Login

प्रतिभा (अंतिम भाग)

आल्या आल्या वाघमारे म्हणाले.............


आल्या आल्या वाघमारे म्हणाले, " थॅक्स मि. उत्तम. एवढं धाडस सहसा कोणी दाखवीत नाही. " त्यांच्या बरोबर असलेल्या लेडी कॉन्स्टेबलना त्यांनी प्रतिभाला ताव्यात घेण्यास सांगितले. त्याबरोबर नारायण भडकून म्हणाला, " लेकीन हमने किया क्या है ?" त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी सगळ्यांनाच ताव्यात घेण्यास सांगितले. प्रकाश अजूनही तळमळत होता. त्याला पाहून वाघमारे म्हणाले, " तुला आधीच पोलिस रेकॉर्ड आहे. चल ऊठ तू तर हवाच होतास. अमली पदार्थांचा पुरवठा करतोस आणि सभ्य माणसा सारखा फिरतोस काय ? " त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. त्याने एक हात गालावर ठेवला होता. त्याचा जबडा चांगलाच सुजला होता. नारायण कडे वळून ते म्हणाले, " एक आदमीको धमकाने और पकडके रखनेका इल्जाम काफी नही है ? और वैसे भी मै तुमको पकडनेवाला ही था. तुम इंक्वायरीमे टिकोगे नही. कोशिश करके देखो. " मॅनेजरचे बकोट आधी धरलेच होते . सगळीच यात्रा मग पोलिस व्हॅनमध्ये बसली. मी वाघमारे साहेबांच्या जीपमधे बसलो होतो. साहेब म्हणाले, " तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घरी जाऊ शकता, पण मला विचाराल तर तुम्ही पो. स्टेशनला येऊन लगेचच स्टेटमेंट दिलत तर बरं होईल. म्हणजे काही तपशील सुटणार नाही. काय करता ? " मी घड्याळाकडे पाहिलं, साडेदहा होऊन गेले होते. मला रिताचा चेहरा आठवला. पण मी त्यांना आधी स्टेटमेंट देणार असल्याचे सांगितले. पो. स्टेशनला पोहोचायला आम्हाला तासभर लागला. गेल्या गेल्या सगळ्यांना आत टाकण्याची ऑर्डर देऊन त्यांनी प्रथम माझं स्टेटमेंट नोंदवले. घरी सोडायला गाडी देऊन ते म्हणाले, " मि. उत्तम, आता हे सगळे पोचल्यातच जमा आहेत. तुमच्या डायरेक्टर साहेबांशी मी एक दोन दिवसात बोलणार आहेच. उद्या मी तुम्हाला ऑफिसमध्ये फोन करीन आणि मग परत सगळे धागे जुळवून पाहीन. या बदमाषांना कोर्टापुढे हजर करावे लागेल आणि रिमांडही घ्यावा लागेल. " ......मी रात्री साडेबाराच्या सुमारास घरी पोहोचलो. रिता जागीच होती. तिला जवळ घेत मी म्हणालो, " आत्ता काही विचारू नकोस, जे असेल तेच वाढ आणि मला झोपू दे. "ती तर आज्ञाधारक होतीच . झोपलेल्या मुलांवरून मायेने हात फिरवित मी स्वतःशीच म्हणालो, "चला एक ताण नाहीसा झाला. जे काही करायचं ते कायदा करील. " त्या रात्री मला अतिशय शांत झोप लागली.
