प्रत्येक बाबतीत तुलना नकोच

Sasu Ani Sunechi Katha

सजवलेली गाडी एका मोठ्या बंगल्यापाशी येऊन थांबली. आभा आपल्या नवऱ्यासह त्या गाडीतून खाली उतरली. इतक्या मोठ्या बंगल्यापुढे गाडी थांबली, तसे आभाला आश्चर्य वाटले. 'ही सारी माणसे साधी दिसतात, त्या मानाने बंगला फारच मोठा आहे!' तिला बरं वाटलं. आभाला खरंतर परेशचे हे स्थळ पसंत नव्हते. मात्र घरातल्या मोठ्या माणसांच्या इच्छेपुढे तिचे काही चालले नाही. 


"आभा, आपले घर इकडे आहे." परेश म्हणाला, तशी आभा त्याच्या पाठोपाठ चालू लागली. 

दारात येताच परेशच्या आत्याने तिला ओवाळले आणि माप ओलांडून ती आत आली. 

तशा तिच्या सासुबाई, वर्षाताई म्हणाल्या, "चला..झालं एकदाचं लग्न. अतिशय दमले बाई मी. जरा पडते थोडा वेळ." असे म्हणत सासुबाई आत निघून गेल्या. पाठोपाठ आभाची नणंद, शिल्पाही आत निघून गेली.


आत्याने आभाला एका खुर्चीवर बसवले. आभा तिथे बसून सारं घर न्याहाळत राहिली. सगळीकडे नुसता पसारा पडला होता. पाणी पिण्याच्या बहाण्याने ती स्वयंपाक घरात आली. तर तिथेही सगळा पसारा होता. टेबलवर पसारा, सिंकमध्ये उष्टी, खरकटी भांडी तशीच पडली होती. 

आभाला वाटले, 'लग्न घर आहे. पसारा होणे तर स्वाभाविकच आहे.' पण बराच वेळ कोणी घर आवरायला घेईना. आत्या सर्वांना हाका मारून दमल्या.

"आत्या, मी करते साफसफाई. सगळे दामले असतील ना?" कोणी पुढे येईना हे पाहून आभा म्हणाली. 


"अगं, नवी नवरी ना तू? मग आल्या आल्या तुला कामाला लावणे बरे दिसत नाही. जा तू तुझं आवरून घे. मी शिल्पाला बोलावते." आत्या आत निघून गेल्या. 

आभा साडी बदलून बाहेर आली. तसा आत्या आणि शिल्पाचा वाद तिच्या कानावर पडला. "आता आली आहे ना सून? मग करेल ती सगळं." शिल्पा आत्याला म्हणाली.


"अगं, पण ती नवखी आहे अजून. माप ओलांडल्यानंतर लगेच कुणी कामाला लावतं का?" आत्या चिडून म्हणाल्या. 


हे ऐकून आभाने झाडू शोधून काढला. खाली पडलेला सगळा पसारा एका जागी लावून, केर काढून घेतला. सिंकमधली भांडी घासून कट्ट्यावर एका बाजूला लावून ठेवली. हे पाहून आत्या तिच्या मदतीला धावल्या. मी करते म्हणू लागल्या. 

"आत्या अहो, मी केले म्हणून काय झाले? सून म्हणून आले ना मी या घरात? मग हे घर माझेच तर आहे आणि आपल्या घरात काम करायची कसली लाज?" आभाचे विचार ऐकून आत्याला बरे वाटले.


"चहा टाका थोडा." इतक्यात आवाज आला. बाहेर घरातली पुरुष मंडळी गप्पा मारत बसली होती. त्यातल्याच कुणीतरी चहाची ऑर्डर दिली. 

"वहिनी, उठा आता. घर तुमचे आहे. आलेल्या पाहुण्यांची सरबराई तुम्ही करायची. आम्ही नाही." आत्या आभाच्या सासुबाईंना म्हणाल्या.

