प्रणिती भाग १

प्रणिती! जी आपला भूतकाळ मागे टाकत त्याच्याशी लग्न करून त्याच्या घरी आली. त्याच्या मुलांना सावत्र असूनही सख्ख्या आईप्रमाणे जीव लावला. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांना मात्र तिने चांगलाच धडा शिकवला. नंतर मग सुखाचा संसार! असा हा प्रवास जाणून घेण्यासाठी वाचा, unknown Words जानकी ?? लिखित, ' प्रणिती '...
                  मंगलाष्टका झाल्या आणि दोघांच्या मधला अंतरपाट बाजूला झाला. तशी त्याची नजर तिच्यावर गेली. तो एकसारखा तिला पाहू लागला. खूपच सुंदर दिसत होती ती. त्याची नजरच हटत नव्हती. ती मात्र खाली मान घालून उभी होती. कुठलेच भाव नव्हते तिच्या चेहर्‍यावर. पंडितच्या आवाजाने तो भानावर आला. आधी तिने त्याला आणि मग त्याने तिला वरमाला घातली. नंतर मग सप्तपदी. त्या सप्तपदीं सोबत सात वचनं ही घेतले गेले. मंगळसूत्र, सिंदूर दान, कन्यादान सर्व काही झालं. तिला आईवडिल नसल्याने तिच्या काका काकूंनी तिचं कन्यादान केलं. तिचा चेहरा जरा उदासच वाटत होता. लग्न विधिवत पूर्ण झालं आणि तिची पाठवणी झाली. गाडीत बसल्यावर तिने डोळे बंद केले आणि रिलॅक्स होऊ लागली. तो मात्र चोरून चोरून तिच्याकडे पाहत होता. 

                     तो म्हणजे राजवीर कुलकर्णी. खूप मोठ्या खानदानाचा एकुलता एक वारस. बिझनेसमध्ये टॉप असा ३० वर्षांचा युवक. दिसायला हँडसम, ग्रेईश डोळे, लांब नाक, थोडासा गव्हाळ रंग, अंगकाठीने मजबूत. अगदी कोणतीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल असा तो राजवीर. घरातही सर्वांचा लाडका होता. पण अजूनही काहीतरी होतं त्याच्या आयुष्यात, जे त्याला आणि त्याच्या घरच्यांना माहित होतं पण त्याच्या नव्या नवरीला माहित नव्हतं. त्यामुळे कुठेतरी त्याच्या मनात अपराधीपणाची भावना होती की नवीन नातं खोट्यापासून सुरु झालं. त्या नात्याची सुरुवात होईल की सुरु होण्याआधीच संपेल हे त्याला माहित नव्हतं. 

                ती म्हणजे प्रणिती चव्हाण. लहानपणी आईवडिल वारलेले म्हणून काका काकूंसोबत रहात होती. साधी सरळ, सोज्वळ जिथे कुठे जाईल, तिथे तिथे सर्वांना आपल्या निर्मळ स्वभावाने आपलंसं करून घेत होती. ना मनात कुठला कपट आणि नाही वाईट विचार. तरीही नशिबाने वेगळाच खेळ मांडला होता तिच्या आयुष्याचा. तो असा की हे तिचं दुसरं लग्न होतं. पहिल्या नवर्‍याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला डिवॉर्स दिला होता. पहिल्या नवऱ्यापासून तिला एक छोटीशी ५ वर्षांची मुलगी सुद्धा होती. जी सध्या तिच्या पहिल्या नवऱ्याकडे होती. लाख प्रयत्न करून पण तिला तिची मुलगी मिळाली नव्हती. पहिल्या लग्नामुळे तिला खूपच धक्का बसलेला होता. तिच्या काळजीपोटी तिच्या काका काकूंनी ती नाही म्हणत असतानाही तिचं राजवीर सोबत लग्न ठरवलं. एकट्या बाईला आयुष्य काढणं खूपच कठीण असतं हे माहित होतं त्यांना. त्यामुळे त्यांनी तिला समजावून सांगून लग्न लावून दिलं. तिच्याबद्दल राजवीर आणि त्याच्या घरातल्यांना माहित होतं. त्यामुळे राजवीरची मामी या लग्नाला नाखुश होती. कारण त्यांची इच्छा होती की राजवीरशी त्यांच्या मुलीचं म्हणजेच रजनीचं लग्न व्हावं. फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी. त्यांची पहिल्यापासूनच त्यांच्या घरावर आणि प्रॉपर्टीवर नजर होती, पण घरच्यांना आणि राजवीरलाही रजनी पसंत नव्हती. त्याचं कारण तिचा स्वभाव. लेट नाइट पार्ट्या, क्लब, मित्र मैत्रिणीसोबत हुंदडणं बस्स एवढंच काय ते तिला येत होतं. तिलाही राजवीर फार पूर्वीपासून आवडायचा. पण त्याच्यावर हक्क वैगरे काय तिला दाखवता आला नाही. त्याला मिळवण्याचे केलेले  तिचे सगळे प्लॅन्स फेल ठरायचे. 

                      थोड्याच वेळात गाडी थांबली तसे प्रणितीने डोळे उघडले. तिने समोर बघितलं आणि तिचे डोळेच मोठे झाले. समोर दिमाखात उभा असलेला  कुलकर्णी यांचा बंगला सजून धजून त्या नवीन जोडप्यांच्या स्वागतासाठी सज्ज होता. तिच्या मनात उगाचंच एक विचार चमकून गेला. कुठे तिचं साधं सुधं घर आणि कुठे हा राजवाडा. ती तिच्या विचारात तशीच गाडीत बसून होती. तिच्या सासूबाई म्हणजेच नर्मदा कुलकर्णी यांनी तिला आवाज दिला तेव्हा ती भानावर आली. 

