प्रसार - माध्यमं वाईट - भाग २

ईरा : शब्दांचा सुरेल प्रवास


फेरी ः राज्य स्तरीय करंडक वाद-विवाद
विषयः प्रसार-माध्यमं वाईट-भाग २
संघः कोल्हापूर


"राजकीय व सामाजिक परिभाषा अशा रितीने घडवली जाते की, एखादी गोष्ट खोटी आहे हे ठाऊक असुन ही कालांतराने ती खरी वाटू लागते "( जाँर्ज आर्वेल)



सध्याच्या 21व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगात वैज्ञानिक प्रगतीने गाठलेले मैलाचे दगड मानवी जगण्याचा कधी अविभाज्य भाग होऊन बसले कळालेच नाही. जगण्याची गती वाढावी म्हणून ते तंत्रज्ञान जगण्याचा अविभाज्य भाग बनले हे सांगायला कुण्या पंडिताची गरज नाही. पण, मानवी अस्तित्वापेक्षा तंत्रज्ञान जेव्हा मोठं व्हायला लागतं तेव्हा त्या गोष्टीचं आपण आपल्या आयुष्यात वाढवलेलं अनावश्यक महत्त्व जर आपण समजूनच घेणार नसू तर, आपण स्वतःचे भविष्य अंधारात नेतोय असं मला वाटतं. कारण अन्न ,वस्त्र,निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यांच्या शिवाय माणसाचं आयुष्य चालू शकत नाही ही गोष्ट मान्य आहेच पण सामाजिक माध्यम ही अन्न वस्त्र निवारा इतकीच अनिवार्य आहेत हा विचार थोडा जास्तच वाटतोय.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, माणसांला मनोरंजनाची भूक किती? २४ तास असू शकते का? मग जर मनोरंजनाची भूक मर्यादित असेल तर २४ तास माध्यमातल्या अनावश्यक गोष्टींचा भडीमार कशासाठी? मानवी मनाच्या संवर्धनाची कसलीच घटना घडत नाही तर मग २४ तास प्रसार-माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमातुन आपण काय साध्य करत आहोत? हा विचार अधिक संवेदनशील होत आहे.

आपण बिल्किस बानो प्रकरणाचा संदर्भ घेतला. न्यायप्रक्रियेतून शिक्षा होऊन सुद्धा अशा प्रकारे सुटलेल्या लोकांचे संदर्भ समाज माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचले, आणि तो एक आवाज उठला. ही गोष्ट महत्त्वाची ठरते पण दुसऱ्या बाजूला त्यांचे समर्थन करणाऱ्या विचार प्रवाहाचे सुद्धा विचार, सामाजिक माध्यमातून फिरणाऱ्या पोस्ट या तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त पातळीवर फिरवल्या गेल्या आणि ही गोष्ट कशी योग्य आहे हे सांगण्यासाठी सामूहिक समाज भावना बनवण्याचे प्रयत्न केले गेले. मग जर देशातील चुकीच्या बाबींवर आघात करण्याचे प्रयत्न इथली एक व्यवस्था करत असेल अशा काळात समाज माध्यमांचा वापर करून चुकीची बाजू कशी योग्य आहे हे सांगण्यासाठी सामूहिक समाज भावना बनवली जात असेल तर प्रसार माध्यमे चांगली कशी म्हणता येतील?आणि सुशांतसिंग व आर्यन खान प्रकरणात समाज-माध्यम व प्रसारमाध्यमांनी आपणच न्यायालय असल्यासारखे आपले निर्णय लोकांच्यावर थोपवले. बगलकार म्हणून त्यांनी भुमिका बजावली .
काही दिवसांपूर्वी तुषार दामुगडे या व्यक्तीने एका प्रसिद्ध पत्रकाराला विचारले कि साहित्य मूल्य नसणाऱ्या प्रमाण भाषेची मोडतोड करून २४ तास बातम्या देणारी न्यूज चँनल काय कामाची?तेंव्हा त्या पत्रकारांने उत्तर दिले "तुम्हाला नको असेल तर बघु नका. आम्ही आमचे काम करतच राहू. " या उत्तरातच प्रसार माध्यमांची सद्यस्थितीत आणि भारताचे भविष्य दडलेलं आहे.याचा अर्थच असा आहे की, आम्ही आमचा अजेंडाधारी विचार या समाजात पसरवणार आणि सामाजिक विषमता निर्माण करतच रहाणार.

