प्रतिभा (भाग ४)

आज रात्री पुन्हा घरी जायला उशीर झाला होता......

आज पुन्हा मला रात्री घरी जायला उशिर झाला होता . तरीही साडेनऊच झालेले असल्याने मी रिताला म्हंटले, " चल , आपण जेवायला बाहेर जाऊ. " पण ती तयार झाली नाही. थोडी रागातच ,केलेल्या जेवणाकडे बोट दाखवीत ती म्हणाली, " मग याचं काय करू ". माझ्याजवळ उत्तर नव्हतं. न बोलताच जेवणं झाली. साडेदहा अकराच्या सुमारास अंथरूणं घालून ती माझ्या जवळ लवंडली. अर्थातच माझ्याकडे पाठ करून . माझ्या ते लक्षात आलं. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करू लागलो. पण तिने माझा हात बाजूला करून ती म्हणाली, " बस, आता झोपू द्या. मुलांनीही खूप वाट पाहिली. निदान त्यांचा तरी विचार करायचा होतात. नव्हतं बाहेर जायचं तर नसती वचनं देताच कशाला ? " मी फक्त सॉरी म्हंटलं. मला झोप लागेना. आजचा दिवस मात्र सार्थकी लागला होता. प्रतिभा कुठे राहते ते कळलं होतं. रितालाही झोप येत नसावी. ती सारखी चुळबुळ करीत होती. शेवटी येत्या रविवारी नक्की बाहेर जायचं आणि तेही सकाळपासून असं ठरल्यावर ती मला बिलगून झोपली. मला आता कुठे या प्रतिभा प्रकरणात थोडी प्रगती झाल्यासारखी वाटू लागली . दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो. बहुतेक प्रतिभा आजही मला झापेल की काय असा विचार माझ्या मनात आला. मी घाबरतच आत शिरलो. पण प्रतिभा आलीच नव्हती. नारायणने मला विचारले, पण मी मला माहित नसल्याचे सांगून बाहेर आलो. त्याला तिचा फोनही आला नसावा. असे दोन तीन दिवस गेले. मला एचआर डिपार्टमेंटने बोलवले. तिथे जंबोसिंग नावाचा रिजनल हेड होता. त्याने मला बोलावले. त्याने मला काही माहिती मिळते का ते पाहण्यासाठी बोलावले. पण मी परत कानावर हात ठेवले. मला माहिती अशी नव्हतीच. मी जागेवर परत आलो. संध्याकाळच्या सुमारास मला नारायणने मला बोलावले. " देको, अगर प्रतिभा कलभी नही आयेगी तो एक लेटर देता हूं वो उसको देके आना. एचाअर से उसका पता ले लेना.  " मला जरा बरं वाटलं. आता कसं अगदी आधिकृत रित्या प्रतिभाच्या घरी जायला मिळणार होतं.
दुसऱ्या दिवशीही मी उत्साहात ऑफिसात पोहोचलो. प्रतिभा न आल्याने मला बरं वाटलं. मला नारायण बोलावणार हे नक्की होतं. पण त्याने मला संध्याकाळ झाली तरी बोलावले नाही. माझी निराशा होते की काय असे मला वाटले. पण सहा वाजता मला नारायणने बोलावले. "देको, कल तक प्रतिबा की राह देकेंगे, फिर तुम लेटर ले जाना. लेकीन एचाअर मे जाकर उसका आड्रेस आजही पता कर लेना. " मी हो म्हंटले. पण फारसं बरं वाटलं नाही. तरीही मी उत्साहाने जंबोसिंगला जाऊन भेटलो. सरदारजी मला ओळखत होता. ओळखीचं हसू हसून तो म्हणाला, " क्या बात है उत्तम , तुम तो यहां का रास्ताही भूल गया. " त्याचं म्हणणं बरोबर होतं. सुरुवातीच्या काळात म्हणजे पाचसहा वर्षांपूर्वी स्टाफ कमी होता तेव्हा तो अधून मधून भेटायचा. मग मी त्याला प्रतिभाचा पत्ता विचारला. त्यावर त्याने त्याचा सहकारी निशांतला प्रतिभाची फाइल घेऊन बोलावले. तो पर्यंत तो म्हणाला, " ये नारायण , खुद क्यूं हँडल कर राहा है, ये तो हमारा काम है. " तेवढ्यात आलेली फाइल उघडून प्रतिभाचा पत्ता असलेले पान काढून माझ्यापुढे धरीत म्हणाला, " लिख लो. " त्याने मला फाइल हातात दिली नाही. कदाचित मी फाइल चाळून पाहीन असं वाटल्याने असेल. पण मी पत्ता पाहिला आणि मला धक्काच बसला. तिचा पत्ता सोनार गल्लीतला होता. म्हणजे मला सापडलेला पत्ता कंपनीला तिने अजून कळवला नसावा. याचाच अर्थ तिचं वेगळं राहणं मागील काही महिन्यातच झालं असावं. मी तिथून निघालो. आणि घरी जाताना विचार केला. तिने पत्ता का कळवला नव्हता. खरंतर आता माझ्या दुष्ट मनाला उकळ्या फुटत होत्या. पत्ता न कळवल्याबद्दल कंपनी तिच्याविरुद्ध काही कारवाई नक्की करील. .....मला आता दोन्ही घरी हक्काने जाता येईल. पण कागदोपत्री तिचा नवीन पत्ता कंपनीकडे नसताना मी तिथे जाऊन तिला लेटर देणं., कितपत योग्य होतं हे मला कळत नव्हतं. मी काही पोलिस अधिकारी अथवा सरकारी नोकर नव्हतो. ....अधिकृत पत्त्यावर जाऊन तिच्या नवऱ्याला भेटता येईल त्याच्याशी बोलता येईल . फोन करणारा तोच आहे का तेही कळेल. पण तिचे पत्र मला त्याच्याकडे देता येणार नाही. मग मला तिच्या नव्या घरी जाता येईल आणी तिला ते पत्र देता येईल. म्हणजेच मला तिच्या बऱ्याच गोष्टी जवळून पाहता येतील. म्हणजे तिची एकूण परिस्थिती वगैरे(या वगैरे मध्ये बरंच काही येतं) . माझी मनस्थिती अशी असली तरी मला कधीही असं वाटलं नाही की मी इतका रस तिच्या आयुष्यात का घेत होतो ते पाहावं. इतका मी झपाटला गेलो होतो. एकदा एखादी स्त्री एकटी आहे म्हंटलं की आजूबाजूचे लोक (म्हणजे पुरूष ) तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात हेच खरं. पण अजूनही एक गोष्ट मी विसरत होतो की तिच्या गळ्यात नवऱ्याच्या नावाचं मंगळसुत्र होतं. याचा अर्थ मला लागत नव्हता.
मी घरी गेलो . रिता अजुनही थोडी गुश्श्यात होती. म्हणजे बोलत होती, पण अगदी जुजबी. आता रविवारचा तोडगा केल्याशिवाय काही खरं नाही(म्हणजे बाहेर जेवायला जाणं वगैरे) . मीही काही खास बोललो नाही. आज मला प्रतिभाकडे जाण्यात तेवढा रस वाटत नव्हता. पण माझ्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं असावं. सकाळी ऑफिसमध्ये गेल्या गेल्या मला नारायणने बोलावले. त्याने एक सीलबंद लखोटा मला दिला. याचा अर्थ ते पत्र गोपनीय होतं. मी ते उघडून पाहण्याची अपेक्षा नव्हती.

