प्रतिभा (भाग ८)

पोलिस स्टेशनला पोहोचलो......

पोलिस स्टेशनला पोहोचलो. पिवळ्या प्रकाशाचे बल्ब . त्यामुळे जास्त वाटणारा अंधार . खुर्च्यांमध्ये बेपर्वा आणि गणवेषात बसलेली माणसे . त्यांचे रुक्ष चेहरे या सगळ्याचा सामना करीत मी एका कॉन्स्टेबलला विचारले, " वाधमारे साहेबांनी बोलवलयं. त्यांची केबीन कोणती ? " विचारलेल्या प्रश्नाला उत्तर मिळेल तर ते पोलिस स्टेशन कसले ? त्याने माझ्याकडे पाहिले. पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळून झाल्यावर तो म्हणाला, " राजवाडे केस काय ? " मी हो म्हंटलं. तो अशा रितीने बघत होता की माझ्या आर्थिक परिस्थितीचा तो अंदाज घेत असावा. त्याने एका केबीन कडे बोट दाखवलं. मी अर्थातच तिकडे वळलो. धडधडत्या छातीने दारावर बोटे वाजवली. आतून पोलिसी आवाजात " येस कम इन ...... " आणि आत शिरल्यावर लक्षात आलं की टेबला पलिकडील दगडी चेहरा मला न्याहाळत होता. आता तुम्ही म्हणाल की मला दगडी चेहरा पाहण्याची सवय होती. खरं आहे , पण इथे नुसता चेहरा नव्हता तर त्यातील संशयाची बॅटरी माझ्या चेहऱ्याचं स्कॅनिग करीत होती. त्यांनी समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं. पण अनिच्छेनीच , असं मला वाटलं. आपण दुसऱ्याला बसायला सांगतो तेव्हा थोडेतरी सौम्य भाव असतात. पण हे पोलिस स्टेशन होतं. मला त्यांनी नाव विचारलं. मी म्हणालो , " उत्तम राजाराम कोनकर " त्यावर त्यांनी विचारले, " म्हणजे आमचे एसीपी कोनकर तुमचे कोण ? " मी म्हंटले, " फक्त नावबंधू. आमचे कोणीही नातेवाईक नाहीत " त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते थोडा वेळ जाऊन देत म्हणाले, " मि. कोनकर मला सांगा , नारायण बद्दल तुम्हाला काय माहिती आहे ? " मला कल्पना नव्हती . असा प्रश्न समोर आल्याने मी बावचळलो. मी म्हंटले, " म्हणजे काय माहिती पाहिजे तुम्हाला ? " त्यावर ते भडकून म्हणाले, " इथे फक्त प्रश्नांची उत्तरं अपेक्षित असतात , प्रतिप्रश्न नाही. बोला काय काय माहिती आहे तुम्हाला, नारायणची. " मी म्हंटले, " तशी काही फार नाही. तो वांद्य्राला राहतो, आणि कामामध्ये अतिशय तज्ञ आहे. बाकी त्याची वैयक्तिक माहीती फार नाही. तो डिव्होर्सी आहे असं ऐकलं होतं. नक्की माहित नाही. " मग जरा वेळ जाऊन देऊन त्यांनी एक आलेला फोनही घेतला. मग म्हणाले, " मि. कोनकर, तुम्ही ज्या वेळी राजेशचा मृतदेह रक्ताच्या थोरोळ्यात पडलेला पाहिला तेव्हा ताबडतोब पोलिस स्टेशनला का फोन केला नाहीत ? " ...माझ्या जवळ याला स्पष्टीकरण नव्हते. पण अचानक मला सुचले. " साहेब मी फार घाबरलो होतो आणि रक्ताळलेला मृतदेह मी जवळून प्रथमच पाहत होतो. "