सकाळी उठल्यावर माझा उल्हसित चेहरा पाहून रिता म्हणाली, " आज अगदी उत्साह ओसंडून जातोय काल काहीतरी असं झालंय का की एकदम तुमच्यात बदल होईल" मी उत्तरादाखल फक्त हासलो आणि म्हणालो, " आज माझ्याकडून तुला मस्त फीस्ट. लवकर आलो काय नाही काय , पण आजचं जेवण नक्की. " असे म्हणून मी तयार झालो, तिला जवळ घेतली. ऑफिसला जाण्यासाठी निघालो. मी दरवाज्या उघडला आणि पाहिलं तर बाहेर "शुचिता " उभी होती. तिने बेलवरचा हात काढला. म्हणजे ती बेल वाजवणार होती . मला काही समजेना तिला काय म्हणावं. आता सगळं संपलं होतं मग हे परत काय चालू झालं ? तिला नाही म्हंटलं तर माणुसकी नसल्यासारखं दिसलं असतं आणि ये म्हंटलं तर नसता संबंध . मला काही समजेचना. रिताही पाहत राहिली . मग रिताच म्ह्णाली , " कोण ग तू ? " त्यावर तिने मला तिला आलेला एसएमेस दाखवला. तो वाघमारे साहेबांचा होता. "या मुलीला सध्या तुमच्याकडेच ठेवा, लवकरच सोशल वर्करच्या मदतीने आम्ही तिची सोय करू. तिला एकटीला राहणं कठीण आहे . आणि मुख्य म्हणजे प्रतिभानेच हे सुचवले आहे की तुम्ही तिला थोडे दिवस तरी सांभाळाल. मी तुम्हाला संपर्क करणारच आहे. एकदा का रिमांड घेतला की तुम्हाला बोलावून घेईन. प्लीज कोऑपरेट. आणि थँक्स. " तरीही मला सुचेना. प्रतिभा जी आपल्याशी एक अक्षर बोलायला तयार नसायची, तिने आपल्याकडे मुलीला कसं पाठवलं. तिला माझी खात्री कशी वाटली की मी शुचिताला सांभाळेन. मी तिला आत घेतली. रिताला म्हंटले, " मी आलो की सगळं सांगेन . तिला सांभाळून घे. आपल्या दोन्ही मुलांना बहीण आहे असे समज. " ती हो म्हणाली. कुणास ठावूक , तिला आवडलं होतं कि नाही. की ती माझ्याकरिता हे करीत होती. मग मात्र मी ऑफिसला गेलो. ....... गेल्या गेल्या कासम भेटला. कासम आमचा प्यून. त्याचा चेहरा घाबरल्यासारखा वाटला. ऑफिसमधले सगळेच गटा गटाने चर्चा करताना दिसले. मी आजचा पेपर वाचला नव्हता. अधून मधून ते माझ्याकडे पाहत होते. मी विचारले, " काय रे काय झालंय काय , असा घाबरल्यासारखा काय दिसतोस ? " तो म्हणाला, " तुम्हाला माहिती नाही नारायणसाहेबाला आणि प्रतिभा मॅडमला पोलिस पकडून घेऊन गेले ते . पेपर पाहा . " असं म्हणून त्याने मला पेपर आणून दिला . पहिल्याच पानावर बातमी होती. .. " एका मल्टिनॅशनल कंपनीचा एचोडी पोलिसांच्या जाळ्यात. मागच्या काही दिवसात झालेल्या राजेश राजवाडे यांच्या खुनाचेही धागेदोरे पोलिसांना सापडण्याची शक्यता. .......... " पुढे मी वाचणार एवढ्यात मला जंबोसिंगने बोलावल्याचे कासमने सांगितले. आता या सरदारला माझ्याकडून काय हवंय ? याचा विचार करीत मी त्याच्या केबिनचा दरवाज्या वाजवला. आतून आवाज आला., " येस कम इन..... " मी आत शिरलो. मी बसल्यावर तो म्हणाला, " उत्तम, तुम ये पुलिसके चक्करमे कैसे आ गया ? नारायण तो अब गया, उसे रखेंगे नही और वो प्रतिभा , वो भी गयी. वैसेभी उसे नारायणके कहने पर ही तो काम पे रखा था. शायद कल परसू एमडी साब तुमको बुलायेंगे" ते ऐकल्यावर माझ्या काळजाचा ठोका चुकला. आमचा एमडी थडानी , एक नंबरचा खवचत. त्याने कधी कोणाला चांगलं म्हंटलं असल्याचं आठवत नाही. मी घाबरतच माझ्या टेबलापाशी आलो. जवळच्याच काही स्टाफ मेंबर्सनी मला बऱ्याच गोष्टी विचारल्या. या सगळ्यात माझा रोल काय याचं त्यांना कुतुहल होतं .
