प्रत्येक सुदामाला कृष्ण भेटत नाही ! पार्ट 3

.
दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्य आपल्या पुत्रासमवेत कांपिल्यनगरीच्या दिशेने निघाले. वाटेत द्रोणाचार्य यांनी अश्वत्थामाला लहानपणीच्या असंख्य गोष्टी सांगितल्या. धृपदसोबतची मैत्री , आश्रमातले दिवस अश्या अनेक आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. अखेरीस दोघेही पांचालदेशात पोहोचले. कांपिल्यनगरी एक भव्य शहर होते. तिथले उंच उंच महाल , दुमजली घरे , विशाल बागा आणि त्यात लावलेली कारंजे हे सर्व पाहून अश्वत्थामाला फार कौतुक वाटले. अश्या भव्य नगरीचा राजा किती भव्य असेल आणि असा भव्य राजा आपल्या पिताश्रींचा मित्र आहे हे जाणून त्याच्या मनात पिताश्रींबद्दल असलेला आदर कैक पटीने वाढला. महालाजवळ येताच सैनिकांनी दोघांना अडवले.

" कुठे जात आहात ब्राह्मणदेव ?" एका सैनिकाने विचारले.

" मी भरद्वाजपुत्र द्रोण आणि हा माझा पुत्र अश्वत्थामा. " द्रोणाचार्य म्हणाले.

" काय काम आहे ?" सैनिक म्हणाला.

" मला धृपदला भेटायचे आहे. " द्रोणाचार्य म्हणाले.

" पांचालनरेशाचे नाव इतक्या अनादराने घेणारे दंडास पात्र असतात. " सैनिक म्हणाला.

" तुमच्यासाठी तो पांचालनरेश असला तरी माझ्यासाठी तो माझा बालपणीचा सखा धृपद आहे."
द्रोणाचार्य म्हणाले.

" तुमच्या देहावर परिधान केलेली जीर्ण , फाटकी वस्त्रे पाहून तुम्ही महाराजांचे मित्र असाल असे किंचितही वाटत नाही. " सैनिक म्हणाला.

" आम्हाला आत प्रवेश करू द्या. जर धृपदला ही वार्ता समजली तर तुम्ही त्याच्या क्रोधासाठी पात्र व्हाल." द्रोणाचार्य म्हणाले.

" जाऊदे यांना. भिक्षेच्या आशेने आला असेल. शाप वगैरे दिला तर महाराज क्रोधित होतील. " दुसरा सैनिक म्हणाला.

सैनिकांनी दोघांना आत प्रवेश करू दिला.

***

भव्य राजसभा भरली होती. राज्यातील वेगवेगळी धनाढ्य व्यापारी मंडळी , मंत्री सुंदर वस्त्रे आणि आभूषणे घालून आपापल्या जागी विराजमान होती. एका भव्य सुवर्ण सिंहासनावर महाराज धृपद राजमुकुट परिधान करून बसले होते. ग्रहांच्या मध्यभागी जसा सूर्य शोभून दिसतो तसे ते शोभून दिसत होते. द्रोणाचार्य यांनी आपल्या पुत्रासमवेत राजसभेत प्रवेश केला.

" मित्र धृपद.." द्रोणाचार्य यांनी हाक मारली.

" मित्र ? हा भिक्षुक महाराजांचा मित्र ?" एक मंत्री हसत म्हणाला.

बाकीचे उपस्थित सदस्य जोरजोरात हसू लागले.

" याचे वस्त्रे तरी पहा. याहून चांगली वस्त्रे महालातील दास घालतात. " दुसरा मंत्री म्हणाला.

" मैत्रीचा आणि वस्त्रांचा काय संबंध ? मैत्री तर सोबत घालवलेल्या सुंदर क्षणांमुळे निर्माण होते. धृपद , तू सांग ना या सर्वांना आपली मैत्री ?" द्रोणाचार्य म्हणाले.

