प्राक्तनाचे ओझे ( भाग २ रा)

तिच्या प्राक्तनाची करूण कहाणी

प्राक्तनाचे ओझे ( भाग २ रा)

©® आर्या पाटील

 "डॉक्टर, ताई ठिक आहे ना ?" ती रडत म्हणाली.

" माफ करा. पेशन्ट सिरियस आहे. तात्काळ जिल्ह्याच्या रुग्णालयात भरती करावं लागेल. जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर रुग्णालय गाठा." म्हणत त्यांनी तिला ॲम्बुलन्समध्ये नेण्याचा इशारा केला.

नेहाला काहीही सुचत नव्हतं.आज्ञाच्या मागे ती ही तशीच ॲम्बुलन्सकडे निघाली.

" आजची तरुण पिढी.शिक्षणाच्या नावाखाली नको नको ते रंग उधळतात आणि मग अशी अवस्था होते." तिला दवाखान्यात घेऊन येणाऱ्यांपैकी कोणी एकजण म्हणाले.

त्याचे ते शब्द नेहाच्या जिव्हारी लागले.त्याचं बोलणं तिच्यासाठी कोडच होतं कारण तिच्या ताईचा शिक्षणाविषयीचा दृष्टीकोन तिच्यापेक्षा जास्त चांगला कोणाला माहित असेल. आई वडिलांच्या कष्टांची जाणिव ठेवून स्वतःला अभ्यासात झोकून देणाऱ्या तिला आठवून नेहाच्या डोळ्यांत पाणी आले.

स्वतःला सावरणे गरजेचं होतं. खूप मोठा आणि बिकट प्रसंग होता ज्यात तिला खंबीरपणे उभं राहायचं होतं.

समोर आज्ञा जन्ममृत्यूच्या दारात उभी होती तिला पाहून काळीज कातर होत होतं. मनातल्या मनात तिने देवाचा धावा सुरु केला.ॲम्बुलन्स शहराच्या दिशेने निघाली.

दुपारची वेळ असल्याने ट्राफिक तशी नव्हती पण तरीही गाडीचा वेग तिला कमी जाणवत होता. सायरनचा आवाज कानासोबत हृदयालाही अगतिक करत होता.

यासाऱ्यांत ती बाबांना फोन करायचही विसरली.

सुरेश वाड्याच्या दवाखान्यात येऊन पोहचला. तिथे चौकशी केल्यावर आज्ञाला पुढे हलवल्याचे कळले आणि तो कोसळला. मोठ्या भावाने त्याला आधार दिला तोच आजूबाजूच्या लोकांची कुजबुज त्याला पूर्णपणे हलवून गेली.

" पाच जण होते गाडीत. दोन मुली आणि तीन मुले. कॉलेज सुटल्यानंतर जवळच्या हिल स्टेशनवर गेले होते पार्टी करायला.गाडीत ब्रिजरच्या बाटल्या होत्या. ती मुलगी फ्रण्टसीटवर मुलाच्या बाजूलाच बसली असावी. मुलीसोबत असल्याने हिरोगिरी दाखवायला गेले. गाडीचा वेग नियंत्रीत झाला नाही आणि जाऊन झाडाला ठोकले. दोन तीन पलट्या खाल्ल्या गाडीने. गाडीत काय सुरु होतं त्यांनाच माहित." घोळक्यातील कोणी एक म्हणाले.

" कॉलेज सोडून फिरायला जातात म्हणजे समजून घ्या ना काय सुरु असेल. पालकांचाच दोष आहे यात. आपली मुले, मुख्यतः मुली कुठे जातात,काय करतात नको का बघायला ?" म्हणत एकाने पालकांना दोष दिला.

" कॉलेजला शिकायला नाही तर लफडी करायला जातात ही मुले." एकाच्या शब्दांनी सुरेश आता पुरता घायाळ झाला.

चौकशी केल्यानंतर कळले की आपली स्कूटी तिथेच कॉलेजमध्ये ठेवून आज्ञा त्यांच्यासोबत फिरायला गेली होती. परतीच्या मार्गावर कॉलेजपासून अगदी काही अंतरावर असतांना अपघात झाला.

" सुरेश, तुला माहित होतं का आज्ञा फिरायला जाणार होती ते ?" दादा गंभीर होत म्हणाला.

सुरेशने नकारार्थी मान हलवली.आपल्या डोक्यावर मारून घेत तो रडू लागला.

क्रमश:

🎭 Series Post

View all