प्रामाणिकपणा एक सद्गुण

प्रामाणिकपणा एक सद्गुण

अष्टपैलू लेखक महासंग्राम स्पर्धा

पहिली फेरी - लघुकथा

कथेचे नाव - प्रामाणिकपणा एक सद्गुण

         तत्त्व घेऊन जगायचं...

          बांधून विचारांची गाठ...

          लढत राहायचं शेवटपर्यंत...

          मान ठेवून ताठ....

  'चल गं कमळे. चल थोड्या काटक्या आणूया जंगलातून.'असं म्हणत गणूने त्याची पत्नी कमळीला आवाज दिला. चला निघूया, असं म्हणत कमळी व गणू जंगलात काटक्या गोळा करण्याकरिता निघाले. जंगलात काटक्या  गोळा करत असताना कमळीला तहान लागली. ती गणूला म्हणाली ' अहो, मला खूप तहान लागली आहे. दिसते कां कुठे पाणी?'गणूने खूप शोधाशोध केली. त्याला तिथून काही अंतरावर एक विहीर दिसली. 'कमळे, ही बघ विहीर. जा पाणी पिऊन ये.'मी तोपर्यंत काटक्या गोळा करतो. म्हणत गणू तिथून निघून गेला.


विहीर मोठी होती. तिथे एक दोर, बकेट ठेवली होती. कमळी विहिरीच्या पायरीवर उभी राहून पाणी ओढू लागली. पण दुर्दैववश  ती पाय घसरून विहिरीत पडली. विहिरीतून ती ओरडू लागली पण कोणाला ऐकू जाणार? आसपास कोणीच नव्हते. इकडे आपली पत्नी अजून आली नाही म्हणून गणू कमळीला शोधण्यासाठी निघाला. आवाज देत देत 'कमळे अगं एक कमळे, कुठे आहेस? रस्ता चुकलीस कां? असे म्हणत म्हणत तो विहिरीजवळ पोहोचला.


संध्याकाळ होत आली होती. विहिरीजवळ त्याला कोणीच दिसले नाही. विहिरीच्या आत त्याने डोकावून पाहिले. पण आतले काहीच दिसत नव्हते. तो घाबरला. रडू लागला. अगदी गयावया करत परमेश्वराचा धावा करू लागला. ' कोण हा? मला आर्ततेने आवाज देत आहे.' चल जाऊनच पाहतो असे म्हणत परमेश्वर प्रकट झाला. तेव्हा त्याला विहिरीच्या काठावर कुणीतरी एक पुरुष जोरजोराने रडताना दिसला. ' कमळे,अगं एक कमळे, कुठे गेली मला सोडून. येना गं लवकर.'


त्या पुरुषाचे पत्नी प्रेम, त्याचा आक्रोश पाहून परमेश्वर व्यथित झाले. त्याने त्या पुरुषाची प्रेमाने विचारपूस केली.' तुझं नाव काय? तू कां रडतो आहेस? गणू ने आपले नाव आणि घडलेली इत्यंभूत कहानी सांगितली. परमेश्वराला दया आली. ' याला म्हणतात प्रेम 'परमेश्वर  पुटपुटला. आता आपल्याला काहीतरी केले पाहिजे, असं म्हणत त्याने गणूला धीर दिला व विहिरीच्या पाण्यात डुबकी मारली.व बाहेर आला. आता परमेश्वरासोबत एक सुंदर स्त्री होती अगदी अप्सरेलाही लाजवेल असे तिचे सौंदर्य. परमेश्वराने आपल्या जवळील मोठा ट्रॅक्टर टॉर्च काढून त्या स्त्रीकडे दाखवत गणूला विचारले 'हीच कां तुझी बायको?'


त्या टॉर्च च्या प्रकाशात गणू ने त्या स्त्रीकडे एक दृष्टिक्षेप केला व लगेच म्हणाला.' नाही ,देवा ही माझी कमळी नाही.'पुन्हा परमेश्वराने विहिरीच्या पाण्यात डुबकी मारली.आणि पुन्हा एका सुंदर स्त्रीला बाहेर काढत तो म्हणाला, ही नक्कीच असेल रे गणू तुझी बायको. पुन्हा गणूने तिला न्याहाळले आणि म्हटले नाही देवा, हीसुद्धा माझी बायको कमळी नाही. पुन्हा परमेश्वराने विहिरीच्या पाण्यात डुबकी मारली आणि पुन्हा एका स्त्रीला बाहेर काढले. आता मात्र'देवा हीच माझी कमळी'परमेश्वरा तू किती दयाळू आहेस. माझ्या कमळीला तू शोधून काढले. असे म्हणत तो रडू लागला मात्र यावेळी ते आनंदाश्रू  होते. निपचित पडलेल्या कमळीला त्याने शुद्धीवर आणले. आणि म्हणाला देवा, निघतो आता मी. तुझे उपकार कसे फेडू हेच मला समजत नाही. माझा कमळीवर खूप जीव आहे. देवा, तिच्याशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. निघतो आता मी.


