प्रणिती भाग ६

प्रणिती! जी आपला भूतकाळ मागे टाकत त्याच्याशी लग्न करून त्याच्या घरी आली. त्याच्या मुलांना सावत्र असूनही सख्ख्या आईप्रमाणे जीव लावला. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांना मात्र तिने चांगलाच धडा शिकवला. नंतर मग सुखाचा संसार! असा हा प्रवास जाणून घेण्यासाठी वाचा, unknown Words जानकी ?? लिखित, ' प्रणिती '...


              सर्वजण देवदर्शन करून थकून भागून घरी परतले होते. प्रणितीने प्रिन्सेसला नर्मदांकडे दिलं आणि सगळ्यांसाठी पाणी आणायला गेली. तिने एका ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास भरून घेतले, पण त्याआधी तिने गॅसवर चहासाठी पाणी गरम करायला ठेवलं. सर्वांना पाणी देऊन ती पुन्हा किचनमध्ये गेली आणि चहा बनवू लागली. दिवसभरात एवढी थकलेली असून सुद्धा ती सर्वांचं पाहत आहे म्हणून प्रज्ञाही  काळजीने तिच्यामागे गेली. तिने आत जाऊन तिला बाहेर सर्वांसोबत बसायला पाठवलं. प्रणिती खूपच थकल्यासारखी वाटत होती. गड चढायचा थकवा नव्हता, पण आरवने खूप दमवलं होतं तिला उतरायच्या वेळेस. नुसता इकडून तिकडे पळत होता. तो पडेल या भीतीने ती पण त्याच्यामागे पळत होती. राजवीरने तर त्याला एकदा दोनदा रागवलं पण होतं. पण छोटा बच्चा तो, थोड्यावेळाने जैसे थे. शेवटी गाडीत बसल्यावर तो झोपी गेला. पायही खूप दुखत होते त्याचे. ती त्याला आणि प्रिन्सेसला घेऊन बसली होती. घरी आल्यावर पण ती सर्व पाहत होती. कंबर, पाय दुखू लागले होते, तरीही तिला स्वतःची काळजी नव्हती. ती सारखी सारखी सोफ्यावर मागे मान टाकून बसलेल्या राजवीरला पाहत होती. त्याच्या बाजूलाच आरव आडवा झोपलेला होता. 

             मेड्सने जेवण वैगरे बनवायला सुरुवात केली. तोपर्यंत आराम म्हणून सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेले होते. राजवीर उठायचा कंटाळा करत होता, म्हणून प्रणितीही तिथल्याच दुसऱ्या सोफ्यावर झोपून गेली. प्रिन्सेस तिच्या आजीजवळ होती, तर आरव राजवीरच्या कुशीत शिरला होता. ते सर्व झोपले होते, पण प्रज्ञा जागीच होती आणि तिने दोन - तीन मेड्सना हाताखाली घेऊन राजवीर प्रणितीची रूम छानपैकी सजवून घेतली. आज त्यांची पहिली रात्र होती. किचनमधल्या मेड्सने स्वयंपाक झाल्यावर सर्वांना उठवून घेतलं आणि जेवायला बोलावलं. सर्वजण उठून फ्रेश झाले आणि जेवायला बसले. आरव अजूनही पेंगत होता. तो राजवीरच्या शेजारी बसलेला होता. आणि त्याच्या शेजारी प्रणिती होती. जी त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न करत होती. 

" आरू, आ कर बाळा. " प्रणिती घास त्याच्या तोंडासमोर धरत म्हणाली. तसं त्याने झोपेतच आ केलं. तिने त्याच्या तोंडात छोटा घास ठेवला, पण तो झोपेच्या गुंगीमुळे चावेना. 

" आरू, घास चावून खा बाळा. " प्रणिती पुन्हा म्हणाली, तसं त्याने झोपेतच तो घास चावला आणि गिळून घेतला. त्याच्या अशा वागण्याचं सर्वांना हसू येत होतं. कसंबसं प्रणितीने त्याला जेवू घातलं. 

