प्रतिभा (भाग ६)

आतले आवाज न थांबल्याने........

आतले आवाज न संपल्याने माझेही कामात लक्ष लागेना. काहीतरी करायचे म्हणून मी क्लायंट लिस्ट वाचायला घेतली. पण माझे सगळे लक्ष केबीन मधल्या आवाजांकडे होते. मला थोडी ही पण भीती होती, की मला आत बोलावले तर काय करायचे. तेवढ्यात माझ्या खांद्यावर हात पडला. मी गर्रकन वळून मागे पाहिले. एक हवालदार माझ्याकडे पाहत होते. ते माझ्या जवळच्याच खुर्चीवर बसले. मला म्हणाले, " काय नाव तुमचं? . " मी संशयाने त्यांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, " अहो घाबरता काय? मी काय तुम्हाला पकडून नेतोय का? " माझ्या चेहऱ्यावरचे तणावाचे भाव थोडे कमी झाले असावेत. मी माझं नाव सांगितलं. त्यावर ते म्हणाले, " उत्तम साहेब, आपण मराठी माणसं, नाकासमोर चालणारी. आपण गुन्हे बिन्हे काही करीत नाही हो. " माझ्या छातीतला तणाव कमी झाला आणि प्रथमच रोखलेला श्वास बाहेर पडला....... माझ्या चेहऱ्याचे जवळून निरिक्षण करीत त्यांनी विचारले, " या प्रतिभा ताई कुठे बसतात? " मी पटकन उत्तर दिले, " तुम्ही बसलाय त्याच खुर्चीवर. "........ त्यांनी हातातली तंबाखू तोंडात टाकली. माझ्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा पाहून ते म्हणाले, " अहो असं काय करताय , मी आपलं सहज विचारलं . " ते थोडावेळ थांबले आणि म्हणाले, " न्हाई म्हनजे , काल प्रतिभा ताईंनी तुमचं बी नाव घेतल ना . " मला आतून धक्का बसलाच होता. तोंडाला कोरड पडली. तरीही मी अगदी सहजपणा दाखवीत म्हणालो, " माझं नाव ? " . हवालदार म्हणाले, " अहो कशापायी इतकं घाबरता ? आं ? काल साहेबांनी बरोबर काम करनाऱ्यांची नावं विचारली ना ." मग हवालदार साहेब इकडे तिकडे नजर फिरवीत राहिले. आणि मग अचानक म्हणाले, " काल तुमी तिकडं गेल्ता काय ? " ........... " " तिकडं , म्हणजे कुठं ? " .......... मला काही सुचेना, आता हा आणखी काय विचारतो कुणास ठाऊक. प्रतिभाने आणखीन काय काय सांगितलय कोण जाणे. माझी अस्वस्था पाहून हवालदार म्हणाले, " चला जाऊ द्या. अहो मी सहजच विचारलं. " मग माझ्या खांद्यावर हात ठेवित म्हणाले, " अहो किती टेन्शन घेता साहेब ? " असं म्हणून ते इकडे तिकडे पाहत राहिले. या सवाल जवाबातून सुटका व्हावी म्हणून मी जागेवरून उठलो. ते त्यांच्या लक्षात आलं असावं, त्यांनी विचारलं. " कुठं निघालात , साहेबाकडं ? " मी नाही म्हंटले आणि मला वॉशरुंमला जायचं असल्याचं सांगितलं. मी पटकन वॉशरूमकडे निघालो.

खरंतर मला वॉशरुममध्ये काहीच काम नव्हतं. मी आत शिरलो. उघाचंच एक दोन नळ सोडले. तोंडावर पाण्याचे हबके मारले. रुमालाने तोंड पुसले. आणि वॉशरूमचं डोअर किलं किलं करून पाहिलं. हवालदार गेला का? पण मला तो तिथेच बसलेला दिसला. तो माझ्या टेबलाकडे पाहत होता. मी तोंड पुशीतच माझ्या जागेवर येऊन बसलो. मी मुद्दामच काल काय झालं या बद्दल त्याला विचारलं नाही. रुमाल घडी घालून खिशात ठेवणार एवढ्यात नारायणच्या केबिनचं दार उघडून इन्स्पेक्टर साहेब बाहेर आले. हवालदाराने उठून अदबीने सलाम ठोकला. त्यांनी बाहेर पडण्याची खूण त्याला केली. ते दोघे बाहेर गेले. आणि साधारण पंधरा वीस मिनिटांनंतर नारायणने केबीन मध्ये बोलावले. मी बसल्यावर नारायण म्हणाला, " ये पुलिस लोग भी, हमेशा डाउट करता है. इनका बस चले तो अपने फादर पर भी डाउट करेगा. " तो काय काय सांगतो ते ऐकायचं ठरवल्याने मी काहीच बोललो नाही. तो पुढे म्हणाला, " मेरेको क्या पूछा उसने मालूम है, ये

