Feb 23, 2024
नारीवादी

प्रणिती भाग ३

Read Later
प्रणिती भाग ३
                प्रणितीने त्या छोट्याश्या परीला राजवीरच्या रुममध्ये आणलं आणि बेडवर अलगद झोपवलं. बाकी सर्वजण तिच्या मागेच आले होते. तिने प्रिन्सेसला झोपवून दिल्यामुळे आरवही लगेच बाळाच्या बाजूला जाऊन झोपला. तसं तिने बेडवर बसत दोघांनाही थोपटून झोपू घातलं. तिच्या थोपटण्याने आरवही शांत झोपी गेला. बराच वेळ झाला होता. दोघेही झोपी गेल्याची खात्री करून तिने उठून त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकून दिलं. नंतर तिने या सर्वांकडे पाहिलं आणि मग राजवीरकडे एकटक पाहू लागली. तिच्या पाहण्याने त्याला समजलं की तिला त्याच्याशी एकांतात बोलायचं आहे. त्याने सर्वांना बाहेर जाण्यासाठी खुणावलं. आता तरी काहितरी मोठा धमाका होईल असं शोभा मामींना वाटलं. सर्वजण बाहेर गेल्यावर राजवीरने दरवाजा लावून घेतला आणि तिच्यापुढे गुपचूप येऊन उभा राहिला. 

" अहो, काय आहे हे सर्व? हे सगळं का लपवलंत तुम्ही माझ्यापासून? तेही एवढं मोठं सत्य! आपल्याच आयुष्याशी निगडीत असलेलं! " प्रणिती नाराज आवाजात म्हणाली, चिडलेली सुद्धा वाटत होती. पण तिचं चिडणं स्वाभाविक होतं.

" सॉरी प्रणिती, पण आम्हाला वाटलं की कदाचित हे सर्व कळाल्यावर तू लग्नाला तयार होणार नाहीस आणि झालीस तरी तू मुलांना सांभाळणार नाहीस म्हणून हे सर्व लपवलं. " राजवीर खाली मान घालत म्हणाला. त्याने तिला आत्तापर्यंतच्या आलेल्या अनुभवावरून सांगितलं.

" बास्स, एवढंच कारण? तुम्हाला माझ्याकडे पाहून वाटलं का तसं काही? माझा पास्ट माहित असूनही जर तुम्ही मला या घरची सून आणि तुमची बायको म्हणून स्वीकारू शकता, तर मग मी तुमच्या मुलांना का नाही सांभाळू शकत? तुम्हाला असं का वाटलं की मी या मुलांना आईचं प्रेम नाही देऊ शकत? या मुलांच्या ऐवजी मी येताना माझी मुलगी सोबत घेऊन आले असते, तर तुम्ही नसतं का तिला एका वडिलांचं प्रेम दिलं? अहो, जशी ही लेकरं आईच्या प्रेमासाठी, मायेसाठी तरसत आहेत ना, तशीच मी ही मुलांसाठी तरसत आहे. माझ्या मुलीसाठीही त्यांनी दुसरी आई आणलीच ना? मग मला निदान हे तरी सांगायचं होतं की तुला सुद्धा २ मुलं असणार आहेत. मी राजीखुशीने सगळं स्वीकारलं असतं, पण तुम्ही नाराज केलंत मला. ही गोष्ट लपवून ठेवली तुम्ही. खूप त्रास वाटतोय मला या सगळ्यांचा. " प्रणिती रडत म्हणाली आणि त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. रडत होती ती कळालं राजवीरला. त्या मुलांना आई नव्हती याचं तर दुःख वाटलंच तिला, पण घरच्यांनी आपल्यापासून ही गोष्ट लपवली म्हणून नाराजही होती. ती रडू लागली, तसा राजवीर तिच्या मागे येऊन उभा राहिला.

" प्रणिती, प्लीज माफ कर! खरंच यामागे आमचा वाईट किंवा तुला दुखावण्याचा हेतू नव्हता. आम्ही नंतर तुला सांगणारच होतो, पण वेळच नाही भेटला लग्नाच्या गडबडीत. माझ्याकडे पहा ना एकदा प्लीज! " राजवीर कळकळीने म्हणत होता. तो तिला खांद्यावर हात ठेवून स्वतःकडे वळवू लागला, पण ती वळायला तयार नव्हती. तेवढ्यात दारावर टकटक झाली. राजवीरने जाऊन दरवाजा उघडला, तर दरवाजात नर्मदा उभ्या होत्या.

" मी काही बोलू का प्रणिती बाळा? " नर्मदा आत येत म्हणाल्या, पण तरीही तिने मागे वळून पाहिलं नाही. तशा नर्मदा दुसऱ्या बाजूने तिच्यापुढे उभ्या राहिल्या. 

