" माते माते.." लहानगा अश्वत्थामा हाका मारत आला.
" काय झाले प्रिय पुत्रा ?" देवी कृपी म्हणाली.
" मला दूध प्यायचे आहे. " अश्वत्थामा म्हणाला.
" दूध ?" देवी कृपी म्हणाली.
" हो. गायीचे दूध. " अश्वत्थामा म्हणाला.
लहानग्या अश्वत्थामाच्या गोड आवाजात हे शब्द ऐकताच देवी कृपी यांचा मुखावर चिंतेचे भाव दाटून आले.
" प्रभू श्रीराम यांनी चंद्राचा हट्ट धरला तेव्हा माता कौशल्याने दुधात पडलेले प्रतिबिंब दाखवले. परंतु , आमच्या घरात इतके दारिद्र्य आहे की मी माझ्या पुत्राचा दुधाचा हट्ट कसा पूर्ण करू ?" देवी कृपी विचारात पडली.
" माते , दे ना. " अश्वत्थामा म्हणाला.
" पुत्र , तू काही वेळ अंगणात खेळ. मी दूध आणते. "
देवी कृपी म्हणाली.
देवी कृपी म्हणाली.
अश्वत्थामा आनंदाने बाहेर खेळायला गेला. मग देवी कृपी हिने पाण्यात पीठ मिसळून ते दूध म्हणून अश्वत्थामाला दिले. थोड्या वेळाने द्रोणाचार्य घरी आले. लहानगा अश्वत्थामा त्यांना बिलगला.
" पिताश्री , आज मातेने मला दूध दिले. खूप स्वादिष्ट होते. मी थोडे तुमच्यासाठीही राखून ठेवले आहे. " अश्वत्थामा म्हणाला.
" अतिउत्तम. जा. माझ्यासाठी घेऊन ये. " द्रोणाचार्य म्हणाले.
अश्वत्थामा दूध घेऊन आला. पाण्यात पीठ मिसळलेल्या द्रव्याला आपला प्रिय पुत्र " दूध " म्हणून संबोधित करतोय हे पाहून द्रोणाचार्य यांचे डोळे पाणावले. तेवढ्यात देवी कृपी यांनी घरात प्रवेश केला.
" प्रिय पुत्र , तू काही क्षण बाहेर जा. " द्रोणाचार्य म्हणाले.
अश्वत्थामा बाहेर गेला.
" प्रिय पत्नी कृपी , तू माझ्या पुत्राला दूध म्हणून हे काय पाजवले ?" द्रोणाचार्य म्हणाले.
" क्षमा करा स्वामी. परंतु.." देवी कृपी यांच्या मुखातून शब्द फुटत नव्हता.
" तुझ्या यातना मी समजू शकतो. हस्तिनापुर सारख्या बलाढ्य राज्याचे कुलगुरू कृपाचार्य यांची तू बहीण आहेस. स्वतः सम्राट शंतनू यांच्या अंगाखांद्याखाली खेळलेली , राजवैभवात वाढलेल्या तुला मी विवाहानंतर कसलेच सुख देऊ शकलो नाही. तरीही तू कधीच तक्रार केली नाही. " द्रोणाचार्य म्हणाले.
" स्वामी , मी शेजारी कुणाकडून दूध मागून अश्वत्थामाचा हट्ट पुरवू शकले असते पण त्यामुळे तुमचा स्वाभिमान दुखावला गेला असता. मला क्षमा करा. " देवी कृपी म्हणाली.
" तुझी काहीच चुकी नाही. एक माता आणि एक पत्नी या दोन्ही धर्माचे तू सुंदरपणे पालन केले आहेस. मला भौतिक सुखांबद्दल कधीच आकर्षण नव्हते. पण माझ्या या वैराग्यसम स्वभावामुळे माझ्या पत्नीला आणि पुत्राला यातना होत आहेत याचा मी कधीच विचार केला नाही. " द्रोणाचार्य म्हणाले.
" भ्राता कृप नक्की आपली मदत करतील. " देवी कृपी म्हणाली.
" पत्नीच्या माहेरकडची मदत घेऊन माझा स्वाभिमान कमी होईल प्रिये. मी या दारिद्र्याच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मदत घेईल पण ती मदत " उपकार " नसेल. तर एका मित्राने मित्रासाठी केलेली मदत असेल. " द्रोणाचार्य म्हणाले.
" अर्थात ?" देवी कृपी म्हणाली.
" भारद्वाज ऋषीच्या आश्रमात विद्याग्रहण करताना माझा एक जवळचा मित्र धृपद पुढे जाऊन पांचाल देशाचा राजा बनला. तो मला नक्कीच मदत करेल. त्याने मला वचन दिले होते. मी उद्याच अश्वत्थामासमवेत पांचाल राष्ट्राकडे जाईल. माझ्या पुत्राला पाहून धृपद त्याचे खूप लाड करेल. " द्रोणाचार्य म्हणाले.
देवी कृपी प्रसन्न झाली.
" मी भाऊजींसाठी पोहे बनवते. तुमच्यासाठीही शिदोरी बांधून देते. त्यांना ते पोहे नक्की आवडतील." देवी कृपी म्हणाली.
" अवश्य. " द्रोणाचार्य म्हणाले.