प्रवास एकटीचा भाग - 5

प्रेम आंधळं असतं पण आपण ते कुठपर्यंत निभावू शकतो हे मात्र आपल्यावर असतं


विषय - प्रेमकथा

एकटीचा प्रवास भाग - 5


           संपूर्ण प्रवासात किरण विचार करत होता . त्याच्या घरात सगळे सुशिक्षित असूनही लव्ह मॅरेजला परवानगी का नाही ??

" प्रेम करणं गुन्हा थोडीच आहे ".

       तो फक्त त्याच्याबाजूनेच विचार करत होता . पण तात्यांना काय वाटत असेल , त्यांच्या मनाला काय वाटलं असेल आपल्या मुलाबद्दल अस जाणून .

विचार दोन्ही बाजूने करायला हवा , हे भावाने म्हणजेच सुधाकरने शिकवलं होत त्याला . प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करून बघायचा म्हणजे आपल्याला कळायला सोपं जातं ते . आणि समोरच्याच्या मनात काय चालले असेल हे ही समजते . त्यामुळे समोरच्याला न दुखवता आपण आपली बाजू मांडू शकतो त्यांच्यासमोर .

किरण तात्यांचा विचार करू लागला .
           
            " आपलं गाव एक छोटंसं खेडेगाव आहे , तिथे मुलाने एखाद्या मुलीसोबत बोललं तरी वेगळा अर्थ काढतात . म्हणून कदाचित तात्यांना हे पटत नसावे . आणि त्यांची साऱ्या पंचक्रोशीत ओळख आहे . कडक शिस्तीचे गुरुजी म्हणून शाळेतील सगळी पोरं त्यांना घाबरत , आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या मुलाने अस काही करायला नको असेल कदाचित . विचार करून करून डोकं दुखायला लागलं होतं त्याच .

" पण प्रेम हे काय ठरवून होत का ???

ते जेव्हा होत तेव्हा आपल्याला कळतही नाही , आपण फक्त वाहावत जातो त्यात . पण हे बाकीच्या लोकांना कस कळणार . 

         तात्यांना वाटत असेल कि आपल्या मुलाला रागावून ओरडून ऐकेल तो , पण मी हार मानणार नाही . भलेही कितीही वेळ लागला तरी सुद्धा मी सगळ्यांना तयार करूनच राहीन . माझं ठरलंय आता . कोणालाही न दुखवता सगळ्यांना तयार करायचं .

         त्यादिवशीच किरणने सुधाकरला फोन करून त्याच्याशी बोलून घेतल . थोडी भनक होतीच त्याला पण आज मी त्याच्यासमोर सर्व मान्य करणार होतो .

लगेच फोन लावला दादयाला
त्यालाही सांगितलं , मी मुलगी पसंत केलीये ते .

" अरे वाह छुपे रुस्तम , तरीच तुझा फोन सध्या बिझी येत असतो सारखा सारखा ".

" नाही रे दादा , अगदीच तस काही नाहीये ".

" मग कस आहे , सांग तर जरा ".

किरणने त्याला प्रियाबद्दल सगळी माहिती सांगितली .
सुधाकरने ही त्याच म्हणणं सगळं ऐकून घेतलं .

" किरण , तू खरंच सिरीयस आहेस ना याबाबतीत ???
कारण लग्न म्हणजे दोन व्यक्तीचंच नाही तर दोन कुटुंबाच नातं जोडल्या जात . त्यात प्रिया केरळी आणि आपण महाराष्ट्रीयन .
इथे जिल्हा नाही तर दोन वेगवेगळे राज्य आहेत . भाषाही वेगळी , खाणंपिणं वेगळं , राहणीमान वेगळं , पेहेराव वेगळा , सगळंच वेगवेगळं आहे .
कस जमेल हे ???

" जमेल दादा सगळं , आम्ही जमवून घेऊ . आमचं खरंच खूप प्रेम आहे एकमेकांवर ".

हे बोलायला सोपं वाटतं असलं तरी सुद्धा खूप काळजीपूर्वक बघावं लागेल सगळं . मला नाही वाटत तात्या लवकर होकार देतील या लग्नाला . त्यांना तयार करणं खूप अवघड आहे आपल्यासाठी .

" दादया तू तरी निदान अस बोलू नकोस ".

" जे आहे ते आहे किरण , उगाच खोटी आशा कशाला दाखवेन मी तुला ".

" हम्मम्म्म , हे ही खरंच आहे म्हणा ".

" पण तरी सुद्धा मी आहे तुझ्या सोबत , नको काळजी करू तू इतकी . बघू आपण काही करता येतंय का ते ".

" हो , थँक्स दादा . तुझ्याशी बोलून मन मोकळं झालं माझं ".

