प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 18

प्रेम आंधळं असत पण ते नातं कायमस्वरूपी टिकवून ठेवणे आपल्या हातात असते


प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 18


          किरणने सगळ्यात पहिले आईला फोन करून ही आनंदाची बातमी दिली. त्यानंतर प्रियाच्या घरी तिच्या मम्मीला फोन करून सांगितले, त्या तर लगेच दिल्लीला येण्यासाठी तिकडून निघणार होत्या. लेकीच्या गरोदरपणात तिला काय हवं काय नको हे सगळं बघण्यासाठी त्यांना तिच्याजवळ असायलाच हवे, अस त्यांना तरी वाटत होतं.

अजून दोन दिवसांनी प्रियाला हॉस्पिटलमधून घरी सोडणार होते, तोपर्यंत तिची मम्मी आणि पप्पा घरी आले होते दिल्लीला. घरी येताच मम्मी पप्पा समोर उभे होते तिला सरप्राईज द्यायला, त्यांना बघताच खूप आनंद झाला प्रियाला.

प्रियाची मम्मी आली तेव्हापासून त्यांनी किचनचे सगळे काम सांभाळले होते, त्यामुळे प्रियाला आता भरपूर आराम मिळत होता. तिचे पप्पा बाहेरच काम बघायचे त्यामुळे किरण पण आरामात होता. प्रियाचे इतके लाड सुरू होते की विचारता सोय नाही.

प्रत्येक महिन्यात चेकअप साठी गेल्यावर प्रिया तिच्या मम्मीला ही सोबत घेऊन जायची. किरणला वाटलं होतं की काही दिवसांनी त्या त्यांच्या घरी जातील केरळला, पण त्या तर संपूर्ण डिलिव्हरी होईपर्यंत इथेच थांबणार होत्या. बरं त्या थांबणार त्याच काही नाही, पण किरणला बाहेर हॉलमध्ये किंवा दुसऱ्या बेडरूम मध्ये झोपावं लागायचं. त्यामुळे किरणला प्रियासोबत मोकळा वेळ घालवता येत नव्हता आणि किरणची चिडचिड व्हायची.

प्रियाची मम्मी आल्यापासून त्यादोघी केरळी भाषेत बोलायच्या आणि किरण त्यादोघींच तोंड बघत बसायचा.  त्यांचं सारख आपलं हे नका खाऊ, ते नका आणू, हे अस नाही ते तस नाही.. ह्यासगळ्याला किरण खरतर वैतागला होता. पण त्याला बोलून दाखवता येत नव्हतं इतकंच, आपल्याच घरात पाहुणा असल्यासारखं वाटत होतं त्याला.

प्रिया अगदी सातव्या महिन्यापर्यंत ऑफिसला येत होती, त्यामुळे किरण ऑफिसमध्ये गेला की कायम प्रियाजवळच असायचा. तिला काय खायचं ते आणून द्यायचा बाहेरून, कारण घरात मम्मी काहीच खाऊ देत नव्हती तिला बाहेरच.

प्रियाचं पोट आता जास्तच दिसायला लागले होते, तिला चालतांना, उठताना, बसताना थोडा त्रास व्हायचा. त्यामुळे तिला घरातून ऑफिसच काम करण्याची परवानगी मिळाली. हे एक प्रकारे चांगलंच झालं, म्हणजे तिला घरात राहून भरपूर आराम मिळणार होता. किरण तिच्या पोटावर हात ठेवून बाळाची हालचाल बघायचा, त्याला खूप मस्त वाटायचे पोटावर हात ठेवून बाळाशी गप्पा मारायला.

वेदू पण प्रियाला फोन करून बराच वेळ बोलत बसायची, तिचा अनुभव सांगत बसायची. त्यामुळे प्रियाला बऱ्याच गोष्टी समजायच्या, काय करायचं काय नाही करायचं हे सुद्धा ती सांगायची.

प्रियाचे हात पाय जास्तच दुखायचे त्यामुळे तिच्यासाठी कामवाल्या मावशी जास्त वेळ थांबत होत्या आणि तिच्या हातापायाची मालीश करून द्यायच्या. इतकी छान झोप लागायची तिला की चार चार तास उठत नव्हती ती.

रोज सकाळी संध्याकाळी तिचे पप्पा तिला फिरायला घेऊन जायचे, पायी चालणं चांगल असत म्हणून ते रोज तिच्यासाठी जात होते. कधी कधी किरण सुद्धा लवकर यायचा ऑफिसमधून.

सातवा महिना म्हटलं की डोहाळेजेवण करतात हे माहिती होत किरणला, त्यामुळे त्याने सहज विषय काढला प्रियाच्या मम्मी समोर की आपण पण प्रियाचं घरातल्या घरात डोहाळेजेवण करूया. तिलाही छान वाटेलं आणि होणाऱ्या बाळालाही.

तिच्यासाठी तिची मम्मी सगळंच करायला तयार व्हायची अगदी हौशीने, त्यामुळे त्यांनी किरणच्या आई सोबत बोलून घेतले फोनवर. त्यांच्याकडे कशी पद्धत आहे, कस करतात हे सगळं. चांगल्या तासभर बोलून झाल्यावर किरणला सोबत मार्केट मध्ये घेऊन गेल्या.

प्रियासाठी एक सुंदर हिरवीगार साडी घेतली सिल्कची, हातात गळ्यात बांधण्यासाठी नकली फुलांचे दागिने घेतले. फुलं, फळं, गजरे, प्रियाला आवडते तशी मिक्स मिठाई आणि पेठा घ्यायला विसरल्या नाही त्या. जे दिसेल जे आवडेल ते सगळंच घेऊन आल्या.

