प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 31

प्रेम आंधळं असत पण ते नात कायमस्वरूपी टिकवून ठेवणे आपल्या हातात असते


प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 31


किरण आता कायमस्वरूपी साठी युरोप मध्ये आला होता, आधी ऑफिसच्या कामानिमित्त आलेला तेव्हा त्याला वाटलं नव्हतं कधी तो सुद्धा इथलाच एक बनून जाईल. आणि त्याच्या आयुष्यात श्रेया सारखी त्याच्यावर इतकं भरभरून प्रेम करणारी एखादी मुलगी येईल.

प्रियाला तो तिकडे श्रेया कडे राहायला गेल्याच समजलं होत, पण तिला अजूनही तिची स्वतःची चूक कळत नव्हती.
आजही ती किरणलाच दोषी मानत होती, तोच मला सोडून गेला. त्यालाच जायचं होतं मुंबईला.. सगळं काही त्याला एकट्याला करायचं होतं, पण माझं काय? माझा विचार का करत नव्हता तो? मी त्याला जाण्यापासून तर कधीच अडवलं नव्हतं, तो गेला तर पुन्हा परतून माझ्याजवळ न येण्यासाठी.
विचार करून करून प्रियाचं डोकं जड झालं होतं, तिला आता काय करावं काहीच कळत नव्हतं.

तिने लगेच वेदूला फोन केला, आणि तिच्यासोबत काय काय घडलं हे सर्व सांगितले. जवळपास दिवसभर ती बोलत होती वेदू बरोबर.

वेदूला ही हे ऐकून विश्वास बसत नव्हता की तिचा लाडका दिर अस वागू शकतो.
वेदू ने गावी आईंना फोन करून सगळी हकीकत सांगितली. त्यांनी तर डोक्याला हात लावून मटकन बसूनच घेतले. तात्यांना कळालेच नाही की काय होतंय आपल्या घरात, इतकं सगळं घडून गेलं आणि आपल्याला आत्ता हे सांगताय.

तात्या तर लगेच बोलले,
"तरी मी सांगत होतो तुम्हांला सगळ्यांना, नको करूया आपण त्याच लग्न तिकडे. पण नाही.. माझं कोणी ऐकेल तर ना! आता भोगा आपल्या कर्माची फळं."

आई फक्त ऐकून घेत होत्या तात्यांच, कारण ह्या सगळ्यात जास्त दोष ते आईंनाच देत होते. त्यांच्याच लाडाने हे सगळं झालं होतं, वेळीच पोराला दम देऊन सावरले असते तर आज हे इतकं आपल्याला पाहावे लागले नसते.

आईचा खरंच दोष होता का? त्या तर त्यांच्या मुलाच्या चांगल्यासाठी त्याच्या खुशी साठी हे सगळं करायला तयार होत्या. पण त्याने काय केलं शेवटी, इज्जत धुळीला मिळवली आपली असे तात्या सारखे म्हणत होते.

खूप रडल्या आई, त्यांनी सुधाकरला फोन केला. त्याला सांगितलं की समजावून सांगा किरणला तुझं ऐकेल तो. आणि गोड गोड बोलून त्याला इकडे बोलावून घे. तिकडे इतक्या लांब जाऊन कोण कुठल्या मुलीसोबत राहायला याला लाज सुद्धा कशी वाटली नाही.
एक ना अनेक गोष्टी आई सुधाकरला सांगत होती. सुधाकरला ही त्याच्याशी काय बोलावे हे कळत नव्हते, तरी पण त्याने फोन लावला आणि बोलून घेतले. समजावून सांगितले, पण किरण ऐकायला तयार नव्हता.
आई तुझ्या फोनची वाट बघतेय हे ऐकल्यावर त्याने गावी फोन केला.

त्याला माहिती होत गावी फोन केला म्हणजे बोलणी ऐकावी लागेल, त्यासाठी त्याने स्वतःच्या मनाची तयारी करून ठेवली होती.

"किरणा, बाळा.. अरे हे काय करून बसलास तू तिकडे. इकडे ये आपल्या लोकांमध्ये, तिकडची नोकरी सोडून दे किती वेळा सांगितलं होतं तुम्हांला दोघांना पण तुम्ही काही ऐकलं नाही तात्यांच. आता पुढे काय करणार आहेस आणखीन, अजून काय काय बघावं लागणार आहे रे देवा परमेश्वरा.."

आई रडून रडून बोलत होत्या, किरणने त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि इतकंच सांगितलं,
"आई, लग्न मी माझ्या मर्जीने माझ्या जबाबदारी वर केलं मग पुढे काय करायचं ते माझं मी बघून घेईन. तुम्ही नका पडू आमच्या दोघांत."

"अरे ही काय बोलायची पद्धत झाली का? म्हणे आमचं आम्ही बघून घेऊ, अरे लहान लेकरू वाट बघतंय रे तुझी. त्या सार्थक सातगी तरी घरी ये, आपण बघू ना काय ते. तुमच्या दोघांच्या भांडणात त्या लहान जीवाचे किती हाल करताय तुम्ही दोघे हे कळतंय का तुम्हांला."