आता सासुबाईंना उठणे भागच होते. कसाबसा चहा करून त्या पुन्हा खोलीत गेल्या. 

"वहिनी, नव्या सुनेसमोर असे वागलात तर कसे व्हायचे? रात्रीच्या जेवणाची तयारी व्हायला हवी. शिवाय उद्या पूजा आहे, त्याची तयारी व्हायची आहे." नाईलाजाने आभाच्या सासुबाई पुन्हा उठल्या. 

"आम्ही लग्न झाल्या दिवसापासून घरात कामं करत होतो. बसून राहिलो नाही कधी. या आत्ताच्या सुनांना काय धाड भरली? नवी नवरी असली म्हणून काय झाले? तिचेच घर आहे ना हे?" वर्षाताई आभाला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणाल्या. हे ऐकून आभा पुन्हा मदतीला आली नि सारं काम निभावलं. 


दुसऱ्या दिवशी पुजा झाली आणि पाहुणे मंडळी आपापल्या घरी परतली. आत्या मात्र आणखी दोन दिवस थांबणार होत्या.

आभाच्या सासुबाई, आत्या जवळपास नाहीत हे पाहून तिला म्हणाल्या, "आता घरचं सारं तू पाहायचं. माझ्याने काही होत नाही आता." त्या क्षणापासून आभा पुन्हा पदर खोचून कामाला लागली. 


"आई, मीही येते आता." शिल्पा आवरून बाहेर पडली. 


"अगं, तू थांब ना. नाहीतरी आठ आठ दिवस राहतेस इथे. सासरी काही काम नसतं तुला. सगळं तुझ्या सासुबाई करतात. हे माहित नाही की काय मला?" वर्षाताई म्हणाल्या.


"आई, अगं काहीतरीच काय बोलतेस? घरी माझ्याविना कुणाचे पानही हालत नाही. मला जायलाच हवे." शिल्पा आईला डोळा मारत म्हणाली.


"वहिनी, जाऊ दे तिला. इथे राहण्यापेक्षा सासरी राहून सासुकडून चार चांगल्या गोष्टी शिकेल आणि एक लक्षात ठेव शिल्पा, हे आता तुझ्या वहिनीचं घर आहे. इथे येऊन तिच्या संसारात अजिबात लुडबुड करायची नाही." आत्या म्हणाल्या आणि शिल्पा नाक मुरडत घरी निघून गेली.


दोन दिवस खपून आभाने आत्याच्या मदतीने सारं घर पुन्हा आवरलं. सासरेही मदतीला आलेले पाहून आभा त्यांना म्हणाली, " बाबा मी करेन सारं. तुम्ही विश्रांती घ्या." 

"खरं सांगू का सुनबाई, तुझी सासू आता घरात एकही काम करत नाही. रिटायर झाल्यापासून मीच घरातली निम्मी कामे करतो. तेवढीच हालचाल होते आणि घरातली कामेही पार पडतात."


खरंच..सून आल्यापासून वर्षाताईंनी सकाळी लवकर उठणेही बंद केले. परेश ऑफिसला गेल्यानंतर त्या निवांतपणे उठायच्या. मग आभाला त्यांची सरबराई करावी लागायची. तिचा स्वयंपाक होईपर्यंत त्या बैठकीच्या खोलीत बसून तिच्यावर नकळत नजर ठेवायच्या. सतत आभाला काही ना काही कामे सांगायच्या. 'आमच्या वेळी हे असे नव्हते बाई..' त्यांचं एकच पालुपद सुरू असायचं. आभाने एखादा नवीन पदार्थ केला आणि सासुबाईंना वाढला तर त्या पदार्थाचे मुळीच कौतुक होत नसे. 'मी केलेल्या आमटीत डाळ उठून दिसते. मी केलेल्या पोळ्या कशा छान फुगतात! हिच्या भाजीला चवच नसते. माझ्यासारखा उटारेटा काय जमणार हिला?' सासुबाई असे म्हणत.