मुळात प्रसारमाध्यमे कशी वाईट आहेत या बाजूचं विवेचन करत असताना आपली बाजू मांडण्यासाठी ओढून ताणून काही गोष्टी करण्याचा माझा हेतू नाही. पृथ्वीच्या उत्क्रांतीपासून या क्षणापर्यंत पृथ्वीवर जितके काही शोध लागले गेले. त्यातून मानवी जगण्याच्या हाताला लागलेल्या जेवढ्या काही नवीन गोष्टी होत्या, त्या प्रत्येक गोष्टी समोर ठेवून ती चांगली की वाईट असा विचार करता येत नाही. आण्विक शक्तीचा शोध माणसाने लावला खरा. पण, त्या अणूपासून माणूस वीजनिर्मिती करणारा की अणुबॉम्ब करणार हा मानवी प्रवृत्तीचा भाग आहे. सोशल मीडियाची वाईट ही बाजू मांडत असताना मला प्रामाणिकपणे सांगावसं वाटतं की, कुठलीही गोष्ट कुठलाही शोध, तंत्रज्ञानातली कुठलीही बाब ही चांगली किंवा वाईट असं म्हणता येत नाही तर, त्याचा वापर माणूस कसा करतो? किंबहुना त्याचा वापर करणारी मानवी प्रवृत्ती चांगली की वाईट याच्यावरून त्याचं चांगलं किंवा वाईट असणं ठरत असतं हे आम्हाला आधी समजावून घ्यावे लागेल.

