प्रसारमाध्यमे चांगली - ३

प्रसारमाध्यमे चांगली - ३

शीर्षक : प्रसारमाध्यमे चांगली - ३

विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।

नागाननाथ श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥


गणपती बाप्पा मोरया! किती छान, प्रसन्न वातावरण आहे ना भोवताली… "गणेशोत्सव", आपल्या सर्वांना लोकमान्य टिळकांनी दिलेली एक अपूर्व देणगी! "लोकांचे एकत्रीकरण", हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून टिळकांनी चालू केलेला हा गणेशोत्सव म्हणजे प्रत्येकाच्या हृदयातील एक प्रसन्न कोपरा…


कोरोना काळानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्यामुळे भक्तांचा उत्साह तर दांडगा आहेच पण, हा सण किती महत्वाचा आहे हे या दोन वर्षांत अगदी प्रत्येकाला कळून चुकले. आता गणेशोत्सव चांगला की वाईट यावर बरीच चर्चा झाली, बरेच वादविवाद रंगले तरी गणेशोत्सव बंद करता येणं शक्य नाहीच! कारण ती आता आपली "गरज" झालेय…


प्रसारमाध्यमे चांगली की वाईट ह्या पेक्षा ती आपली "गरज" आहे. नाण्याला दोन बाजू असतात, ह्या विषयालासुद्धा आहेत! पण, प्रसारमाध्यमांची सुरवात चांगल्या कारणासाठी झालेली, जी कारण आपण आपल्या सोयीनुसार बदलली. "कालाय तस्मै नमः।", यानुसार त्यात बदल होत गेले. तो बदल स्वीकारून आपण सर्वच पुढे वाटचाल करतआहोत.



प्रसारमाध्यमांचा आपल्या आयुष्यातील सहभाग आपण दूर नाहीच करू शकत, कारण सकाळी उठायच्या गजरापासून ते रात्री शतपावलीत किती पावले चाललो इथं पर्यंत आहे. व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम ह्याचा "आपण" करत असलेला वाईट वापर सोडला तर प्रसारमाध्यमांमुळे जग बरेच पुढे गेले आहे. जागतिक उलाढाली, जगाच्या पटलावर चाललेल्या घडामोडी ह्या सगळ्याची माहिती आपल्याला प्रसारमध्यमांमुळेच मिळते.


अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण अवलंबून असलेल्या प्रसारमध्यमांवर "वाईट"पणाचा ठपका नाहीच लावू शकत. जगात लागलेल्या बऱ्याच शोधांपैकी हा देखील एक शोध आहे. प्रत्येक गोष्टीचा उपयोग कसा करावा हे पूर्णतः आपल्या हातात असते. प्रसारमाध्यमांचा वाईट उपयोग करा, असं कोणीही आपल्याला सांगत नाही. आपली पाऊलं त्या गोष्टींकडे वळत असतील तर आपल्याला आत्मपरीक्षण आणि मार्गदर्शनाची गरज आहे. आपल्या विचारांच्या चष्म्यातून बघून प्रसारमध्यमांच वाईट ठरवणं, हे अयोग्य आहे.


प्रत्येक व्यक्ती आपलं आयुष्य स्वतःच्या विचारधारेनुसार जगात असतो. प्रत्येकाची काही चांगली, काही वाईट मूल्य ठरलेली असतात. आपल्यातसुद्धा काही वाईट गुण असतातच की पण म्हणून आपण एक "व्यक्ती" म्हणून वाईट आहोत असं कोणी आपल्याला म्हणलं तर ते निंदनीय आहे, हे आपण सर्वच जाणतो. त्याप्रमाणेच प्रसारमाध्यमांचे वाईट उपयोग किंवा वाईट वापर करणारे काही आहेत म्हणून, प्रसारमाध्यमे मुळातच "वाईट", हे दखील चूकच!


