प्राक्तनाचे ओझे ( भाग ४ था)

तिच्या प्राक्तनाची करुण कहाणी

प्राक्तनाचे ओझे ( भाग ४ था)

©® आर्या पाटील

जवळ जवळ रात्री आठच्या सुमारास आज्ञाचं अवयव वजा पार्थिव त्यांना सुपूर्त करण्यात आले. पोस्टमार्टम नंतर त्या शरिरात काहीच तर उरलं नव्हतं. मरणोत्तर वेदना कदाचित यालाच म्हणत असावे. मघाशी ओक्साबोक्सी रडणारा सुरेश आता कठोर बनला होता. मुलीच्या जाण्याच्या दुःखाची जागा तिच्यामुळे गेलेल्या इज्जतीने घेतली होती. नेहा मात्र खूप रडत होती.

जवळजवळ नऊच्या सुमारास पार्थिव गावात पोहचलं.

एक हुशार, साधी सरळ मुलगी म्हणून गौरवलेल्या तिच्या पार्थिवाला लोक संशयाच्या नजरेने पाहत होते.

" वाटायची तर साधीसरळ पण नको तिथं फसली आणि लफड्याला बळी पडली." लोकांची जीवघेणी कुजबुज स्मशानशांतता भेदत होती.

" कोणीच रडायचे नाही."रडणाऱ्या साऱ्यांना पाहून सुरेश बरसला. सुरेशचा कठोरपणा बापाच्या दुःखावर वर्चस्व प्रस्थापित करत होता. अगदी पंधरा मिनिटांतच तिचं पार्थिव अंतिम विधीसाठी घराबाहेर काढण्यात आलं. मरणानंतरचे कोणतेच सोहळे तिच्या वाट्याला आले नाहीत.आपल्या लेकीला शेवटची आंघोळही घालता आली नाही तिच्या माऊलीला.हंबरठा फोडून रडणाऱ्या तिच्या आईचं दुःख आभाळाएवढं होतं. आई निदान रडून मोकळं होत होती पण सुरेशचं काय गेलेल्या इज्जतीचा शेला पांघरुण तो लेकीसाठी अश्रूही ढाळू शकत नव्हता.

तेवढ्या रात्री तिच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला.

जमलेले सगळेच तिलाच दूषण देत निघून गेले. घरी परतल्यानंतर सुरेशने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. मघापासून दाबून ठेवलेला आवंढा गिळत तो ओक्साबोक्सी रडू लागला.

" तु का असं केलस ? माझा अभिमान होतीस तु आणि आज त्याच अभिमानाला पायदळी तुडवून ही अशी निघून गेलीस. कुठे कमी पडलो मी तुला संस्कार देण्यात की परिस्थितीची जाणिव घडवण्यात ? माझं नाव मोठं करायचं स्वप्न होतं तुझं ते असं केलस ? मी कधीच माफ करू शकणार नाही तुला." मनातली मोठी विवंचना व्यक्त करत सुरेश रडत होता.

" बाबा, ताई असं कधीच करणार नाही. तुमच्या अभिमानासाठीच तर रात्रंदिवस एक करून ती अभ्यास करत होती. तुमची इज्जत जाईल असं ती कधीच वागणार नाही." दाराआडून नेहा समजावत होती पण त्याच्यावर त्याचा कोणताच परिणाम होत नव्हता. 

फक्त कर्तव्य म्हणून मरणोत्तर आज्ञाच्या विधी तो पार पाडत होता. पंचक्रोशीत आज्ञाच्या चारित्र्याबद्दल नको नको ते बोललं जावू लागलं होतं.' लफड्याचं' लेबल लावून तिच्या आत्म्याला मरणोत्तर वेदना दिल्या जात होत्या.

अंतिम विधीच्या आदल्या दिवशी त्या पाचजणांत असलेली तिची मैत्रीण घरी येऊन पोहचली.अपघातात तिच्या शरिरावरच्या झालेल्या जखमा स्पष्ट दिसत होत्या. नशिब बलवत्तर म्हणून ती वाचली. आज्ञा गेली हे ऐकल्यानंतर मानसिकरित्या खचलेली ती हिमंत करत आज तिच्या घरी येऊन पोहचली.आईच्या गळ्यात पडून ती ओक्साबोक्सी रडली. नेहाला जवळ घेत तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. सुरेश खोलीत बसला होता. ती त्याच्याजवळ पोहचली.

क्रमश:

🎭 Series Post

View all