"आई, सार्थकला मी काही सुद्धा कमी पडू देणार नाही. तू नको काळजी घेऊ त्याची."

"अरे तू पैसा पुरवशील तिकडून, पण बापाचं प्रेम कस पुरवशील? त्यासाठी तर तुला यावच लागेल ना!"

"मी येईन आई सार्थक साठी तिकडे, महिन्यातून किंवा वर्षातून एक दोन चक्कर मारेन मी तिकडे."

"अरे का.. का? अस का करतोय तू? डोकं बिक फिरलंय का तुझं? अस नको रे वागू तू."

"आई तू शांत हो बरं आधी, तुला नाही माहिती प्रिया कशी वागली आहे माझ्यासोबत. तुला काय वाटत सगळी चूक माझी आहे का? माझी चूक लगेच दिसली सगळ्यांना, पण तिने काय केलंय आत्तापर्यंत ते नाही सांगता येणार मला."

"विसरा रे तुम्ही ते आधीच सगळं, आणि परत ये तू आपल्या देशात आपल्या माणसात. तिकडे दिल्ली पण नका राहू तुम्ही, इकडे मुंबई पुण्यात येऊन रहा नाहीतर सरळ गावी ये."

"आई, आई तू शांत हो आधी. आणि मी जरी पुन्हा तिकडे आलो तर मी प्रियाजवळ पुन्हा कधीच जाणार नाही. हे माझं ठरलंय."

आईंनी इतकं समजावून ही किरण ऐकून घ्यायला तयार नव्हता, पण प्रियाने इतकं वाढूच कस दिलं प्रकरण. स्वतःचा नवरा अस दुसऱ्या बाईजवळ जाईपर्यंत झोपली होती का ही? काहीतरी तर करायला पाहिजे होत ना तिने.

प्रियाचं किरणच्या आईं सोबत आणि वेदू सोबत कायम बोलणं व्हायचं, आता तिला त्यांची गरज वाटू लागली होती. तिला खूप आशा होती की किरण आईंच्या सांगण्या वरून तरी घरी येईल, पण तस काहीच झाले नाही.

तात्या म्हटलेच होते, किरण तिला एकटीला टाकून लांब गेलाय ह्यात तिची थोडी तरी चुकी असणारच आहे ना! आणि टाळी कधी एका हाताने वाजत नाही. जरूर प्रियाची ह्यात मोठी चुकी असणार होती.

पण दोघांना किती विचारलं तरी ते सांगायला तयार नव्हते की भांडण नेमकं कोणत्या कारणावरून झालं होतं त्यांचं. कळलं असत म्हणजे मिटवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करता आले असते.

प्रियाच्या विरोधात घरचे सगळेच होते पण वेदूला कायम वाटायचं, की प्रियाने एकटं नको राहायला. सार्थक अजून लहान आहे, त्याला बापाच्या मायेची गरज आहे. प्रिया जरी स्वतः जॉब करून कमवत होती पण ती वडिलांचं प्रेम थोडीच देऊ शकत होती.
प्रियाच्या जागी जर आपली एखादी बहीण असती तर आपण त्यांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न केलेच असते ना!
त्यामुळे वेदू नेहमी तिच्या बाजूने असायची, पण याचा अर्थ असा नाही की चूक पूर्णपणे किरणची होती.

झाली चूक प्रिया कडून तिने आता मान्य सुद्धा केलं, मग त्यांनी परतून यावं तिच्याकडे. मागच झालं गेलं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करावी.

पण किरणने जेव्हा वेदूला सांगितलं की प्रिया कशी वागायची त्याच्यासोबत तेव्हा तिलाही विश्वास बसला नव्हता. तिला समजत होत किरणची काय अवस्था झाली असले तेव्हा, आणि हे ही कळत होते की आता ते तिच्यासोबत राहायला का नको म्हणताय.

वेदू दोन्ही बाजूने अडकून पडली होती, किरणच तस वागणं साहजिकच होत पण प्रिया.. तिच्यासमोर तर अख्ख आयुष्य उभं होत सार्थकला घेऊन. सार्थक तिच्याकडे होता त्यामुळे तीच पारडं किरण पेक्षा जड होत.

वेदू ने प्रियाला कायम सपोर्ट केला, तिला मानसिक आधार दिला. जो तिला खरा आता गरजेचा होता, नवरा बायकोत कितीही वाद झाले तरी ते आपापसात बोलून बसून मिटवून टाकायचे असतात. पण अस डायरेक्ट सोडून जाणे तिला मनाला अजिबात पटत नव्हते.

पण तिकडे किरणच ऐकलं की त्याचही बोलणं तिला पटायचं, वेदूला काय करावं ते समजत नव्हते. तिला फक्त इतकंच समजत होत की सार्थकला त्या दोघांची गरज आहे आणि त्यासाठी दोघांनी समझौता करून राहायची गरज आहे.