"हे विश्वाचि माझे घर!", ही उक्ती आपण अभिमानाने वापरतो. याच उक्तीला इथे दैनंदिन जीवनात प्रसारमाध्यमांच्या आधारावर वापरू शकतो. आपण सर्व इथे जोडलो गेलो आहोत ते याच प्रसारमाध्यमांमुळे! ही स्पर्धा, ईराचा आपल्या सर्वांना एकत्र जोडलेला धागा, स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याच शहरातील अनोळखी पण आपल्या सारखेच साहित्यप्रेमी लोक, सर्व वयोगटातील लोकांचे विचार ऐकण्यात येणारी मज्जा हे सर्व फक्त प्रसारमाध्यमांमुळे शक्य आहे.


अभ्यास, काम, स्वयंपाक, नोकरी, वाचन, लेखन, व्यवसाय या आणि अशा अगदी सर्व क्षेत्रांतून प्रसारमाध्यमांचा वापर अधोरेखित तर होतोच शिवाय आज आपल्या यशामध्ये यांचा असलेला वाटा देखील अधोरेखित करण्यासारखा आहे.


समोरच्या संघाने मांडलेला मुद्दा मला इथे अधोरेखित करावासा वाटतो की, तंत्रज्ञान माणसासाठी आहे, माणूस तंत्रज्ञानासाठी नाही! अगदी योग्य मुद्दा आहे हा, पण प्रसारमाध्यमे तंत्रज्ञानाचा एक भाग असली तरी त्याचा किती वापर करायचा, कसा वापर करायचा हे फक्त आपल्या हातात आहे. तुम्ही संधी द्या, ते नक्की तुमच्यावर हुकूमत गाजवतील... तुम्ही तुमची सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून वापर करा, प्रगती कराल! एवढं साधं सोपं समीकरण आहे हे, त्यासाठी प्रसारमध्यमांना वाईटपणा देण्याची गरज नाहीच... आणि इथे कितीही चर्चा केली सरतेशेवटी प्रसारमध्यमांशिवाय आपले पान हलत नाही हे खरं आहे मग, हा वाईटपणा कशासाठी ? चांगला वापर करून, इतरांना चांगला वापर करण्यासाठी प्रवृत्त करून प्रसारमाध्यमांचे चांगुलपण आपण टिकवू शकतो. आता इतरांना प्रवृत्त करून ती ऐकणार आहेत का, हा मुद्दा नक्की इथे उपस्थित होईल पण या वेळी सुद्धा हेच सांगावेसे वाटतेय की स्वतःपासून सुरवात करा, जग तुमचे अनुकरण करेल आणि जर स्वतःला जमत नसेल तर या वादात न उतरलेलंच बरं! एक मजेशीर उदाहरण द्यायचे झाले तर, लग्नात जाऊन म्हणायचे की पुऱ्या कडक आहेत, गुलाबजाम बरोबर नाहीत आणि वाढपी कडून आधी आपल्याला वाढून घ्यायचं... वाईटपणा नक्की प्रदर्शनात आणावा पण तो तसाच कुरवाळत न बसता, त्यातून चांगल्याची निष्पत्ती कशी होईल हे बघावे.


