प्रतिभा (भाग ७)

आत येऊन बसत तो म्हणाला....

आत येऊन बसत तो म्हणाला, " आजची रात्र तुझ्याकडे राहण्याचा विचार आहे. " प्रतिभाच्या चेहऱ्यावर नापसंतीची आठी पाहून तो म्हणाला, " तुझा चेहरा असा बारा वाजल्यासारखा काय दिसतोय? अगं आता तर खरोखरीचे बारा वाजून गेलेले आहेत" ती काहीच बोलली नाही. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्याचं म्हणणं खरं होतं. राजेशच्या आयुष्यात रजनी आल्यापासून तिच्या संसाराचे बारा वाजले होते. पण तिला तो विषय आता नको होता. तिला खरंतर आत्ता एकटीनं राहायचं होतं. म्हणजे काहीतरी मार्ग दिसला असता, ज्याने घाबरलेलं मन स्थिर झालं असतं. तिला आता आधार कोणाचाच नव्हता. आई केव्हाच गेली होती. बाप्पा काही वर्षांपूर्वी गेले होते, आणि आता राजेश. मनाने राजेशचं नाव मुद्दाम घुसडलं....... राजेशचा आधार? आता आपण त्याची विधवा होतो. आत्तापर्यंत तिने , म्हणजे राजेश पासून लांब राहायला लागल्या पासून, गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं होतं ते घटस्फोट झाला तरीही काढलं नव्हतं. आणि यापुढेही ती काढणार नव्हती. तिच्या दृष्टीने मंगळसूत्र म्हणजे एक प्रकारची दुसऱ्या पुरूषांपासून वाचवणारी ढाल होती. निदान ते पाहून तरी दुसरा पुरूष तिच्या मागे लागला नाही. बहुतेक जण विवाहित स्त्रीच्या पुरुषाला घाबरत असावेत. आपला सामना दुसऱ्या न पाहिलेल्या आणि न अजमावलेल्या पुरुषाशी कुणालाच आवडत नसावा. हे सगळे विखुरलेले विचार तिला सतावू लागले. तिने अहेतुकपणे प्रकाशकडे पाहिलं. हा का आलाय.......??? तिला तो बाप्पा गेल्यापासून नकोसा झाला होता. आपल्याला पाठचा भाऊ आहे या भावनेचं तिला केवढं कौतुक होतं. पण याने स्वतःच्या वर्तणुकीने सगळं घालवलं. बाप्पांना यानेच मारलं, असं तिला सारखं वाटायचं. तो त्यांचा छळ करीत होता अस बाप्पांच्या बोलण्यात एक दोन वेळाआल्याचं तिला आठवलं. ती त्याच्या प्रत्येक कृतीकडे गढूळ नजरेनेच पाहायची. आता जाण्याची शक्यता नव्हती आणि इतक्या रात्री त्याला जायला सांगणं माणुसकीला धरून झालं नसतं. नाइलाजाने ती म्हणाली, " तुला पाहिजे तर तू पलंगावर झोप. मला खालीच झोपायचंय. "


