प्रतिभा ( संपूर्ण कथा)

its a story of a woman who has a talent of expressing her words in so well manner that she got an award for her writing.

                                                                       प्रतिभा

पुरस्कार सोहळा संपला, सगळे पाहुणे तिचे अभिनंदन करून, तिला मिळालेल्या यशाचं भरभरून कौतुक करून, हॉल मधून बाहेर निघू लागले. तिचे आई वडील कितीतरी वेळ तिचा हात हातात धरून तिचे कौतुक आपल्या डोळ्यात सामावून घेत होते. तिचे दादा-वहिनी, बहिणी-भाऊजी, प्रशांत म्हणजे तिचा सखा अर्थात तिचा नवरा, तिचा आणि प्रशांतचा मुलगा- पुष्कर, हे सर्वजण भरभरून टाळ्या वाजवून तिचा कौतुक सोहळा अनुभवत होते. आज तिला सर्वश्रेष्ठ लेखिका म्हणून गौरवण्यात आले होते, तिच्या पुस्तकाला वर्षातील सर्वश्रेष्ठ व सर्वाधिक खप असलेले पुस्तक म्हणून पुरस्कार मिळाला होता, त्याचाच सोहळा आटपून ती घरी आली होती. घरी येवून आपल्या लाडक्या खुर्ची वर जरा वेळ डोळे बंद करून विसावली, तसे तिचे मन भूतकाळात धाव घेवू लागले.

‘चंचल’ तिच्या आई वडिलांचे तिसरे आणि शेवटचे अपत्य. चंचल स्वभावाने तिच्या नावाच्या अगदी विरुध्द होती, अगदी शांत आणि सोज्वळ. छोट्यातील छोटं काम हि ती अगदी मनापासून करायची. तिचा अभ्यास वेळेत पूर्ण करायची, आईला तिच्या परीने मदत करायची. आई वडील, मोठा भाऊ आणि बहिण यांचे सर्व काम मनापासून ऐकायची. तिला वाचनाची अगदी मनापासून आवड होती, कितीतरी लहान मोठे पुस्तक तिने तिच्या खाऊच्या पैश्यातून स्वतः विकत घेतले होते , काही पुस्तके तर तिला तिची वाचनाची आवड बघून वडिलांनी भेट म्हणून दिले होते. असे तिच्याकडे अनेक लहान मोठ्या गोष्टींचे पुस्तके, कादंबऱ्या, कथा संग्रह, कविता संग्रह, यांचा खजिना जमा झाला होता. तिचा मुळ स्वभावच अबोल असल्याने, तिला फार मित्र मैत्रिणी नव्हत्याच, तिचे पुस्तकच तिचे खास सवंगडी होते. तिचा मोठा भाऊ ‘राहूल’ आणि बहिण ‘हेमा’, खेळात आणि अभ्यासात अतिशय हुशार, वर्गात नेहेमी त्यांचा प्रथम क्रमांक ठरलेलाच. त्यांच्या आई वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी आठवीमध्ये असतानाच ठरवून टाकले कि, त्यांना मोठे होवून डॉक्टर बनायचे आहे. आणि तसे बारावी नंतर त्यांच्या कष्टामुळे त्यांना वैद्यकीय शाखेत प्रवेश देखील मिळाला. आता त्यांच्या आई वडिलांना चंचल कडून देखील तीच अपेक्षा होती, परंतु दहावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतरही चंचलने जेव्हा तिला सायन्स शाखेत प्रवेश न घेता आर्ट्स शाखेत जास्त रस असल्याचे घरी सांगितले, तेव्हा मात्र सर्वांना फार आश्चर्य वाटले. तिला राहुल आणि हेमाने समजावले कि, सायन्स मध्ये प्रवेश घेतल्या नंतर ती कुठल्याही ठिकाणी आपले करियर घडवू शकते. तिला हवा तितका पैसा कमवू शकते, नाव कमवू शकते, मनासारखा जोडीदार मिळवू शकते. फक्त पुस्तक वाचून पोट भरता येणार नाही. भविष्यात सर्व सुख सोयी आणि मान मिळवायचा असेल तर आज कष्ट करून अभ्यास करावाच लागेल. चंचलला कष्ट करायचा किंव्हा अभ्यासाचा कंटाळा मुळीच नव्हता, तिला फक्त तिच्या दोस्तांपासून वेगळं नव्हतं व्हायचं, तिला अभ्यास करतानाच आणखी पुस्तकांशी मैत्री करायची होती, तिला त्यांच्या जगात प्रवेश करून त्या द्वारे सगळे जग पालथे घालायचे होते. तिला पैश्यांचा किंव्हा सुख सोयींचा मोह नव्हता, जगातल्या वेगवेगळ्या लेखकांचे साहित्य, पुस्तक यांच्या वाचनाची तिला भूक होती. इतर वेळी कधीही कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट न करणारी चंचल मात्र साहित्याचा अभ्यास करण्यासाठीचा हट्ट धरून बसली. शेवटी नाईलाजाने आई वडिलांनी तिला आर्ट्स शाखेत प्रवेश घेण्यासाठी परवानगी दिली.         

