प्रतिकार

Gosht anyayala kelelya pratikarachi

मीरा आज ऑफिसला घाईगडबडीने चालली होती. एरवी जाता येता शेजारी -पाजारी हाय, हॅलो करणारी मीरा आज कोणाकडे लक्ष न देताच चालली होती. तिची कलिग ईशा, तिच्याच बिल्डींगमध्ये राहायची. ती मीराची वाट पाहत गेटजवळ उभी होती. मात्र तिच्याकडे न पाहताच बाहेर येऊन मीराने रिक्षा थांबवली आणि ऑफिसच्या दिशेने निघून गेली.

"आज काय झालं मीराला? कधीची हाक मारते आहे मी. तिचा चेहराही पडलेला दिसतोय. डोळे रडून -रडून सुजल्यासारखे दिसत आहेत. कुणास ठाऊक काय झाले?"
ईशाने स्वतःशीच बोलत आपली गाडी घेऊन मीराच्या रिक्षामागे जाऊ लागली.

मीरा ऑफिसला पोहोचताच तडक मॅनेजरच्या केबिनमध्ये शिरली. तिने आपला राजीनामा मॅनेजर जवळ सोपवला.

"मीरा हे काय?" एनी प्रॉब्लेम? तुझ्यासारखी सिन्सियर एम्प्लॉई जर रेजिग्नेशन द्यायला लागली तर बाकीच्यांनी काय करावं?" मॅनेजर घाईघाईने तो राजीनामा उघडून पाहत म्हणाले.

मीरा काहीच न बोलता तशीच बसून राहिली.

"प्लीज मला कारण कळेल मीरा? या रेजिग्नेशनच? कारण तुझ्यासारखी बेस्ट एम्प्लॉई गमावणे म्हणजे, आमच्या कंपनीचं नुकसान! ते आम्हाला परवडणार नाही आणि आतल्या गोटातली बातमी म्हणजे, लवकरच तुझं प्रमोशन होणार आहे." मॅनेजर मीराकडे पाहत डोळे मिचकावत म्हणाले.

तरीही मीराच्या चेहेऱ्यावरची रेषही हलली नाही.

"प्लीज मीरा बोल. घरी काही प्रोब्लेम आहे का? शक्य असेल तर तोही सोल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण." सर तिच्या चेहऱ्याकडे निरखत म्हणाले.

"सर.. घरच्या गोष्टी कोणाला सांगताही येत नाहीत आणि लपवताही येत नाहीत. माझा नवरा मला मारहाण करतो, संशय घेतो, वाट्टेल तसे बोलतो. कारण त्याचा त्याच्या रागावर ताबा राहत नाही आणि या साऱ्यात त्याच्या घरची मंडळी केवळ बघ्याची भूमिका घेतात. गेली तीन वर्षे हे असंच सुरू आहे. सर या चेहऱ्यावरच्या खुणा मी रोज मेकअप आड लपवायचा प्रयत्न करते, दुःख लपविण्याचा प्रयत्न करते. पण सहन करण्याची क्षमता संपली आज. हे सारं सोडून कुठेतरी निघून जावं म्हणून हा राजीनामा." इतकं बोलून मीरा हमसाहमशी रडायला लागली.

"काय? मीरा हे गेली तीन वर्षे असेच सुरू आहे? अगं तक्रार का केली नाहीस याची? सहन का करत राहिलीस? अगं सांगायचे तरी मला. काहीतरी मार्ग काढला असता आपण." इतका वेळ दारात उभी राहून ऐकणारी ईशा पट्कन पुढे होत म्हणाली.

"सॉरी मीरा. पण हा राजीनामा मी स्वीकारत नाही. या त्रासातून बाहेर पडण्याचा हा काही मार्ग नव्हे. ही वेळ गप्प बसण्याची नाही, तर या विरूध्द आवाज उठवण्याची आहे. आम्ही सारे तुझ्या सोबत आहोतच.
पण मला जास्त कौतुक या गोष्टीचं वाटतं की, तू या साऱ्या गोष्टींचा परिणाम तुझ्या कामावर होऊ दिला नाहीस. कायम बेस्ट परफॉर्मन्स देत आलीस! काम हे आपलं 'पॅशन' म्हणून जपतो तसाच आपला 'आत्मसन्मानही' जपावा. गप्प राहून सारं सहन केलंस, तर कोणीही तुझ्या बाजूने उभे राहणार नाही आणि चार भिंतीच्या आतल्या या गोष्टीत बाहेरची माणसे काही करू शकत नाहीत. त्यामुळे तुलाच स्वतःसाठी उभे राहिले पाहिजे." मॅनेजर समजावणीच्या सुरात म्हणाले.

या बोलण्याने मीराला थोडा धीर मिळाला. थोडयाच वेळात ती केबिन बाहेर आली. थोडं फ्रेश होण्यासाठी ईशा तिला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली.

