प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 15

प्रेम आंधळं असत पण ते नातं कायमस्वरूपी टिकवुन ठेवणे आपल्या हातात असते


प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 15


गावी येऊन आता आठवडा झाला होता, निघायची वेळ झाली तरी वेदू आणि प्रियाच्या गप्पा काही संपत नव्हत्या. निघतांना आईने किरणच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला,

"किरणा, आता तुम्ही पण विचार करा. पुढच्या वर्षी तुमच्याकडून पण मला गोड बातमी हवी आहे."

"आई काहीही काय, इतक्या लवकर कुठे."

"अरे आमचे हात पाय शाबूत आहेत तोपर्यंत होऊ दे लेकरं आमच्या डोळ्यासमोर मोठे. नंतर आम्हांला काही करता यायचं नाही, म्हणून सांगतेय."

"चलो आई, अब निकलते ही हम. नहीं तो देर हो जाएगी."

"भाभी आप अपना खयाल रखना, और हा हमारे नन्हे बच्चे का भी."
प्रिया वेदूच्या पोटावरुन हात फिरवत अगदी लाडाने बोलली.
असे म्हणून निघाले दोघेही दिल्लीला जाण्यासाठी.

ते दोघे गेल्यावर घर एकदम रिकामे झाले, आईला मात्र काळजी वाटत होती त्यादोघांची. त्यांनी तात्यांना पण बोलून दाखवले, पण ते ही चूप बसले. उलट त्यांनाच बोलले,

"वसुधा, तुम्ही नका काळजी करू इतकी. ते बघून घेतील ना त्यांचं, लग्न त्यांनी त्यांच्या पसंतीने केलं मग हे पण त्यांनाच ठरवू द्या. तुम्ही उगाच जबरदस्ती नका करू आणि पोरांच्या मागे ही नका लागू."

"अहो पण मी कुठे काय इतकं बोलले, जे बरोबर वाटलं तेच बोलले ना."

"पण मी काय म्हणतो, ही पोरगी आलीये इकडे तिच्याकडे बघायचं तिला काय खावस वाटत काय नाही ते बघा ना! तिला आराम द्या, देवळात घेऊन जा फिरायला न्या. उगाच कशाला नसत ते डोक्यात आणून टेन्शन घेत बसता."

तात्या वेदू कडे बघून आईंना बोलत होते. आणि आईंना ही ते पटलं त्यांचं.

आई वेदूला जास्त काही कामं करू देत नव्हत्या, तिला रोज काही ना करून खाऊ घालत होत्या. संध्याकाळी रोज फिरायला घेऊन जायच्या. खूप काळजी घेत होत्या त्या वेदूची, जणू काही तिचीच आई होत्या त्या.

नववा महिना लागला आणि वेदूचे आई वडील आले तिला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी, लेकीचं पहिलं बाळांतपण माहेरी करतात म्हणून घ्यायला आले होते ते.

वेदूने सगळ्यांसाठी जेवण बनवले आणि संध्याकाळी निघाली ती माहेरी जाण्यासाठी. आईंनी तिला खूप माया केली, काळजी घे म्हटल्या. आणि काही वाटलंच तर लगेच फोन करा म्हणून पण सांगितले, अगदी काहीही असो पहिले मला फोन करा.

वेदू डिलिव्हरी साठी माहेरी गेली, आणि इकडे आईंना पुन्हा एकटं पडल्या सारखं वाटू लागलं.

"अहो वसुधा बाई, अस काय करता तुम्ही. आता आपल्याकडे नवीन पाहुणा येणार आहे, तुम्ही तर खुश असायला हवं ना!"

"मला काळजी वाटतेय हो पोरीची, वेदू इतका त्रास सहन करेल ना?"

"आई होतांना होणाऱ्या यातना तर मला माहित नाही, पण प्रत्येक आईला आपल्या बाळाच्या विचारानेच तिला हिंम्मत येते."

तात्यांना सगळं समजत होत, ते ही काळजी करतच होते पण दाखवत नव्हते कधी. उलट हिम्मत द्यायचे समोरच्याला.

"आत्ताच्या पोरीं खुप नाजूक असतात हो, तरी माझ्या वेदू ने खूप कामं केली अगदी इथून घरी जाईपर्यंत. तुम्ही बघा तिची डिलिव्हरी अगदी छान नॉर्मलच होईल."

"तसच होईल, तुम्हांला वाटतेय ना मग अगदी तसेच होईल."

तरी पण आईची काळजी काही मिटत नव्हती, त्या रोज वेदूला फोन करायच्या आणि खूप गप्पा मारत बसायच्या. प्रियाला फोन करता येत नव्हता कारण ती ऑफिसमध्ये बिजी असायची, त्यामुळे ती जेव्हा फोन करेन तेव्हाच बोलून व्हायचं.

नववा महिना ही भरत आला होता, आणि त्यात बाळाची हालचाल कमी दिसत होती म्हणून डॉक्टरानीं सिझेरियन करण्यासाठी सांगितलं. वेदूची पहिलीच वेळ होती त्यामुळे ती घाबरून गेली, पहिले सुधाकरला फोन करून सांगितलं तेव्हा तो लगेच इकडे यायला निघाला.

