प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 26

प्रेम आंधळं असते पण ते नात कायमस्वरूपी टिकवून ठेवणे आपल्या हातात असते
प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 26



किरण मुंबईत राहत होता सुधाकर कडे पण तरीही त्याला नको वाटत होते. भावाकडे अस किती दिवस राहणार होता तो, तरीपण रोज काही ना काही भाजीला घेऊन यायचा तो घरी, आणि अमय अदितीला फिरायलाही घेऊन जायचा.

त्या दोघांना खेळतांना बघून किरणला सार्थकची खूप आठवण यायची, दिवसातून एकदा तरी झोपायच्या आधी तो प्रियाला व्हिडीओ कॉल करायचा आणि सार्थक सोबत बोलायचा.

फक्त दोन वर्षांचा सार्थक तरी त्याला फोनमधील सगळं कळायचं, फोनवर किरणला बघताच त्याचे बोबडे बोल ऐकू आले की खूप छान वाटायचं.

दोन महिन्यांनी तो दिल्लीला गेला तेव्हा प्रियाला सार्थकला भेटून खूप आनंद झालेला, पण प्रियाच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसून येत नव्हते. तीच म्हणणं होतं की तो गेला होता तिला सोडून, ती तर तिथेच होती. त्याला वाटलं होतं प्रिया त्याच्याशी खूप प्रेमाने वागेल, इतक्या दिवसांनी नवरा घरी आलाय त्याला वेळ द्यायचा सोडून ती ऑफिसमध्ये तीच काम करण्यात बिजी असायची. ह्यामुळे किरण आणखी नाराज झाला तिच्यावर.

प्रियाला त्याने बोलून पण दाखवले, पण तीच म्हणणं होतं की माझी मी इथे आरामात राहू शकते. तू जा तिकडे मुंबईत तुझ्या नवीन जॉबला, इकडे बायको एकटी मुलाला घेऊन राहतेय त्याच काही नाही. तुला तर बस तुझ्या घरच्यांची पडलेली आहे, बायको म्हणून माझी काही काळजीच नाहीये.

किरण प्रियाला त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी आजही तयार होता, आणि प्रिया आजही तयार नव्हती त्याच्यासोबत जायला. त्यामुळे चार दिवसांनी तो पुन्हा मुंबईत आला.

घरापासून ऑफिस बरंच लांब होत त्यामुळे ऑफिसला जायला दीड ते दोन तास लागून जायचे, आणि यायला वेगळा वेळ लागायचा. त्यामुळे त्याने ठरवले की ऑफिसच्या जवळपासच एखादी रुम बघावी.
पण सुधाकरला हे सांगितल्यावर त्याला आवडणार नाही, इथे स्वतःचा भाऊ राहत असतांना तू दुसरीकडे कशाला राहायला जातोय अस म्हणेलच तो.
पण तरी सुद्धा बोलायला तर पाहिजेच त्याच्याशी, समजून घेईल तो आपल्याला अस त्याला वाटले.

नवीन ऑफिसमध्ये काम करून आता दोन चार महिने होत आले होते, तशी बऱ्याच लोकांशी ओळख झाली होती. काही काही तर इतके जवळचे मित्र बनले की त्यांच्यासोबत मनातलं देखील बोललं तरी काही हरकत नाही. आणि काही काही तर अगदी त्यांच्या गावाकडचेच होते. ते सुद्धा एकटे राहायचे इथे मुंबईत, चांगला फ्लॅट घेऊन त्यात तीन ते चार जण राहायचे आणि संध्याकाळी डब्बा यायचा. किरणने ही सहज विचारले, त्याच्यासाठी एखाद्या फ्लॅट मध्ये जागा आहे का म्हणून. मित्राने लगेच हो म्हणून सांगितले.
अगदी त्याच्याच फ्लॅट मध्ये तिघे जण राहतात आणखी एक जण ऍडजस्ट होऊ शकतो अस तो स्वतःच म्हणाला.