त्याने अंगातला शर्ट काढला. तो झोपण्याची तयारी करू लागला. अचानक त्याच्या खिशातून चाव्यांचा गुच्छ पडला. त्याने तो घाईघाईने उचलून खिशात घातला. का कोण जाणे हा चाव्यांचा गुच्छ तिला पाहिल्यासारखा वाटला. तिने विचारले, " अरे, या चाव्या कोणत्या? " ........ तो विचार करून बोलत असल्यासारखा तिला वाटला. वेळ घेऊन तो म्हणाला, " अग, आपल्या शेजारी चित्रा आंटी राहते ना तिनेच तर ठेवायला दिलाय. तिच्याच घराच्या चाव्या आहेत. " असं म्हंटलं पण त्याने त्या दाखवल्या नाही. चित्रा आंटीच्या चाव्या तो बरोबर घेऊन का फिरतोय, घरी ठेवायला पाहिजेत. पण तिने तसे काही विचारले नाही. तिने लाइट बंद केला. ती दमली होती. पण झोप लागेना. प्रकाश खोटं बोलत होता असा तिला पक्का संशय होता. शंख असलेली चावी, तिला आठवलं. अशी कीचेन राजेशच्या चाव्यांची होती. मग ती याच्याकडे कशी आली. चित्रा आंटी पण अशी कीचेन वापरू शकते, मनाने संशयात संशय निर्माण केला. तिचे समाधान होईना. तिला अचानक आठवलं. लग्न झाल्यावर ती आणि राजेश हनिमूनसाठी उत्तर भारतातल्या कोणत्यातरी हिल स्टेशनला गेले होते. तिथे तिने ती कीचेन राजेशला घ्यायला लावली होती. मग राजेशच बोलणं तिला आठवलं. तिला जवळ घेत म्हणाला होता, " कमाल असते बायकांची, काहीतरी महागडं गिफ्ट मागायचं सोडून असलं फालतू गिफ्ट घेतात. " ती म्हणाली होती, " तुला घ्यायचय की नाही..... " तिने फुरंगटल्याचा अभिनय केला होता. ते पाहून त्याने ती कीचेन घेतली होती. प्रसंग अगदीच फालतू होता. पण तो चावीचा गुच्छ घटस्फोट घेईपर्यंत तिच्याकडेच होता. तो गुच्छा तिच्याकडून त्याने तो कोर्टातून बाहेर पडताना मागून घेतला होता. पण अशा कीचेन्स खूप असतात. चित्रा आंटीने
असाच आणला असेल. तिचं डोकं आता गरगरायला लागलं. सकाळी बघू. उठल्यावर त्याच्याकडून घेऊ.