त्यावर ते म्हणाले, " तुम्ही भोळसटपणाचा आव आणलाय तो तुम्हाला खरा आहे असं म्हणायचंय ? नक्की बोला तुम्हाला नारायणने राजेश मृत्यू पावला आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी तिकडे पत्राचा बहाणा करून पाठवलेलं होतं की नाही ? " आता मला कळलं की यांचा दृष्टिकोन कसा आहे. म्हणजे मी आणि नारायणने मिळून कोणाकरवी तरी राजेशचा खून केला होता.
अशी यांची कल्पना झाली होती. मला आता पाठीवरून घामाचा थंड ओघळ खाली उतरताना जाणवू लागला. मग मी ठरवलं की यांना काहीही खरं सांगून उपयोग नाही. यांना जर कळलं की मी प्रतिभाचा पाठलात करून हा जुना पत्ता आधीच शोधला होता आणि नवीनही. तर ते मला नक्कीच या प्रकरणात गोवतील. मी माझा लेटर देण्यापलीकडे या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याच सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, "पण तुम्हाला तर नारायणने तिथे असताना आणि त्याही नंतर तीन चार वेळा तरी फोन केल्याचं दिसतंय. ते कशासाठी ? " खरंतर हा प्रश्न त्यांनी नारायणला विचारलाच असणार तरी मला तो परत विचारण्याची गरज काय. पण मी तसं विचारल नाही. मी काहीच उत्तर देत नाही असं पाहून ते म्हणाले, " बोला मि. उत्तम , मी इथे किर्तन सांगायला बसलो नाही. माझी स्टोरी पुढे गेलीच पाहिजे. बोला " ते ओरडले. मग ते म्हणाले, " आपण एक काम करूया.आता मीच तुम्हाला कथा सांगतो. म्हणजे कसं आहे बघा, तुम्ही लेटर द्यायला गेलात त्या लेटरच्या पाकिटावर जुना पत्ता लिहिला होता. जो तुम्ही एचार मधून घेतलात. नारायणने प्रतिभाला छळणाऱ्या राजेशला संपवण्यासाठी सुपारी दिली. तो गुंड आधीच तिकडे पोहोचला होता. त्याने राजेशला मारण्याचं काम केलं. पण नारायणचा विश्वास नव्हता म्हणा , किंवा खात्री व्हावी म्हणून त्याने लेटर पोहोचवण्याचा बहाणा केला. तुम्हाला लेटर घेऊन पाठवले आणि गुंडाने काम झालं असा मेसेज अथवा फोन नारायणला करण्याचा धोका नारायणला किंवा प्रतिभाला घ्यायचा नव्हता म्हणून त्याने तुम्हाला पाठवलं. बरोबर ? (त्यांनी माझ्याकडे पाहिलं) .... किती पैसे नारायणने तुम्हाला दिले, बोला मि.उत्तम. " मी असं काही झालं नाही म्हणालो. पण ते ओरडून म्हणाले, " मग नारायणने तुम्हाला ते लेटर देऊ नये म्हणून का सांगितले ? पण तुम्ही ते लेटर देण्याची चूक केलीत. गुन्हेगार चूक करतातच. मि . उत्तम. .....असा सगळा तुमचा प्लान होता. बोला. मधल्या रिकाम्या जागा भरण्यासाठीच तुम्हाला मी बोलावलंय. " ...... आता मात्र आपण कशात गुंतत चाललोय याची मला जाणीव झाली. मी ओरडून म्हंटलं "अजिबात नाही. माझा राजेशच्या खुनाशी काहीही संवंध नाही. " ........ मग ते म्हणाले, " तुम्हाला ओरडायचंय मि. कोनकर , चला आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला पाहिजे तितके ओरडा, कारण आत आम्ही ओरडायची संधी देत नाही, ओरडायला लावतो आणि खरं बोलायला पण. .....जाधव, याला आत घ्या. "