               जेवणं आटोपून सर्वजण पुन्हा झोपायला चालले होते. तसा प्रज्ञाने राजवीरच्या हातात एक बॉक्स ठेवला. त्याने तो उघडून पाहिला, तर त्यात एक कुर्ता पायजमा होता. 

" आज तुमची पहिली रात्र आहे. सो, माझ्याकडून तुला हे गिफ्ट! " असं म्हणत तिने त्याला तयार व्हायला त्याच्या रुममध्ये न पाठवता गेस्टरूममध्ये पाठवलं. रजनी हे सर्व पाहत होती. तिला या सर्वांचा खूप राग येत होता. 

प्रज्ञा प्रणितीला तिच्या रुममध्ये घेऊन गेली. तिने तिच्यासाठी मस्त लाल रंगाची झिरमिरीत साडी घेतली होती. केसांत लावायला गजरा मेड्सतर्फे आणून ठेवला होता. हातात हिरव्या बांगड्या, पायात पैंजण, गळ्यात फक्त मंगळसूत्र, कपाळावर लाल टिकली आणि भांगेत कुंकू या व्यतिरिक्त काहीच मेकअप नव्हता तिचा. तरीही खूप सुंदर दिसत होती ती. प्रज्ञाने तिला तयार करून राजवीरच्या खोलीत आणलं आणि बेडवर बसवलं. रूम पाहून तर प्रणिती हरखून गेली होती. खूपच सुंदर सजवली होती प्रज्ञाने रूम. प्रणिती विचारातंच होती की राजवीर रूममध्ये आला. त्याने पूर्ण रूमभर नजर फिरवली, तर त्यालाही खूप छान वाटली रूम. रुममध्ये नजर फिरवता फिरवता त्याची नजर बेडवर गेली. त्या गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेल्या बेडवर प्रणिती नावाचं फूल खुपच आकर्षित वाटत होतं. त्याने दरवाजा लावून कडी घातली आणि बेडवर तिच्या पुढे जाऊन बसला. प्रणितीने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि परत लाजून नजर खाली केली. त्यावरून त्याला कळालं होतं की ती लाजली आहे ते. त्याने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर केला. तो एकसारखा तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. तो पाहतच होता की ती अचानक बोलली. 

" अहो, एक ऐकाल का? " प्रणिती हळू आवाजात म्हणाली. 

" हो, बोल ना! " राजवीर तिचा हात हातात घेऊन म्हणाला. 

" प्रिन्सेस अजून लहान आहे तर ( थोडं थांबली ) आपण थोडं थांबूयात का? बेबी अजून लहान आहे. त्यात नको रिस्क घ्यायला. " ती तिच्या मनातलं बोलून मोकळी झाली. तसा राजवीर कौतुकाने तिच्याकडे पाहत होता. आजपर्यंतच्या मुली ज्या त्याच्यासाठी चालून आल्या होत्या, त्या एकतर त्याच्या शरीरावर फिदा होत्या नाहीतर काही त्याच्या प्रॉपर्टीवर. पण प्रणिती पहिलीच अशी होती जी सवतीच्या मुलांसाठी स्वतः नात्याला पुढे न्यायला थांबा म्हणत होती. त्याला खरोखरंच तिचा अभिमान वाटला. त्याने तिचा हात घट्ट पकडला. 

" मी आदर करतो तुझ्या निर्णयाचा! " असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसे तिने डोळे मिटून घेतले. त्याने खाली झुकून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आणि मिश्किल हसत तिला विचारलं. 

" यासाठी तर मनाई नाही आहे ना? " राजवीर हसत म्हणाला, तशी ती लाजली. 

" नाही. " ती लाजत नकारार्थी मान हलवत म्हणाली, तसा तो पुन्हा हसला.

तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी पकडला आणि पुन्हा तिला किस करू लागला. तीही त्याला प्रतिसाद देत होती. जरी शरीराने नसले, तरी मनाने ते एकमेकांना समजून घेत होते. काहीवेळाने त्याने तिला सोडलं. तशी तिने नजर झुकवून घेतली.

" तुला माहित आहे प्रणिती? निताही अगदी तुझ्यासारखीच होती. सुंदर, सालस, सर्वांना समजून घेणारी आणि सर्वांना आपलंसं करणारी. मलाही तिने तशीच तिच्या मनमोहक स्वभावाने भुरळ घातली होती. " राजवीर तिच्यापासून बाजूला होत निताबद्दल बोलू लागला, तशी ती त्याच्याकडे पाहू लागली.

" तुम्ही खूप प्रेम करत होतात ना त्यांच्यावर? " प्रणितीनेही न राहवून विचारलं, तसा तो हलका हसला.

" खूप..! " राजवीर निताचा विचार करत म्हणाला, तशी तीही विचार करू लागली. शेवटी तिला एक विचारावसं वाटलं.

" एक विचारू का? " प्रणितीने हळू आवाजात विचारलं, तशी त्याने आपल्या विचारातून बाहेर येऊन तिच्याकडे पाहून होकारात मान हलवली.

" तुमचं तुमच्या पहिल्या पत्नीवर एवढं प्रेम असतानाही, तुम्ही माझा स्वीकार कसा काय केलात? तेही एवढ्या लवकर? म्हणजे आपल्या लग्नाला फक्त ५ दिवस झाले आहेत. तुम्ही लग्नाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच मला स्वीकरलं आहे. असं का? " प्रणितीने न राहवून मनातला प्रश्न विचारला, कारण कुठलाही नवरा आपल्या पहिल्या बायकोवर अपार प्रेम असताना दुसऱ्या बायकोला सहज स्वीकारणार नव्हता. तिच्या त्या प्रश्नावरही राजवीर हसला.

" तुझी आणि माझी ओळख झाली ना प्रणिती, तशीच निता आणि माझी झाली होती. मग ते पाहण्याच्या कार्यक्रमात असो की लग्नाच्या मंडपात. फरक फक्त एवढाच की ती हसतमुखाने माझ्यासमोर होती आणि तू नाराज मनाने. तुझ्या नाराजीचं कारणही मला माहित होतं, म्हणूनच तुला एवढं प्रेम देण्याचा निश्चय केला की तुला भेदभाव वाटला नाही पाहिजेत आणि निताचीही तशीच इच्छा होती. जसं की मी आधीही सांगितलं निता आणि तू सारखीच. प्रिन्सेस झाल्यानंतर फक्त अर्धाच तास ती जगली होती. त्याच वेळेत ती आम्हा सर्वांशी बोलली होती. निताचीही जाण्याआधी हीच इच्छा होती की मी तिच्यासारखीच मुलगी या घरची सुन, माझी बायको आणि माझ्या मुलांची आई म्हणून आणावी. तिलाही तसंच प्रेम द्यावं जसं निताला देत होतो. तिची शेवटची ती इच्छा मोडावी वाटली नाही. आई आणि बाबांनीही मनावर घ्यायला सांगितलं. प्रिन्सेस एवढी छोटी की तिलाही आईची गरज होती. त्या बाबतीत मी स्वार्थी होतो, म्हणूनच तुझ्यापासून लपवून ठेवली होती ही गोष्ट. " राजवीर तिच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाला, तशी ती आणखीच प्रश्नात पडली.

" म्हणजे तुम्ही हे लग्न फक्त निता ताईंच्या इच्छेखातर केलं आहे? तुम्हाला माझ्याप्रति काहीच भावना नाहीत. " प्रणितीने पुन्हा विचारलं, आणि नेहमीप्रमाणे राजवीर हसला. 

" उगाच गैरसमजाला मनात जागा देऊ नकोस प्रणिती. निताची सावली मला तुझ्यात दिसली आणि म्हणूूनच मी होकार दिला. तुलाही सहज स्वीकारायचं ठरवलं. आता तुझे प्रश्न संपले असतील तर झोप. सकाळी मलाही ऑफिसला जायचं आहे. " राजवीर हसून म्हणाला, तशी तीही हलकी हसली. त्याने बेडवर अंग टाकलं आणि झोपून गेला. ती मात्र तशीच विचार करत राहिली.

' तरीही तेच आलं ना राजवीर. तुम्ही फक्त निता ताईंची छबी माझ्यात दिसते, माझा स्वभाव निता ताईंसारखा आहे म्हणून मला स्वीकारलं आणि म्हणूनच माझ्यावर प्रेम करत आहात. पण मी तर माझ्या पहिल्या नवऱ्यासारखी एकदी गोष्ट तुमच्यात शोधली नाही, तरीही तुमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत आहे. हे असं सारखं सारखं आहे म्हणून प्रेम नको राजवीर. तुम्हाला मनातून प्रेम नसणार तर मलाही ते नको आहे. अशाने तुम्हाला काही वाटणार नाही, पण मला नक्कीच त्रास होईल. बाकी, मुलांच्या प्रेमात मात्र मी कसलीच कमी सोडणार नाही. ते निरागस आहेत आणि माझी ममताही आहे. आरव आणि प्रिन्सेसला मी कधीच अंतर देणार नाही. कधीच नाही. ' प्रणिती राजवीरच्या बोलण्यावर विचार करत म्हणाली. हलके हलके डोळेही पाणावले होते. तिला राजवीरच्या बोलण्याचा त्रास होत होता. तो निता आणि ती सारखीच आणि निताची शेवटची इच्छा म्हणून तिला बायको म्हणून स्वीकारत आहे याचं वाईट वाटत होतं. नंतर तिनेही हलके पाणावलेले डोळे पुसले आणि बेडवर झोपून घेतलं. विचारातच काही वेळातच तिला झोप लागली.

             मध्यरात्री अचानक त्यांच्या रूमचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला, तशी प्रणितीला जाग आली. तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला. आवाजाने राजवीरही उठला होता. तिने दरवाजा उघडल्याबरोबर प्रज्ञा बाळाला घेऊन उभी दिसली. प्रिन्सेस खूपच रडत होती. नाईलाजाने प्रज्ञाला प्रिन्सेसला घेऊन यावेळी तिच्याकडे यावं लागलं होतं. प्रिन्सेसचा रडण्याचा आवाज ऐकून राजवीरही दरवाजात आला. प्रणितीने पटकन प्रिन्सेसला हातात घेतलं आणि हाताचा पाळणा करून तिला झुलवू लागली. तशी ती इतकुशी प्रिन्सेस तिच्या आईच्या कुशीत शांत झाली. घरातले सर्वच तिच्या रडण्याच्या आवाजाने जागे झाले होते. ती रडतच तशी होती. तिलाही दोन दिवसांत प्रणितीच्या कुशीची, मायेची सवय झाली होती. अचानक जाग आल्यानंतर तिला ती मायेची कुशी तिच्या शेजारी जाणवली नाही म्हणून ती रडत होती. ती आता तिच्या आईच्या कुशीत शांत झाली होती. तसे सगळे हसले. नर्मदांच्या आणि राजवीरच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. प्रणितीने प्रिन्सेसच्या दूधाची बाटली मागवून घेतली. तिने सर्वांना झोपायला जायला सांगितलं. आरवनेही त्याच्या मम्माजवळच झोपणार म्हणून हट्ट केला. प्रणितीने त्याला आत घेतलं आणि दरवाजा लावून घेतला. आपल्या दोन्ही लेकरांना मध्ये घेऊन ते दोघेही झोपी गेले, पण जागी झाल्यामुळे प्रणितीच्या डोक्यातलेही विचार पुन्हा जागे झाले होते. 

क्रमश:


🎭 Series Post

View all