सकाळ झाली. प्रतिभा प्रकाशला काही विचारणार इतक्यात तिच्या लक्षात आले की त्याचा बिछाना रिकामा आहे. तिची नजर मुख्य दरवाज्याकडे गेली. तो अर्धवट उघडा होता. तिने प्रथम बाथरुम तपासले. तिथेही प्रकाश दिसला नाही. हा न सांगताच गेला की काय. तिला त्याचा संशय आला. आपली कीचेन त्याच्याकडे आहे यात काहीतरी गूढ असणार आणि आपण त्याला विचारू म्हणूनच तो गेला असावा. याचे असे लपवाछपवीचे धंदे लहानपणापासूनच होते. प्रथम प्रथम तिला त्याचा कळवळा यायचा, पण नंतर तो निर्ढावल्यासारखा झाला. त्याला एकदा शाळेत असतानाच पोलिसांनी अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ग्रुपमध्ये पकडला होता. बाप्पांची पोलिसात ओळख असल्याने थोडेफार पैसे देऊन त्याला सोडवून आणला होता. आणि त्या धक्क्याने आईने अंथरुण धरले होते. पुढे पुढे त्याच्या वेगवेगळ्या लीला दिसायला सुरुवात झाली आणि आईचं आजारपण वाढायला लागलं. तिचं लग्न व्हायच्या आतच आईने या जगाचा निरोप घेतला होता. राजेशलाही हे सगळं माहीत होतं. पण त्याने दुर्लक्ष केलं. अर्धवट शिक्षण झालेल्या प्रकाशने बाप्पांना दहशत दाखवून पैसे उकळण्याचा धंदाच चालू केला होता. पैसे दिल नाही तर तो तमाशा करायचा लोकांना गोळा करायचा, बाप्पांबद्दल वाट्टेल ते सांगायचा. पुढे पुढे बाप्पांच विरोधही कमी झाला. पण तेही काही वर्षातच गेले. नाही म्हणायला घटस्फोटाचा निर्णय घ्यायच्या आधीच ते गेले. तिला आता माहेरचे असं कोणीही नव्हतं की ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती तिच्या भावनांना वाट करून देऊ शकली असती. तिच्या मनाने तिची कींव करण्याची संधी सोडली नाही. ती वाहवत चालली आहे हे तिच्या लक्षात येताच तिने इतर कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले. तिला अचानक नारायणने पाठवलेल्या लेटअरची आठवण झाली. पण ते तर पोलिसांकडे होतं. त्यात तीन दिवसात कामावर गैरहजर असल्याचे कारण कळविण्यास सांगितले होते, नाहीतर तिच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी होती. कामावर गेले तर पोलिस तिथे गाठतील आणि निष्कारण ऑफिसमध्ये तमाशा होईल. त्यापेक्षा न जाता पत्राला उत्तर द्यावं आणि बोलावलं तर पोलिस स्टेशनला जाऊन यावं. खरंतर तिला दोन्हीकडे जाण्याची इच्छा नव्हती. अचानक बेल वाजल्याने ती दरवाज्या उघडायला गेली. दारात पोलिस हवालदार उभा होता. त्याने आत नजर फिरवीत म्हंटले, " मॅडम तुम्हाला बाघमारे साहेबांनी बोलावलंय. " तिला काय उत्तर द्यावं कळेना. ती पटकन म्हणाली, " पण मला तर ऑफिसला जायचंय. मी संध्याकाळी येईन . " मग अजिजीने तो म्हणाला, " मॅडम असं म्हनून कसं चालंल ? चौकशी पूर्ण होईपर्यंत हे असंच चालंल. " पाहिजे तर , स्टेशनला येऊन साहेबांच्या परवानगीनं हापिसात जावा " असं म्हणून तो तर गेला. तिला खरंतर आज कुठेच जायचं नव्हतं. तिने कसातरी नाश्ता बनवला. शुचीला उठवून तिच्या शाळेत जाण्याची तयारी केली. मग ऑफिसमध्ये उशिरा येत असल्याचं कळवण्यासाठी तिने फोन केला. नारायणने तिचा फोन उचलला नाही. तिने दोन चार वेळा प्रयत्न केला. तिला उत्तमशी बोलायचं नव्हतं. शेवटी तिने फोन न करण्याचे ठरवले. अचानक तिला नारायणचा फोन आला. तो पोलिस स्टेशनला आलेला होता. तिला त्याने तिकडे येण्यासाठी सांगितले होते. ती फोन बंद करून काय करायचं हे न ठरवता आल्याने ,अगतिकपणे बिछान्यावर बसली.तिच्या पायाला कोणती तरी वस्तू टोचल्याचं तिला जाणवलं. ती खाली वाकून वस्तू उचलायला गेली. ती तिची कीचेन होती. पण ......"फक्त कीचेन ."..... चाव्या नव्हत्या. हातात घेतलेल्या शंखाकडे ती निरखून पाहू लागली. तिला त्या शंखावर "पी " हे अक्षर रंगवल्याचे दिसले. म्हणजे हि तीच कीचेन आहे. चित्रा आंटिचा काहीही संबंध नाही. कीचेन काढून फेकण्यात प्रकाशचा काय हेतू असावा, तिला कळेना. राजेशच्या घराच्या चाव्या गेल्या कुठे ? पोलिसांना हे सांगायचं का ? एक नाही अनेक प्रश्न उभे राहिले. कोणत्या संदर्भात सांगायच ? आणि ही कीचेन आपल्याकडे कशी आली आणि प्रकाशकडे काय करीत होती ?

तिने ती कीचेन तशीच कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवली. आता ती पोलिस स्टेशनला जाण्यासाठी तयार होऊ लागली. ........