तिकडून जाधव (ज्याने मला बाहेर न्याहाळले होते तो ) आला त्याने मला कॉलर धरून उचलले. मला धरून त्याने एका कोठडीकडे ओढत नेले. अधिकच अंधारलेल्या त्या कोठडीतल्या अंधुक प्रकाशात मला आतले सगळे धरलेले मेंबर दिसले. सगळेच निर्ढावलेले गुन्हेगार आणि निर्लज्जही. इथे जायचं ? बापरे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. मी म्हणालो, " जाधव साहेब मी जे आहे ते सगळे सांगतो, प्लीज मला आत नका नेऊ. " तशी जाधव म्ह्णाला, " अरे आपली गिरीपच अशी आहे , भले भले कापत्यात. " ते ऐकून वाघमारे ओरडले , " जाधव , तुझी ताकत नंतर दाखव, घेऊन ये त्याला इकडे. " मला परत जाधवने ओढत आणले. आता मला बसू न देता वाघमारे म्हणाले, " बोल लवकर लवकर. इतक्या लवकर तुटशील अस वाटलं नाही रे. " मग मी प्रतिभाच्या कंपनीतल्या येण्यापासून तो आजपर्यंतची सगळी माहिती सांगितली. अर्थातच ती एका कॉन्स्टेबलने लिहून घेतली. मग माझ्यापुढे ते पेपर टाकीत वाघमारे ओरडले, " सही कर

त्याच्यावर " मी थरथरत्या हाताने सही केली. मग विचारले, " आता मी जाऊ शकतो का सर ? आपण बोलवाल तेव्हा तेव्हा येईन मी. " वाघमारे म्हणाले, " बोलवल्यावर तुझा बापही येईल. समजलास. हे बघ , आजपासून मला नारायणची इत्थंभूत खबर पाहिजे. लपवाछपवी केलीस ना तर तुझ्यासाठी कोठडीतच बिछाना लावायला सांगतो. चल नीघ. " मी शर्टाची कॉलर सारखी करीत निघालो. तेव्हा ते म्हणाले, " तुला काय वाटतं तू सांगितलंस याच्यावर आमचा विश्वास बसला ? " ...... त्यांनी जाधवला बोलावून उत्तमवर लक्ष ठेवण्यास सांगितले. .............................

मी काही न बोलता निघालो. निघालो कसला भराभर चालत , पळालोच म्हणा ना. बाहेर पावसाने झोंड उठवली होती. पण मला आता भिजण्याची पर्वाही नव्हती आणि भीतिही. कशी तरी रिक्षा पकडून मी स्टेशनवर आलो. भिजलेल्या अवस्थेतच मी गाडी पकडली.