, मर्डर आपने उत्तम के जरिये किया है और आपके प्रतिबाके साथ संबंध है. मेरेको एक बात बताओ उत्तम तुमने प्रतिबाके पुराने आड्रेस पर जाकर ये लेटर दिया, तब प्रतिबाका हसबंड का मर्डर हुवा था ? " .......... आता माझी ट्युब पेटली. मी काहीच उत्तर देत नाही असे पाहून तो ओरडला. " उत्तम , सच क्या है बता दो . " ....... मी विचार करून मान होकारार्थी हालवली. ते पाहून तो म्हणाला, " सिर्फ मुंडी मत हिलाना. ये तुमने मुझे , फोन पर क्यू नही बताया ? कही तुम्हारा और प्रतिबाका चक्कर तो नही चल राहा है. ? " आता मात्र मी ओरडलो. " नही. जब मै गया तो उसके हसबंडका मर्डर हो चुका था, और वो वहां नही थी. वो अचानक वहां आ धमकी. जल्दबाजीमे मैने उसको आपका सील्ड एन्व्हलप दे दिया और मै भाग आया. "......... थोडा विचार करून तो म्हणाला, " द्येको, उत्तम मेरेको कल पुलिस स्टेशन बुलाया है, शायद वो तुमको भी वुला सकता है. टीक है, अब तुम जाओ. कलका मिटिंग तुम एटेंड करो., ये लो फाइल, स्टडी. मै आनेतक तुम और प्रतिबा आयी तो उसके साथ मिटींग संमालना. " असं म्हणून त्याने मला एक फाइल दिली. मी बाहेर आलो. म्हणजे मी गेलो होतो हे त्या हवालदाराला माहित होतं. याचाच अर्थ प्रतिभाने पोलिसांना लेटर दिलं होतं. आणि माझ्याबद्दलही सांगितलं होतं. पाच वाजून गेले होते. मी अर्धा तास कसातरी काढला. आणि नारायणला सांगून निघालो. तो थोडा वैतागला. त्याने जाताना मला दिलेली फाइल घरी घेऊन जायला सांगितलं. आणि मी लवकर जाण्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

मी मनामध्ये बरीच आंदोलनं घेऊन घरी पोहोचलो. रिता कुठेतरी जाण्याच्या तयारीत होती. मला लवकर आलेला पाहून ती म्हणाली, " आज, आपण बाहेर जाऊ या जेवायला. मला आज घरी करण्याच कंटाळा आलाय. " मी विचार केला. आपलंही डोक अस्थिर आहे. काय हरकत आहे जायला. तास दीड तासाने निघण्याचं मी ठरवलं. ती खूश झाली. फाइल रात्री बसून वाचता येईल असं
ठरवून मी तयार झालो. कुठे जायचं असं रिताला विचारल्यावर ती म्हणाली, " आपण चँग वँगला जाऊ या. मला चायनीज खायचंय. " मला चायनीज फारसं आवडत नसलं तरी मी हो म्हणालो. मग लवकरच टॅक्सी पकडून आम्ही साडे आठच्या सुमारास चँग वँगला पोहोचलो. हे एक जुहू चौपाटी वरचं मिडियम साइझचे रेस्टॉरंट होतं. चौपाटी रंगी बेरंगी दिव्यांनी चमकत होती. असली चायनीज हॉटेलं तिथे बरीच होती. रस्त्यात असताना रिताची उत्साही बडबड चालू होती. जणू काही ती प्रथमच हॉटेलमध्ये जेवायला जात होती. पण मी तिला नाराज न करण्याचं ठरवलं होतं. माझ्या मनात पोलिसांसारखा विचार चालू होता. खरंच प्रतिभा आणि नारायण यांचे संबंध असतील का? मी विचित्र जोडी एकत्र आणण्याचा प्रयत्न करित होतो. मन सारखं ही आयडिया धुडकावून लावीत होतं. मी विचार केला प्रतिभासारख्या दगडी चेहऱ्याच्या स्त्री बरोबर प्रेमसंबंध कोण ठेवणार? ..... का तू ठेवणार नाहीस? माझ्या मनाने टोचायला सुरुवात केली. त्याला प्रतिसाद द्यावा लागू नये म्हणून मी समोरच्या लोकांनी फुललेल्या बीचकडे पाहिलं. वेगवेगळी आकर्षक जोडपी इकडे तिकडे फिरत होती. कोणी कोपरा पकडून " चुकचुकाट " करीत बसले होते.