चला म्हणजे राहण्याची खाण्याची व्यवस्था पण छान झाली होती, बस आता फक्त सुधाकर सोबत बोलायच बाकी होत.

किरण आज ऑफिसमधून लवकर घरी आला पण सुधाकर यायचा बाकी होता, त्यामुळे त्याने वेदूला आधीच सांगून टाकले. ती पण थोडी नाराज झाली, आम्ही इथे असताना दुसरीकडे राहायची काय गरज?
तीच म्हणणं बरोबर होत, पण सुधाकर समजून घेईल त्याला.
जेवण झाल्यावर किरणने बिचकत बिचकत सुधाकरला विचारले,

"दादा, ते.. मी काय म्हणतो.. "

"हा बोल ना काय म्हणतोस."

"मला इथून ऑफिसला जायला खूप वेळ जातो, जाऊन येऊन चार तास निघून जातात."

"हम्मम, तुझं ऑफिस लांब आहे ना इथून त्यामुळे इतका वेळ तर लागेलच."

"मी काय म्हणत होतो, मी तिथेच ऑफिसजवळ मित्राच्या रुमवर राहायला गेलं तर बरं पडेल मला."

"अरे पण.."

"मला माहितीये आता तू काय म्हणशील ते, आम्ही इथे असताना तू कशाला दुसरीकडे राहायला जातो आणि बरंच काही."

"मी अस तर बिलकुल म्हणणार नव्हतो, पण हा हे वेदू नक्कीच बोलली असती."

"हो दादा एकदम बरोबर ओळखलं तू, वहिनी सेम असच बोलली मला तू यायच्या आधी."
यावर ते तिघेही हसले.

"पण मी काय म्हणतो, तुला कधी घरी यावस वाटलं किंवा घरच खावस वाटलं तर नक्की इकडे हक्काने यायचं."

"हो दादया, मी दर आठड्यातून एक चक्कर मारेन इकडे."

" कधीही कसलीही गरज पडली तर मी आहे इथे, हे विसरू नको कधी."

दोन्ही भावांमध्ये किती समजूतदार पणा होता, वेदूला त्यांना अस बघून खूप छान वाटायचं. पण प्रियानेही यायला पाहिजे होत इकडे अस कायम वाटायचं तिला.

तिकडे जायच्या आधी किरण एकदा गावी जाऊन आला, आई तात्यांना हे ऐकून आश्चर्य वाटले की किरण एकटा राहतोय मुंबईत. त्यांनी प्रियाशी फोनवर बोलून घेतले पण ती फोनवर जास्त काही बोलायला तयार नव्हती सार्थक त्रास देतोय म्हणून फोन ठेवून दिला फोन.

आईंनी पण किरणला समजावून सांगितले, अधूनमधून घरी जात जा प्रियाला सार्थकला भेटायला. इतके दिवस एकमेकांवर राग धरून कस चालेल? तुम्ही दोघे लवकरच पुन्हा एकत्र या राहायला.

किरणला त्यांचं म्हणणं अगदीच पटलं, पण त्याच्या मनात खूप चलबिचल चालू होती.

दोन दिवस गावी राहून आल्यावर किरणला फ्रेश वाटत होते. त्याला प्रिया आणि सार्थकचा आठवण कायम यायची पण तिच्या हट्टा पायी त्याला हा निर्णय घ्यावा लागला. 

आता किरण ऑफिसजवळच राहत होता त्यामुळे मित्रांसोबत गप्पा मजा मस्ती करत हसत हसत दिवस जात होते.

पण प्रियाचं काय.. तिला काहीच फरक पडत नव्हता. ती तर मस्त राहत होती, आता तर तिच्या सोबत तिचे मम्मी पप्पा पण राहायला आले होते. त्यामुळे तिला किरण जवळ असो वा नसो काही फरक पडत नव्हता, पण नवरा आहे तो तिचा तिला थोडी तरी आठवण यायला हवी ना!
नेहमी किरणच फोन करायचा आणि तिच्याशी बोलत बसायचा.