" प्रणिती बाळा, ये चल खाली. " नर्मदा हसून प्रणितीला म्हणाल्या, तशी तीही हसून हो म्हटली. प्रणितीला नर्मदांचा स्वभाव माहित होता त्यामुळे तिला त्या खूप आवडायच्या. पण जास्त भेटीगाठी झालेल्या नव्हत्या म्हणून अजून तरी ती त्यांच्यासोबत मोकळी बोलत नव्हती. 

             ती खाली उतरली तसे एक एक करून बाकीचेही खाली उतरले. नर्मदा राजवीर आणि प्रणितीला घेऊन समोर चालत होत्या. त्यांच्यामागे बाकी सर्वजण चालत होते. ते थोडे पुढे गेले असतील की शोभा ( राजवीरची मामी ) यांनी प्रज्ञा ( राजवीरची मोठी बहीण ) हिला मागेच थांबवून घेतलं. 

" प्रज्ञा, मी काय म्हणते, की आता थोड्यावेळात प्रणितीला सगळं खरं काय ते कळेल. तर मग मी माझ्या ओळखीच्या एखाद्या वकिलाला बोलावून डिवॉर्स पेपर्स तयार करून घेऊ का? म्हणजे कसं की जेवढं लवकर होईल, तेवढं लवकर राजवीर आणि रजनीचं लग्न लावून देता येईल. माझ्या रजनीला तर सगळं माहित आहे ना. पण हिला काहीच माहित नाही. मग ती सगळं अॅक्सेप्ट करेल की नाही काय माहित. बघ विचार कर! मी लगेच वकिलांशी बोलते. " शोभा म्हणाल्या, तशी प्रज्ञा चिडली. 

" मामी, काय बोलत आहात तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का? डोकं बिकं ठिकाणावर आहे का तुमचं? जे तोंडाला येईल ते बोलत आहात. आता हे जर माझ्या वडिलांनी ऐकलं असतं ना, तर त्यांनी आत्ताच्या आत्ता तुम्हाला आणि तुमच्या त्या मुलीला घराबाहेर काढलं असतं. यापुढे ना जरा भान ठेवून बोलत जा. नाहीतर पश्चात्तापाची वेळ येईल तुमच्यावर. आणि राहिली गोष्ट प्रणितीने सगळं स्वीकारण्याची तर मला पूर्ण खात्री आहे. ती सगळं समजून घेईल. तेवढी समजदार आहे ती. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. " प्रज्ञा म्हणाली खरी, पण तीही जरा घाबरलेलीच होती. आपल्या भावाचा संसार सुखाचा व्हावा एवढीच काय ती तिची अपेक्षा होती. कारण तिचा भाऊ कोणत्या परिस्थितीतून गेलाय तिला चांगलच माहित होतं. 

" हो का? एवढा विश्वास आहे तुला तर मग खरं सांगून का नाही लग्न लावून दिलं? हे असं लपवून का ठेवलं मग ? हा तिचा विश्वासघात नाही का ? हे सगळं कळाल्यावर ती तुम्हाला माफ तरी करेल का ? हां ? जशी तुला खात्री आहे ना की ती सर्व स्वीकारेल, तशीच मलाही खात्री आहे की ती नाही सहन करू शकणार हे सगळं. त्यामुळे आधीच तयारी करून ठेवा. नाही येत्या काही दिवसांत तिने तुम्हाला डिवॉर्स मागितला ना तर लक्षात ठेवा. " शोभा म्हणाल्या आणि पुढे निघून गेल्या. प्रज्ञा तशीच विचार करत तिथेच उभी राहिली. मग भानावर येऊन सर्वांकडे निघून गेली. *************

                 दरवाजात तांदळाने भरलेलं माप ठेवलं होतं. प्रज्ञा हातात ओवाळणीचं ताट घेऊन आली होती. तिने दोघांचं औक्षण केलं आणि माप ओलांडून आत यायला सांगितलं. तिने एकदा त्या मापाकडे पाहिलं आणि तिला तिच्या पहिल्या लग्नाचा गृहप्रवेश आठवला. किती खुश होती ती त्यावेळी. तिच्या इच्छेने आणि आवडत्या मुलाशी जे लग्न झालं होतं तिचं. आनंद चेहऱ्यावर भरभरून दिसत होता. तिने त्याचा हात पकडून घरात प्रवेश केला होता. मागचं सगळं आठवून तिच्या डोळ्यांत पाणी आलं. ती त्या अश्रूंना थांबवू पाहत होती. तिने अजून माप नाही ओलांडलं म्हणून राजवीरने तिच्याकडे पाहिलं. त्यालाही तिची मनस्थिती कळली असावी बहुतेक. 

                     अचानक तिला तिच्या हातावर थंड हाताचा स्पर्श जाणवला. तशी ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली. तिने तिच्या हाताकडे पाहिलं, तर त्यावर राजवीरचा हात होता. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिला एक हलकी स्माईल दिली. जणू तो सांगत होता की मी आहे तुझ्यासोबत. तिने एक क्षण त्याला पाहिल्यानंतर माप ओलांडलं आणि ती लक्ष्मीच्या पावलाने घरात आली. 


क्रमशः

🎭 Series Post

View all