रात्रीचे आठ वाजून गेले होते. मला माझी मानसिक अवस्था नक्की समजत नव्हती. मन अस्थिर नसलं तरी बरंचंस रिकामं झाल्यासारखं वाटत होतं. मला थोडं पिळल्यासारखं वाटत होतं. मी धसका घेतला असावा. बसलेल्या एक दोन लोकांनी माझ्याकडे अहेतुकपणे पाहिलं. मग त्यांच्या नजरा दुसरीकडे वळल्या. माझा चेहरा ओढल्यासारखा झाला असावा. घरी आल्या आल्या दोघा मुलांनी जाम तक्रारी सांगितल्या. मला जरा राग आला. त्या भरात मी त्यांना म्हंटलं तुम्ही दोघंही खोटं बोलताय. अचानक मी खऱ्या खोट्याची भाषा कशी काय केली कुणास ठाऊक. ते रिताच्या लक्षात आलं असावं. तिने इतकावेळ माझं निरिक्षण केलं असावं. तिने मुलांना " अरे बाबा आत्ताच कामावरून आल्येत त्यांना त्रास देऊ नका. तुमच्या खोलीत जाऊन खेळा . चला " मुलं थोडी हिरमुसली होऊन निघून गेली. मग माझी बॅग जागेवर ठेवीत रिता म्हणाली, " काही प्रॉब्लेम आहे का ? , घरी आल्या आल्या तुम्ही इतकं विचित्र मुलांशी तरी वागत नाही. काय झालं त्या प्रतिभाचं ? " मला आत्ता तिचा विषय नको होता. मी वैतागून उत्तर दिले , " खड्यात गेली ती प्रतिभा, ती माझी बायको आहे का , तिचा विचार करायला ? " असं म्हणून मी फ्रेश होण्यासाठी गेलो. जाता जाता रिता पुटपुटली. \" बायकोचा तरी कुठे विचार करता ? " मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मला आत्ता तरी रिताबरोबर काहीही शेअर करायचं नव्हतं. जेवणं वगैरे झाली . मी सीरियल पाहत बसलो होतो. माझा फोन फुरफुरला. मी दुर्लक्ष केलं. मग तो दोन तीन वेळा फुरफुरला . रिता म्हणाली, " फोन घेतलात तर बरं होईल कोणाचं तरी कामही असेल. बाबांचाही असू शकेल. येत्या रविवारी आपल्याला जेवायला बोलावलेलं आहे. नितेशला नोकरी लागल्ये ना. " नितेश माझा मेहुणा. मी शेवटी फोन घेतला तो नारायणचा होता. मी गॅलरीत आलो. नारायणने विचारले" क्या हुवा पुलिस स्टेशनमे ? मेरे बारेमे पूछा होगा. " मी नाही म्हणून म्हंटले. मी विचार केला आपल्याला जर याच्यावर नजर ठेवायची असेल तर याला बेसावध ठेवलं पाहिजे. मी त्याचा भाग सोडून बाकी सर्व सांगितलं. त्यावर तो म्हणाला, " सरप्रायझिंग . लेकीन संम्हालके. ज्यादा बात नही करना. मेरेकू तेरे बारेमे बहोत पूछा. लेकीन मै ज्यादा कुछ बोला नही. जाने दो . कल आ जाओ . दांडी मत मारना "

दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. हल्ली रिता जरूरीपुरतेच बोलायची. बहुतेक माझं वागणं फारच संवेदनशील झालं असावं. मी त्याचा फार विचार न करण्याचं ठरवलं. आश्चर्य म्हणजे , प्रतिभा आज कामावर आली होती. तिचा दगडी मुखवटा आज नव्हता. तिला त्याचा कंटाळा आला असावा. माझ्या मते माणूस जेव्हा आपल्या स्वभावाशी विसंगत वागतो तेव्हा उसनं वागणं फार दिवस त्याला सांभाळता येत नसावं. अर्थात, तिच्यामध्ये जास्त चिकाटी होती. मी माझ्या कामात व्यग्र होतो. ती तिच्या. मी तिच्याकडे अधून मधून पाहत होतो. मुखवटा नसल्याने तिचे डोळे थोडे रडके वाटत होते. तिच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे दिसत होती , एरव्ही पण असणारच. पण तिच्या मुखवट्यात अडकलेला माणूस तिचं निरिक्षण सोडून देत असावा. मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो, " प्रतिभा, पोलिसांकडून बॉडी ताव्यात मिळाली का ? " हा प्रश्न अगदी सहजच होता. त्यावर तिने चक्क न भडकता मला नीट उत्तर दिले, " नाही, पोलिसांनाच अंत्यसंस्कार करायला सांगितले आहेत. केव्हा करतील ते तेच कळवतील. " पुढचा प्रश्न तिने बंद करून टाकला. मी काहीच न बोलता कामाला लागलो. थोड्या वेळाने नारायणने प्रतिभाला आत बोलावले. मला नारायणवर लक्ष ठेवायचे होते. पण केबीन मध्ये काय बोलणे चालू आहे ते मी ऐकू शकत नव्हतो. साधारण अर्ध्या तासाने ती बाहेर आली. तिची चाल मंदावली होती. तिने एक दोन फाइल्स काढल्या आणि त्यातली रोझ आणि कंपनीची फाइल माझ्याकडे देत म्हणाली, " हे तुम्हालाच हँडल करायला सांगितलं आहे. माझे रिपोर्टस आत आहेतच. " म्हणजे पुन्हा पुढचा संवाद बंद. ...... अजूनही तिला क्रॅक करणं मला जमत नव्हतं. मी फाइल उचलली आणि नारायण कडे गेलो. बोलण्यातला काहीतरी निदर्शक शब्द तो बोलेल म्हणून मी गेलो होतो. तो म्हणाला, " कंपनीका मॅनेजर रामचंद्रन को मेरा नाम बोलो , वो कोऑपरेट करेगा. " मी सर्व तपशील त्याच्याशी बोलून घेतले होते म्हणून निघालो. केबिनचा दरवाज्या ढकलणार एवढ्यात त्याने मला विचारले, " तुम प्रतिभाको फॉलो क्यूं करता है ? " असला प्रश्न तो विचारील याची मला कल्पना नव्हती. खोटं बोलण्यात आणि नाकबूल करण्यात अर्थ नव्हता. याचा अर्थ प्रतिभाने त्याला सगळं सांगितलं असणार. मी काही न बोलत बाहेर आलो. त्यामुळे त्याचा संशय बळावणार होता. मला त्याची पर्वा नव्हती. मी हे सगळंच पोलिसांना सांगितलं होतं आणि त्याला त्याची माहिती नव्हती. आता मला पोलिसांचं संरक्षण होतं. त्याच्यावर नजर ठेवणं जरूर होतं. त्याला बहुतेक संशय आला असावा. आणि मी त्याचाही पाठलाग करीन म्हणून तर तो मला रोझ आणि कंपनीकडे पाठवित नव्हता ? माझी शंका बरोबर असावि. म्हणजेच प्रतिभा आणि तो यांचा काही तरी संबंध असावा. मी रोझ आणि कंपनीचं काम लवकर उरकण्याचं ठरवलं . लंचनंतर मी त्याला सांगून निघालो.