मग मी त्यांना एमडी कदाचित अचानक भेट देईल असे सांगितल्यावर ते आपापल्या जागेवर बसले. पण आतून मला काळजीच होती. मी ह्यात गुंतलो होतो असा त्याचा समज तर झाला नाही ना , पण मी माझं काम तर चोख ठेवलेलं होतं. दिवस असाच गेला. घरी गेल्यावर ठरल्याप्रमाणे आम्ही जेवायला गेलो. अर्थातच शुचिताला घेऊन. आता ती माझ्या मुलांची ताई झाली होती. मुलगी अतिशय मृदुभाषी होती. आई सारखी तिरसट आणि करडी नव्हती. दोन दिवस असेच गेले काहीच घडले नाही. मला दोन दिवसांनी वाघमारेंनी पो. स्टेशनला बोलावले...........

सकाळीच मी पो‌. स्टेशनला गेलो. मला प्रतिभाचं आश्चर्य वाटलं. शुचिताला माझ्याकडे पाठवण्यात तिचा काय हेतू होता मला कळेना. गेल्या गेल्या वाघमारे साहेबांनी अपडेटस दिले. या सगळ्यांना कोर्टाने दहा दिवसाचा रिमांड दिला होता. खुनाचा आरोप असल्याने त्यांना जामीन मिळणार नाही याची वाघमारेंना खात्री असल्याने ते आनंदात होते. अर्थात कोर्टाकडून कोणताच आदेश त्या बाबतीत नव्हता. अजून तपास चालू होता. मग त्यांनी मला प्रकाशची स्टोरी सांगितली. खून प्रकाशनेच केला होता. पण नारायण आणि प्रतिभाच्या सांगण्यावरून. प्रतिभाची तशी इच्छा होती की नाही काही कळायला मार्ग नव्हता. नारायण आणि प्रतिभा एकमेकांना फार वर्षांपासून ओळखत होते. नारायणच्या ओळखीनेच प्रतिभाला नोकरी मिळाली होती . आणि मला मिळालेली कीचेन प्रकाश कडे असली तरी त्यात राजेशच्या खोलीच्या चाव्या नव्हत्या. तर त्या त्याने खून केल्यावर तिथेच फेकून दिल्या होत्या. तपासात तेही सापडले. शेवटी मी वाघमारेंना विचारले , " साहेब शुचिताला माझ्याकडे प्रतिभाने कसे काय पाठवले ? तिला तर माझा तिरस्कार वाटायचा. " त्यावर ते म्हणाले," तसे प्रतिभाला कोणीच नातेवाईक नाहीत. आम्ही तिच्या मुलीला एकटं राहावं लागेल अशी भीती तिला घातली आणि सगळ्या गोष्टी कबूल करून घेतल्या. मग तिला तुला मुलीला कोणाकडे ठेवायला बरं वाटेल असे विचारल्यावर तिने तुमचे नाव घेतले. सोशल वर्कर येईपर्यंत तुम्हाला थोडं सहकार्य करावं लागेल, नाहीतर तिची सोय एखाद्या अनाथाश्रमात करावी लागली असती. तुम्ही नाही म्हंटलंत आणि तिला आमच्या ताब्यात दिलित तरी चालेल. " मी अर्थातच जास्त विचार न करता होकार दिला. काही दिवसांचाच तर प्रश्न होता. त्यांनी एक लेटर माझ्या एमडी साहेबांना पाठवल्याचे सांगितले. आणि लागल्यास त्यांना ते व्यक्तिशः भेटतील असे ही म्हणाले. आता प्रश्न थडानीचा होता. हाउ ही टेक्स इट. पुढचे तीन चार दिवस असेच गेले. मला अजून थडानीने बोलावले नव्हते. मग अचानक एक दिवस इन्स्पे. वाघमारे