एक दिवस आभाने शिल्पाला फोन केला. "ताई, बरेच दिवस झाले, घरी आला नाहीत. येऊन जा एकदा." 

दुसऱ्या दिवशी शिल्पा सकाळी सकाळी हजर झाली." ताई, स्वयंपाक काय करू? " आभाने शिल्पाला तिची आवड विचारली.

"तू..बासुंदी आणि पुरी कर. मला जाम आवडते." 

त्यानुसार आभाने बासुंदी विकत आणली आणि मस्त गरम गरम पुऱ्या तळल्या. वर्षाताईंना हा बेत आवडला. मात्र त्या आपल्या मुलीला म्हणाल्या, "शिल्पा, अगं तुझ्या वहिनीने केलेल्या पुऱ्या काही माझ्यासारख्या झाल्या नाहीत बघ. नीट तळल्या गेल्या नाहीत की फुगल्या नाहीत." 

जेवणं झाल्यावर दोघी मायलेकी खोलीत गप्पा मारत बसल्या ते चहाची वेळ झाल्यावरच बाहेर आल्या. चहा झाल्यावर शिल्पा जायला निघाली. 

"ताई, आलात तशा दोन दिवस राहून जा." आभा शिल्पाला म्हणाली.


"बघ बाई. तू म्हणतेस म्हणून राहते. नाहीतर तिकडे माझ्याविना पान हालत नाही." शिल्पा.


"अगं, मग जा घरी. तसंही तुझ्या आत्याची ताकीद आहे. इथे सारखी लुडबुड करायची नाही म्हणून." वर्षाताई आपल्या मुलीला म्हणाल्या. 

"वहिनीने बोलावले म्हणून मी आले. नाहीतर कशाला आले असते?" माय-लेकीची नोकझोक ऐकत आभा काम करत राहिली. 


घरच्या रूटीनला लवकरच आभा सरावली. मोकळा वेळ मिळू लागला तसा तिला कंटाळा येऊ लागला. 

परेशकडे तिने नोकरी करायला परवानगी मागितली. त्याने सहज परवानगी दिली. खरं सासुबाईंनी नाक मुरडले. "ही बाहेर गेली तर घर कोण सांभाळणार? आम्ही नाही अशी नाटकं केली, नोकरीच करायची म्हणून! आम्ही घर अगदी व्यवस्थित सांभाळले. मोकळ्या वेळातही घरची उरली सुरली कामे केली." 


पण आभाला नोकरी करायची संधी मिळाली नाही. गोड बातमी आली आणि सगळे आनंदून गेले. पुरे तीन महिने आभाला त्रास झाला. डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली. त्यातच घरची सगळी कामं वर्षाताईंना करावी लागल्याने त्यांची चिडचिड झाली. "आम्हाला काय मुले झाली नाहीत का? अशा अवस्थेत आम्ही सगळं करत होतो. असं पडून राहत नव्हतो ."

हे ऐकून आभाला राग आला. "सासुबाई, प्रत्येक बाबतीत तुमची आणि माझी तुलना होऊ शकत नाही. अगदी प्रत्येक बाबतीत तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला काम करायला जमणार नाही. तसाही तुमचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे. तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन राहिलात तर कसे व्हायचे? मलाही मत आहे, मन आहे आणि शेवटी हे घर माझेही आहेच ना?" 

हे ऐकून सासुबाई काहीच बोलल्या नाहीत. आता आभाने मात्र ठरवले, 'इतरांच्या बरोबर आपलं मन जपणं, आपल्या आवडी- निवडी जपणं तितकच महत्वाचं आहे. नाहीतर सगळ्याच बाबतीत आपल्याला गृहीत धरलं जातं. मग त्यापेक्षा इतरांची मनं सांभाळून, आपणच आपले मन जपावे!'



समाप्त.

©️®️सायली जोशी.