आज घरातल्या घरात का होईना त्यांनी तीच डोहाळेजेवण केलं तसेच भरपूर फोटो ही काढले. किरणच्या आईला आणि वेदूला व्हिडीओ कॉल करून सगळी तयारी दाखवली. त्यांना ही खूप छान वाटलं, फक्त इतक्या लांब येणं सहज शक्य नव्हतं म्हणून आलो नाही, पण डिलिव्हरी झाल्यावर नक्की येऊ म्हणून प्रियाला सांगितले.

"किरी, हमे मॅटरनिटी फोटोशूट नहीं करना क्या?"

"अरे तुम बस बोलो कब करना हैं, मैं अभी फोन करता हूं फोटोग्राफर को."

"अगले संडे करते हैं किरी, तब तक मेरी सारी ड्रेसेस भी आजाएगी."

"अरे वाह, और मेरे लिये क्या लिया?"

"तुम्हारे लिये थोडी कुछ लिया हैं, तुम तो बस अपना जीन्स और टिशर्ट पेहेन लेना."

"अरे वाह, खुद्द के लिये नये कपडे और मेरे लिये वही पुराने वाले. वाह रे वा."

किरणच बोलणं ऐकून सगळेच हसायला लागले, पण प्रियाने खरंच त्याच्यासाठी एक टिशर्ट मागवला होता. फक्त त्याला सांगितलं नव्हतं.

रविवारी त्यादोघांनी छान फोटोशूट करून घेतलं, प्रियाने वन पीस गाऊन घातलेला होता त्यात ती खूप सुंदर दिसत होती. असे म्हणतात की गरोदरपणात आईच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज निर्माण होत.

आठव्या महिन्यात तर प्रिया अजूनच जाडी झालेली दिसत होती. तिला आता एकही ड्रेस होत नव्हता, सगळे ढगळ कपडे घालावे लागत होते. थोडं चालतांना पण तिला दम लागायचा, मम्मी असायची तिच्याजवळ म्हणून बरे.

तिच्या मम्मीने प्रिया आणि बाळासाठी लागणारी सगळी कपड्यांची बॅग भरून ठेवली होती. अजून बरंच काय काय भरून ठेवलं होतं त्या बॅगे मध्ये, म्हणजे अचानक कधी पोट दुखायला सुरू झाले तर ती बॅग जशीच्या तशी नेता येईल.

नववा महिना लागला ही नाही की लगेच तिच्या पोटात दुखायला सुरू झाले, पण प्रियाला कळतच नव्हते नेमकं काय होतंय तिला. कारण पाठीतून कळ आली की तिला वाटायचं आधी सारखं नॉर्मल दुखत असेल पाठ, पण मम्मीला सांगितल्या वर तिला समजले की आपल्याला कळा यायला सुरुवात झालीये आणि आता हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे.

किरण नुकताच ऑफिसमध्ये गेला होता, त्याला मम्मीने फोन करून घरी बोलवून घेतलं. तोपर्यंत प्रियाला तिथल्या तिथे फिरायला सांगितले आणि जोरजोरात श्वास घे म्हणून सांगितलं. पण प्रिया चांगलीच घाबरून गेली होती.

किरण लगेच काही मिनिटांत घरी पोहोचला, प्रियाला अस बघितल्यावर त्याला ही टेंशन आले. पण अशा वेळेस त्याने हिंमतीने घ्यायला हवे अस मम्मीनेच त्याला समजावून सांगितले आणि ते सगळे निघाले हॉस्पिटलमध्ये.

तिथे गेल्यावर मॅडम जागेवर नव्हत्या, आता तर किरण चांगलाच घाबरून गेला. पण नर्सने त्यांना रूम तयार करून दिली आणि चेकअप पण केलं, त्याची अपडेट त्या डॉक्टर मॅडमला देत होत्या. अर्धा तासाने डॉक्टर पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये, तोपर्यंत प्रिया कळा देत होती. किरणला त्या डॉक्टरला खूप बोलावेसे वाटत होते, पण आता ही वेळ नव्हती.

डॉक्टर आल्या आल्या आतमध्ये गेल्या आणि बाळाची पोझिशन चेक केली. सगळं काही नॉर्मल होत, आता फक्त प्रियावर होत सगळं काही.

एक तास झाला तरी कसलीच बातमी बाहेर येईना, म्हणून किरण सारखं विचारत होता आणि बाहेर फेऱ्या मारत होता.

अचानक दुपट्यात गुंडाळून इवल्याशा गुलाबी बाळाला नर्स घेऊन आली, आणि आल्या आल्या बाळाला किरणच्या हातात दिलं. तो क्षण जणू त्याच्यासाठी सर्व काही होत, एका बाळाचा बाप होणं म्हणजे खरंच खूप मोठं जबाबदारीच काम असत ते.

किरणकडून लगेच बाळाला आपल्याजवळ घेत मम्मीने विचारलं नर्सला, लडका हैं या लडकी?
"लडका हैं ये."
नर्स ने अस बोलताच तिला मम्मीने पर्समधून पाचशेची नोट काढून दिली.

किरणने लगेच आई आणि वेदूला व्हिडीओ कॉल केला, त्यांना पण खूप खूप आनंद झाला. सगळ्यांच एकमेकांना अभिनंदन करून झालं, पण सगळ्यात महत्वाचे होते हे होते की प्रिया इतकी घाबरून सुद्धा तिची नॉर्मल डिलिव्हरी केली डॉक्टरने. खरंच कौतुक केले पाहिजे प्रियाचे ह्यासाठी.

बाळ आणि बाळांतीन दोघेही सुखरूप आहेत समजताच आईंनी देवापुढे साखर ठेवली.

🎭 Series Post

View all