Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

प्राक्तनाचे ओझे ( भाग ३ रा)

Read Later
प्राक्तनाचे ओझे ( भाग ३ रा)

प्राक्तनाचे ओझे ( भाग ३ रा)

©® आर्या पाटील

"आता काय फायदा आहे रडण्याचा? जेव्हा मुलींना लगाम घालायला हवी होती तेव्हा प्रमाणापेक्षा जास्त सुट दिलीस. अवाक्यात नसतांना चांगल्या शिक्षणासाठी इकडे शहरात पाठवलस.प्रवासाची दगदग नको म्हणून स्कूटी घेऊन दिली आणि त्याच्या बदल्यात काय मिळालं ?गावात कळलं की आज्ञा कॉलेजचं नाव सांगून मित्रांबरोबर फिरायला गेली होती तर काय इज्जत राहिल आपली ?" सुरेशचा मोठा भाऊ बरसला.

सुरेश मात्र अजूनही हतबल होऊन रडतच होता. तोच त्याचा फोन वाजला. नेहाचा फोन होता. आपला दुःखावेग आवरत त्याने फोन उचलला.

" बाबा, तुम्ही कुठे आहात ? लवकर दवाखान्यात पोहचा. ताईची तब्येत जास्त बिघडत आहे. मला खूप भीती वाटतेय." नेहा फोनवर म्हणाली.

" आम्ही पोहचतोय " एवढच म्हणून त्याने फोन कट केला.

" दादा चल.आपल्याला जिल्ह्याच्या दवाखान्यात जावं लागेल. तिची तब्येत आणखी बिघडली आहे." सुरेशने डोळे पुसले आणि तो गंभीर होत म्हणाला.

त्याच्यावर रागीट कटाक्ष टाकत मोठ्या भावाने तशीच गाडी काढली आणि ते दवाखान्याकडे निघाले.

दवाखान्यात पोहचताच लागलिच आज्ञाला आत नेण्यात आले पण तोपर्यंत सगळच संपलं होतं. आज्ञाचा श्वास थांबला होता.जगण्याची लढाई ती हरली होती.

" माफ करा. तुमच्या बहिणीला आम्ही नाही वाचवू शकलो."डॉक्टरांनी असे सांगताच नेहा कोसळली.

दवाखान्यात हतबलतेने ती रडू लागली. आज्ञा जीव होता तिचा. शेवटचं तिच्याशीच तर बोलली होती ती.

" मला असं एकटं सोडून निघून जायची तुझी हिंमत कशी झाली ?" तिच्या पार्थिवाला आलिंगन देत नेहा ओक्साबोक्सी रडत होती.

तोच सुरेशही तिथे येऊन पोहचला.

आज्ञाला मृतावस्थेत पाहून डोक्याला हात मारून घेत तो तिथेच कोपऱ्यात बसला. नेहा लागलिच त्याच्या दिशेने धावली.

" बाबा, सांगा ना ताईला उठायला. ती असं कसं करू शकते ? मला लवकर येते असं म्हणाली होती ती.." नेहा त्याच्याजवळ बसत रडू लागली.

" म्हणजे तुला माहित होतं ती मुलांसोबत फिरायला गेली होती ?" सुरेशचा मोठा भाऊ रागाने म्हणाला.

" हे काय बोलत आहात काका ? ताई कॉलेजला गेली होती. ती असं न सांगता कधीच कुठे..." बोलता बोलता तिला अश्रू अनावर झाले.

" बघितलस सुरेश म्हणजे हिलाही काहीच माहित नव्हतं." तो पुन्हा बरसला.

नेहाला मात्र अजूनही त्यांचं म्हणणं कळलं नव्हतं. तेवढ्यात पोलिसही तिथे येऊन पोहचले.

पोलिसांनी झालेला प्रकार स्पष्टपणे सांगितला पण तरीही नेहाला विश्वास बसत नव्हता.

" बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवावी लागेल." म्हणत पोलिस निघून गेले.

नेहाच्या मोठ्या काकाने लहान भावाला फोन करून आज्ञाच्या मृत्यूची बातमी दिली. नेहाच्या आईला घेऊन दवाखान्याकडे निघालेल्या त्याने रस्त्यातच गाडी थांबवली.

"वहिनी, आपल्याला घरी जावं लागेल. दवाखान्यात जास्त लोकांना थांबून देत नाहीत. आपण उद्या जाऊ. सुरेश दादानेच तसं सांगितलं आहे." त्याने कशीबशी परिस्थिती सावरली आणि तिला घेऊन घर गाठले.

घराच्या आजूबाजूला जमलेला जनसमुदाय पाहून मात्र नेहाची आई सारं समजून चुकली. घरात शिरताच मोठ्या जावेने जवळ घेत तिला सगळं सांगितलं. आईच्या आक्रोशाने सारा आसमंत भावनिक झाला. जमलेल्या साऱ्या स्त्रियांनी डोळ्यांना पदर लावला.

क्रमश:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Aarya Amol Patil

Teacher

निसर्ग सौंदर्याला लेखणीत उतरवायला आवडतं

//