख व्हावी म्हणून ".

" नाव काय मुलीच ???"

"मुलगी कुठली ??? "

" काय करते ??? "

" किती शिकलेली ???"


" आणि महत्वाचं म्हणजे तू कुठं शोधली तिला ".

      तात्या शिक्षक असल्यामुळे प्रश्नांचा भडिमार पडला .

" प्रिया नायर " , नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात गेली त्यांच्या . तात्यांना वाटलं निदान त्यांच्यासारखी मराठी मुलगी असणार , पण ह्याने तर महाराष्ट्रा बाहेरची मुलगी शोधली , आणि ती ही केरळी .....
कस होणार होत देवजाणे

आता काय होणार पुढे ???



सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all