प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 11

प्रेम आंधळे असते पण ते नातं कायमस्वरूपी टिकवून ठेवणे आपल्या हातात असते
प्रवास एकटीचा पर्व दुसरे भाग - 11


घर कामात मदतीला मावशी आल्यापासून प्रिया एकदम निवांत झाली होती, पण सकाळची गडबड होतीच थोडीफार. तितकं तर चालणारच होत, कारण किरणला घरातला स्वयंपाक इतर कुणी केलेला आवडत नसायचा. त्यामुळे प्रियाला करावेच लागायचे, पण तो ही मदत करायचा तिला. म्हणजे भाजी आणून देणे, बसल्या बसल्या मटार सोलून देणे.. ही अशी छोटी मोठी कामं करू लागायचा.

किरणचे फारसे नखरे ही नव्हते, तो सगळ्या भाज्या आवडीने खायचा. पण प्रियाला मात्र काही मोजक्याच भाज्या आवडायच्या, त्याच ती रिपीट रिपीट करायची. किरणला वरण भात आवडायचा त्यावर साजूक तुपाची मस्त अशी धार सोडलेली आवडायची. पण प्रियाला सांबारच चांगलं येत होतं, त्यामुळे शक्यतो ती तेच बनवायची.

आता हे अस होणारच होत ना, तो महाराष्ट्रात वाढलेला आणि प्रिया केरळात वाढलेली. दोघांच्या खाण्याच्या चवी सुद्धा अगदी वेगवेगळ्या, क्वचित कधीतरी ठीक वाटायचं ते सांबार पण रोज रोज नको असायचं ते किरणला. कधी फोडणीच वरण भात खाणार अस झालं होतं किरणला.

कित्येकदा आईला फोन करून रेसिपी विचारून केलं पण तरीही तशी चव काही येत नव्हती. आणि प्रियाला इतकं परफेक्ट ते जमतही नव्हतं, त्यामुळे किरणची थोडी चिडचिड व्हायची पण त्याने अन्नावर कधीच राग काढला नव्हता. जे बनेल जसे बनेल तो खाऊन घ्यायचा आणि पुढच्या वेळी अजून मेहनतीने चांगलं करूया आपण असे सांगून ठेवायचा प्रियाला.

ती बिचारी प्रिया तरी काय करणार म्हणा, तिला जे चांगलं येत होतं तेच ती बनवायची. फक्त शनिवार रविवारी असे वेगवेगळे काहीतरी नवीन ट्राय करून बघायची, कारण इतर दिवशी तिला वेळच कुठे असायचा नवीन काही बनवायला. सकाळी सकाळी घाई असायची त्यामुळे ती लवकर आवरत घ्यायची. 

किरण प्रियाचं तर चांगलं चाललं होतं, पण तिकडे सुधाकरला मात्र रोज मेस मध्ये जेवायला लागायचं किंवा मग डबा आणायला जावे लागायचे. त्याची जेवायची आबाळ होतेय हे तात्यांना आणि आईंना माहिती होते, म्हणूनच त्यांनी सांगितले होते की आता वेदू ला घेऊन जा. तिकडे एक छानसा फ्लॅट बघून ठेव आणि आल्यावर तिला सांग.

सुधाकरने ह्यावेळी खरंच वेदू ला आपल्या सोबत घेऊन यायचं मुंबईत असे पक्के ठरवले. आणि येत्या शुक्रवारी तो निघाला गावी जायला, वेदूला आपल्या सोबत घेऊन यायला.

गावी पोहोचल्यावर तो खूप खुश होता, वेदीकाला जेव्हा समजले की त्याने घर घेऊन ठेवलेय त्यांच्यासाठी तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक जाणवत होती. तिला आताच थोडी थोडी आवरा आवर करायला सांगितले म्हणजे रविवारी निघताना गोंधळ नको व्हायला. तिने आठवेल तितकं सामान बांधून ठेवलं, जास्त काही नाही फक्त भांडी आणि कपडेच होते त्यात.