" हम्मम्म , आणि आई सुद्धा आहेच आपल्या सोबत . त्यामुळे काळजी करण्याचं काही कारणच नाही ".

" हो , मी आईलाही प्रिया विषयी सगळं सांगितलं आहे ".

आणि एक महत्वाचं , तू आम्हांला तयार करतोय पण तुझ्या त्या प्रियाच्या घरी माहिती आहे का ???
नाहीतर आपण तयार व्हायचो आणि त्यांचा नकार यायचा तिकडून .

" नाही रे तस काही नाहीये , उलट तिच्या घरी तिच्या वडिलांना माहिती आहे . म्हणजे त्यांना डाऊट तर आहेच आधीपासून आमच्या बद्दल , पण आईला अजून सांगितलं नाही तिनेही ".

" अरे मग कधी सांगणार ???

" मी बोलतो पोहोचल्यावर प्रियासोबत . आणि गरज वाटली तर मी स्वतः जाईन तिच्या घरी बोलायला ".

" हम्मम्म्म , असच कर तू . हे बरं होईल ".

" बर ते जाऊ दे दादा , तू कधी जातोय मुलगी बघायला ".

" हे बघ माझ्या लग्नाच राहू दे ,
तुला करायचे असेल तर तू लग्न करू शकतोस माझ्या आधी . मला काहीच हरकत नाही ".

" अस कस दादा , मी अस करेन का कधी 
" आधी लगीन कोंढण्याचं " .

आणि दोघेही हसू लागले .

" पण भाई , तू लवकर तुझ्या लग्नाचं बघ ना . म्हणजे माझा रस्ता मोकळा होईल ".

      " गप रे तू , आतापर्यंत पन्नास मुली तरी पाहून झाल्या असतील माझ्या . मला काही आवडल्या तर त्यांना मी  पसंत नव्हतो आणि काहींची पत्रिका जुळत नव्हती ".

           काही मुलींच्या माझ्याकडून अपेक्षा जास्त होत्या . आणि काहींच तर माझ्यापेक्षा जास्त शिक्षण झालेलं . प्रत्येक वेळी काही ना काही अडचण आली .

" जाम वैताग आलाय मला आता ह्या सगळ्याचा ".

" अस कस चालेल दादा वैतागून , निदान माझ्यासाठी तरी तू लवकर बघ ".

" हम्मम आता तर बघायलाच पाहिजे , नाही का ???
पण मी आता ठरवलंय
" जी मुलगी मला पसंत करेन त्याच मुलीशी मी लग्न करणार ".

" मग झालं तुझं लग्न "अस म्हणून किरणने डोक्याला हात लावला .

" ए काहीही काय , इतका वाईट दिसतो का मी ".

" तस नाही रे , पण काही मुली खरंच चेहरा न बघता समोरच्याच मन बघतात ".

" ओ फिलॉसॉफर , झाले का तुमचे पुन्हा सुरू ".

" नाही रे , पण खरंच दादा ... काही असतात असेही .  पण नक्कीच तुलाही लवकरच तुला पसंत करणारी , तुझ्या मनासारखीच भेटेल कोणीतरी ".

" हो का , खुप खूप धन्यवाद आपले " .

" बरं मी सांगतो तुला काही वाटले तर ".

" ओके , सांग मग काय होतंय ते ".

" हो दादा , चल बाय ".

" सांभाळून जा रे , काळजी घे ".

     
             दादा बरोबर बोलून किती छान वाटलं , तो तसा आहेच म्हणा , आई नंतर तोच तर आहे मला समजून घेणारा .

            दोन भाऊ सुद्धा एकमेकांचे किती छान मित्र असतात . लहानपणी सतत भांडणारे , खोड्या काढणारे , मारामारी करणारे , चिडवणारे . सोबत शाळा कॉलेजमध्ये मजा मस्ती करत जाणारे भाऊ मोठे झाल्यावर मात्र एकमेकांचे चांगले मित्र बनतात .

        " हे देवा माझ्या भावाला चांगली मुलगी मिळू दे . त्याला सांभाळून घेणारी , त्याची काळजी घेणारी , त्याच हळवं मन जपणारी आणि त्याच्यावर खूप खूप खूप प्रेम करणारी ".

आणि त्याच्यासोबत मलाही समजून घेणारी , माझ्यावरही भावासारखी माया करणारी वहिनी मला मिळू दे .

          मनातल्या मनात किरण आपल्या भावासाठी प्रार्थना करत होता देवाजवळ . किती निर्मळ मनाने बोलत होता तो . पण यात त्याचा थोडासा स्वार्थ ही दडला होता . कारण त्याच झाल्याशिवाय किरणला प्रियासोबत लग्न करता येणार नव्हतं म्हणून . बाकी काही नाही .


सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा

🎭 Series Post

View all