आईंना पण फोन करून सांगितले, त्यांनी काळजी करू नको सांगितले पण त्यांना स्वतःला खूप भीती वाटत होती. त्यांचं लगेच बीपी लो होऊन जायचं त्यामुळे सुधाकरने त्यांना सांगून ठेवलं होतं, मी जेव्हा घरी येईल तेव्हा मी घेऊन जाईन तुम्हांला वेदू कडे तुम्ही आधीच नका जाऊ एकटे दोघेही. त्यामुळे आई घरीच देवाची प्रार्थना करत बसल्या.

"सगळं व्यवस्थित होऊ दे रे देवा, बाळ आणि बाळांतीन दोन्हीही सुखरूप असू देत."

सुधाकर पोहीचला त्यावेळी तिला ऍडमिट करत होते हॉस्पिटलमध्ये, सुधाकरला बघताच वेदूच्या डोळ्यात पाणी आले.

"ए वेडाबाई, आता तू आई होणारेस. आणि तू स्वतःच अशी लहान मुलींसारखं काय रडते?"

वेदू त्याच्या कुशीत शिरून रडतच होती.

"हे बघ काहीही होणार नाहीये, आणि मी आहे ना इथे तुझ्यासोबत."
तेव्हा कुठे वेदू शांत झाली आणि तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं.

तासाभरातच बाळ आणि बाळांतीन बाहेर आले, वेदूला एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळे झाले होते.
हे ऐकून सगळे जण खूप आनंदी झाले होते, पण वेदू आणि सुधाकरने हे कोणालाच सांगितले नव्हते की त्यांना जुळे होणार आहे. सरप्राईज होत हे सगळ्यांसाठी.

आईंना फोन करून सांगितल्यावर त्या तर इतक्या खुश झाल्या की गावातल्या मंदिरात सगळ्यांना मी स्वतः पेढे वाटेन अस बोलून टाकले. घरात सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता.

वेदू आणि दोघेही बाळ सुखरूप होते, सुधाकर आठवडाभर सुट्टी काढून आलेला होता. पहिले तीन दिवस वेदू जवळ हॉस्पिटलमध्येच होता त्यानंतर तिला घरी घेऊन गेल्यावर तो ही घरी जायला निघाला.

तिकडे आई आणि तात्यांना कधी एकदाच वेदू आणि बाळांना बघतोय अस झालं होतं. सुधाकर घरी आला तेव्हा आईंनी त्याचे खूप खूप अभिनंदन केले, तो येण्याआधीच तयारी करून ठेवली होती वेदू कडे जाण्याची.

बाळांना कपडे घेऊन ठेवले होते, बाजूच्या पोरीला लंगोट बाळाते आणि छोट्या छोट्या साडीच्या गोधड्या दुपटी शिवून घेतली. तात्या त्यांच्यासाठी खेळणी घेऊन आले होते. इतकंच नाही तर आईंनी तिला बाळांतवीडा पण काढून ठेवला होता.

किलो किलो खारीक, खोबर, काजू, बदाम, गूळ, साजूक तूप, रवा, ओवा बडीशेपा आणि अजून बरंच काय काय वस्तू आणून ठेवल्या होत्या. इतक्या मोठ्या पिशव्या बघून सुधाकरला आश्चर्य वाटले.

"आई, अग हे काय आहे?"

"इतकं न्यायचं असत रे बघायला जाताना."

"हो पण इतकं सगळं न्यायचं?"

"हो, इतकं सगळं न्यायचं असत. तरी हे इतकं काही नाही."

"भरपूर झालं की हे इतकंच."

"अजून महत्वाचं राहिलंय घ्यायचं, आपण वेदुकडे जातांनाच घेऊ ते. शहरात गेल्यावर मोठ्या दुकानातून."

"आता अजून काय घ्यायचं आहे आई."

"अरे सोन्याची एखादी वस्तू घ्यायला नको का. अस रिकाम्या हातानी थोडीच जायचं असत."

"आई, नंतर घेऊया आपण ते."

"नंतर मंतर काही नाही, सोन्यासारखी नातव माझी मग त्यांना घ्यायला नको का?"

"जा बाबा जा, तुझ्या आईला काय आणायचं ते आणू दे. खूप खुश आहे ती, तिला आता कुणीही अडवू शकत नाही."
तात्या पण हसून हसून सांगत होते.

दुसऱ्या दिवशी पाचवी होती, सकाळी लवकरच आवरून सुधाकर आई आणि तात्यांना घेऊन निघाला. वाटेत सोनाराच्या दुकानात थांबून दोघा बाळांसाठी सोन्याची चईन घेतली. वेदू साठी एक सुंदर साडी घेतली, आणि मग ते पुढे जाण्यासाठी निघाले.

जेव्हा पहिल्यांदा बाळांना हातात घेतले तेव्हा कोण जाणे नकळत पाणी आले डोळ्यात आईच्या. इतका आनंद त्यांना याआधी कधीच झालेला नव्हता, त्यांना बघून वेदू पण रडायला लागली. पण तिच्या पोटावर ताण पडत होता त्याने टाके दुखू लागले.

"वेदू, आता रडायचं नाही पोरीं. इतका मोठा आनंद दिलास तू आम्हांला, खूप भरून पावले बघ मी."

वेदू आणि बाळांना एक सेपरेट खोली केलेली होती, तिथे दोघांना झोळी बांधलेली दिसतं होती. दोन्ही इवलीशी पिल्लं गुडूप झोपलेली होती. तिच्यासोबत तिची मावशी राहत होती कायम, कारण दोन दोन बाळांना घेण्यासाठी दोन जणी तरी पाहिजेच घरात.

🎭 Series Post

View all