" अरे ब्राह्मणा , तुला शिष्टाचार ठाऊक नाहीत का ? राजाचा एकेरी उल्लेख करायचा नसतो. आणि कसली मैत्री ? तू माझा सहाध्यायी होतास हे सत्य असले तरी आपण त्याने मित्र बनत नाही. " महाराज धृपद म्हणाले.

" मित्रा , तुझ्या मुखातून असे कटू शब्द माझ्या कानाला विलक्षण पीडा देत आहेत. विसरलास आपण आश्रमात असताना किती चांगले मित्र होतो. तुला रात्री भूक लागायची म्हणून मी माझ्या भोजनातले अर्धे भोजन लपवून ठेवायचो आणि रात्री तुला भूक लागल्यावर तुला द्यायचो. एकदा वनविहार करताना मी हिंसक पशूंवर बाणवर्षाव करून तुझे प्राण वाचवले होते. तुला श्लोकपठण करण्यात अडचण यायची तेव्हा मीच मदत करायचो. तू मला वचन दिले होतेस की आपण आयुष्यात जे काही मिळवू त्यावर दोघांचाही समान अधिकार असेल. आज मी त्याच वचनाची तुला आठवण करायला आलो आहे. एक मित्र म्हणून माझा तुझ्यावर अधिकार आहे. त्या अधिकाराने मी तुला फक्त दोन गाय मागत आहे. दोन गायी देऊन वचन पूर्ण कर मित्रा. " द्रोणाचार्य म्हणाले.

" मौन रहा ब्राह्मण. जर तू ब्राह्मण नसता तर मी क्षणार्धात तुझे मस्तक धडावेगळे केले असते. महालात कितीतरी दासी रोज माझ्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवतात , कितीतरी सैनिक माझे रक्षण करतात , कितीतरी ब्राह्मण काव्य ऐकवतात म्हणून ते माझे मित्र होतात का ? एक गरीब ब्राह्मण आणि एका वैभवशाली राज्याचा राजा कधीच मित्र होऊ शकत नाहीत. मी रोज दानधर्म करतो. तुलाही दहा गायी दान करतो. पांचालनरेशच्या दरबारातून कुणी भिक्षुक रिकाम्या हाताने परत जात नाही. " महाराज धृपद म्हणाले.

" भिक्षा , दान नकोय मला. मला माझा अधिकार हवाय. " द्रोणाचार्य म्हणाले.

" अधिकाराची वाणी मुखातून काढू नकोस. आपापली पात्रता पाहून मित्र बनवले जातात. राजाचे मित्र राजा , मंत्री , धनाढ्य व्यापारी असतात. भिक्षुक नव्हे. तसे असते तर मान काय राहिला असता राजाचा ? दान हवं तर घे. नाहीतर तत्क्षण सभेचा त्याग कर. माझ्याकडे इतका व्यर्थ वेळ नाही. लहानपणी अजाणतेपणी दिलेले वचन मी ग्राह्य धरत नाही. " महाराज धृपद म्हणाले.

सर्वजण हसू लागले. लहानगा अश्वत्थामा रडू लागला आणि द्रोणाचार्य यांना बिलगला.

" भरत्वाजनंदन दान नाही मागत. आज पांचालच्या या राजसभेत मी प्रतिज्ञा घेतो की ज्या राजवैभवाचा , राजसिंहासनाचा तुला अहंकार चढला आहे मी ते राजवैभव , राजसिंहासन जिंकून घेईल. धन , संपत्ती , सौंदर्य कालानुरूप नष्ट होते पण ज्ञान कधीच नष्ट होत नाही. तुझ्याकडे राजवैभव आहे आणि माझ्याकडे ज्ञान. याच ज्ञानाच्या जोरावर मी असे शिष्य घडवेल जे एकदिवस हे पांचाल राज्य जिंकतील. जोवर हे वचन पूर्ण होत नाही तोवर मी पांचाल राष्ट्रात प्रवेश करणार नाही. " द्रोणाचार्य म्हणाले.

त्यांची वाणी विजेप्रमाणे सभेत कडाडली.

क्रमश..

🎭 Series Post

View all