             आर्ट्स मध्ये प्रवेश घेवून चंचल ने तीचा पुढचा प्रवास सुरु केला. ती नेटाने तिचा अभ्यास करायची, आता तर कॉलेजच्या लायब्ररीच्या रूपाने तिला साहित्याचा समुद्रच जणू भेटीसाठी आला होता. घरी आईला मदत करून ती तिचा अभ्यास आणि अवांतर वाचन सांभाळत होती. राहुल आणि हेमाच्या बारावीच्या परीक्षेच्या वेळी, त्यांना सर्व नातेवाईकांनी फोन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येवू नये म्हणून घरातील टी.व्ही. बंद केला होता, नातेवाईकहि समजूतदार असल्यासारखे परीक्षाकाळात त्यांच्या घरी फिरकले नव्हते. परंतु चंचलच्या बारावीच्या परीक्षेबद्दल कुणीही साधी चौकशी देखील केली नव्हती, पाहुणे येण्या-जाण्याच्या कार्यक्रमातही काही फरक पडला नव्हता. सगळे म्हणायचे, “काय सोप्प तर असतं आर्ट्स ... फक्त वाचलं आणि लिहिला पेपर कि झालं.... आणि असंहि त्यानंतर तर पदवीलाच प्रवेश मिळणारंना ... मग काय!!!” पण या गोष्टींनी चंचलच्या अभ्यासात कुठलाही फरक पडला नाही. तिचे आई-वडील आणि भाऊ-बहिण परीक्षा काळात तिला काय हवं-नको ते सर्व निट पाहत होते, तिच्यासाठी तेच खूपं होत. तिने अतिशय चांगल्या गुणांनी बारावी उत्तीर्ण होवून बी.ए. साठी प्रवेश घेतला. आता हेमा आणि राहुल ने त्यांचा वैद्यकशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला होता, राहुल ने पुढील अभ्यासासाठी प्रवेश घेतला होता तर आता हेमा साठी वरसंशोधन सुरु झाले होते, डॉक्टर असल्यामुळे तिलाहि डॉक्टरच जोडीदार हवा होता, त्यानुसार स्थळहि तिला येत होते, शिक्षण आणि दिसायलाहि नाकी-डोळी नीट असल्यामुळे हेमाला सर्व स्थळांकडून होकार येत होते, अखेर एक स्थळ हेमाच्या पसंतीस उतरलं आणि तीचं लग्न ठरलं. हेमाच्या लग्नात आईला, चंचलची खूप मदत झाली. लग्न झाल्यावर पाठवणीनंतर सर्व वडीलधारी मंडळी, हेमा आणि राहुल चे काही जवळ चे मित्र-मैत्रिणी गप्पा मारत बसली होती, चंचल किचनमधून सर्वांसाठी चहा घेवून आली, तिला पाहून तिच्या आईची मोठी बहिण म्हणजे तिची सरूमावशी म्हणाली, “ ह्म्म! चंचल, आता पुढचा तुझा नंबर बरं का! ... पण बघ नं .. हेमा डॉक्टर आहे त्यामुळे तिने तिला सर्वार्थाने शोभेल आणि सुखात ठेवू शकेल असा जोडीदार निवडला.. पण तुला ज्याचा होकार येईल त्याच्याशी लग्न करावं लागेल. तुही चांगली शिकली असतीस, डॉक्टर-इंजिनिअर झाली असतीस तर तुलाहि बक्कळ कमाई करणारा, सुखात ठेवणारा नवरा मिळाला असता.” सरुमावाशीच बोलणं ऐकून सर्व चकित झाले, पण कुणी काही बोलण्याच्या आतच चंचल अतिशय शांतपणे मावशीला म्हणाली, "“मावशी, अगं मीही शिकतेच आहे, माझी वाट कदाचित इतरांना सोपी वाटत असेल पण मेहेनत तिथेही आहेच, फक्त पैसा कमवायचा असता किंव्हा मला रस असता तर मीही माझ्यासाठी इतर करीयर निवडलं असतं, पण मला समाधान हवयं, माझी आवड जोपासायची आहे, आणि तेच मी सध्या करते आहे, आणि राहिला प्रश्न जोडीदार मिळण्याचा तर फक्त पैसा कमावणारा असण्यापेक्षा मला समजून घेणारा जोडीदार मिळाला तर मी जास्त सुखी होईल.”" अतिशय शांत आणि नम्र शब्दात चंचल ने दिलेलं हे उत्तर सगळ्यांना आवडलं, पण जेव्हा कुणीतरी तिच्यासाठी चक्क टाळ्या वाजवायला लागलं तेव्हा सगळे त्या व्यक्तीकडे आश्चर्याने बघू लागले... कोण होती ती व्यक्ती जी अगदी भारावल्यासारखी चंचलकडे बघत होती?..... तो होता प्रशांत.... राहुलचा जिवलग मित्र.