ऑफिसमध्ये हल्ली तो खूप शांत शांत दिसायचा, त्याला ऑफिसमध्ये एक नवीन प्रोजेक्ट वर काम करायचे होते, त्यामुळे त्याला काही दिवसांसाठी बाहेर देशात जावे लागणार होते. हे त्याने प्रियालाही फोन करून सांगितले, पण ती सुद्धा ऑफिसमध्ये बिजी असायची.

प्रियाच्या अशा वागण्यामुळे किरणला खूप एकटं एकटं वाटायचं. कामातही त्याच लक्ष लागत नव्हत पण काम तर केलंच पाहिजे. त्यासाठी त्याला युरोपला जावं लागणार होतं.

तिकडे युरोप मध्ये जाऊन सुद्धा त्याच मन लागत नव्हत. अशातच त्याला नवीन प्रोजेक्ट मधली एक कलीग भेटली जी मुंबई मधलीच होती, तीच नाव श्रेया होत.. पण सध्या ती त्या देशातच राहायला होती. दोघांमध्ये कामाव्यतिरिक्त बरंच बोलणं व्हायचं, कधी कधी ते दोघे बाहेर कॉफी साठी बाहेर पण जायचे. किरणला तिच्यासोबत बोलून खूप छान वाटायचं, ती हुशार तर होतीच पण स्वभावाने देखील चांगली होती.

तिकडे लांब परक्या लोकांमध्ये ती एकटीच मुलगी ओळखीची आणि जवळची वाटत होती. जी मुलगी अनोळखी असूनही त्याला ओळखीची वाटतं होती आणि जी जवळची होती ती त्याच्या पासून दुरावत होती.

श्रेया, तीच लग्न तर झालेलं नव्हतं आणि तिला करायचं ही नव्हतं. कारण तिचंही म्हणे कुणावर तरी प्रेम होतं, पण त्याने फक्त तिचा फायदा घेतला. लग्न मात्र कुणा दुसऱ्या सोबतच केलं आणि तिला सोडून दिलं.

दोघेही आत्ता या वळणावर एकमेकांना भेटले होते जिथे त्यांना समजून घेणाऱ्याची गरज होती. त्यामुळे ते ऑफिस सुटलं की हमखास जेवायला एकत्र असायचे, किरणला युरोप नवीन होते आणि श्रेयाला तिथलं बऱ्यापैकी माहिती होत.

किरण उदास असायचा त्यामागच कारण ही माहिती होत श्रेयाला आणि श्रेया एकदम बिनधास्त मुलगी पण तिच्या मनाला झालेली जखम फक्त तिने किरणला बोलून दाखवली होती.

दोन जखमी मनं भेटल्यावर एकमेकांबद्दल सहानुभूती तर वाटणारच ना!
ते दोघे एकमेकांची खूप काळजी घायचे, एकमेकांना एकटं बिलकुल सोडत नव्हते. दोन महिने होऊन गेले तरी किरणच्या प्रोजेक्टच काम झालेलं नव्हतं, त्याला सार्थकची खूप आठवण येत होती. म्हणून त्याने घरी फोन लावला प्रियाला, तिच्याशी बोलून झाल्यावर सार्थकला बोलायला दिला फोन.. त्याला बघण्यासाठी श्रेया पण थांबली होती.

पण श्रेयाला बघून प्रियाला वेगळेच काहीतरी वाटले. बहूतेक ती जलस फिल तर करत नसेल ना!

तिच्या मनात आणखीनच राग भरला, साहजिकच आहे. एका बाईने आपल्या नवऱ्याला कोणा एका दुसऱ्या बाई बरोबर बघितलं तर काय होईल हे सांगायला नको.
मग भलेही त्यांच्यात फक्त मैत्रीचं असली तरीही नको ते विचार मनात येतात आणि आता प्रियाच्या मनात सध्या तेच चालू झालं होतं.

🎭 Series Post

View all