ऑफिसमध्ये दिसले. ते म्हणाले, " आत्ताच तुमच्या एमडी साहेबांना भेटून आलो. पूर्ण रिपोर्टही दिलाय. ते तर करणं भागच होतं. आणि खास तुमच्याबद्दल प्रशंसा करणारं लेटरही दिलय. बहुतके तुम्हाला साहेब बोलावतील. " मग ते गेले. मी तपासाबद्दल मुद्दामच विचारले नाही. मला माहिती होतं की नारायण , प्रतिभा आणि प्रकाश तिघेही पक्के अडकलेले आहेत. त्या दिवशीही एमडीने बोलावलं नाही. शुचिता घरीच होती . मध्यंतरी एकदा वाघमारेंचा फोन आला . शुचिताची सोय एका सोशल वर्करने केली आहे. तिला पो. स्टेशनला घेऊन या म्हणजे पेपर्ससहित सोशल वर्करला तिचा ताबा देता येईल. मग मी मुद्दामच त्या दिवशी शुचिताशी बोललो. ती म्हणाली, " काका, मला तिकडे नाही जायचंय. प्लीज मला तिकडे नका ना पाठवू........ " आणि ती हमसाहमशी रडू लागली. रिताला ही ती आवडत होती. मग आम्ही दोघे काहीच बोलत नाही पाहून ती काकुळतीने म्हणाली, " ठेवाल का मला , ठेवा ना . तिकडे माझ्या ओळखीचं कोणीच नाही. प्ली...... ‍ज ! " मी रिताकडे पाहिलं. तिला भरून आलं होतं. तिने होकार भरला. शुचीला हे न कळून ती रडत रडत म्हणाली, " काका , मी खूप मदत करीन कधीच त्रास देणार नाही. " रिता म्हणाली, " एखाद्या अनाथ मुलीला आपण दत्तक घेतलंय असं समजू या. ती एकटी तरी कुठे जाणार. मला चालेल. " मग माझेही डोळे पाणावले. शुचीला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवीत मी म्हंटलं, " आता तुला कुठेच जाण्याची गरज नाही. आम्ही सांभाळू. " मात्र दुसऱ्या दिवशी शुचीला घेऊन पो. स्टेशनला जाणं भाग होतं. रिताही बरोबर आली होती. वाघमारे साहेबांच्या समोर एका खुर्चीत मध्यम वयीन बाई बसल्या होत्या. माझी ओळख करून देताना वाघमारे म्हणाले, " मि. उत्तम , या नमिता मावशी , या सोशल वर्कर आहेत आणि या अनाथ मुलींची चांगल्या कुटुंबात सोय करतात किंबा अनाथाश्रमात पाठवतात. " मी त्यांना हाय हॅलो केलं. पण का कोण जाणे त्या अनोळखी स्त्रीच्या हातात शुचीचा हात द्यायचा, माझा जीव धजेना. त्यातून ती थोडी करड्या चेहऱ्याची वाटली. तुम्ही म्हणाल प्रतिभासारखी. मग काय हरकत होती तिच्याकडे द्यायला. प्रतिभाच्या जवळ शुची होतीच की. पण ती तिची आई होती. मी वाघमारे साहेबांना माझा निर्णय सांगितला. त्यावर ते म्हणाले, " वा , हे तर फारच छान . नमिता मावशीच्या चेहऱ्यावर थोडी निराशा दिसली. कदाचीत प्रसिद्धीची एक संधी मी तिच्या हातून घेतली होती. काही असो, शुचीला घेऊन आम्ही निघालो. वाघमारेंनी शुचीला विचारले, " काय ग ममीला नाही भेटायचं का तुला ? " त्यावर तिने "अजिबात नाही " असे म्हंटले.

