प्रतिभा (भाग १)

खरंतर प्रतिभा दोन वर्षांपासून आमच्या ऑफिसमध्ये काम करत होती...

खरंतर दोन वर्षांपासून प्रतिभा आमच्या ऑफिसमध्ये काम करीत होती. ती थोडी अबोल होती. फारशी स्वतः हून मिसळत नसे. ऑफिसमधल्या कोणत्याही कार्यक्रमाला मात्र ती न चुकता हजेरी लावीत असे . पण ती बरीचशी निर्विकार होती. तिची प्रतिक्रिया क्वचितच बघायला मिळत असे. माझी सहकारी म्हणून ती उत्तम होती. प्रत्येक कामाची ती अगदी मन लावून आखणी करून ते यशस्वी करून दाखवीत असे. वयाने माझ्यापेक्षा एखादं दोन वर्ष लहान असेल किंवा बरोबरीची पण असेल. तिचा चेहरा थोडा करारी वाटायचा. उभट कपाळ , त्या खाली असलेले स्थिर डोळे तिचा गंभीर पणा उगाचच वाढवीत आहेत असे वाटे. ही थोडी मोकळी राहिली तर काय बिघडणार आहे असं मला नेहमी वाटायचं. मोकळी म्हणजे पुरुषाला जी मोकळेपणाची अपेक्षा असते ती. खरं म्हणजे असा अर्थ माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जळमटा सारखा चिकटलेला असावा. पण दिखाऊ स्त्रीदाक्षिण्याला बळी पडणाऱ्यांपैकी मी पण असल्याने मी तिच्याशी योग्य तेवढ्या सभ्यतेने वागत असे. एकूण तिचा बांधा आकर्षक नसला तरी ती स्त्री होती हे महत्त्वाचं होतं. तिची घरची परिस्थिती नक्की काय होती कुणास ठाऊक. मी कधी त्याबद्दल विचारलंही नाही आणि तिनी ते सांगितलंही नाही. निदान मला तरी. तिच्या बोलण्यात कधी घरचा संदर्भ येतच नसे. मला नेहमी
वाटे मिस्टरांबद्दल काहीतरी बोलेल, किंवा मुलांबद्दल तरी. पण ती बरोबरीच्या मैत्रिणींशीही कधी बोलल्याचं दिसलं नाही. जेवणाच्या वेळेलाच ती जी काही कामातून उठायची इतकंच. थोडक्यात हा बर्फ लवकर फुटणाऱ्यांपैकी नव्हता. गळ्यात मंगळसुत्राशिवाय दागिना नव्हता की हातात बांगड्या. मात्र हाताला घड्याळ होतं. वर्ण किंचित गोरा होता. एक प्रकारचा निबरटपणा असूनही ती बरी दिसत होती. दोन वर्षात तात्काळ करायलाच हवं किंवा जास्त वेळ बसून करायलाच हवं असं काम निघालं नव्हतं. कारण अगदी सरळ होतं , ज्या दिवसाचं काम त्या दिवशीच करणं ही आमच्या बॉसची शिस्त होती. त्याचं नाव, नारायणन. .... ‌ सदाशिव नारायणन. आम्ही दोघेही त्याच्या शिस्तीत बसत असल्याने आम्हाला नेहमी इतरांपेक्षा जास्त पगारवाढ मिळायची. इतर सहकारी आमच्याकडे थोड्या नाखुशीनेच बघत.

