प्राक्तनाचे ओझे ( भाग ५ वा) अंतिम

तिच्या प्राक्तनाची करूण कहाणी

प्राक्तनाचे ओझे ( भाग ५ वा) अंतिम

©® आर्या पाटील

सुरेशच्या बाजूला बसत तिने हात जोडले.

" बाबा, त्या पाचजणांत मी ही होते किंबहुना माझ्यामुळेच..." बोलता बोलता तिला आवंढा आला.

" मला तुझं काहीच ऐकायचं नाही. तु आताच्या आता इथून निघून जा." तो बरसला.

" पण मला बोलायचं आहे. माझ्या मैत्रिणीवर लावलेला खोटा काळिमा पुसायचा आहे. मला जगाची पर्वा नाही पण तुम्ही तिच्याबद्दल काय विचार करता हे जास्त महत्वाचं आहे. तिच्या आयुष्याच्या मंदिरातील देवच आज तिच्यावर रुसला आहे मग तिच्या आत्म्याला शांती कशी मिळणार ? प्राक्तनाच्या या ओझ्याने ती घुटमळत असेल." ती गयावया करत म्हणाली.

तिच्या शब्दांनी सुरेशमधला बाप हळवा झाला.

" काय सांगायचं आहे तुला ? अजून काय लपवलं आहे ?" पुन्हा गंभीर होत तो म्हणाला.

"बाबा, त्या दिवशी आम्ही कॉलेजनंतर फिरायला जायचा प्लॅन केला.एका मित्राचा वाढदिवस होता.परीक्षाही संपली होती म्हणून तिथेच जाऊन वाढदिवस साजरा करणार होतो. या प्लॅनमध्ये आज्ञा नव्हतीच किंबहुना मीच तिला सोबत येण्याची गळ घातली.तिने स्पष्टपणे दिलेला नकार मी मैत्रीचं बंधन वापरून होकारात बदलला. ती फोन करून तुमची परवानगी घेणारच होती की मी पुन्हा तिला कोणालाही न सांगण्याची गळ घातली.माझ्या आईबाबांना काही कळेल या भीतीपोटी मी तिच्या संस्कारांचा बळी दिला. फक्त आणि फक्त माझ्यासाठी ती आमच्यासोबत आली आणि..." बोलता बोलता ती अगतिक झाली आणि ओक्साबोक्सी रडू लागली.

"आणि मी मात्र माझ्या लेकीच्या चारित्र्यावर संशय घेतला.वीस वर्षांत तिला एवढंही ओळखू शकलो नाही. आपल्या बापाचं नाव मोठं करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या लेकीच्या चितेला कठोर बनून अग्नी दिली. मरणोत्तर तिला एवढ्या वेदना दिल्या की.." आता तो धाय मोकळून रडू लागला.

" बाबा, शांत व्हा. खरं तर चुक या समाजाची आहे ज्यात कोणत्याही तथ्याशिवाय मुलीला दूषण दिलं जातं. ती मुलांसोबत बाहेर फिरली तर तिचं लफडं आहे,तिने फॅशनेबल राहण्याचा प्रयत्न केला तर ती चालू आहे, तिने उच्चशिक्षण घेतलं तर तिला घमेंड आहे अश्या एक ना अनेक शृंखलांनी मुलींना बांधले जाते. आज्ञाच्या बाबतीत तर या समाजाने कहरच केला. मरणोत्तर ही अविवेकी विचारांची ही बेडी तिच्यावर लादत तिच्या आत्म्याला दुखावलं." ती आता गंभीर झाली.

" समाजाचं माहित नाही पण मी माझ्या मुलीचा गुन्हेगार आहे. माझ्याच संस्कारांवर आक्षेप घेऊन मी बेगडीपणाने वागलो. माझी सोन्यासारखी लेक मला कायमची सोडून गेली हे आभाळाएवढं दुःखही मातीमोल ठरवलं. कुठे फेडू मी हे पाप ?" तो आक्रोश करत म्हणाला.

" तुम्ही शांत व्हा. तुम्हांला असं रडतांना पाहून ती आणखी दुःखी होईल. तिला निःशंक मनाने निरोप द्या. या मरणोत्तर वेदनेतून तिची मुक्ती करा. प्राक्तनाचं हे ओझं तिच्यापासून दूर करा." हात जोडत ती म्हणाली आणि निघून गेली.

नेहा आणि तिच्या आईला जवळ घेत सुरेश ओक्साबोक्सी रडला. दुसऱ्या दिवशी साफ मनाने त्याने आज्ञाच्या साऱ्या विधी पार पाडल्या. पिंडाला कावळा शीवला आणि त्याचा जीव भांड्यात पडला.कमनशिबी प्राक्तनाचं ओझं मात्र एका बापाला आयुष्यभर छळीत राहिलं.

समाप्त

©® आर्या पाटील

🎭 Series Post

View all