कदाचित आपल्या ममीचा तिला तिरस्कार वाटत असावा. काही असो , आम्ही शुचीताला घेऊन घरी आलो.

जवळ जवळ सात आठ दिवसांनी मला एमडीने बोलावलं. मी जंबोसिंगकडे मुद्दामच गेलो. तो म्हणाला मला बोलावलेलं आहे याची त्याला काहीच माहिती नाही . मग मी त्याला माझ्याबरोबर चलण्याची गळ घातली. तो म्हणाला, " मेरा क्या काम, तुम तो एमडी को जानते हो. कुछ भी बोल सकता है. " मी निराशेने उठलो. दरवाज्याशी पोहोचल्यावर तो म्हणाला, " अरे उत्तम, मै भी चलता हूं. मेरे पास भी एक केस है. वो डिसकस करनी है. लेकीन एक बात है , मै पह्यले जाता हूं. तू बादमे आ जाना " असे म्हणून तो घाईघाईने फाइल घेऊन निघाला सुद्धा. मी एमडीच्या सेक्रेटरीला जाऊन भेटलो. तिचं नाव प्रियंका. मला बोलावल्याचं सांगितल्यावर ती म्हणाली, " तुम्हाला थोडं थांबावं लागेल. आत्ताच जंबोसिंग आत गेल्येत. मी सरांना सांगते तुम्ही आल्याचं. तोपर्यंत बसा ना, प्लीज. " असे म्हणून तिने आत फोन केला. फोन बंद करून ती म्हणाली, " जा, तुम्ही . " मला जरा बरं वाटलं. चला , निदान जंबोसिंग समोर तरी थडानी नीट बोलेल. माझी भाबडी अपेक्षा. मी दरवाज्या वाजवून गुड मॉर्निंग म्हंटलं. थडानी एक मध्यम वयाचा सिंधी एका मोठ्या अंडाकृती टेबलामागे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरून तो नक्की काय विचार करीत आहे हे सांगणं कठीण. त्याने बसण्याची खूण केली. मी बसलो . का कोण जाणे त्याच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी दिसली. मी घाबरलो हा आता काय बोलेल कुणास ठावूक. नेहमीप्रमाणे मी बरोबर वर्क रिपोर्टचं स्टॅटिस्टिक आणलं नव्हतं. खरंतर ही भेट का होती हे कळलं नाही. पण नारायणची ही पद्धत होती. कोणी सीनियर बोलवो आपण लेटेस्ट प्रोग्रेस रिपोर्ट जवळ ठेवायलाच पाहिजे. आता तो पोलिसांच्या ताब्यात होता . पण त्याने घालून दिलेली पद्धत फारच उपयोगी होती. माझ्या तळहाताला घाम येत होता. आपली ड्रिल करणारी नजर रोखून मला म्हणाला, " आपको तुरंत आनेको क्या हो गया ?. धिस इज बॅड मॅनर्स. एनीवे ये नारायणका क्या लफडा है ? मेरे कंपनीमे कभी पुलिस नही आयी. आप दोनोने क्या किया है ? " वास्तविक त्याच्या कडे इन्स्पे. वाघमारेंच लेटर होतं, म्हणजे त्याला माहिती होतं. मला उगाचच हलकासा घाम येऊ लागला. आता याला काय काय सांगणार ? माझी काहीच इन्व्हॉलमेंत नव्हती. मग मी त्याला थोडक्यात सगळं सांगितलं. त्यावर तो काहीच म्हणाला नाही. जंबोसिंगनेही तोंड बंद ठेवलेलं होतं. नाहीतर त्याची बडबद अखंड चालू असायची. त्याने जंबोसिंगला बादमे आओ असे सांगून घालवला. आता तर मला जास्तच असुरक्षित वाटू लागलं. जंबो गेल्यावर थडानी मला म्हणाला, " देखो ,
यू हेब डन अ गुड जॉब बाय कोऑपरेटिंग पुलिस. मैने तुम्हारा पूरा करियर चेक किया है. इट इज फाइन. आय थिंक यू डिझर्व्ह अ प्रमोशन. देखता हुं क्या कर सकता हूं. वुई विल ट्राय टू टॉक इन डीटेल्स. तुम्हारा प्रोग्रेस रिपोर्ट भेज दो. ओके ? यू कॅन गो नाऊ . " त्याने हसरी मुद्रा करण्याचा प्रयत्न केला असावा असं मला त्याच्या ओठांवर आलेल्या लहानश्या सुरकुतीवरून वाटले. मी पडत्या फळाची आज्ञा मानली आणि
एकदाचा केबीन बाहेर आलो. प्रियंका फोन वर व्यग्र होती. मी घाईघाईतच माझ्या टेबलापाशी आलो. मला जरा बरं वाटलं. प्रमोशन ? सहा सात वर्षांनंतर ? शुचिताचा पायगुण म्हणायचा की काय ? माझ्या मनात भलतेच विचार आले.