मी तिकडे पाहतोय असं पाहून रिताने मला ओढले आणि म्हणाली, " यासाठी आलोय का आपण ? " मी चेष्टेच्या सुरात म्हंटले, " काय हरकत आहे? अजून आपण म्हातारे नाही झालो. " मागून कुणाचा तरी धक्का लागल्याने मी चिडून पाहिले. एक म्हातारा एका तरूण युवतीच्या कमरेत हात घालून समुद्राकडे धावत होता. रिता काहीच बोलली नाही. पण "जनाची नाहीतरी मनाची ठेवा " असं मला ऐकू येईल इतपत पुटपुटली. ती असं का म्हणाली मला कळलं नाही. पण उगाच मूड खराब व्हायला नको, म्ह्णून मी रेस्टॉरंटमध्ये तिला घेऊन शिरलो. चिनी (तो चिनी असण्यापेक्षा नेपाळी जास्त वाटत होता. मुंबईचा काही भरवसा नाही इथे काहीही सापडेल. ) वेटर आदबीने पुढे आला. कमरेत वाकत त्याने विचारले, " शाब अंदर बैठेगे या बाहर लगवा दूं टेबल? " समुद्रावरून येणारा वारा पाहून रिता म्हणाली " बाहरही लगाव. "..... त्याने बसण्याची व्यवस्था करी पर्यंत मी सहज म्हणून रेस्टॉरंटच्या आतल्या भागावर नजर टाकली. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. .....आतल्या एका टेबलापाशी नारायण आणि प्रतिभा बसले होते. ..... मला मनाने अर्धवट सोडलेला प्रश्न नव्याने विचारला. अर्थातच मी उत्तर न देता त्यांच्याकडे पाहत उभा राहिलो. नारायण मला पाठमोरा होता. पण प्रतिभा मात्र नीट दिसत होती............ मला आश्चर्य आणि राग या दोन्ही भावना एकदम जाणवल्या. या बाईच्या नवऱ्याचा खून कालच झालाय आणि आज ही प्रियकराबरोबर हॉटेल मध्ये? मी नारायणचं नामकरण केलं. दगडी मुखवटा चढवणारी प्रतिभा इतकी पुढे गेलेली असेल असे मला वाटले नाही. मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना रेडहँड पकडण्याच्या विचारात होतो. तेवढ्यात रिताने हाक मारली. मला मागे येणं भाग पडलं. परत वेटर आला. मी ऑर्डर देण्याचा विचार करू लागलो, पण माझं त्यात लक्ष नव्हतं. त्या दोघांचा माग आता मला सोडावासा वाटत नव्हता. रिता आणि माझा मोठा मुलगा( वय वर्ष आठ ) चिकन टिक्क्याचा आग्रह धरू लागले. आणि इतर चायनीज स्टार्टर्स मागू लागले. मग धाकटा मुलगाही मागे कसा राहणार? साहेबांना पापलेट हवा होता. ऑर्डर तर दिली. मेन कोर्सचं मग बघू असं सांगितलं. मी उठलो आणि वेटरला बाजूला घेऊन प्रतिभा बसलेलं टेबल दाखवलं आणि तो निघाले की मला सांगण्यास सांगितले. तो म्हणाला, " शाब, ऐसा काम हम नही करता ये अच्छा नही है " त्याला शंभराची नोट दाखवून मी म्हंटले, " अब करेगा ना? ...... " तरीही तो नाही म्हणाल्यावर मी आणखी एक नोट काढली. आणि त्याला दाखवली. तो हो म्हणाला. मग मी त्याला सांगितले, " वो आदमीने गाडी लाया होगा, उसका नंबरभी मुझे चाहिये " त्यावर घाबरून तो म्हणाला " शाब आप है कौन? " मी उत्तरादाखल त्याला म्हंटले, " ठिक है, लगता है तुम्हे पैसेकी जरुरत नही. " मी पैसे परत मागितले. त्यावर तो म्हणाला, " ठीक है शाब करेगा " त्याने पैसे खिशात घातले आणि तो गेला. रिताने मला विचारले, " ऑर्डर बदलली नाहीत ना? असलं काही करू नका. कितीतरी दिवसात आपण बाहेर आलो नाही. " ऑर्डरला वेळ लागेल असे समजून मी प्रतिभाकडे पाहत राहिलो. तिथे दुसऱ्या एका वेटरने ऑर्डर घेतली . जरी ते हॉटेलमध्ये बसले होते तरी प्रतिभाचा चेहरा ओढलेला वाटला. ह्या दोघांनी मिळूनच नवऱ्याचा खून केला असला तर ? मला ही आयडिया आवडली. मला आता इन्स्पेक्टर वाघमाऱ्यांची कल्पना पटली. नारायणचे आणि प्रतिभाचे संबंध असणार हे त्यांनी बरोबर ताडले होते. शेवटी ते पोलीस होते. त्यांना अनुभव होता. पण इथे काय मोटीव्ह होता कोण जाणे . शोधण्याचं काम पोलिसांचं होतं. मला मनाच्या कोपऱ्यात प्रतिभा कुठे तरी अडकावी असं वाटत होतं. कारण तिने मला पाहिजे तसा रेस्पॉन्स दिला नव्हता. खरंतर तिने मला रेस्पॉन्स द्यायलाच पाहिजे ही माझी अपेक्षा चुकीची होती. पण सध्या मला हे पटलं होतं.