असे म्हणत गणू परमेश्वराचा निरोप घेऊ लागला. पण परमेश्वर गणूला म्हणाला. थांब मित्रा, तू खूप प्रामाणिक आहेस. तुझ्या या प्रामाणिकपणाबद्दल मी खूप खुश झालो आहे. आणि म्हणूनच  या दोन्ही सुंदरींना तुला भेट म्हणून देतो आहे. परमेश्वराने असे म्हणताचं गणू म्हणाला, नको मला माझी कमळी मिळाली हेच खूप झाले. आणि तसेही द्विभार्या प्रतिबंधक कायद्यामुळे उगाच माझी पंचायत होऊन जाईल. माझी कमळीच मला प्रिय आहे. शी इज माय बेस्ट वाइफ. माय लव्ह. अरे व्वा! तू तर सुशिक्षित दिसतोस. परमेश्वर म्हणाला.


हो, मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे. तुला हे मी सांगायलाच विसरलो. नोकरी मिळत नाही म्हणून छोटी मोठी काम करतो. माझ्या पत्नीची मला उत्तम साथ आहे. गणू म्हणाला. त्यावर परमेश्वराने त्याला विचारले काही मूलबाळ वगैरे. त्यावर जरा लाजतच गणू म्हणाला. सध्या विचार केला नाही आम्ही. सेटल झाल्यावर पाहू. इकडे परमेश्वर मनातल्या मनात हसत होता. गणू पुढे म्हणाला परमेश्वरा प्रधानमंत्री उज्वला योजनेत आम्हाला मोफत गॅस कनेक्शन मिळाले आहे. सुरुवातीला गॅस सिलेंडरची किंमत कमी होती. पण दिवसेंदिवस  किमती वाढतच आहेत. म्हणून पुन्हा चुलीकडे वळावं लागलं.त्यासाठी दिवसभर काम झाल्यावर थोडा वेळ दोघेही जंगलात काटक्या गोळा करतो.


सामाजिक वनीकरणाचा जो नारा आहे  'झाडे लावा-वृक्ष जगवा'याची सुरुवात सुद्धा मी स्वतः पासूनच केली. मी जंगलात येताना कुऱ्हाड अजिबात आणत नाही आणि जी फळे आपण खातो त्याचे बी सुद्धा मी धुवून, स्वच्छ वाळवून, गोळा करून ठेवतो. व जंगलात आल्यावर इतरत्र फेकून देतो. सर्व बी नाही रुजणार पण काही तर रुजेल व नवीन झाडे तयार होतील. हेच आमचे उद्दिष्ट. आज आम्ही जंगलात काटक्या गोळा करण्यासाठीच आलो होतो. पण ही घटना घडली. गणू म्हणाला.


अरे व्वा! खऱ्या अर्थाने तू सामाजिक ऋणचं फेडतो आहेस. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडंचं. एकंदरीतच तुझ्यावर मी आज एवढा खुश आहे की तुला माझ्याकडून काहीतरी घ्यावचं  लागेल बक्षीस म्हणून. परमेश्वर म्हणाला.' देवा फक्त तुमची कृपा आम्हावर असू द्या. माझ्या पत्नीची भक्कम साथ आणि आम्हा उभयतांच्या डोक्यावर तुमच्या कृपेचा हात, बस एवढाच मला हवं आहे. तुमची कृपा हेच माझ्यासाठी बक्षीस आहे. गणू म्हणाला.


बरं बरं ठिक आहे. पण जाताना माझा मोबाईल नंबर मात्र घेऊन जा. आणि आभासी माध्यमातून मी तुझ्याशी बोलत सुद्धा जाईल. परमेश्वर म्हणाला. खूप खूप धन्यवाद देवा. निघतो आम्ही आता. असे म्हणत गणू ने परमेश्वराचा निरोप घेतला व आनंदाने कमळीला घेऊन घराकडे मार्गस्थ झाला. गणूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे परमेश्वर मात्र अचंबित होऊन पहातच राहिला व मनात म्हणाला ' अरे गणू, तुझ्यासारखी प्रामाणिक माणसे या पृथ्वीतलावर आहेत म्हणूनच तर सर्व सुरळीत चालू आहे.' असे म्हणत परमेश्वर अंतर्धान पावले.


            कर्मावर आणि प्रामाणिकपणावर...

             निःसंकोच विश्वास ठेवा...

             योग्य वेळ आली की परमेश्वर इतके देणार,..

             की मागायला काहीच उरणार नाही.

लेखिका - सौ.रेखा देशमुख