राहुल आणि प्रशांत दोघं शाळेत असल्यापासून एकमेकांचे मित्र होते.त्यानंतर दोघांना वैद्यकशास्त्रात एकाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला त्यामुळे त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. प्रशांत अधूनमधून राहुल च्या घरीही यायचा त्यामुळे त्याच्या घरीही सर्वांना तो परिचित होता, त्याचं वागणहि खूप सुस्वभावी होतं, चंचल कधीतरी येत-जाता त्याला दिसायची, अगदी शांत आणि सोज्वळ चंचल त्याला इतर मुलींपेक्षा वेगळी वाटायची, आणि आज तिच्या बोलण्याने तर तिने जणू त्याचं मनच जिंकून घेतलं होतं.

काही काळ गेला, चंचलने साहित्यात एम.ए. पूर्ण केल आणि इकडे प्रशांतने आपलं शिक्षण पूर्ण करून एका नामांकित हॉस्पिटल मध्ये नोकरी मिळवली होती. आई-वडिलांच्या परवानगीने त्याने चंचलला लग्नाची मागणी घातली, चंचलच्या आई-वडिलांना तर आश्चर्ययुक्त आनंद झाला कारण प्रशांतला अनेक डॉक्टर मुलींची स्थळ सांगून येत होती, तरी त्याने त्यांच्या चंचलला भावी जोडीदार म्हणून निवडलं होतं. चंचलने मात्र भावनेच्याभरात वाहून न जाता त्याला पुन्हा विचार करण्यास सांगितले तेव्हा तो तिला म्हणाला कि, “कदाचित त्याला तिच्यापेक्षा जास्त शिकलेली मुलगी मिळेलही पण तिच्यासारखी समजूतदार मैत्रीण नाही मिळणार.” अखेर सर्वांच्या संमतीने त्यांचे लग्न थाटामाटात पार पडले. तेव्हाही सरुमावाशी म्हणाली, "चंचल, तू नशीबवान आहेस कि तू स्वतः डॉक्टर नसतानाही तुला डॉक्टर नवरा मिळाला!”" त्यावर चंचल फक्त हसली पण प्रशांत म्हणाला कि, “"मावशी, खरा नशीबवान तर मी आहे आणि ते सगळ्यांना एक दिवस नक्की कळेल.”"

प्रशांतने पहिल्या रात्री चंचलसाठी घेतलेला मोत्यांचा हार तिला गिफ्ट दिला, ते बघून चंचल खूप गोड हसली, पण जेव्हा त्याने "सरप्राईज" असा म्हणून अजून एक गिफ्ट तिच्या हातात दिले, ते बघून तिच्या आनंदाला पारावारच नाही उरला.... ते गिफ्ट होते.. तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक! ते बघून तिला खात्री पटली कि तिला समजून घेणारा जोडीदार तिला लाभला आहे आणि दोघांचा संसार सुरु झाला. राहुलनेहि डॉक्टर मुलगी बघून संसार मांडला. चंचलने पुढे एम.फील.यशस्वीरीत्या पूर्ण केले. काही दिवसात ती तिच्याच कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाली. प्रशांतने राहुल,त्याची पत्नी, हेमा आणि तिचा पती यांच्या सोबत एक मल्टीस्पेशियालिटी हॉस्पिटल सुरु केले. आता प्रशांत आणि चंचल च्या संसारवेलीवर पुष्कर नावाचे नवे फुल उमलले होते, त्यामुळे नोकरी, घर, मुल यांच्यात चंचल आता व्यस्त झाली होती तरीही तिने पुस्तक आणि वाचन यांची साथ सोडली नव्हती. एकमेकांना प्रत्येक प्रसंगात साथ देत तिचा आणि प्रशांतचा संसार सुरु होता. एकदा एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नात सर्व जमले असतांना सरुमावशी तिला म्हणाली, "प्रशांतला कित्ती लोक ओळखतात गं!, त्याच्या हाताने लगेच गुण येतो असं सगळे म्हणतात, मोठ्यातल मोठ ऑपरेशन तो सहज करतो, सगळीकडे कित्ती नाव काढतात त्याचं .... आणि आम्ही त्याचे नातेवाईक आहोत असं सांगितल्यावर आमच्याकडे पण किती आपुलकीने पाहतात सर्व माहीत्येय!! तू खरचं खुप नशीबवान आहेसं गं कि तो तुझा नवरा आहे ते!!!." ते ऐकून चंचलने त्यांचे मनापासून आभार मानले, पण प्रशांत पुढे येवून त्यांना म्हणाला कि,"प्रत्येक पुरुषाच्या कार्तुत्वामागे एक स्त्री असते असं म्हणतात ,माझ्या आयुष्यात ती स्त्री चंचल आहे." यावर सरुमावशी म्हणाली, "हा तुझा मोठेपणा आहे पण तुझं कर्तुत्व खरचं फार मोठं आहे.त्यामानाने चंचल म्हणजे साधी चारचौघींसारखी नोकरी,घर,मुल हेच विश्व असणारी स्त्री आहे." त्यावर चंचल फक्त हसली पण प्रशांतला मात्र राग आला. घरी आल्यानंतर प्रशांत चंचलला म्हणाला कि, "का नेहेमी लोकं तुलना करत असतात, तुला कुणीही काही बोललेलं मला आवडत नाही, तू पण यापुढे कुणाचही इतक्या शांततेने ऐकून घ्यायचं नाहीस." तेव्हा चंचल ऊठली आणि कपाटातून काही वह्या, नीट लावलेले कागद, दोन फाईल घेवून आली आणि ते प्रशांतच्या हातात वाचण्यासाठी दिले.