"देको, आज दोपर तक वो आ सकती है. आयेगी तो लेटर मेरेको वापिस करना " असं म्हणून तो कामाला लागला. मी बाहेर आलो. आज कामात माझं लक्ष जेमतेम लागलं. वेळही मुंगीच्या पावलाने सरकत होता . शेवटी एकदाचे साडेपाच वाजले. रिक्षा करून मी सोनार गल्लीत पोहोचलो. आता मला अजिबात घर शोधायचं नव्हतं. उलट मला बऱ्याच रहस्यमय गोष्टी आज समजणार होत्या. पावसाला सुरुवात झाल्याने मी भराभर चालत होतो. उत्साहाच्या भरात मी त्या खोलीपाशी पोहोचलो. जोरात आणि आत्मविश्वासाने मी बेल वाजबली. मागच्या वेळेला माझी भीतीची प्रतिक्रिया होती. रस्त्यावर पावसाची काळोखी झाल्याने बीएमसी ने दिवे चालू केले होते. त्यांचा अतिमंद उजेड येत होता. दरवाजा उघडला गेला नसल्याने मी, पुन्हा बेल वाजवली. मी विचार केला हा बेवडा शुद्धीत नसणार. म्हणून मी दरवाज्या ठोकला. त्याबरोबर तो जुनाट आवाज करीत उघडला गेला. आत मध्ये थोडा काळोखच होता. बाहेरच्या मंद उजेडात आत पावसाचे पाणी शिरले असल्याचे मला वाटले ....... माझ्या मोबाईलचा टॉर्च मी चालू केला. त्याच्या झरोक्यात मला असे दिसले, की मी पाण्याच्या डबक्यात उभा नसून रक्ताच्या ओघळांमध्ये उभा आहे. टॉर्चचा प्रकाश मी लांबवला. आतल्या खोलीचे दार मला उघडे दिसले. माझ्या अंगाला कापरं भरू लागलं. तशाही अवस्थेत मी आतल्या अर्धवट उघड्या दरवाज्यातून वाकून पाहिले. प्रतिभाचा नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पुढे काहीही न पाहता मी बाहेरच्या दरवाज्या जवळ आलो. पावसाने जोर धरला होता. रस्त्यावर शाळकरी मुलं येताना दिसत होती. माझा श्वास आता वर खाली होऊ लागला. इथून आपण लवकरात लवकर जावं हे बरं. दुसरं तिसरं कोणीही न दिसल्याने आणि कोणत्याही खोल्यांचे पुढचे दरवाजे उघडे न दिसल्याने मी पटकन तिथून पळण्यासाठी पाय बाहेर टाकला . आणि समोर मला प्रतिभा आलेली दिसली . पावसाच्या धारांमध्येही माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. नशीब माझ्या हातात लखोटा होता. तिला पाहून माझी बोबडीच वळली. आता मी काय बोलणार होतो ? ........ क्षणभर मी तिच्याकडे , ती माझ्या कडे आणि हातातल्या लखोट्याकडे पाहू लागली. मी हातातला लखोटा तिच्या पुढे केला तिने तो कपाळावर नाखुषीच्या आठ्या घालीत तो हातात घेतला. तिच्या हातात छत्री होती. तिच्या मागे एक सात आठ वर्षांची मुलगीही होती. ती शुचिता असावी. तोंडावर पडणारं घाममिश्रित पाणी पुसण्याचं भानही मला राहिले नाही. प्रतिभाच्या नजरेतला तिरस्कार आणि अचानक मी दिसल्याने तिला बसलेला धक्का ती लपवू शकली नाही. . ती काही बोलण्याच्या आतच मी तिथून धूम ठोकली................


(क्र म शः  )

🎭 Series Post

View all