प्रवास -भूतकाळाचा भाग १

प्रवास - भूतकाळाचा भाग १

जलद कथा मालिका लेखन स्पर्धा

विषय -भूतकाळात डोकावताना


शाळा म्हणजे गावाचे वैभव...

ती चालवणारी शिक्षण संस्था त्या वैभवाची वारसदार....

अशा वैभवाचा वारसा म्हणजे माझी शाळा.

आयुष्याची २९ वर्ष मी  शाळेत  सहा. शिक्षिका म्हणून नोकरी केली. सेवानिवृत्तीच्या दिवशी मात्र शाळा सोडताना मनाची जी घालमेल झाली त्याची साधी आठवण जरी झाली तरी मन अस्वस्थ होऊन जातं. एक खेडेगावातील शाळा. काही विद्यार्थी सोडले तर जास्तीत जास्त विद्यार्थी अल्पभूधारक, शेतमजूर घरातून आलेले. घरी शैक्षणिक वातावरण एकंदरीत कमीच. अशा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणं, त्यांच्यात बदल घडवून आणणं वाटतं तेवढं सोपं काम नाही.


काही विद्यार्थी अतिशय व्रात्य,उनाड. पण अतिशय प्रेमाने, वेळप्रसंगी शिक्षा करून त्यांच्यात जर बदल घडून आला तर ती मुले इतकी जीव लावतात की आपणच त्यांचे आई वडील होऊन जातो.

                अध्यापनाचा बहु मोद होई...

                 माते परी बालकास प्रेम लावी...

                 चरित्र जयाचे स्फटिकासमान...

                  शोभे तयाला गुरुजी सुनाम...

आज माझे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर आहेत. आजही जेव्हा ते भेटतात तेव्हा आदराने नमस्कार करतात. आणि जे विद्यार्थी व्रात्य म्हणून ओळखले जायचे ते जेव्हा भेटतात तेव्हा अगदी आपसूकपणे त्यांच्या तोंडावर शब्द निघतात  " मॅडम, त्यावेळी तुम्ही आम्हाला वळण लावलं नसतं तर.... ते ऐकून खरंच डोळ्यात पाणी येतं.


अशाच काहीशा उनाड मुलांच्या आई जेव्हा शाळेत येऊन सांगायच्या, मॅडम याला चांगलं मारत जा. आमचं तर मुळीचं ऐकत नाही. मी समजून जायची त्याला प्रेमाच्या शब्दांची गरज आहे. कारण मारल्याने मुले कोडगी बनतात. अशा मुलांमध्ये जर बदल  घडून आला तर पालकांना खूप आनंद होतो. असे पालकही आवर्जून भेटायला येतात.


२९ वर्षाच्या कालावधीमध्ये दहावीच्या पहिल्या व दुसऱ्या बॅचच्या मुलांची लग्न होऊन त्यांची मुले सुद्धा माझ्या शाळेत शिकली. म्हणजे दोन पिढ्या. त्या मुलांना आम्ही त्यांच्या आई-वडिलांच्या गमती सुद्धा सांगायचो. खरंच माझ्यामते शिक्षकासारखी दुसरी कोणतीच नोकरी नाही. सतत अगदी निरागस मुलांच्या संगतीत राहणं, त्यांना घडवणे यासारखे दुसरे सुख नाही. लहान मुलांमध्ये आपल्याला आपलं बालपण शोधायला मिळतं. शिक्षकांनी सुद्धा आपल्या पेशाला पूर्णपणे न्याय दिला पाहिजे.


ज्ञानातला डोळसपणा, कार्यातील शुचित्व, ध्यानातील एकाग्रता, भक्तीतील समर्पणशीलता या चार गोष्टी शिक्षकांनी जरूर आत्मसात केल्या पाहिजेत. माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांमधले काही किस्से ही आहेत. एकदा एका मुलाची आई रडतच शाळेत आली.मुलगा आठव्या वर्गात शिकणारा. थोडा तामसी वृत्तीचाचं. ती सांगू लागली सर/मॅडम माझं पोरगं तलावाच्या काठी झोपलं आहे. जीव देतो म्हणत आहे. तुम्हीच काहीतरी करा. आम्ही तिला शांत केलं.. धीर दिला. तिथे जाऊन त्या मुलाला शाळेत आणलं. त्याला प्रेमाने समजावलं. तो सारखा रडत होता. आम्ही सर्वांनी त्याच्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे त्याच्यामध्ये हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागला. तोच मुलगा पुढे दहावा वर्ग उत्तीर्ण झाला. आय. टी.आय. झाला व नोकरीला सुद्धा लागला.


असे अनेक किस्से आहेत. तसं पाहिलं तर प्रत्येक मूल स्पेशल असतं. काही विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात. काहींच्या अंगी खेळ कौशल्य असतं. काहींचे वक्तृत्व चांगले असते. म्हणून शिक्षकांनी त्यांचे अंगभूत असलेले गुण ओळखून त्या गुणांना प्रोत्साहित केले पाहिजे. " सोबतीला खडूची धारदार तलवार व फळ्याची ढाल पाठीला बांधली की उद्दिष्टांच्या वाटेवर स्वार होता येतं"

समुद्राच्या तळागारात हात घातल्यास केवळ मोतीच मिळतील असे नाही तर शंख शिंपले ही हाती येतील. त्या शंख शिंपल्यांची ही मोहक अशी पूर्णाकृती बनवण्याचा आत्मविश्वास आपल्या ठिकाणी मात्र असला पाहिजे.

पुढील कथा वाचण्यासाठी पुढचा भाग अवश्य पहा.

क्रमशः

लेखिका - सौ.रेखा देशमुख






🎭 Series Post

View all