आता आम्हाला हॉटेलमधे येऊन अर्धा पाऊण तास झाला होता. आमचा मेन कोर्स चालू झाला. मी सारखा प्रतिभाकडे पाहत होतो. ते काहीतरी खात असावेत. मला त्यात अजिबात रस नव्हता. ते काय बोलत होते हे मला कळत नव्हते. मी नारायणच्या गाडीचा नंबर घेऊन काय करणार होतो , कोण जाणे. कदाचित पोलिसांना त्यांचं आजचं येणं सांगितल तर उपयोगी पडेल असं मला वाटलं. ते दोघेही उठले . त्यांनी बिल वेटरकडे दिलं असावं. माझा वेटर अचानक दिसेनासा झाला. मला त्याचा राग आला. एवढं सांगूनही त्याने त्यांचा माग घालवला. ते गेल्यावर आम्ही अर्ध्या तासाने म्हणजे दहा वाजायला आले असताना उठलो. माझा वेटर आता अवतीर्ण झाला होता. तो बिल घेऊन आला . मी त्याला नजरेनेच विचारले .त्याने रिताला ऐकू जाणार नाही अश्या बेताने " बिल के पीछे देखो " असा संदेश दिला. मी बिलाची मागची बाजू पाहिली. त्यावर नारायणच्या गाडीचा नंबर होता. मी बिलामागे पाहतोय , हे रिताच्या लक्षात येऊन ती म्हणाली, " बिलामागे काय पाहताय " असं म्हणून तिने माझ्या हातातून बिल घेतले. मला आवडले नाही. मग ती म्हणाली, " कोणाच्या तरी गाडीचा नंबर दिसतोय. तिने ते बिल चुरगळून टाकून दिले. मला राग आला. पण मी ती उठून पुढे गेल्यावर ते उचलले आणि निघालो. तिच्या लक्षात आले नाही. आम्ही रात्री आइस्क्रीम वगैरे खाऊन घरी पोहोचे पर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते. रिताने झोपायची घाई केली. पण मी आणलेली फाइल घेऊन बसलो. ती वैतागून म्हणाली, " घरी कसली कामं करता हो. " तिला आता मी जवळ हवा होतो. पण मी प्रतिसाद न देता तसाच बसून राहिलो. ती लवकरच निद्राधीन झाली.


*************** ******************** ************************* *************************** ********************* ************************