अखेर तो रविवारचा दिवस उगवला. इकडे घरात तात्यांनी गाडी ठरवली होती, आता वेदिका पण जाणार होती मुंबईला. इतके महिने लग्न झाल्यावर सुद्धा ती सासरीच राहत होती आणि नवरा तिकडे एकटा राहत होता त्यामुळे तात्यांनीच सांगितले की आता पुढच्या वेळी गावी आल्यावर सुनबाईला पण तिकडे मुंबईत घेऊन जा, किती दिवस तुम्ही असे राहणार.

आईंनी वेदू च्या लग्नाची सगळी भांडी तशीच बांधून माळ्यावर ठेवली होती, ती खाली काढून घेतली. आणि त्यात घरातली सुद्धा काही भांडी भरली, जी वेदू ला कायम लागत होती. वेदीकाने कपडे भरले जितके मावेल तितके बॅगमध्ये नंतर पुन्हा आले की नेता येईल म्हणून अर्धे कपडे ठेवले तशेच.

आईंच्या मनात काय होत काय माहित, सकाळपासून खूप गप्प गप्प होत्या. वेदिका सारखी त्यांना काही ना काही विचारत होती पण त्या जितकं विचारलं तितकंच उत्तर देत होत्या.

       वेदिकाला समजले होते, की तिच्या जाण्याने आईंना खूप वाईट वाटणार होते, पण आता पर्याय नव्हता. लग्नाला सहा महिने होतील पण नवरा बायको अजूनही वेगवेगळे राहत होते त्यामुळे नवऱ्याकडे जायलाच पाहिजे. पण इकडे आई एकट्या पडतील, म्हणून वेदिकाला सुद्धा तितकंच वाईट वाटत होतं. कारण ती आल्यापासून घरातलं सगळंच बघत होती, अगदी किराणा सामानाची यादी पासून ते पाहुणे आल्यावर त्यांचं करायचं, लग्नात कोणाला काय काय आहेर द्यायचा इथपर्यंत सगळं ती एकटी सांभाळून घेत होती म्हणून आई अगदी निवांत झाल्या होत्या.

बॅग भरताना आईंनी त्यांचा आवडता लक्ष्मीहार वेदिकाच्या हातात दिला,

"हे काय आई, मला का देताय तुम्ही हा तुमचा आवडता हार."

"तू खरी लक्ष्मी आहेस ह्याघरची, सगळं कसं व्यवस्थित पार पाडलेस घरात होणारे प्रत्येक कार्य. खरी मानकरी तूच ह्या लक्ष्मी हाराची."

"नाही आई, मी घालेन हा हार पण हा इथेच ठेवा तुमच्याजवळ. सणाला वैगरे जेव्हाही मी येईन तेव्हा नक्की घालत जाईन तुमच्याकडून घेऊन, पण आत्ता हा इथेच राहू द्या. तिकडे नीट सांभाळता नाही येणार मला व्यवस्थित, त्यामुळे हा मी ठेवून जात आहे तुमच्याजवळ असं समजा."

"बरं अस म्हणतेस, तू सांगतेय म्हणून मी इथेच ठेवते. पण हा तुझाच आहे आता."

खरंतर आईंचे डोळे भरून आले होते, पण त्या दाखवत नव्हत्या इतकंच. वेदिकाला मात्र ते कळून चुकले होते की आईंना त्रास होतोय, पण ती तरी काय करणार आता इलाज नव्हता आता.

सगळी आवराआवर झाली, तात्यांनी गाडीवाल्याला एक एक करून सामान गाडीत भरायला सांगितले. सामान भरेपर्यंत आजूबाजूच्या घरात वेदिका जाऊन सांगून आली "आमच्या आईंकडे लक्ष द्या" म्हणून. सगळ्या बायका तशा चांगल्याच होत्या, वेदू ला काळजी करू नको म्हणाल्या.