एक दिवस मला वाघमारेंचा सकाळी सकाळी फोन आला . आज बांद्रा कोर्टात या, अकरा वाजेपर्यंत. प्राथमिक सुनावणी आहे. मी विचारले, " माझं काय काम आहे ? \" त्यावर ते म्हणाले, " असं काय म्हणता , तुम्ही तर आमचे महत्त्वाचे साक्षिदार आहात . आम्ही तुमचे नाव कोर्टाकडे पाठवले आहे. " मी हो म्हंटले. पण मला कोर्टात जाणं या प्रसंगामुळे अस्वस्थ वाटू लागले. पेपरात असल्या गुन्ह्यांच्या संदर्भात कोर्टरुममध्ये झालेलं वाचलं होतं. पण प्रत्यक्षात माझा संबंध आल्याबरोबर नको वाटू लागले. तरीही मी जाण्याचे ठरवले. शुचीलाही तसे सांगितले. पण तिने ठाम नकार दिला. मग मी गेलो. कोर्टात वातावरण एकदम गंभीर होते. वाघमारे साहेब , त्यांचा स्टाफ , आणि प्रतिभा, प्रकाश आणि नारायण हेही आले होते. अजूनही ते पोलिसांच्या ताब्यात होते. कोर्टासमोरील एका बाकड्यावर ते तिघे बसले होते. त्या तिघांचे चेहरे ओढल्यासारखे दिसत होते. प्रतिभाचे डोळे तर खोल गेलेले आणि मान बाहेर आल्यासारखी वाटली. नारायणचा ताठा संपलेला होता. प्रकाशचा प्रश्नच नव्हता. त्याचा जबडा बैद्यकीय उपचाराने ठीक झाला असावा. त्यांना झोप लागली नसावी असे दिसत होते. पोलिसी खाक्याचा परिणाम त्यांच्या लाल डोळ्यांवरून दिसत होता. मला पाहिल्यावर प्रतिभाला माझ्याशी बोलण्यासाठी यायचं असावं पण नारायणने तिचा हात घट्ट धरून ठेवलेला दिसला. ती तशीच बसून राहिली. तिला शुचीबद्दल विचारायचे असावे. मी पण काही न बोलता वाघमारे साहेबांना जाऊन भेटलो. अकरा वाजता कोर्ट स्थानापन्न झालं. प्रतिभाची केस पुकारली गेली. तिघे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले. मग एक म्हातारेसे वकील आले . ते त्या तिघांचे असावेत. सरकारी वकिलांनी सगळी कथा सांगितली आणि उर्वरित तपासासाठी रिमांड मागितला. तसेच माझेही नाव पुकारले गेले. मला फक्त तिथे उभे राहून हजेरी द्यावी लागली. मी फार महत्त्वाचा साक्षीदार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. नंतर रिमांड देण्यात आला. पण खुनाची केस असल्याने जामीन मान्य झाला नाही. पुढची तारीख पडली. मी वाघमारेंना सांगून निघालो. मला त्या वातावरणात क्षणभरही उभं राहण्याची इच्छा नव्हती. केस चालू झाल्यावर बकरं कापायला घेतल्यासारखं वातावरण असतं. मी दरवाज्या बाहेर पडणार तेवढ्यात माझ्या हाताला स्पर्श झाला. तो प्रतिभाचा होता. तिने पाणावलेल्या डोळयांनी