तासाभराने ती पोलिस स्टेशनला पोहोचली. वाघमारे साहेबांच्या समोरच्या खुर्चित नारायणन बसला होता. तो पाठमोरा असल्याने त्याच्या चेहऱ्यावरच्या भावना तिला दिसल्या नाहीत. प्रतिभा आल्याची खबर हवालदाराने त्यांना येऊन दिली होती. नारायणला ते ऐकू न येईल याची काळजी घेतली होती. आता नारायण जाम कंटाळला होता. तेच तेच प्रश्न , त्यांची तीच तीच उत्तरं आणि तेच तेच संशय यांनी त्याच्या डोक्याचा पार भुगा केला होता. प्रतिभा आत शिरली . तिला बसायची खूण करीत वाघमारे म्हणाले, "मॅडम , सध्या, ऑफिस वगैरे विसरा. आम्हाला जेवढ्या लवकर खुन्याचा माग लागेल तेवढ्या लवकर तुम्ही सुटाल. वाईट वाटेल तुम्हाला, पण तुम्ही आणि हा नारायण अजिबात सहकार्य करित नाही आहात. " तिने दगडाचा मुखवटा चढवल्याने ती नारायणकडे पाहत नव्हती. थोडावेळ जाऊन देऊन वाघमारे म्हणाले, " अरे जाधव जरा मॅडम आणि नारायण साठी चहा सांग , म्हणजे थिजलेली डोकी जरा नीट चालतील. तोपर्यंत हे दोघे आपल्याला काहीतरी लीड नक्कीच देतील. " तेवढ्यात नारायणने पाणी मागितले. वाघमारे साहेबांनी तिथलाच पाण्याचा ग्लास त्याला दाखवला. तो घेऊन पाणी पिऊन झाल्यावर ते म्हणाले, " मि. नारायण , क्रिमिनॉलोजीके मुताबिक जब सस्पेक्ट पानी पिता है ना तब वो सच को छिपाने की कोशिश करता है . बोलिये , इनका और आपका संबंध कितना पुराना है ? " ते जोरात ओरडले. मग मात्र नारायण वैतागून म्हणाला, " आपको कितनी बार कहां हमारा कोई संबंध नही है. ना हम एक दूसरेको पर्सनल लेव्हल पर पहचानते है. " ...... त्यावर वाघमारे म्हणाले, " काम डाऊन मि. नारायणन , ये पोलिस स्टेशन है , नीची आवाजमे बात कीजिये . जबतक आप दोनो सच नही बोलते तबतक आपको हम यहां बुलाते रहेंगे और आपके ऑफिसमे आके भी मिलेंगे. एक आदमीका मर्डर हुवा है मि. नारायणन. " मग ते प्रतिभाकडे वळून म्हणाले, " तर मॅडम आता आपण परत एकदा या घटनेकडे बघू. तुम्ही नेमक्या खून झाल्या झाल्या तिथे कशा पोहोचलात ? " तेवढ्यात हवालदार आत येऊन त्यांच्या कानाशी कुजबुजला . ते ऐकून ते म्हणाले, " मॅडम फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला आहे. खून पाच ते साडेपाचमध्ये झालेला आहे. तुम्ही आणि उत्तम सहा वाजता तिथे होतात. ....का ? आणि कसे ? .... " .....थोडं थांबून तिचा चेहरा निरखीत ते सावकाश विचारले, " कोणाचा तुम्हाला फोन आला होता का ? मोबाइल द्या तुमचा.......... ‌ सरळ सांगितलंत तर बरं होईल . तुम्ही उत्तमला तिकडे मुद्दाम बोलावलंत. तो तिकडे येणार आहे तेही तुम्हा दोघांना माहित होतं. तुमचं काम आयतंच झालं. " मग नारायण कडे वळून ते म्हणाले, " तुमने लेटर खुद क्यूं बनाया ? वो भी नये पतेपर ? और उत्तम को लेटर लेके पुराने पतेपर भेजा. .....एचारको क्यूं नही बनानेको बोला ? " नारायण कडे डोळे वटारून पाहत त्यांनी विचारलं . मध्येच चहा आला. तो त्यांनी घ्यायला सांगितला नाही. ........ मग ओरडून ते म्हणाले, " बोला, खरं काय आहे ? " नारायण म्हणाला, " देको साब जो मालुम था वो बता दिया. अभी आपको जो करना है वो करो. " असं म्हंटल्याबरोबर ते चिडले आणि त्यांनी हाक मारली, " जाधव याला आत घ्या, नारायण कडे पाहत ते म्हणाले, " आपको हमारी मेहमाननवाजी देखनी है ? अभी हम अपना तरीका अपनायेंगे. " असं म्हंटल्याबरोबर नारायण शहारला. कॉन्स्टे. जाधवने त्याला हाताला धरून उभा केला.