प्रशांत एक एक पान वाचू लागला, कित्ती सुंदर लिहीलं होतं सगळं, त्यात काही कविता होत्या, काही लेख होते, काही प्रवासवर्णन होते. प्रत्येक गोष्ट किती अभ्यासपूर्वक लिहिली आहे ते कळत होतं, प्रवासवर्णन तर आपण  आत्ता त्या ठिकाणी उभे राहून ते सर्व आपल्या डोळ्याने बघत आहोत असं त्याला वाटत होतं, कुठेही अतिशयोक्ती नाही कि उथळपणा नाही, प्रत्येक पानातून सखोल अभ्यास उठून दिसत होता. इतके वर्ष केलेल्या वाचनाचा परिणाम सर्व लेखनातून व्यक्त होत होता. सर्वात शेवटी काही अभिप्राय लिहिले होते, ते बघून तर प्रशांत चाटच पडला, कारण ते सर्व नामांकित लेखकांचे अभिप्राय होते ज्यात त्यांनी चंचल च्या प्रत्येक लेखाविषयी अतिशय सुंदर आणि सकारात्मक मत व्यक्त केले होते. प्रत्येक लेखाखाली प्रतिभा म्हणून नाव लिहिले होते. प्रशांतने तिला कारण विचारले, ती म्हणाली,"प्रत्येकामध्ये काही खास गुण असतात, प्रत्येकात एक वेगळी प्रतिभा असते, ती त्याची ओळख असते, माझं लिखाण माझी प्रतिभा आहे म्हणून मी ठरवलं कि जे लिहीलं ते 'प्रतिभा' नावानेच. प्रशांतला तिचा हा विचारही खुप आवडला. चंचलने त्याच्या हाती एक धनादेश आणि छपाईची पावती दिली. ते बघून तर प्रशांतचा आनंद गगनात मावेनासा झाला. चंचलने तिचे पहिले दोन कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह एका प्रकाशनामार्फत प्रकाशित करण्यासाठी दिले होते, प्रशांत तिच्याकडे बघून लटक्या रागाने म्हणाला कि मला आधी का नाही सांगितलं? तेव्हा हसून चंचल त्याला म्हणाली "सरप्राईज!" आणि दोघेही हसू लागले.

असे एका पाठोपाठ एक तिचे पाच कथासंग्रह आणि तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले. सर्व पुस्तकांना सर्व थरातून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्याचे तिला मानधन तर मिळालेच पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे समाधान आणि नवीन ओळख मिळाली. आज तिची 'प्रतिभा' सगळ्यांना कळली होती. त्यातल्याच एका पुस्तकाला आज पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यात आज सरुमावाशी पुन्हा भेटली, आणि तिला म्हणाली,"तुझी प्रतिभा ओळखण्यात मी कमी पडले, तुझं कर्तुत्व खरचं फार मोठं आहे ,आज मला खुप अभिमान वाटतोय कि मी तुझी मावशी आहे." आणि तिने अगदी मनापासून चंचलला जवळ घेतलं. ते बघून सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. घरी येवून आपल्या लाडक्या खुर्चीवर विसावली असतानाच तिला प्रशांतच्या येण्याची चाहूल लागली, तिने डोळे उघडले, प्रशांत हातात पुस्तक घेवून उभा होता ... तो तिच्या जवळ येवून म्हणाला.."सरप्राईज"...आज त्याने तिला त्याच्या स्वतःच्या आवडत्या लेखिकेचं पुस्तक गिफ्ट म्हणून दिलं. लेखिकेचं नावं होतं ... अर्थातच ..'प्रतिभा'.