Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रवास एकटीचा भाग - 9

Read Later
प्रवास एकटीचा भाग - 9


विषय - प्रेमकथा
प्रवास एकटीचा भाग - 9

   


  
  सुधाकर आणि वेदिका , यांच्या लग्नाच्या तयारीत दिवस भराभर जात होते . खरंतर लग्नाची तारीख लवकर यावी असेच सगळ्यांना वाटत असते .

तयारी तर खूप जोरात चालू होती . सुधाकरने लग्नात घालायला सोनेरी रंगाची मस्त शेरवानी शिवून घेतली होती , जी वेदीकाच्या नऊवारी साडीला मॅचिंग होती . प्रत्येक कार्यक्रमासाठी दोघांनी थोडे थोडे मॅचिंग कपडे घेतले होते . जेणेकरून त्यांची जोडी एकदम भारी दिसेल .

किरणने सुद्धा स्वतःसाठी एक चंदेरी कुर्ता पायजमा शिवून घेतला आणि त्याचा फोटो देखील पाठवला होता प्रियाला . तिने सुद्धा त्याला मॅच होईल असाच ड्रेस शोधून काढला लग्नात घालायला . म्हणजे हे दोघेही सेम सेम दिसतील .

लग्नाला आता थोडेच दिवस बाकी होते . नातेवाईक यायला सुरू झाले होते घरी . घर आनंदाने अगदी भरून गेलं होतं .

साखरपुड्याचा दिवस आला , दोघांनी एकमेकांना स्वतःच्या नावाच्या अंगठ्या बनवून घेतल्या होत्या . त्या एकमेकांना अगदी प्रेमाने घातल्या . दोघांच्या डोळ्यात आनंद स्पष्ट दिसत होता .

        थोड्याच वेळात त्यादोघांचं वेगवेगळ्या पोज मध्ये फोटोशूट झालं . फोटो काढताना एकमेकांना होणारा ओझरता स्पर्श अंगावर शहारे आणत होता . त्यातही प्रेम होतं , दोघेही खूप खुश होते . 

दुसऱ्या दिवशी सकाळी हळद लावून झाली . दुपारी लग्नाचा मुहूर्त दिड वाजताचा असल्याने हळद सर्वांनी मनसोक्त खेळली .

             किरणला तर त्याच्या चुलत मामाची मुलगी सोडतच नव्हती . सारखी त्याच्या मागे लागायची . काय झालं होतं तिला काय माहिती . ती जवळ आली की किरण कुठलाही बहाणा करून तिला टाळायला बघायचा . पण तरीसुद्धा ती त्याच्या मागे मागे करणे काही थांबवत नव्हती . किरण अक्षरशः वैतागून गेला होता तिला .
हे सगळं बघून सुधाकरला मात्र खूप हसू येत होतं त्याच . दया येत होती किरणची . पण सांगणार कोणाला , म्हणून तो गप्प राहिला .

आईला सांगितले असते पण ती तिच्या बायकांच्या कामात बिजी असायची . त्यामुळे किरणला हे सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता .

प्रियाला फोन करून आठवण करून दिली , ती आजच निघाली होती इकडे यायला . पहिल्यांदाच ती किरणच्या घरच्यांना भेटणार होती , त्यामुळे थोडी भीती वाटत होती तिला . पण किरण सोबत असणारच होता म्हणून थोडी खुश होती . लग्नाच्या दिवशी दुपारपर्यंत पोहोचणार होती . किरणला तर तिला कधी भेटेन अस झालं होतं .

लग्नाचा मुहूर्त जवळ आला , किरणने सुधाकरला तयार केलं . त्याच आवरल्यावर तो ही तयार झाला . दोघेही भाऊ अगदी राजकुमार दिसत होते . 

घोड्यावर बसून नवरदेवाची वरात निघाली . डिजे समोर मनसोक्त नाचत सगळे वर्हाडी जल्लोष करत होती . त्यात किरण सुद्धा होता . त्याच्या तर आनंदाचा ठिकाणा नव्हता .