काही दिवसातच आमच्या हाती कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट दिला गेला. त्यातही इतरांना मत्सर वाटला. इतर म्हणजे इतर बॉसेस आणि त्यांचा स्टाफ. या प्रोजेक्टमध्ये सत्तर ते ऐंशी लहान कंपन्या होत्या. प्रथम यांना संपर्क करून आमच्या उत्पादनाची माहिती द्यायची. मग भेटी देऊन चर्चेतून त्यांना तपशील द्यायचा ,आखणी करायची आणि नवीन उत्पादन बाजारात आल्यावर त्यातून त्यांना होणारा फायदा अंदाजे किती आहे ते पटवून त्यांच्याकडून ऑर्डर्स घ्यायच्या. असं काहीसं स्वरूप होतं. त्यासाठी प्रथम पूर्वतयारी म्हणून नारायणने आम्हाला दोघांना बोलावले. तास दीड तास चर्चा करून त्याने कामाची वाटणी तिघामध्ये केली. साधारण सहा महिन्याचा कालावधी दिला होता. कालावधी कमी असला तरी नारायण असल्या कमी वेळात पूर्ण करण्याच्या कामात निष्णात होता. त्याला मराठी बोललेलं समजायचं . पण बोलता येत नसे. गेल्या काही दिवसांपासून त्याला कुठूनतरी " कशाला " शब्द कळला होता. तो मात्र तो अधून मधून आमच्याशी बोलताना वापरीत असे. पण आम्हाला त्याचं खूप हसू यायचं. त्याला इतर कोणतेही शब्द माहिती नसल्याने त्याचा हा कशाला मजेशीर रित्या मध्ये यायचा. आम्ही कधी कधी त्याच्या तोंडावर पण हसायचो. म्हणजे मीच. प्रतिभा नाहीच. तरीही त्याला राग येत नसे. आपण हा शब्द विनाकारण वापरत आहोत हे आम्हाला कळतंय हे माहीत असूनही तो आमच्या हसण्याचा राग धरीत नसे. तोही हसण्यात सामील व्हायचा. प्रतिभा फार झालंच तर थोडं ओठाच्या कोपऱ्यातून हसल्यासारखा करायची. मला तिचा राग यायचा. जरा मोकळेपणाने हसली तर हिचं काय खर्च होतं असं मला वाटायचं. असो. ......... आम्ही जरा जास्तच व्यग्र झाल्याने आम्हाला कधी कधी तास दोन तास जास्त बसायला लागत असे. मला कंटाळा यायचा. पण ती मात्र मख्खपणे बसून काम करीत राहायची. तिच्या बरोबर कामाबद्दल बोलताना सुद्धा ती अगदी जेवढ्यास तेवढंच बोलत असे. मीच कधी कधी काही गोष्टी विनोदीपणे सांगायचो आणि स्वतःच हसतं सुटायचो . आणि ती हसते का ते पाहायचो . पण ती ताकास तूर लागून देत नसे. कोणत्याही मैत्रीणींसोबत ती ऑफिस सुटल्यावर जात नसे. इतक्या वर्षात कोणाशी तरी तुमची मैत्री होतेच. पण ती अशी एकलकोंडेपणाने जगत होती. घरची कारणं नको सांगूस पण मिसळायला काय झालंय , असं सारखं माझ्या मनात यायचं. मी सुद्धा विवाहित होतो. मला दोन मुलंही होती. तिला होती की नाही माहीत नाही. तरीही मला तिच्याशी मैत्री हवी होती. कदाचित मला तिच्या या मूग गिळून बसण्यामुळे तिच्या कोशातला आयुष्य काय आहे ते कळावं असं माझ्या मनात असावं. म्हणजे सुरुवातीला. पुढे पुढे "असावं " हा शब्द मनाने काढून टाकला आणि तसं मला वाटू लागलं. किंबहुना तो माझा सामाजिक हक्कच आहे असंही वाटू लागलं. त्यात तिच्या जवळ जाण्याचा माझा हेतू नक्कीच होता. दुसऱ्या सहकारी स्त्रीने आपल्याशी अगदी मिळून मिसळून वागण्याची आपली का अपेक्षा असते कळत नाही. कदाचित मला ती स्त्री आहे म्हणून सुप्त आकर्षण होतं. वरवर सुप्तपणाची शाल पांघरलेलं आकर्षण .

