माझी ओळख
स्वतःची ओळख स्वतःच कशी करून देणार. मी तर तसा चांगलाच आहे हो म्हणजे निरागस, दयाळू, मायाळू आणि कनवाळू. म्हणजे मला तर वाटत की जगात माझ्या सारखा चांगला आणि हुशार माणूस पृथ्वीवर अजून जन्मालाच आला नसेल. पण हे झालं माझं माझ्या बद्दलच मत. पण इतरांना तस वाटत नाही ना.
त्या पेक्षा इतरांच्या नजरेतून मी कसा ते पाहू.
आई बाबा- लग्ना आधी चांगला वागायचा. पण हिने काय जादू केली आहे कुणास ठाऊक. बायको ची लुगडी धुवायला ही कमी नाही करायचा. तिच्या ताटाखालच मांजर आहे तो.
शिक्षक- वरच्या वर्गात घातले आहे. मागच्या जन्मी पाप केलेलं असलं की असे विध्यार्थी नशिबात येतात. यांना शिकवण्या पेक्षा शेतात नांगर धरणं जास्त चांगलं.
माझे विद्यार्थी : (कोपरा पासून हात जोडून ) खरच गुरु आहात.
मैत्रिणी- पक्का मोरू आहे. इझीली मामा बनवता येतो.
शेजारी -- गाडी आहे म्हणून संबंध ठेवावा लागतो. नाही तर असले शेजारी नसलेले बरे.
बायको - अहो दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे असतात. मी आहे म्हणून टिकली. आपलंच नशीब खराब म्हणायचं आणि गप्प बसायचं. काय सांगणार, कोळसा कितीही उगाळा काळा तो काळाचं.
मुलं- बाबांमध्ये आईने नेमकं काय पाहिलं असेल देव जाणे.
सुन -(सुना )- ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर बरीच सुधारणा व्हायची शक्यता आहे सासऱ्यात.
भाचे- या आधी कंस, शकुनी ही पात्र खोटी वाटायची. पण आता यांच्या पुढे ती बरी म्हणावी असं म्हणावं लागतं.
वाहिनी-- खायला बसला की दुष्काळातून आल्या सारखं गिळतात.
पुतण्या-(पुतणे )- ह्यांना पाहिलं की काका मला वाचवा असं म्हणायच्या ऐवजी *काकांपासून मला वाचवा* असं जिवाच्या आकांतानं ओरडावंसं वाटतं.
मित्रं- वय वाढलं म्हणजे अक्कल येतेच असं नाही.
ऑफिस मधले सहकारी- सीजीएचएस सॅम्पल नॉट टू बी सोल्ड !!!
हा ssहा ss, ही ss ही करत दिवस कसे पुढे ढकलावे हे यांच्याकडून शिकावे.
हा ssहा ss, ही ss ही करत दिवस कसे पुढे ढकलावे हे यांच्याकडून शिकावे.
डॉक्टर : डोक्यात काय पण गुढघ्यातही मेंदू नसलेला हा माणूस म्हणजे एक आश्चर्य आहे.
समवयस्क -- लाकडं पोहोचली पण पोरकटपणा सुटला नाही अजून.
सेंड ऑफ च्या वेळचे दोन शब्द : (मान एकशे ऐंशी डीग्रीत फिरवून अत्यंत निराशेने, हताश पणे) इथ भेटलात ते भेटलात.
असं प्रत्येकाचं माझ्या बद्दलच मत. मला वाटत एव्हढी ओळख पुरे होईल. घ्या सांभाळून मंडळी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा