प्रसार माध्यमे चांगली - 2

प्रसार माध्यमातून आपल्याला बसल्या जागी अगदी काही सेकंदात हवी ती माहिती मिळू शकते


फेरी - राज्यस्तरीय करंडक वादविवाद 

विषय - प्रसारमाध्यम चांगली - २

संघ - सांगली , सातारा


    " कधीतरी सहज विचार करावा आणि त्यातून बाहेर पडावे " अस आपल्या बाबतीत देखील होतच ना ? तर मग जेव्हा एखाद्या  चांगल्या गोष्टीत आपण अडकून जातो तेव्हा त्यातून बाहेर कसं पडू शकतो ना ?


मानवी मेंदू असा आहे जो एकवीस दिवस एकच गोष्ट केल्याने त्यामध्ये सामावून जातो . म्हणजेचं त्या गोष्टीची त्याला सवय लागते....!

मग अगदी सकाळच्या लवकर उठण्यापासून ते रात्री पुस्तक वाचून झोपेपर्यंत असो किंवा मग सकाळी योगा , मेडिटेशन पासून ते रात्री झोपताना डोळे बंद करून शांत  बसून स्वतःला पारखून , स्वतःच आत्मपरीक्षण करेपर्यंत....!
अशा प्रत्येक चांगल्या गोष्टींची सवय आपल्याला लागत असते . आणि अशीच सवय ती म्हणजे प्रसारमाध्यम...! कारण प्रसारमाध्यम ही चांगलीच आहेत....!

आता हे नुसतं "प्रसारमाध्यम चांगली आहेत असं म्हणणं वेगळं आणि प्रसार माध्यम चांगलीच आहेत " असं म्हणणं वेगळं ना ?

हा जो आपल्याला दिसणारा चांगलीच मधला "च" आहे ना ? हा खूप काही बोलून जातो...! आपल्या आयुष्यात या "च " ला खूप महत्त्व असतं....!

म्हणजे थोडक्यात हे "केलंच " पाहिजे , हे "झालंचं "पाहिजे , हे आपल्याला "आलंच " पाहिजे....!

यातला "चं " पहा आणि हे "चांगलंचं " आहे , हे "फायद्याचचं " आहे , आपल्या "उपयोगाचचं " आहे....! यातला "च " बघा . दोन्हीतला "च " आपल्याला काहीतरी  वेगवेगळे पण सांगून जातो...! आपलं काहीतरी वेगळेपण दाखवून जातो...! पण दोन्हींना महत्त्व तेवढेच आहे ना ? म्हणूनच म्हटलं प्रसार माध्यम ही "चांगलीचं " आहेत....!

निश्चितच ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत . आता जस आपण पाण्याशिवाय राहू शकत नाही किंवा अन्नाशिवाय राहू शकत नाही , वस्त्र परिधान केल्याशिवाय राहू शकत नाही आणि निवाऱ्या शिवाय कुठे थांबू शकत नाही...! असंचं प्रसार माध्यमांच ही आहे...!
प्रसारमाध्यमे असतील तर आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी नकळत का होईना आपण अडले जातं नाही...!

आता आपण जर का पाहायला गेलं तर वृत्तपत्र म्हणजे वर्तमानपत्र , आपल्या भाषेत न्युज पेपर..... दूरदर्शनवरील बातम्या म्हणजेच टिव्हीवरील न्यूज आणि सोशल मीडिया म्हणजे आपल्या भ्रमणध्वनी मधील . आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मोबाईल मधील सोशल मीडिया . जसे की , व्हाट्सएप , इंस्टाग्राम ट्विटर , युट्युब , फेसबुक यांवर आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यातली माहिती बसल्या जागी मिळते .

आता अगदी परवाच झालेल उदाहरण सांगायचं झालं तर  ती घटना अंगावरती काटा आणणारी आहे . पण या सोशल मीडियामुळेच त्या विषयाची खरी गंभीरता आपल्या लक्षात आली . कारण सतत आपल्या नजरेसमोर तेच होतं आणि ते म्हणजे बिलकिस बानो केस...!

" गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील अकरा दोषींच्या सुटकेनंतर देशात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून , आता या सर्व घडामोडींमध्ये अमेरिकेनेही उडी घेतली आहे . यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमने (USCIRF) अकरा दोषींच्या मुदतपूर्व सुटकेच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे . जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोषींची लवकर सुटका करणे अन्यायकारक आणि न्यायाच्या आयोगाने म्हटले आहे . "

आत्ता हे पहायचं झालं तर त्यामध्ये ती बलात्कार झालेली पीडित महिला अनेक वर्ष न्यायासाठी झुंजत होती . परंतु , आपण इकडे 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत असताना त्याच वेळी त्या नराधमांना जेलमधून सोडण्यात आलं . आता जर का सोशल मीडिया नसतं तर ही न्यूज एवढी मोठ्याने पसरली असती का ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना ?
नाहीतर या अशा घटनांच्या बाबतीत "लांडगा आला रे आला " अस व्हायचं...! आणि जेव्हा हा लांडगा खरंच येतो तेव्हा मात्र कोणीच जवळ नसत...!


या गोष्टीचा असंतोष किंवा या विरुद्ध द्वेष लोकांच्या मनात असणं स्वाभाविकच आहे....! आणि तो असावा ही बरं का...! कारण ही अतिशय निर्घृणपणे  केलेली गोष्ट आहे . जेव्हा इतक्या जणांकडून सामूहिक बलात्कार केला जातो तो ही अगदी अमानुष पणे....!  आणि तोही एका गरोदर महिले वरती , ते ही अगदी निर्घृणपणे आणि निर्दयीपणे....!
हे लिहिताना किंवा बोलताना सुद्धा अंगावरती शहारे आणून जातं....!
मग जेव्हा त्या बाईने ते सोसल असेल , त्या मरणप्राय यातना भोगल्या असतील तेव्हा तिची अवस्था काय झाली असेल ?


बरं त्यानंतरही तिला स्वतःच्या अस्तित्वासाठी , स्वतःच्या न्यायासाठी आणि निर्घृणपणे ओरबाडलेल्या तिच्या अमूल्य अशा सर्वस्वासाठी हक्क मागताना काय वाटलं असेल ना ?
किती ते लाचार पण आलं असेल ना ?
हक्क असून असा मागावर लागतो ?
जो तिला आपल्या संविधानाने , कायद्याने व्यक्ती स्वातंत्र्य , हक्काच स्वातंत्र्य दिलेल असताना देखील त्या हक्काच्या स्वातंत्र्यासाठी लढावं लागलं तेव्हा तिला काय वाटलं असेल ?


आणि आता जर का आपल्या हाती सोशल मीडिया नसतं तर आपल्यापर्यंत त्या एका ठिकाणी , जगाच्या एका कोपऱ्यात घडलेली गोष्ट दुसऱ्या मिनिटाला आपल्याकडे समजली असती का ?


कारण आपण पाहायला गेलं तर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये समाज हा खूप मोलाचा असतो...!
त्याचा खूप मोलाचा वाटा असतो...!
कारण की माणूस हा एक समाजशील प्राणी आहे .
किंवा समाजाला प्राधान्य देणारा प्राणी आहे...!
मग जेव्हा अशी एखादी घटना घडते म्हणजे अशीच नाही तर एखादी चांगली असो किंवा वाईट घटना असो . पण जेव्हा ती घडते तेव्हा या समाजाचा आपल्या आयुष्यात नक्कीच एक वाटा असतो....!
त्याचा एक भाग असतो . आपल्या भाषेत सांगायचं झालं तर खारीचा वाटा हा समाज नक्कीच उचलतो....!

" थेंबे थेंबे तळे साचे " म्हणतात ते काही चुकीचं नाही ना ? कारण एका छोट्या छोट्या थेंबा मधूनच एक तळ तयार होतं . आता ह्याच्यामध्ये दडलेला मतीत अर्थ असा की , " जगाच्या कानाकोपऱ्यातून एक-दोन-तीन अशी असंख्य लोकं या गोष्टीचा पाठपुरावा करताना  आपल्याला दिसतात . मग यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते मोठमोठे वकील , जज , पोलीस , अधिकारी , इतर सरकारी क्षेत्रातील व्यक्ती आणि अनेक जण यामध्ये सहभागी झालेले असतात . आणि त्यांचं सहभागी असणं साहजिकच आहे...!

इतक्या जणांची शक्ती पाठी असल्यानंतर म्हणजे पाठिंबा असल्यानंतर व्यक्तीला न्याय तर मिळणारच ना ? कारण एखादी गोष्ट फक्त एकच व्यक्ती जेवढा चांगल्या प्रकारे हाताळून करू शकत नाही तेवढी ती सामूहिकरीत्या करू शकते , हे आपल्याला माहीतच आहे . म्हणजे एकजूट हेच बळ किंवा एकीचे बळ हाती म्हणतात ते काही चुकीचं नाही ना ?
मग हे कशामुळे शक्य झालं ?
तर हे या सोशल मीडियामुळेच ना ?
म्हणूनच म्हटलं प्रसारमाध्यम " चांगलीच " आहेत...!

आता आपण जर का विचार करायचा म्हटलं तर आपल्या भारताच्या लोकसंख्येचा आणि क्षेत्रफळाचा त्याशिवाय त्याचबरोबर येणाऱ्या गरीब- श्रीमंत या गोष्टींचा , शिक्षणाचा , सामाजिक स्तराचा , त्यातून येणाऱ्या आर्थिक घटकाचा जर का विचार करायचा झाला तर तसा आपला देश विकसित होत असला तरी देखील आपल्या देशात गरिबीही आहेच की....!

अठरा वर्षांच्या खालचे आसुदेत , अगर अठरा वर्षांची किंवा नुकतीच अठरा वर्षातून एकोणविसाव्या वर्षात पदार्पण केलेली पिढी असू देत . प्रत्येक जण हा आपल्या मातापित्याला चांगलं जीवन देता यावा म्हणून झटत असतो .

काही जणां वरती अख्ख्या घराचा भार असतो . त्यातून त्यांना स्वतःचे शिक्षण करायचं असतं . मग घरात एकत्र कुटुंब असेल तर त्यांच पाहायचं असतं . लहान भाऊ किंवा लहान बहिण यांचे शिक्षण पाहायचं असतं . जर का मोठा भाऊ असेल तर त्याला आपल्या धाकट्या बहिणीचे लग्न कसं होईल ?
बरं ते अगदी थाटामाटात कसं होईल ?
याची चिंता लागलेली असते . त्यासाठी तो पैसा कमावण्यासाठी झटत असतो .


आपल्या भारतामध्ये शिक्षण खूप महत्त्वाचा आहे . म्हणजे भारतामध्ये असं नाही परंतु जागतिक स्तरावरती शिक्षण ही खूप मोलाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे . असं आपल्याला दिसून येत...! आणि ते खरंच आहे...!

कारण , " एखाद्या गोष्टीतलं ज्ञान एकवेळ नसलं तरी चालेल पण अर्धवट ज्ञान कधीही असू नये " आणि हे आपलं अर्धवट ज्ञान हे शिक्षणानेच निश्चितच पूर्णत्वाला जातं.....!

आता जर का विचार करायला गेला तर ही तरुण पिढी रोजगारासाठी झटत असते . अर्थात शिक्षण पूर्ण करत करत एखादा पार्ट टाइम जॉब करणं सोप्प नाहीये ना ? कारण इकडे अभ्यासात अव्वल यायचं असतं...! शिष्यवृत्ती देखील मिळवायची असते . कारण जो आपण कमावलेला पैसा असतो तो दुसऱ्या कशाला तरी कामी येईल हा त्यामागचा एक हेतू असतो . त्यामुळे शिष्यवृत्तीतून शिक्षण व्हावं हा एक महत्वाचा मुद्दा झाला आणि त्यासाठी निश्चितच खूप अभ्यास करावा लागतो . मग ज्यावेळी आपण पार्ट टाइम जॉब करणं शक्य नसतं तेव्हा हीच प्रसारमाध्यम आपल्याला अनेक प्रकारे मदत करत असतात .

म्हणजे आता रोजगार जर का खरंच अत्यंत गरजेचं आणि आवश्यकच असेल तर काय करायला हवं ?
याबाबतीत माहिती किंवा त्या मुलांपर्यंत त्या बातम्या दिल्या जात नाही  किंबहुना पोहचत नाहीत . त्या वृत्तपत्रातून किंवा न्यूज चॅनल्स मधून दिल्या जातात आणि जर का आता मोठ्या स्तराचा विचार करायला गेला तर इन्स्टाग्राम असेल , व्हाट्सएप असेल किंवा अजून ट्विटर , फेसबुक , युट्युब असेल या सगळ्यांवरती याच्या जाहिराती आपल्याला दिसून येतात . तेव्हा त्याद्वारे आपल्याला दिसतात . आपल्याला बसल्या बसल्या याबद्दल माहिती मिळते . आपण याबद्दल तिथेच खात्री करून घेऊ शकतो . ते ही गुगल सारख्या एका मोठ्या महाजालावरती आपण ह्याबद्दल सर्च करू शकतो . याची सत्यता पडताळून पाहू शकतो .


एकावेळी आपण मल्टीलास्टिंगही करू शकतो . या गोष्टींमुळे जास्त वाया जाणारा आपला वेळही वाचतो आणि एकावेळी अनेक कामे पटकन होऊन ही जातात .

आता आपण जर का इंस्टाग्राम वरती बघितलं तर सोनिया पाटील मॅडम असतील किंवा इतर अनेक महिला उद्योजक असतील किंवा बाकीचे पुरुष उद्योजक असतील . मधुरा रेसिपी सारख्या मधुरा मॅडम असतील यांच्याबद्दल आपण पाहतो , ऐकतो आणि वाचतो . अर्थात हे फक्त इंस्टाग्राम मध्ये , तर मधुरा मॅडमचा युट्युब वरती ही त्यांचे चॅनल आहे . त्यांचा हा यशस्वी प्रवास नक्कीच सोपा नव्हता . पण ; त्यांनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या . आणि जर का आपल्या हातात सोशल मीडियाच नसती , ही प्रसार माध्यमच नसती तर त्यांच्याबद्दल आपल्याला कसं कळलं असतं ना ?


आता जर का तळागाळातल्या लोकांचा विचार करायचा असेल तर अनेक महिला या आपल्याला जमेल का ?
इथ पासून त्यांची सुरुवात असते . म्हणजे अस की त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असते . परंतु , जर का मधुरा मॅडमचा आदर्श घ्यायचा झाला तर त्या जेव्हा दहावीत होत्या तेव्हाचा प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो .

प्रत्येक वेळेला माणूस लहान घरातून मोठ्या घरात जाण्याचे स्वप्न पाहतो परंतु त्या शंभर स्क्वेअर फुट मधून पन्नास स्क्वेअर फुट वरती आल्या . आहेत तस त्यांना राहत्या घरामधून वस्त्रानिशी बाहेर काढलं होतं . त्यानंतर मॅडम एका साध्या सहा पत्राचा शेड मारून त्या एका छोट्याशा जागेमध्ये राहिल्या होत्या . तिथे बाकीच्या भावंडांना आणि ह्यांना सरळ झोपता ही येत नव्हतं . एका कुशी वरती होऊन झोपायला लागायचं . परिस्थिती खूपच बेताची होती .  त्यात त्यांनी ग्रॅज्युएशन करता करता जॉब केला . त्यांना वर्क एक्सपिरीयन्स खूप होता त्यांना कामाचा....!


त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या . त्यानंतर त्यांनी जॉब केला . खरं तर पोटात बाळ असताना शेवटच्या दिवसापर्यंत ही त्या अमेरिकेमध्ये पडणाऱ्या बर्फाच्या पावसामधून वाट काढत काढत आपलं काम करत होत्या . बाळ झाल्यानंतर बाळ लहान होतं आणि त्यांना रिकाम बसण्याची सवय नव्हती . मग त्यावेळी त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा ठेवा घेत आपले भारतीय पदार्थ अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलं आणि निश्चितच हा प्रवास त्यांचा सोपा नक्कीच नव्हता परंतु आपल्या सोशल मीडियाचा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा वाटा असलेला आपल्याला दिसून येतो .

त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दलचा प्रवास हा थोडक्यात युट्युब वरती एका व्हिडिओमध्ये "जोश टॉक्स मराठी " या चॅनलच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलाच आहे आणि आज या लेखामध्ये मला ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते . कारण निश्चितच ह्या मॅडममुळे अनेक स्त्रियांच्या मनामध्ये असो किंवा अनेक तरुणींच्या , अनेक तरुणांच्या अर्थात कोणत्याही एखाद्या  माणसाच्या मनामध्ये जर का उमेद नाहीशी झाली असेल किंवा खचून गेले असेल किंवा मग निराशा ठाकली असेल तर त्या व्यक्तीला नव्या उत्साहाने काम करण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल .

यासाठीच प्रसार माध्यम चांगलीच आहेत . कारण या गोष्टीतून आपल्याला माहिती मिळते . रोजगाराच्या संधी या गोष्टीतून आपल्याला उपलब्ध होताना दिसतात . आता जर का कोरोना काळाचा विचार करायला गेलं तर एकीकडे माणसांना एकमेकांना भेटायला बंदी होती परंतु जेव्हा माणसांना जेवणासाठी अन्न , पिण्यासाठी पाणी , बाकी औषध या सगळ्यांची गरज होती तेव्हा हेच सोशल मीडिया होत त्यांना मदत करायला आणि त्यांच्याकडून मदत मिळत होती .

एकीकडे माणसाला माणसापासून दूर जायला हा रोग भाग पाडत होता . तर तिकडे या सोशल मीडियाच्या माध्यमातून माणसं माणसांच्या जवळ येत होती . असा आपल्याला दिसत होतं . मग ज्या सोशल मीडियामुळे आपल ज्ञान वाढत , आपल्या विचारांमध्ये सतत विवेक बुद्धी जागृत होते , सद् विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये अगदी आपसूक रीतीने निर्माण होते ती प्रसारमाध्यम निश्चितच चांगलीच आहेत...! हे आपल्याला दिसून येतं .

"जो मागे पडला तो संपला " असं म्हणतात ते काय खोटं नाही ना ?
पाहायला गेलं तर प्रसारमाध्यमांद्वारे आपल्याला अनेक गोष्टींच ज्ञान मिळतं आणि आपण या अनभिज्ञ जगापासून प्रत्येक गोष्टीचा ज्ञान मिळून प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्याच्या मागे लागतो . नक्कीच प्रसार माध्यमे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली आहेत .

©® सौं तृप्ती कोष्टी
जिल्हा - सांगली , सातारा