मी रोज घरातून निघताना ठरवून जात असे की आज तिला विचारायचंच तिचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे . मुलं किती आणि मिस्टर काय करतात. पण सबंध दिवसभरात मला तशी संधी घेता येत नसे , किंवा मी घाबरत होतो. पण धीर करून आज मात्र मी तिला विचारलंच." प्रतिभा , रोज रोज उशीर होतो म्हणून माझी बायको आणि मुलं जाम वैतागतात ग. तुझं तसंच ........ " होतं का असं मला

विचारायचं होतं. म्हणून मी प्रश्न अर्धवट ठेवला. पण तिचा चेहरा निर्विकार होता. उत्तरादाखल ती म्हणाली, " लंचनंतर सरांनी रोझ आणि कंपनीकडे जायला सांगितलंय. " तिने उत्तर टाळल्याचं मला लक्षात आलं. पण आज निदान तिच्या मनस्थितीच्या प्रांगणात मी एका प्रश्नाचं बी तरी फेकलं होतं. पाहू या कधी उगवतंय ते. असं म्हणून मी गप्प बसलो. ती यथावकाश भेटीसाठी निघून गेली. मला एवढं विचलित होण्यासारखं तिचं वागणं नव्हतं. पण अपेक्षा आणि त्याही स्त्री सहकाऱ्याकडून हे महत्त्वाचं निमित्त होतं. त्या दिवशी मला जवळ जवळ साडेनऊ झाले. मी जाम वैतागलो होतो. काय कारण काढून घरी जाण्याबद्दल नारायणला पटवावं ते सुचत नव्हतं. तेवढ्यात प्रतिभा आली. मला आश्चर्य वाटलं . बहुतेक ही घरी गेली असणार. पण ती रोझ आणि कंपनीकडून एक फाइल घेऊन आली . मी जास्त लक्ष दिलं नाही. कदाचित तिला वाटत असावं मी विचारेन की ती एवढ्या उशिरा पण ऑफिसला का आली. पण मी विचारलं नाही. ती फाइल घेऊन केबिन मध्ये जाणार तेवढ्यात नारायण बॅग घेऊन बाहेर आला. मला म्हणाला," अरे उत्तम अभी रहने दो. कल सुबे देकेंगे, तुम भी निकलो. ..... (प्रतिभाकडे वळून ) त्याने विचारलं " तुम आ गयी क्या ? सीधा घर जाती . " तिचा मख्ख चेहरा पाहून तो पुढे काही न बोलता ऑफिस बाहेर पडलाही. आणि बाहेर असलेल्या गार्डला ऑफिस बंद करण्याच्या सूचना देऊन तो लिफ्टमध्ये शिरला. आता आम्ही दोघंच राहिलो होतो. प्रतिभाची निराशा नक्कीच झाली असणार. एवढी काळजीने ती ऑफिसला परत आली होती. तेही फाइल घेऊन. ती काहीतरी कुरबूर करील म्हणून मी वाट पाहत होतो. आणि अधून मधून आवरण्याची आवश्यकता नसतानाही माझं टेबल आवरत होतो. तिने काही न बोलता हातातली फाइल समोरच्या कपाटात ठेवली . कपाटाला कुलूप लावून , पर्स खांद्याला अडकवून ती निघाली. मी पण घाईघाईने बॅग सांभाळीत लिफ्टकडे निघालो. तिने बटण दाबलं होतं. लिफ्टमध्ये मी पण शिरलो. माझ्या सहज मनात आलं , लिफ्ट अचानक बंद पडली तर . ती काहीतरी जळजळीत प्रतिक्रिया देईल. आणि संभाषणाचा धागा मला मिळेल. गंमत म्हणजे , खरच एक दोन मजले गेल्यावर लिफ्ट बंद पडली. आता लिफ्टमध्ये फक्त ती आणि मी होतो. तुमच्या मनात काय आलंय ते माझ्याही मनात होतं. चेहऱ्यावर विक्षिप्त भाव आणून तिने आपला एक हात इमर्जन्सी अलार्म कडे नेला . ठीक त्याच वेळी मीही माझा हात नेला. आणि तिच्या हातावर माझा हात एका क्षणासाठी कां होईना विसावला. तिच्या हाताचा स्पर्श थंड होता.
तिने लावलेला हलकासा सेंटही माझ्या नाकाने टिपला. मग तिने माझ्याकडे नजर वळवली. ............

(क्र म शः )

🎭 Series Post

View all