"मीरा अगं एका शब्दानेही काही सांगितलं नाहीस? का सहन केलंस हे? गुन्हा करणाऱ्यांपेक्षा सहन करणाराच जास्त गुन्हेगार असतो आणि जग त्यालाच दोषी ठरवत असतं. मीरा तुझ्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेऊ देते आहेस तू. सहन करण्याची ताकद ही स्त्रीमध्ये उपजत असतेच. पण म्हणून सगळचं सहन करावं, याला काही अर्थ नाही. सहनशक्तीला मर्यादा असावीच. बघ एकदा प्रतिकार करून. त्याने काय होईल? फार तर नातं तुटेल तुमचं. बाकी काही होणार नाही आणि तसंही रोजचा त्रास सहन करण्यापेक्षा हे असलं नातं तुटलेलं बरं.

अशावेळी मन मोकळं करावं गं. काहीतरी मार्ग निघतो. शेवटी आपली माणसं सोबत असली की दुःख जरा हलकं होतं."
मीराच्या चेहऱ्यावरच्या खुणा निरखत ईशा तिला म्हणाली.

"माहेरी आई -बाबांना काही सांगितलेस तर तुझे काही खरे नाही अशी धमकी देत होता राहुल मला आणि आमचा रूद्र केवळ दोनच वर्षांचा आहे गं. त्याची काळजी वाटते. शिवाय सासुबाईही राहुलला समजावून थकल्या. म्हंटल्या 'शेवटी नवरा -बायकोची भांडण आहेत ही. आम्ही काय करणार?' म्हणून सगळं सहन करत राहिले. आज कहरच झाला गं. पण आता नाही. नक्कीच नाही." ईशाच्या बोलण्याने मीराला थोडा धीर आला होता.

रात्री ऑफिसचे काम संपवून मीरा उशीरा घरी पोहोचली, तर राहुल तिची वाट पाहत दारातच उभा होता.

"इतका का उशीर?"

मीरा काही न बोलता आत आली. "अगं कुठे होतीस इतका वेळ?" राहुल रागाने थरथरत होता.

"ऑफिसमध्ये." मीरा तुटकपणे उत्तर देऊन खोलीत जायला निघाली. तसा राहुल तिला अडवत म्हणाला, "नक्की ऑफिसमध्येच की आणखी कुठे?" राहुल तिच्यावर हात उचलणार इतक्यात मीरानेच त्याला एक जोरदार कानाखाली ठेऊन दिली. अचानक झालेल्या या प्रतिकाराने राहुल गडबडला.

इतक्यात मागून सासुबाईंचा आवाज आला.

"आणखी एक मीरा.."

तसा परत राहुलच्या कानाखाली आवाज झाला.

"आई? अगं तुला काहीच कसं वाटत नाही? तुझी सून तुझ्या पोटच्या पोरावर हात उचलते आहे." राहुल आपला गाल चोळत मागे सरत म्हणाला.

"त्यात काय वाटायचं? तू इतकी वर्षे हेच करत आलास आणि ती सहन करत राहिली. मी वाट पाहत होते, ती तुला प्रतिकार कधी करते याची. कारण एक सासू म्हणून मी तिला शिकवलंही असतं रे तुझ्यावर हात उचलायला. पण ते माझ्या संस्कारात बसत नव्हतं आणि ते धाडसही नव्हतं माझ्यात.
तुझ्या वडिलांनी हेच केले, जे तू इतकी वर्षे करत आलास. आता असं वाटतं, मलाही त्यावेळी मीरासारखं वागायला जमलं असतं तर किती बरं झालं असतं. पण घरचे आजूबाजूचे लोक काय म्हणतील? हा विचार करून मी सगळं सहन केलं.

मी तुझ्यावर संस्कार करायला कमी पडले हेच खरं. तुला माझा मुलगा म्हणायलाही लाज वाटते रे. अरे मीरा रोज मेकअप करून ऑफिसला जायची. कारण तू केलेल्या मारहाणीच्या खुणा कुणाला दिसू नयेत म्हणून. ती कायम हसतमुख राहायची. का? तर आपल्या चेहऱ्यावर दुःख दिसू नये म्हणून.

तिने कधी कुठलीच तक्रार केली नाही की बाहेर कोणाला या गोष्टी सांगितल्याही नाहीत.
पण जर इथून पुढे माझ्या सुनेवर पुन्हा हात उचललास तर गाठ माझ्याशी आहे आणि या घराचे दरवाजेही तुझ्यासाठी कायमचे बंद होतील हे लक्षात ठेव." मीराच्या सासुबाई रागाने बेभान होऊन बोलत होत्या.

"एक स्त्री म्हणून अन्याय कुठवर सहन करायचा? त्या सहनशीलतेला अंतच नाही. संयम बाळगायचा तरी किती, त्यालाही मर्यादा असतात राहुल. तुझ्या पदरी एक मुलगा आहे हे लक्षात ठेव. आपल्या मुलावर हेच संस्कार करणार आहेस का?

आणि..मीरा मला माफ कर. माझ्या मुलाला चांगले वळण लावायला मी कमी पडले. पण आज तू केलेला प्रतिकार पाहून माझी मलाच चीड आली. एक स्त्री म्हणून मी या आधीच तुझ्या पाठीशी उभं राहायला हवं होतं गं."
असे म्हणत सासुबाईंनी मीराला जवळ घेतले. तसा मीराचा बंध फुटला. या मिठीत मीराला अन्यायाला प्रतिकार करण्याचं बळ मिळालं आणि सासू -सुनेचं नातं पुन्हा नव्याने उमलू पाहत होतं.

(हा लेख हिंसाचाराचे समर्थन करत नाही.)