मग त्याने एकदा प्रतिभाकडे पाहिले. तिने कोणताही इशारा केला नाही. नरम आवाजात तो म्हणाला, " हम एक दुसरेको जानते है. ये मेरी क्लासमेट थी. " वाघमारे चिडले त्याच्याकडे येऊन त्यांनी त्याला एक कानफटात दिली आणि म्हणाले, " आमचा पेशन्स पाहतोस काय रे ए, कुत्र्या ? ..... आता लवकर लवकर सगळ ओक. " प्रतिभाचा चेहरा पडला होता. दगडी मुखवटा सरकला होता. तिचा चेहरा काळजीने काळवंडला होता. तरीही नारायण म्हणाला, " हम थे क्लासमेट . उससे क्या फरक पडता है ? " मग हलक्या आवाजात वाघमारे म्हणाले, " सिर्फ क्लासमेटस या और कुछ? हफ्ते हफ्तेमे जानकारी मत देना आगे बोलो. " ....... थोडं थांबून तो म्हणाला, " मैने तरस खाके इसे ये नौकरी दी. उसने डिवोर्सके बारेमे मुझे कहां था. और हमारा कोई संबंध नही था. " ....... मग थोडा वेळ थांबून ते प्रतिभाला म्हणाले, " कसं वाटतंय मॅडम हे सगळं ? " ती काहीच बोलली नाही. नारायणच्या लक्षात आलं की यांना अजून कोणताही पुरावा मिळालेला नाही. म्हणूनच हे वैतागलेले आहेत. यांना जास्त माहिती देण्यात अर्थ नाही. तो काही तरी विचार करित आहे असे पाहून इन्स्पे. म्हणाले, " क्या सोच रहे हो ? कुछ तो पकडके बैठे हो. हम ढुंढनेसे पहले बोलो , वरना तेरी ऐसी पिटाई करूंगा की जिंदगीभर याद रखोगे. " आज तुम जा सकते हो. फिर बुलाउंगा बो भी बार बार. निकलो........ " असं म्हंटल्यावर प्रतिभा पण उठली. ते पाहून इन्स्पे. म्हणाले, " अरे , तुम्ही कुठे चाललात ? तुम्हाला जायला सांगितलं नाही ......? तसा नारायण चांगला माणूस आहे नाही ? " ती काहीच बोलली नाही. ती बोलत नाही असं पाहून ते म्हणाले, " मॅडम तुम्ही डिवोर्स घेतल्यावर याच्याशी लग्न करणार होतात का ? रागावू नका पण एकेक इच्छा असते नाही का माणसाच्या मनात. त्यानी तुम्हाला तरस का काय ते खाऊन नोकरी पण दिली. याचाच अर्थ तुमचा त्याच्याशी नियमित संपर्क होता. ...... होता की नाही ? बोला मॅडम . लवकर लवकर बोला. तुमच्या मिस्तरांचा " खू........ न " झालाय मॅडम. सीरियसली घ्या. " तरीही ती काहीच बोलली नाही. तिचा दगडी लुक परत आला. काही वेळ जाऊन देऊन ते म्हणाले, " ठीक आहे , निघा. बहुतेक तुम्हाला घरी चौकशी केलेली आवडत असावी. बघू या काय जमतंय ते. " ........ ती जरा वेळ रेंगाळली. पण उठत म्हणाली, " हे पाहा मी माझ्या मिस्टरांचा खून केलेला नाही आहे. . " काय माहीत ? अशा अर्थी हात करीत वाघमारेंनी तिला जाण्याची खूण केली. ती गेल्यावर त्यांनी जाधवला बोलावून या दोघांवर लक्ष ठेवण्यास सांगितले.