प्रियाला आधीच आठवून खूप रडायला यायचं, त्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात त्या दोघांच्या आठवणी होत्या. ती स्वतःला खूप कमजोर फिल करत होती.
पण वेदू ने तिला समजावल्या नंतर ती पुन्हा ऑफिसला जायला लागली, सार्थकची जबाबदारी होती तिच्यावर. त्यामुळे तिला उठून पुन्हा उभं राहावच लागणार होतं.

सार्थकला तिने मोठं केलं, त्याच्या प्रश्नांची न समजाणारी उत्तरे त्याला दिली. शाळेत घातलं, त्याला शिकून खूप मोठं करण्यासाठी, एक चांगला व्यक्ती घडवण्यासाठी ती प्रयत्न करत होती.
ह्यासगळ्यात आणखी चार वर्षे गेली, सार्थक आता आठ वर्षांचा झाला होता. किरण वर्षातून फक्त एकदा यायचा त्याला भेटायला, आता तर त्यालाही समजायला लागले होते की आपले पप्पा बाहेर देशात राहतात वर्षातून एकदाच आपल्याला भेटतात त्यांना खूप कामं असतात त्यामुळे ते पुन्हा लगेच निघून जातात.

प्रिया आता मुंबईत आली होती जॉब साठी, सार्थकला ही तिथेच शाळेत घातलं होत. ती अजूनही वाट बघत होती, कधीतरी किरण येईल पुन्हा तिच्याजवळ आणि ते आधी सारखेच राहतील.

तिला तिच्या चुका समजायला लागल्या होत्या, त्यामुळे ती स्वतः वर देखील चिडायची. तिला झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप देखील होत होता. त्या चुका सुधारण्याची एक तरी संधी मिळावी अस तिला वाटायचं, पण आता वेळ हातातून निघून गेली होती.

रोज रात्री ती भिंतीवर लावलेल्या त्यांच्या फॅमिली फोटोकडे बघून रडत रडत किरण सोबत बोलायची, पण तिचे शब्द त्यांच्यापर्यंत आता कधीच पोहोचणार नव्हते कारण तो आता तिच्यापासून खूप लांब गेला होता.

ती स्वतःशीच सतत बोलत बसायची, आणि समजून घ्यायचा प्रयत्न करायची की किरणला काय वाटत असेल तेव्हा, जेव्हा आपण त्याच्याशी अस वागलो, त्याला खूप लागलं असेल मनाला. पण आता विचार करून तरी काय होणार होते.

एखाद्याने किती बोलावं समोरच्याला, आणि का बोलावं? समोरचा ऐकून घेईल आणि एक दिवस सगळं सोडून निघून जाईल चुपचाप की त्या व्यक्तीला कळणार सुद्धा नाही.
हेच झालं होतं त्यांच्या बाबतीत, आता प्रिया एकटीच राहिली होती. तिची मम्मी होती तिच्यासोबत पण तिच्या पप्पांची तब्येत बिघडल्यावर ती सुद्धा केरळला निघून गेली.

आता मात्र प्रियाला घर खायला उठत होत, लहान सार्थक वेगवेगळे प्रश्न विचारायचा.
पप्पा कुठे आहे?
ते आता येत का नाही लवकर मला भेटायला?
खूप लांब का गेले पप्पा आपल्यापासून?
आपण का नाही जात तिकडे?

असे एक ना अनेक प्रश्न त्या भाबड्या जीवाला पडायचे, शाळेत आलेल्या मित्रांच्या पप्पांना पाहून त्यालाही किरणची आठवण यायची. त्यांची उत्तरं तर माहिती असायचे प्रियाला, पण कोणत्या तोंडाने बोलणार होती ती.

तिला हे कळायला खूप उशीर लागला की चूक आपल्याकडूनच झाली आहे, किरणला नको नको ते बोललो, त्याच्या विषयी मनात संशय निर्माण केला. पण आता त्याची कितीही माफी मागून तो काही परत येणार नव्हता तिच्याकडे.

तिला कळून चुकलं होत की हे सगळं आपल्यामुळे झालंय, आणि यापुढे आपल्याला आता सगळं एकटीला पाहावं लागणार होतं. आयुष्याचा हा प्रवास तिला एकटीला करायचा होता आणि ते ही सार्थकला घेऊन. कठीण वाट होती पण तिने अजूनही धीर सोडलेला नव्हता.

प्रेम आंधळं असते अस म्हणतात पण ते नातं कायमस्वरूपी टिकवून ठेवणे हे आपल्या हातात असते. 


शेवटी मेल्यानंतर त्या माणसाची केलेली स्तुती आणि एखाद्याला पहिले दुखावून नंतर मागितलेली माफी.. याला काहीच महत्व नसते!



समाप्त. 

🎭 Series Post

View all