पण प्रिया अजून कशी पोहोचली नाही , म्हणून किरण काळजी करत होता . एकदा फोन करून घ्यावे असंही बरेचदा वाटलं त्याला , पण डिजेचा आवाज इतका मोठा होता की ऐकूच येणार नव्हतं त्यात काही सुद्धा . म्हणून त्याने मेसेज करून ठेवला तिला .

किरणचा मेसेज बघितला होता प्रियाने पण त्याला सरप्राईज द्यायचं म्हणून डायरेक्ट त्याच्या समोर येऊन उभी होणार होती .

       किरणला वरातीमध्ये अस नाचताना बघून प्रियाला हसू येत होतं हे बघून , ती सुद्धा पाठीमागून हळूच त्याच्यासमोर आली आणि त्याला बघून तिनेही डीजेच्या मराठी गाण्यावर थोडासा डांस केला . तिला बघून किरणला अजूनच आनंद झाला आणि तो आणखी जोशात नाचू लागला .

वरात लग्नमंडपात आली , वर्हाडी मंडळींचे जोरदार स्वागत झाले . एकमेकांना टावेल टोप्या आणि फुलांचे हार देत मंडपात प्रवेश झाला .

भटजी माईक वरून बोलले " मुलीचे मामा मुलीला लग्नमंडपात घेऊन या ".

नंतर नवरा नवरी गुलाबाच्या पाकळ्यांवरून स्टेजपर्यंत एकमेकांचा हात हातात घेऊन गेले . अंतरपाट समोर धरून मंगलाष्टके चालू झाली . सुधाकरची नजर वेदिका वरून हटतच नव्हती , खूप सुंदर दिसत होती ती नऊवारी साडीत .

प्रिया सुद्धा किरणच्या पाठीमागे येऊन स्टेजवर चढली . तिला ही मराठी लग्न पद्धती खूप आवडली . पण किरणच्या मामाची मुलगी तिला धक्का देऊन किरणच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली .

हे बघून प्रियाला खूप राग आला तिचा . पण ती फक्त शांतपणे बघत उभी राहिली , त्याला नंतर बघू म्हणून . 

लग्न लागले आणि सगळ्यांनी आशीर्वाद रुपी अक्षता नवरदेव नवरीच्या अंगावर उधळल्या . लक्ष्मी नारायणाचा जोडा अगदी शोभून दिसत होता .

वर्हाडी तर पळाले लगेच जेवायला , खरंतर काही काही लोकं फक्त त्यासाठीच आलेले असतात .

काही लोकं फोटो काढण्यात बिजी होते तर काही गप्पा मारण्यात .

थोड्याच वेळात सप्तपदी सुरू झाली . लग्नाच्या सर्व विधी प्रिया अगदी मन लावून बघत होती . त्यामागचा अर्थ समजून घेत होती . मराठी भाषा थोडीफार समजत होती तिला , त्यानुसार तिने समजून घेतले . जे नाही समजले ते किरणला नंतर विचारणार होती ती .

          ह्या सगळ्यात ती मामाची मुलगी काही किरणला सोडायला तयार नव्हती , किरणला समजले की प्रिया चिडतेय तिला माझ्याजवळ आलेलं पाहून . तो ही मग मुद्दाम तिच्याशी बोलू लागला . ते पाहून प्रिया अजूनच रागाने लाल झाली होती . पण किरणला मात्र तिचे खूप हसू येत होते .
त्या दोघांचं नजरेनेच बोलणं सुरू होत .

आईला प्रिया आली हे समजलेच नव्हते . सगळे विधी पूर्ण झाल्यावर आई थोडीशी निवांत बसली तेव्हाच किरणने प्रियाला नजरेने खुणावल .

प्रिया आईजवळ गेली .
"मी प्रिया , म्हणत तिने वाकून नमस्कार केला ".
तिच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवत आईने तिला आशीर्वाद दिला , " सुखी रहा बाळ ".
" तू नाव नसते सांगितले तरी मी ओळखले असते हो तुला . खूप सुंदर दिसतेय तू , कारण तू आल्यापासून किरणची नजर तुझ्यावरच तर आहे . ते समजलंय मला ".

" आई काहीही काय , असे म्हणत किरणने त्याच्या केसांमधून हात फिरवला ."