" प्रणिती, खरंच माफ कर बाळा. आम्ही तुला सांगायला हवं होतं, पण नाही सांगितलं भीतीपोटी. याआधी भरपूर काही सहन केलं होतं आम्ही यामुळे, म्हणून तुलाही सांगायला घाबरत होतो. घरातल्या सर्वांना तू पाहिल्याबरोबर आवडली होतीस, म्हणून आम्ही लपवायचं ठरवलं. तू पण नकार दिलास तर ! प्रिन्सेसचा जन्म झाला आणि तिची आई गेली. आमची सून आम्हाला मुलीसारखी होती. अगदी तुझ्यासारखीच होती प्रेमळ, सर्वगुणसंपन्न! माझा राजवीरही खूप प्रेम करायचा तिच्यावर. तिच्या जाण्याने सर्वच खचले होते. माझ्या राजवीरचं वयंच काय आहे गं! फक्त ३० वर्षे! एवढ्या कमी वयापासून त्याने एकट्याने कसं जगायचं? त्यात मुलांनाही आईची गरज होती, म्हणून मुलगी शोधत होतो. याआधीही कितीतरी मुलींचे स्थळ आले होते, पण त्यांच्या अटीही तशाच होत्या. त्यांना फक्त राजवीरची बायको व्हायचं होतं, पण मुलांची जबाबदारी नको होती. तुझं स्थळ आल्यानंतर आम्हाला सर्वांनाच तू खूप आवडलीस. खास करून राजवीरला. आणि हे स्थळ हातातून जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून लपवलं होतं. स्वार्थी झालो होतो आम्ही त्या बाबतीत. आम्ही तुझी फसवणूक केली असं जर तुला वाटत असेल, तर माफ कर बाळा आम्हाला." नर्मदा तिच्यासमोर हात जोडत म्हणाल्या, तसे तिने पटकन त्यांचे हात धरून छातीशी धरले. 

" मला माफ करा आई! पण तुम्हीही माझा स्वीकार केलाच ना. मग तुम्ही माझ्याबद्दल एवढा अविश्वास का बाळगला आई. थोडातरी विश्वास ठेवायचा होता ना माझ्यावर. मला जर आधीच हे सर्व माहित असतं तर मी माझ्या या दोन्ही लेकरांना घेऊन मिरवले असते लग्नात. प्लीज, पुन्हा असं काही लपवू नका. आणि हो, आता ही मुले माझी आहेत. मी त्यांची आई आहे. कोणी काही म्हटलं तरी हे सत्य बदलणार नाही. तुम्हीही लक्षात ठेवाल. " प्रणिती ठामपणे म्हणाली, तसा नर्मदांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. तिने पुढे होऊन त्यांना मिठी मारली. त्यांनीही तिला प्रेमाने जवळ घेत कुरवाळलं. राजवीरलाही त्याच्या चॉईसवर गर्व वाटत होता. तो जोडीदार निवडताना आधीही योग्य होता आणि आताही योग्यच निघाला. 

              दरवाजात उभे असलेले सर्वांचेच डोळे पाणावले होते तिचे शब्द ऐेकून. शोभा मामी आणि रजनीची तर लाहीलाही होत होती. त्यांना वाटलं होतं की प्रणिती सर्व माहित झाल्यावर घर सोडून निघून जाईल, पण तसं काही झालंच नाही. उलट तिने त्या मुलांना आणि राजवीरलाही स्वीकारलं होतं. 

" चला, मी निघते. रात्र खूप झाली आहे. झोपा आता तुम्ही दोघेही. उद्यापासून देवदर्शन करून आणायचंय तुमचं. " नर्मदा हसून म्हणाल्या, तशी प्रणिती त्यांच्यापासून बाजूला झाली आणि होकारार्थी मान हलवली. नर्मदा निघून गेल्या, तसे त्यांच्यामागे सर्वजण निघून गेले. प्रज्ञाने जाता जाता शोभा मामीला किलर स्माईल दिली. तशा त्या आणखीनच चिडल्या. पाय आपटतच तिथून निघूून गेल्या. 

                 सर्वजण निघून गेले, तशी राजवीरने दरवाजाला कडी लावली. राजवीर आणि प्रणिती दोघेही फ्रेश होऊन आले. आरवच्या बाजूला राजवीर आणि प्रिन्सेसच्या बाजूला प्रणिती झोपली. तिने दोन्ही मुलांच्या अंगावर तिचा उजवा हात टाकून त्यांना जवळ घेतलं. तसा राजवीरही एका कुशीवर होऊन तिच्याकडे पाहू लागला. तिनेही तसंच त्याच्याकडे पाहिलं. त्याने हळूच आपला डावा हात तिच्या उजव्या हातावर ठेवला. तशी ती हलकी शहारली. ती लाजून हात बाजूला घेणार तर त्याने तो पकडून ठेवला. तिने अजूनच लाजत त्याच्याकडे पाहिलं, तर त्याने नजरेनेच हात राहू दे असा इशारा केला. मग तिनेही चुळबूळ न करता हात तसाच ठेवला. त्याने तिचा हात अजूनच घट्ट धरून ठेवला आणि तिच्याकडे पाहतच झोपी गेला. तो झोपला तशी तीही झोपेच्या अधीन गेली. दिवसभराच्या धावपळीने सगळेच थकलेले होते. त्यामुळे पडल्या पडल्याच सर्वजण झोपी गेले, पण शोभा मामी अजूनही जाग्याच होत्या. त्यांच्या मनाविरुद्ध झाल्याने त्यांना खूपच त्रास होत होता. पण याचाही बदला त्या घेणार होत्या. मनोमन त्यांनी हजारो प्लॅन्स तयार केले प्रणितीला घरातून बाहेर काढण्यासाठी. त्यांनी एकनजर त्यांच्या मुलीकडे टाकली, तर ती मस्तपैकी झोपली होती. शोभा मामींनी डोक्यावर हात मारून घेतला आणि झोपून गेल्या. 

क्रमशः  
   


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Unknown Word's जानकी ??

Housewife

I Am Just A Housewife...

//