द्रोणाचार्य पुन्हा वर्तमानात आले.
" धृपद , अरे मित्र म्हणून फक्त दोन गायी मागितल्या होत्या तुला. कुठे तुझे अर्धे राज्य मागितले होते ? पण तू आपल्या मैत्रीचा आदर करायला विसरलास. तरीही मी कठोर वागणार नाही. मी अर्धे राज्य तुला परत देतो. उत्तर पांचालवर अश्वत्थामा राज्य करेल आणि दक्षिणकडच्या राज्यावर पूर्ववत तुझीच सत्ता असेल. आता सर्व कटुता विसरून मला आलींगण दे मित्रा. आता तरी आपण समान आहोत. " द्रोणाचार्य म्हणाले.
धृपदने बळजबरीनेच आलींगण दिले.
***
काही वर्षांनी एकदा श्रीकृष्ण आणि द्रोणाचार्य यांची भेट झाली.
" माधवा , तू तर ज्ञानी आहेस. तुझ्यापासून काय लपले आहे ? माझी पीडा तुला ठाऊक आहे. मी ज्या मित्रावर एवढा जीव लावला त्या मित्राने माझ्या जीवनातला कठीणसमयी मदत नाकारली. अपमानित केले. या जीवनात मी गुरू म्हणून आदर कमावला पण एकही जिवलग मित्र प्राप्त करू शकलो नाही याची खंत वाटते. हे यशोदासुता , मी ऐकले आहे की सुदामा तुला भेटायला आला होता. त्याने काहीही न मागताच तू त्याला सर्व दिले. कर्ण-दुर्योधन अधर्मी असले तरी त्यांची मैत्री पाहून या मनात ईर्ष्या उत्पन्न होते कधी कधी. माझ्या मित्राने म्हणजे धृपदने एक भव्य यज्ञ करून द्रोणमृत्यूस कारणीभूत असा पुत्र प्राप्त केला. तो पुत्र भविष्यात माझ्या मृत्यूस कारणीभूत ठरेल हे जाणूनही त्या धृपदपुत्राला मी विद्यादान दिले. हे देवकीनंदन , माझं कुठे चुकले की माझ्या जीवनात मैत्रीचे स्थान नाही ?"
द्रोणाचार्य म्हणाले.
द्रोणाचार्य म्हणाले.
" हे गुरूश्रेष्ठ द्रोणाचार्य , अश्वत्थामा याला पाणीत पीठ मिसळलेले द्रव्य दूध म्हणून पिताना पाहिले तेव्हा तुम्ही भावुक झाले. पुत्राला भौतिक सुखाची प्राप्ती करून देताना धर्माची शिकवण द्यायला कमी तर नाही पडले ना ? तुम्ही शिष्याकर्वे त्याला राज्य मिळवून दिले मात्र त्याला स्वतःला राज्य जिंकण्याइतके सक्षम का नाही बनवले ? असो. पांचालनरेश यांनी मैत्रीचा धिक्कार करून मदत करायला नाकारले हे फार वाईट झाले. यात तुमचा दोष नाही. एखाद्या पात्रात जितकी त्याची क्षमता असते तितकेच जल भरते. कधी कधी शेतकरी कष्ट करून शेती करतो पण तरीही भूमीत असलेल्या काही घटकांच्या कमतरतेमुळे मुबलक धान्य त्याला प्राप्त होत नाही. जेव्हा आपले संबंध कुणासोबत बिघडतात तेव्हा दरवेळी आपलाच दोष नसतो. कधी कधी समोरचाही मैत्रीसंबंध ठेवण्याच्या पात्रतेचा नसतो. " श्रीकृष्ण म्हणाले.
" खरे आहे केशवा. प्रत्येक सुदामाच्या नशिबी कृष्ण नसतो. " द्रोणाचार्य म्हणाले.
©® पार्थ