साधारणपणे रोझ आणि कंपनीचे काम मी सव्वा पाच पर्यंत उरकले. मला माहिती मिळावी की नारायण कुठे आहे त्यासाठी मी त्याला फोन केला. बराच वेळ फोन वाजत राहिला. मी फोन खाली ठेवणार एवढ्यात तो उचलला गेला. आमचा शिपाई कासम याने फोन घेतला होता. मी त्याला नारायणबद्दल विचारले त्यावर त्याने "साब वो प्रतिभा मॅडमके साथ अभी अभी निकला है. " असे त्याने

सांगितले. काही लोक न विचारलेली माहितीही पुरवतात आणी माझ्यासारख्याचा फायदा होतो. आत्ताच निघाल्येत म्हंटल्यावर मी कंपनीच्या कार पार्किंगमध्ये जाऊन डोकावलो. तिथल्या वॉचमनला आश्चर्य वाटून तो म्हणाला, " क्या साब नया कार लिया पेडाभी नही खिलाया. " आता माझी कार नाही हे त्याला माहिती होते. मग त्याला म्हंटले , " अरे मेरेको मुरुगन साब गया क्या ? ..... " मी मुद्दामच नारायणचे नाव घेतले नाही. त्यावर तो म्हणाला, " मुरुगन साब तो अभी तक आया नही. हां नारायण साब और एक मॅडम अभी गया. " मला पाहिजे ती माहिती मिळाली . मी त्याच्याकडे लक्ष न देता भराभर रस्त्यावर आलो. मला त्याच्या गाडीचा नंबर माहीत होता. पण एक दोन मिनिटं जरी झाली असली तरी गाडी बरीच पुढे गेली असणार . असे ठरवून मी नाद सोडला. रिक्षा पकडली. आज मला रिताने भाजी आणायला सांगितलं होतं. तिचा भाऊ नितेश यायचा होता. खरंतर मला असलं भाजीबिजी आणणं मान्य नव्हतं. पण माझं काम होत नसल्याने मी बाजारात शिरलो. एकदाची भाजी घ्यायची म्हणून मी समोरच बसलेल्या एका भाजीवाली कडून मिळेल त्या भावात भाजी खरेदी केली. मी पैसे देऊन वळलो. रिक्षाला हात दाखवणार तेवढ्यात मला नारायणची गाडी एका रेस्टॉरंटजवळ उभी असलेली दिसली. मी सहज भाव तोंडावर ठेवून आत शिरलो. माझी भिरभिरती नजर नारायण आणि प्रतिभाच्या टेबलापाशी स्थिरावली. ते एकाच सीटवर मला पाठमोरे बसले होते. नारायणच्या शर्टावरून मी त्याला ओळखले. मी मुद्दामच त्यांना लागून असलेल्या टेबलापाशी त्यांना पाठमोरा होऊन बसलो. ते दोघेही माझ्या मागेच असल्याने मला आता त्यांचे संभाषण ऐकू येणार होते. प्रतिभा म्हणत होती " मेरेको जाना पडेगा . बादमे मिलेंगे नही तो ऑफिसमे. " त्यांचं आधी काहीतरी बोलणं झालं असावं. ती उठणार असावी. सावधतेचा पवित्रा म्हणून मी टेबलावर असलेला पेपर उचलला , कोणतातरी हेराल्ड बिराल्ड होता आणि पसरून माझ्या तोंडापुढे धरला. माझ्या लक्षात आलं नाही की तो कानडी पेपर आहे. ती उठायच्या आधी तो म्हणाला, " बॉडी मिला क्या ? ..... " तिने नकारार्थी मान डोलावली असावी. ( नाही मिळाली हे मला माहित होतं ) त्यावर दोघे उठल्यावर तो म्हणाला " मै फ्युनरलको आउंगा ........." मग वळल्यावर ती म्हणाली, " किसीकोभी आनेकी जरुरत नही है. ..... " तरीही ते बोलत होते. मला ऐकू येणं शक्य नव्हतं मग कौंटरवर बिल देऊन नारायण निघाला. तशी मला काही फार मोठी माहिती मिळालेली नव्हती. आता यांचा पाठलाग करणं कठीण आहे. असं समजून मी रिक्षा पकडली आणि सहजच त्यांच्या गाडीकडे पाहिलं. प्रतिभाने त्याला हात हालवून बाय केले. ती नंतर रिक्षाने स्टेशनला गेली असणार. माझी निराशा झाली होती. मी फारसा मूडमध्ये नव्हतो. ही माहिती वाघमारेंना देऊन काय होणार ? मी पुन्हा विचार करित राहिलो, पुढे काय ? आपण का ह्या प्रकरणात लक्ष घालावं. वाघमारेंनी सांगितलं म्हणून मला थोडं बळ आलं होतं. पण प्रकरण अंगाशी आलं तर काय होतं याची थोडी झलक मला पाहायला मला मिळाली होती. मग माझी ट्यूब अचानक पेटली , वाघमारेंनी मला यांच्यावर पाळत ठेवण्यास सांगितलं होतं तशीच पाळत त्यांनी माझ्यावरही ठेवली असणार . मी उगाचंच गाडीत इकडे तिकडे पाहिलं. एका ताकतवान माणसाचा मला विनाकारण संशय येऊन मी जागा सोडून गर्दीमध्ये उभा राहिलो. हळू हळू मी माझ्या घरी आलो. बेल दाबली मेव्हण्याची गप्पाष्टकं चालू होती. रिताचे बाबाही आले होते. आत शिरलो. म्हाताराही खूष होता. त्याच्या मुलाला नोकरी लागली होती. का कोण जाणे मला माझा मेव्हणा नेहमी बिनडोक वाटत आला होता. बहुतेकांना बायकोचे भाऊ बिनडोक वाटत असतात. असो. मी सध्या त्यांच्या गप्पांमध्ये झोकून दिलं.