प्रिया आईजवळ थोडा वेळ बसली , तिथे त्याचे वडीलही आले . तिने लगेच खाली वाकून त्यांच्या पायाला हात लावला . त्यांनी सुद्धा सुखी रहा म्हणत आशीर्वाद दिला . कारण त्यांना माहितीच नव्हतं ती कोण होती ते .

     लग्नाचे विधी सगळे पार पडले , आता सगळे जेवायला बसलो होते . नवरा नवरी मध्यभागी बसले आणि बाजूने बाकीची मंडळी . किरण सुधाकर जवळ बसला . त्याच्या समोरच्याच बाजूला प्रिया बसली होती . मनात तर त्याच्या जवळ बसायला हवं होत अस चालू होतं . पण इतक्या लोकांसमोर ती काहीच करू शकत नव्हती .

       किरण जवळ ती मामाची मुलगी आली बसायला , आता मात्र खरंच प्रिया चिडणार . आता आपले काही खरं नाही असे म्हणून हळूच त्याने प्रियाला बघत आपले कान पकडले . प्रिया त्याच्याकडे बघून हसत होती , किरण आपल्याला किती घाबरतो हे बघून तिला आनंदच झाला .

           प्रिया तिथूनच घरी पुन्हा जाणार होती . किरण तिला भेटायला तिच्या जवळ गेला . ते दोघे हसून बोलत होते त्यामुळे काहींचे लक्ष त्यांच्यावरच होते . नातेवाईक असतातच त्यासाठी , काय बोलणार आता .

        जी वेळ लग्नानंतर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येते ती पाठवणीची वेळ जवळ आली होती , सगळे घाई करत होते .

आई आणि तात्या वेदिकाच्या घरच्यांना सांगत होते कि " काही काळजी करू नका तुम्ही " .

किरण सुद्धा बोलला , " वहिनी आता आमच्या घरी येणार तेव्हा रडायचं बिलकुल नाही , मी असतांना तरी ".

अखेर निघतांना वेदिकाचा दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला , आणि ती पळत जाऊन तिच्या आई वडिलांच्या कुशीत शिरली , अगदी लहान मुलीसारखी . हे बघून तर तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते . हा क्षणच असतो असा , प्रत्येक जण हळवा होतो . 


वहिनीला घेऊन घरी आलो , लक्ष्मीच्या पावलांनी माप ओलांडून वेदिका घरात आली . पण दार अडवायला होतीच ती मामाची मुलगी .

"नाव घ्या दोघांनी त्याशिवाय घरात प्रवेश मिळणार नाही ". असे म्हणून तिने दरवाजाला आडवा हात रोखून धरला .
मग काय दोघांनी मस्त उखण्यात एकमेकांचं नाव घेतलं आणि मग घरात आले .
सगळ्यात पहिल्यांदा देवघरात जाऊन नमस्कार केला आणि मग बाकीच्यांना .

दुसऱ्याच दिवशी सत्यनारायण पूजा होती . पूजा होऊन जेवण झाल्यावर सगळे नातेवाईक एक एक करून आपल्या घरी निघून गेले . कारण बहुतेक सगळे जवळचेच होते .
आता घरात फक्त आम्ही पाच सहा लोकं होतो .

   " मलाही निघायला हवं उद्या आई , सुट्ट्या संपल्या माझ्या " किरण बोलला .

" अरे थांब की अजून चार दिवस , तुझ्या वहिनी सोबत थोडे दिवस ". आईने अजून आग्रह केला , पण थांबणे शक्य नव्हते आता .

दुसऱ्या दिवशीच सकाळी किरण जायला निघाला .
" आज वहिनीने डब्बा दिलाय बरं किरण ". आई हातात डब्बा घेऊन जवळ येत बोलली .

वहिनी तिथेच उभी होती , थॅंक्यू वहिनी म्हटल्यावर तिने हसून बघितले .
पुढच्यावेळी लवकर या म्हणाली , खरंच छान होती वहिनी .

सुधाकर किरणला स्टॉप पर्यंत सोडायला आला होता आणि बोलला , " छान आहे हं तुझी प्रिया " .....सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Trupti Koshti

मांजर प्रेमी ? पुस्तक प्रेमी ? आणि लिहायला थोडंफार जमत ✍️

//