विचारले, " शुची माझी आठवण काढते का ? " मला आता तिच्याकडे पाहवत नव्हतं. पण एका आईला मुलीची आठवण येणारच. मी उत्तरादाखल फक्त "नाही " असे म्हंटले . आणि घाईघाईने निघालो. तिच्याशी जास्त बोलण्याही माझी इच्छा नव्हती. आज ही बाई इतकी हीनदीन झाली होती. मला ते फार वेळ पाहायचे नव्हते. नारायण लांब उभा राहून प्रतिभाकडे रागाने पाहत होता. त्याला माझ्याशी बोललेलं आवडलेलं नव्हतं. कदाचित त्याच्या डोळ्यात असे भाव असावेत, की हाच तो माणूस ज्याच्यामुळे आपण अडकलो. पण मला पर्वा नव्हती. मी कदाचित अतिकुतुहल दाखवणारा ठरलो असेन पण माझ्यामुळे एक बाईट हेतू असलेले त्रिकुट समाजातून शिक्षेप्रत जाणार होते. मी जास्त विचार न करता ऑफिसला गेलो. ................... गेल्याबरोबर मला जंबोसिंगने बोलावले. त्याने मला प्रमोशनची ऑर्डर दिली. आता मी नारायणच्या रिक्त पदावर बसणार होतो. आणि माझे सहकारी नवीन नियुक्ती झालेले फ्रेशर्स होते. पण का कोण जाणे त्या पदावर नारायणच्या ठिकाणी बसण मला आवडलं नाही. अर्थात, मला चॉइस नव्हता. जमेल तेव्हा मी आमच्या कंपनीच्या दुसऱ्या कोणत्यातरी रिजनल कार्यालयात ट्रान्स्फर करून घेण्याचे ठरवले. तसं माझं एकदा वाघमारेंशी फोन वर बोलणं झालं. ते म्हणाले, " मि. उत्तम , केस मुंबईला चालणार , आणि तुम्ही ट्रान्स्फर घेतलीत तर तुम्हाला तारखांसाठी यावं लागेल, माझ्या मते तुम्ही हा प्रयत्न तुमचं कोर्टापुढे झाल्यावर केलत तर बरं होइल. अर्थात, हे सगळं केव्हा होईल मी सांगू शकत नाही. " त्यांचं म्हणणं मला पटलं. मला एक दिवस थडानीनेही बोलावलं आणि कामाची कल्पना दिलि. आता त्याचा रवय्या बदलला होता. तो म्हणाला, " मि. उत्तम, कुछ डिफिकल्टी होगी तो जरुर आना. "


मी घरी गेल्यावर रितालाही फार आनंद झाला. पण इथेच राहायचंय म्हंटल्यावर तिला फारसं बरं वाटलेलं दिसलं नाही. शुची आमच्यासाठी चांगलीच लकी ठरली होती . वाईटातून चांगलं होतं , ते हे असं . असं म्हणायचं. तीन चार वर्षानंतर केसचा निकाल लागला. तेव्हा मी बंगलोरला होतो. माझं स्टेटमेंट झाल्यावर मी जंबोसिंगला हाताशी धरून बंगलोरला ट्रान्स्फर करून घेण्यासाठी थडानीच्या मागे लकडा लावला. तेव्हा कुठे माझं काम झालं . निकाल लागल्यावर एकदा वाघमारेंचा फोन आला होता. पण आता मला त्यात काहीही रस नव्हता. पण अजूनही मला दगडाचा मुखवटा लावलेली प्रतिभा आठवते.

(संपूर्ण )

🎭 Series Post

View all