रात्रीचे दहा वाजत आले होते. प्रतिभा इन्स्पे. वाघमारे साहेबांच्या समोरच्या खुर्चीत बसली होती. वाघमारेंनी विचारले, " बोला मिसेस राजवाडे , मिस्टरांच्या मर्डरला कोण कारणीभुत आहे ? तुमचा कोणावर संशय आहे ? " हा प्रश्न त्यांनी आल्यापासून पाच सहा वेळेला तरी विचारून झाला होता. पण प्रतिभाचं एकच म्हणणं होतं. आमचा घटस्फोट झालेला आहे . मला काहीही माहिती नाही. शेवटी त्यांनी एकच प्रश्न विचारला, " यांचा खून संध्याकाळी पाच ते सहामध्ये झाला असावा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. अजून वैद्यकीय अहवाल यायचा बाकी आहे. त्या वेळात तुम्ही कुठे होतात ? " आणि खून झाल्यावर अचानक तुम्ही तिथे कशा पोहोचलात. की खुन्याचा तुम्हाला फोन आला होता ?.......... "मी माझ्या घरीच होते. "प्रतिभा थोडक्यात म्हणाली. तिच्या लक्षात आलं इथे जास्त बोलणं म्हणजे निष्कारण अडकणं आहे. थोडावेळ वाट पाहून इन्स्पे. म्हणाले, " हे पाहा मॅडम, तुम्ही जेवढे तपशीलवार सांगाल तेवढं आम्हाला खुनी शोधणं सोपं पडेल. उगाच माहिती लपवू नका. आणि तुमच्या पर्समध्ये इतके पैसे तुम्ही का आणले होते. एक लक्षात ठेवा नवऱ्याचा खून झाला तर आमचा पहिला शक त्याच्या पत्नीवर जातो. ". ...... मग तिने ती राजेश पैशासाठी, घटस्फोट झाला असला तरी , कसा त्रास देत असे आणि आज मी त्याला अखेरची रक्कम द्यायला आले होते असे सांगितले. त्यावर इन्स्पे. म्हणाले, " त्यांच्या आणि तुमच्या चर्चेतून काही निष्पन्न होईना म्हणून तुम्ही त्यांना मारून टाकलत ? कोणाच्या मदतीनी केलंत हे सगळं ? बोला मॅडम लवकर बोला. " त्यावर ती तापून म्हणाली, " खरं आहे ते मी तुम्हाला सांगून टाकलेलं आहे. माझा कोणाशीही संबंध नाही आणि मी कोणाच्याही मदतीनी त्यांचा खून केलेला नाही. " ....... "म्हणजे तुम्ही स्वतःच केलाय असं म्हणायचंय का तुम्हाला ? " त्यानी खंवचटपणे विचारले. मग मात्र वैतागून ती म्हणाली, " मला यावर काहीच बोलायचं नाही. तुम्ही कितिही वेळा जरी विचारलंत तरी माझं उत्तर एकच आहे. पाहिजे तर घटस्फोटाची डिक्री तुम्हाला आणून देईन. माझा नवरा मला त्रास देत होता. पण त्याला मारण्याचा मी कधीच विचार केला नाही. विश्वास ठेवा की नका ठेवू. " ........." डिक्रीची कॉपी लागेलच. वैद्यकिय अहवाल आला की खून केव्हा झाला हे जास्त स्पष्ट होईल. आणि हे एक , तुम्हाला उत्तमने लेटर दिले ते तुमच्या नव्या पत्त्यावरचे होते, मग या पत्त्यावर येऊन त्याने हे लेटर तुम्हाला का दिलं ? का त्याला आधीच बोलावून ठेवलं होततं. ? त्याचे आणि तुमचे काय संबंध होते. ? विचार करून ठेवा मिसेस प्रतिभा राजवाडे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला लागणार आहेत. " आत्ता निघू शकता तुम्ही मी जास्त वेळ थांबवणार नाही, पण परत बोलावीन. आणि आमच्या परवानगी शिवाय या शहरातून बाहेर जायचा प्रयत्न करू नका. पासपोर्ट असेलच , तोही घेऊन या. " ती उठली. जाण्यासाठी दाराकडे वळली. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणाले, " मि. नारायण तुमचे बॉस घरी येत असत्तील ना ? " तिच्या अंगार फुललेल्या डोळ्यांकडे पाहत मवाळ पणे ते म्हणाले, " सॉरी, पण माझा एक अंदाज. " ती निघाली.
लेडी कॉन्स्टेबलने शुचीला आणून दिलि. त्या दोघी निघाल्या. रात्री बारा साडेबाराला ती घरी पोहोचली. कपडे बदलून ती झोपण्याची तयारी करीत असताना , दरवाज्याची बेल वाजली. इतक्या रात्री कोण असणार ? असा भीतीदायक विचार करीत ती दार उघडायला गेली. दारात भुस्कारलेल्या केसांचा प्रकाश उभा होता. प्रकाश तिचा सख्खा भाऊ. ........... हा आत्ता कशाला आला असावा याचं तिला आश्चर्य वाटलं
आत पाय ठेवित प्रकाश म्हणाला, " ताई किती घाबरतेस ? "

(क्र म शः )

🎭 Series Post

View all