अचानक फोन फुरफुरला. तो वाघमारे साहेबांचा होता. मी तो घेऊन गॅलरीत आलो. त्यांचा दणकट आणि उपरोधीक आवाज आला " काय मग डिटेक्टिव्ह उत्तम ? काय खबर ? " मी म्हणालो, " सर कसला डिटेक्टिव्ह ? आज ते दोघे एकत्र आले होते. पण ती त्याला नंतर भेटेन म्ह्णाली आणि तो फ्युनरलला येऊ नये असं तिने त्याला सांगितलं. यात काहीच खबर नसल्याने मी आपल्याला फोन केला नाही. " मग ते म्हणाले, " मि. उत्तम , यू आर डुइंग फाइन , असंच लक्ष ठेवा. तुम्ही सांगितलंत यात बरीच खबर आहे. तुम्ही जास्त डोकं चालवू नका. ते आम्ही चालवू. लक्षात ठेवा या केसमधले तुम्ही फार महत्त्वाचा दुवा आहात. " त्यांनी फोन ठेवला. मी कसला महत्त्वाचा दुवा माझ्या मनात आलं. मला थोडं टेन्शन आलं. मनाने सदिच्छेचा (?)सल्ला दिला, तू अडकू शकतोस.मी आतल्या हॉलमध्ये शिरल्यावर रिता म्हणाली, " हे असंच असतं. काय हो तुम्ही घरी आल्यावरच तुमच्या बॉसला कामाची आठवण जास्त होते का ? " त्याबरोबर माझा मेव्हणा आणि सासरे माझ्याकडे कौतुकाने पाहू लागले. आणि रिताला बरं वाटलं. आपला नवरा ऑफिसमध्ये साधारण नाही काही , तर फार महत्त्वाची व्यक्ती आहे, असा भाव तिच्या चेहऱ्यावर आला. पुढे सगळ्या रुटीन गोष्टी घडल्या. पण माझ्या माहिती मध्ये काय खबर वाटली मला कळेना. रात्र बरी गेली. रात्र बरी जाण्याची आमच्या प्रत्येकाची ( म्हणजे सासरे आणि मेहुणा सुद्धा) कारणं वेगळी होती. पुढचे दोन तीन दिवस

काहीच घडले नाही. मला अजुनही पोलिस स्टेशनमध्ये बोलावले नाही. थोडक्यात सगळेच झोपले होते. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. असे पुढे घडलेल्या घटनांवरून वाटले. ........एक दिवस अचानक नारायणचा फोन आला जेव्हा तो ऑफिसमधे नव्हता. तो फोन मी घेतला पलिकडचा माणूस आवाजावरून लहान असावा असे वाटले. " अरे नारायण साब ? फोन मत रखना. " मी उगाचंच मध्ये बोललो, " नारायण साब नही है, वो बाहर गया है. आप कौन है ? " तो म्हणाला, " प्रकाश.... " आणि त्याने फोन ठेवून दिला. मी केबीन बाहेर आलो. हा प्रकाश कोण ? नवीन दुवा की काय, की असाच कोणीतरी ? मला असला कोणी माणूस पाहिल्याचे आठवत नव्हते. ...... आज नारायण आणि प्रतिभा दोघेही एकत्रच व्हिजीटला गेले होते. त्यामुळे मला काहीच करता आले नाही. दुपारी साडेचार वाजता ते दोघे परत आले. प्रतिभा फाइली ठेवीत होती , नारायण केबीन मध्ये शिरणार एवढ्यात मी त्याला मुद्दाम सांगितले, " कोई प्रकाश नामके आदमीका आपके लिये फोन था. " मी बारकाईने प्रतिभाकडे पाहत होतो. नारायणने तिच्याकडे पाहत उत्तर दिले, " मै तो किसी प्रकाशको नही जानता. " पण प्रतिभाचा चेहरा बदलला होता. पण एखाद सेकंदासाठीच. मी नीट लक्ष ठेवून राहिलो नसतो तर मला तो बदल दिसला नसता. मी प्रकाश कोण ते शोधण्याचे ठरवले.

(क्रमशः)

🎭 Series Post

View all