************** ********************* ********************* *********************** ******************* **************

मी लवकरच ऑफिसमध्ये पोहोचलो. मला वाटलं लेटर पाहून प्रतिभा नक्कीच येईल. पण ती आली नाही. प्रतिभा आणि नारायण यांचा ब्रॅकेट असलाच पाहिजे, नाहीतर ते एकत्र जेवायला कसे आले. आज मला एकट्यालाच मिटींगची खिंड लढवायची होती. कदाचित नारायणनिच तिला येऊ नकोस म्हणून सांगितलं असलं पाहिजे. आत्तापर्यंत पेपरातल्या बातमीमुळे कंपनीमध्ये प्रतिभाच्या नवऱ्याचा खून झाल्याची बातमी पसरली होती. अजून तरी जंबोसिंगने कारवाई केली नव्हती. केली असली तरी मला कळणं कठीण होतं. ते व्यवस्थापन ठरवणार . मी जास्त ताप न करून घेता मिटींगला निघालो. प्रेझेंटेशन खूप चांगलं दिलंही. पण कस्टमरचा मॅनेजर बिजलानिला ते पटत नव्हतं असं दिसलं. तो सारखा कॉस्ट कटिंग करो असं म्हणत राहिला. मग मात्र मी नारायण कडे बोट दाखवलं आणि गप्प बसलो. दोन अडीच वाजता मिटिंग संपली. जेवून जेमतेम जागेवर बसतोय तोच फोन वाजला. मला वाटलं, नारायण असणार , पण ते होते इन्स्पे. वाघमारे.
मी घाबरलो. त्यांनी पाच वाजता मला बोलावले होते. मला हलकासा घाम फुटला. मी त्यांना काय सांगायचं आणि किती सांगायचं याचा विचार करायचा सोडून जे काही आहे ते खरं खरं सांगायचं हे ठरवलं. अगदी नारायण आणि प्रतिभाची भेटसुद्धा. तेवढ्यात नारायण आला. आल्या आल्या त्याने मला केबीन मध्ये बोलावलं. तो थोडा काळवंडलेला दिसला. पोलिसांनी त्याला त्रास दिला असावा. आत गेल्यावर त्याने प्रथम मिटिंगची माहिती घेतली. बिजलानी बद्दल मी त्याला सांगितलं. त्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता ऐकून घेतलं. आणि अचानक तो मला म्हणाला, " देको पुलिस बुलायेगी तो ज्यादा इंफॉर्मेशन मत देना. सब कुत्ते लोग है. " मग मी त्याला मला आज बोलवले असल्याचे सांगितले. तो
म्हणाला, " तुमको समन्स भेजा है क्या ? " मी नाही म्हंटले, त्यावर तो म्हणाला, " तो , मत जाना. " मी केबीन बाहेर आलो. प्रतिभाच्या टेबलापाशी परवाचाच हवालदार बसला होता. ते ओळखीचे हसू हसले. आणि म्हणाले, " सायबान तुमका बलवल्यानी. हे घ्या समन. " त्याने ते दिले आणि माझी सही घेतली . तो पुढे म्हणाला, " खरंतर तुमास्नी घेऊन यायला सांगितलंन. पन , एक तासाभरात आलास तरी चालंल . " असे म्हणून तो उठला. मी पुन्हा नारायण कडे गेलो. त्याला समन्स दाखवले . अजून जायला तासभर तरी होता. मी तसा विचलित झालो होतो. मी कधीच पोलिस स्टेशनला गेलो नसल्याने थोडा ताण होताच. एखाद्या सिरियलमध्ये पोलिस स्टेशन मधले व्यवहार पाहणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथे जाणं वेगळं. नुसते बसून मला कंटाळा आला होता. तेवढ्यात फोन वाजला. तो रिताचा होता. ती लवकर या म्हणजे आपल्याला पिक्चरला जाता येईल असे म्हणाली. मी अर्थातच नाही म्हंटलं . तिने नेहमीप्रमाणे मी किती अरसिक आहे ते सांगितलं. तिला काय माहित माझ्या आयुष्याचा आता पिक्चर चालू होणार होता ते. इतका मी घाबरलो होतो. ......... ‌शेवटी एकदाचा मी निघालो.

(क्र म शः )

🎭 Series Post

View all