दुसरा मुद्दा असा की आजकालचे टीव्ही चॅनेल, सीरिअल, रिऍलिटी शो... आमच्या आधीच्या पिढीचे या बाबतीत मत घेतले तर ते हेच असेल जुन्या सीरिअल मनोरंजन करायच्या. त्या तुलनेत आताच्या सीरिअलमुळे समाजात अश्लीलता, कलह पसरवला जातो. यावर मत मांडायचे झाले तर मी हेच सांगेन की त्या सीरिअलपेक्षा बाकी रिऍलिटी शो किंवा महाराष्ट्राची हास्यजत्रा सारखे कार्यक्रम वरचढ ठरतात. रिऍलिटी शोमुळे कित्येक तळागाळातल्या कलाकारांना संधी मिळते. त्यांच्या कलेला वाव मिळतो, स्वतःला सर्वांसमोर ते उत्तमरीत्या दाखवू शकतात. आता काही जणांचे ह्यावर सुद्धा मत असेल की तिथे दुजाभाव केला जातो, निकालात फेरफार होते तर माझ्या मते हे सर्व दुय्यम मुद्दे आहेत. ते कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी असतात जे ते उत्तम करतात! बाकी निकाल, त्यांचं बाजारीकरण हे आपलं क्षेत्र नाही. तरीसुद्धा त्याच्याशी अडचण असेल तर न बघणे हा पर्याय आहेच की... एकूणच सगळं आपल्या हातात आहे. चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा यांसारख्या कार्यक्रमांचा प्रेक्षकवर्ग अफाट आहे. दिवसभर दमून आल्यावर काही हलकं फुलकं पाहायला मिळत असेल तर ते त्यांचं उद्दिष्ट साध्य करतात, असं म्हणायला हरकत नाही. हे नाहीतर ते, ते नाहीतर हे... बरेच पर्याय आपल्याकडे आहेत, मग काही वाईट गोष्टींवर वाद करून तिथेच अडकण्यात आपलाच बलिशपणा ठरतो. जे उत्तम आहे ते घ्यावे, जे नाही ते तिथेच सोडून द्यावे अशी आपल्याच मोठ्यांची शिकवण आहे. जशी नजर तसे जग... प्रॉब्लेम तो हैं सबके साथ, बस नजरिये की हैं बात!


शाळेचा उपक्रम असूदे, करा गुगलवर सर्च!
कामावरचे प्रेझेंटेशन बनवायचे आहे, करा पॉवरपॉइंटवर!
नवीन रेसेपी शिकायची आहे, मधुरा बाईंचा चॅनल युट्युबवर आहेच!
लांबच्या मित्राचा वाढदिवस आहे, द्या पाठवून एक छानसं गिफ्ट!
हे एवढं सगळं "सोपं" फक्त आणि फक्त प्रसारमाध्यमांमुळेचं झाले आहे. "सोपं" हा शब्द मी इथे अधोरेखित करत आहे कारण, ही सगळी काम अजून वेगळ्या मार्गाने होऊ शकतात यात वादचं नाही, पण ती सोपी फक्त प्रसारमध्यमांमुळेच होतात. वेळ वाचतो कारण कितीही म्हणाले तरी आजचे जग घड्याळाच्या काट्यांवरच चालते! आपण गुलाम आहोत या वेळेचे आणि या स्पर्धेत टिकायचे असेल तर प्रसारमध्यमांशिवाय गद्यांतर नाही…


९०च्या दशकातील पिढीने जे जीवन जगलं तो सुवर्णकाळ होता! पण आमच्यासारख्या तरुण पिढीला तो सुवर्णकाळ जगणं नाहीये शक्य… आम्ही जन्माला आलो आणि प्रसारमाध्यमांनी आईच्या पदराबरोबर आमचा हात धरला. एखादी गोष्ट त्यांच्याशिवाय अशक्य वाटावी, एवढे जवळचे ते आमचे सोबती झाले. आम्ही वाढत गेलो आणि त्यांच्याशी असलेलं नात वृद्धिंगत होत गेलं पण, म्हणून तरुणपिढी प्रसारमाध्यमांच्या आहारी गेलेय, हे काही अंशी चुकी आहे. आम्ही वापरतो प्रसारमाध्यमे कारण साधारण बालपणापासून आईबाबा कामावर गेल्यावर तेच असायचे जो सोबत असायचे! पण कळत्या वयात आल्यापासून त्यांचं महत्त्व, आपण त्यांच्या वापर करून किती पुढे जाऊ शकतो हे समजलं… आमच्या हाती लागलेला परिसाचा दगड आहे तो! माझ्या बरोबरची कितीतरी मुलं आज प्रसारमाध्यमांचा वापर करून स्वतःचा छोटासा का होईना पण व्यवसाय करत आहेत. मी स्वतः चित्र काढून विकते, मला हे करताना प्रसारमाध्यमांचा किती वापर होतो हे मी इथे मांडणे कठीणच!


जे वाईट आहे, ते मूलतः वाईट नाही! ना तुम्ही, ना आम्ही, ना प्रसारमाध्यमे…


सिद्धी घाडगे

जिल्हा - सातारा, सांगली