    हळदीकुंकू लावून देवाला नमस्कार करून वेदिका निघाली होती, निघतांना तात्यांच्या पाया पडल्या आणि आईंच्या पाया पडायला खाली वाकली तर तिच्या हातावर आईंच्या डोळ्यातले पाणी पडले. अखेर इतका उशीर दाबून ठेवलेला आईंचा हुंदका बाहेर पडला, दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून अशा रडत होत्या जणू काही त्यांचीच लेक सासरी निघाली आहे.

      वेदिका खरंच अगदी तशीच होती, सून असूनही मुलीची माया केली तिने. वसुधा ताई सुद्धा सासू नसून त्यांच्या सुनेच्या आईच बनल्या होत्या. त्यांना पोटची मुलगी नव्हती त्यामुळे त्या दोन्ही सुनांवर तितकाच जीव लावायच्या. त्यांची सगळी हौस पुरवायच्या, त्यांना हवं ते करू द्यायच्या.

     सगळ्यांचा निरोप घेऊन वेदिका आणि सुधाकर निघाले होते, त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करायला. मुंबईत वेदिका याआधी कधी गेली नव्हती, पहिल्यांदा ती मुंबई बघणार होती त्यामुळे ती खूप जास्त उत्साही वाटत होती. गाडीत बसल्या बसल्याच तिने सुधाकरला कुठे कुठे फिरायला जायचं ते विचारून घेतले होते.

     मुंबई, जीवाची मुंबई करायला पोहोचले वेदिका आणि सुधाकर त्यांच्या बिल्डिंग मध्ये. बारा मजली बिल्डिंग, त्यात पाचव्या मजल्यावर भाड्याने छोटासा फ्लॅट घेतला होता सुधाकरने. वेदिकाला तो छोटासा फ्लॅट बघून मनात काही भरत नव्हता, कारण तिला गावी राहायची सवय आणि गावाकडे तर इतकं मोठं अंगणच असत. पण तरी ती आहे त्यात समाधानी होती, कारण ती आता तिच्या नवऱ्या बरोबर राहणार होती.

त्या फ्लॅट मध्ये सुधाकरने आधीच इतकी तयारी करून ठेवलेली तयारी दिसत होती वेदू ला, प्रत्येक गोष्ट ती अगदी कुतूहलाने बघत होती. आल्या आल्या हॉल मध्ये टिव्ही लावलेला पाहिला, त्याखाली छोटासा सुंदर टीपॉय ठेवलेला होता. बसण्यासाठी बाजूला त्याची आधीची गादी अंथरूण ठेवली होती आणि सोबत दोन खुर्च्या ही ठेवल्या होत्या. बेडरूममध्ये बेड त्यावर मऊमऊ गादीवर स्वच्छ सुंदर बेडशीट अंथरलेली. कपाट एका बाजूला लावलेले दिसत होते. गॅलरीतुन वाकून खाली पाहिले की भीती वाटायची वेदू ला, त्यामुळे ती यायच्या आत सुधाकरने सर्व गॅलरीला जाळ्या लावून घेतल्या होत्या. सुधाकरने सगळं लक्षात ठेवून एक एक सामान बरोबर आणून ठेवलं होतं.

सुधाकरने ऑफिसमधून दोन दिवस सुट्टी घेतली होती, सामान लावतांना तो वेदूला मदत करत होता. पहिले देव मांडले मग किचनमध्ये भांडी लावून घेतली आणि मग बाकीचे कामं बघितले. हळूहळू करून सगळे एक एक लावून झाले दिवसभरात. कपाटात कपडे लावतांना तर सुधाकरचे कपडे अगदी थोडेच होते आणि वेदू च्या च कपड्यांनी अर्धे कपाट भरून गेले होते. तसही बायकांना लागतातच म्हणा कपाट भरून कपडे.

  इटूकला पिटुकला भातुकलीचा संसार सुरू झाला, दोघेही आता चांगले रुळले होते त्या घरात. वेदीकाने त्या एव्हढ्याशा फ्लॅटला छान घरात रुपांतरीत करून टाकलं होतं. ह्या दोघांचा राजा राणीचा संसार अगदी सुरळीत चालू झाला.

🎭 Series Post

View all