जगभरातल्या संवेदनशील विषयांवरची चर्चा जेव्हा प्रसारमाध्यमातून व्हायला लागते, तेव्हा मला प्रसारमाध्यमं खरंच वाईट असंच म्हणावं वाटतं कारण, माध्यमांनी स्वतःची भूमिका समजून घेतली नाही. एखादा सामाजिक राजकीय सांस्कृतिक स्वरूपाचा पेच निर्माण झाला किंवा गोंधळलेली परिस्थिती निर्माण झाली काही वाद निर्माण झाला तर अशा काळात इथली समाज माध्यम स्वतःच्या भूमिका मांडत असताना आपण प्रसारमाध्यमे आहोत की न्यायालय आहोत हेच समजून घेत नाहीत. एखाद्या गोष्टीचा जणू स्वतः न्यायालय असल्याच्या भूमिकेत ते निकाल देऊन रिकामे होतात ,आणि तीच भावना समाज व माणसांमध्ये रुजवतात हे सगळ्यात वाईट आहे. यासंदर्भात भारताचे मावळते सरन्यायाधीश रमन्ना यांनी एक स्टेटमेंट जाता जाता केलं होतं,
सामान्य जनतेच्या मूळ प्रश्नाला सरळ हात घालून सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी पत्रकारिता लोकांना अपेक्षित आहे.
विद्यार्थी, बेरोजगार,शेतकरी, बहुजन, गरीब,मजूर,कामगार, कर्मचारी, अवघे भारतीय,लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडे आशेने बघत आहेत त्यांच्या प्रश्नाला कधीतरी वाचा फुटेल याची आस ठेवून आहेत. पण त्या प्रश्नाला ही आता प्रश्न पडलेला दिसतो.
दोनेक वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने सगळं जग चार भिंतींच्या आत बंदिस्त केलं. अशा काळात सोशल मीडियाने खूप चांगल्या गोष्टी केल्या हे मान्यच. पण, दुसऱ्या बाजूला खूप नकारात्मक गोष्टी ज्या मानवी भीतीला कारणीभूत ठरतील अशा सुद्धा समाज माध्यमातून फिरल्या, ज्या दहशतीतून अनेक माणसांचं नुकसान झालं. अनेक तज्ज्ञांच असं मत आहे की कोरोनाच्या निमित्ताने जितक्या माणसांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. त्यातले बहुतांशी लोक हे कोरोना कमी आणि त्या आजाराच्या भीतीने गेले ही भीती समाज माध्यमातील मग टेलिव्हिजन असू दे किंवा फेसबुक, व्हाट्सअप, यू ट्यूब, इंस्टाग्राम ट्विटर यातून लोकांपर्यंत पोहोचलेल्या बातम्या असू देत जर माणसांच्या मानसिक बाबींचा विचारच न करता धडाधड बातम्यांचा भडीमार आपण केला नसता तर कित्येक जीव वाचले असते ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे कोरोनाच्या निमित्ताने आणखीन एक गोष्ट सुरू झाली ती म्हणजे वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम च्या माध्यमातून काळाची निकड लक्षात घेऊन माणसं घरात बसून आपला जॉब करू लागली ही गोष्ट नक्कीच चांगली होती त्यातील मर्यादा वेगळ्या आहेत पण ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या नावाखाली मुलांचं बालपण किंबहुना त्यांच्या रुजण्याच्या वयात आपण त्यांच्या खूप गोष्टी हिरावून घेतोय याचा विचार आपण करायला हवा ज्या मुलांना शाळा होती, शाळेला भिंती होत्या, खेळायला पटांगण होतं, शिकवायला माणसं होती, अशा मुलांना मोबाईलच्या आणि लॅपटॉपच्या स्क्रीन समोर बसून जर तुम्ही शिक्षण देऊ लागलात तर आपण माणसं घडवत नसून शिक्षणाच्या कारखान्यातून प्रॉडक्ट बनवतोय हा विचार समजून घ्यायला हवा.याचा मात्र विचार होत नाही. आणि मुलांना आपण संस्कार वर्गात पाठवून रेडीमेड संस्कार घडवत आहोत.
मधुरा रेसिपी समाज माध्यमातून घराघरात पोहचली (खरं म्हणजे ठराविक वर्गासाठी बनवलेला कार्यक्रम असंच म्हणावं लागेल कारण सदरचा कार्यक्रम डोंगरद-यातल्या आणि जंगलातल्या वस्ती, पाड्यावर कधीच पोहचला नाही) पण समाज माध्यम हाताशी नसतांना ही लंडनच्या आजीबाई (राधा डहाके) आपल्या चविष्ट पदार्थाच्या आस्वादांनी संपूर्ण लंडन व्यापून राहिल्या होत्या. हे मात्र समाज माध्यमं ,प्रसार माध्यमांच्या गावी ही नव्हतं.
काळासोबत आपण जर नाही चाललो तर आपण काळाच्या मागे राहतो आणि माणसं पुढे निघून जातात असा विचार रुजवण्यासाठी एचएमटी घड्याळापासून अनेक गोष्टींची उदाहरण समाज माध्यमात फिरतात पण काळासोबत किंबहुना काळाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात मानवी जगण्याचे माणूस पण हरवणार असेल तर मानवी जगण्याला काय अर्थ. साधी गोष्ट प्रसार माध्यम समाज माध्यम ही या तंत्रज्ञानातील प्रगतीची फलश्रुती आहे फक्त एक गोष्ट माणसांनी लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही तंत्रज्ञानासाठी माणूस नसतो तर माणसांसाठी तंत्रज्ञान आहे आपण महत्व देणाऱ्या गोष्टींचा प्राधान्यक्रम एकदा लक्षात घेतला की मग सगळ्या गोष्टी नीट होतात कारण शेवटी "सर सलामत तो पगडी पचास." माणसं आणि माणसांचं जगणं व्यवस्थित राहीलं तर अशा हजार गोष्टी करता येतील पण माणूसच तंत्रज्ञानाच्या हाती जाऊन यंत्र व्हायला लागला तर मात्र अवघड आहे बाकी आपण सूज्ञ आहात

"वो शिक्षक वास्तव में बुद्धिमान है जो आपको अपने ज्ञान प्रकोष्ठ में प्रवेश करने का आदेश नहीं देता, बल्कि वो आपको आपके बुद्धि की पराकाष्ठा तक ले जाता है।"
     © नामदेव पाटील, कोल्हापूर