प्राक्तनाचे ओझे ( भाग १ ला)

तिच्या प्राक्तनाची करुण कहानी

प्राक्तनाचे ओझे (भाग १ ला)

©® आर्या पाटील

टेबलावर ठेवलेला फोन वाजला आणि सुरेशची झोप चाळवली. लाडक्या लेकीचा आज्ञाचा फोन पाहून त्याने लगबगीने तो उचलला.

" हॅलो, आज्ञा. निघालीस का कॉलेजमधून ?"सुरेश म्हणाला.

" तुमच्या मुलीचा अपघात झाला आहे. आम्ही तातडीने तिला वाड्याच्या सरकारी दवाखान्यात नेत आहोत.तुम्ही शक्य तितक्या लवकर पोहचा." म्हणत त्या व्यक्तीने फोन ठेवला.

आज्ञाच्या अपघाताची बातमी ऐकून सुरेशच्या पायाखालची जमिनच सरकली.सी.एसच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या आपल्या लेकीला रोज कॉलेजला जाण्यासाठी स्कूटी घेऊन दिली होती त्याने.सोबत धाकटी नेहाही असायची. ती ही त्याच शहरात अकरावीत होती. ग्रामीण भागात राहणाऱ्या त्यांना वाहनांअभावी नेहमीच प्रवासाच्या समस्येचा सामना करावा लागायचा. या समस्येवर तोडगा काढत सुरेशने लेकींना स्कूटी घेऊन दिली होती.

स्कूटीवर दोघीही असतील असा अंदाज बांधत त्याने धाकट्या नेहाला फोन लावला.

" हॅलो, बाबा. मी कॉलेजमध्येच आहे.ताईचा कॉल आला होता पंधरा मिनिटांपूर्वी. ती इथे पोहचल्यावर लगेच निघू." कॉलेजबाहेर आज्ञाची वाट पाहत थांबलेली नेहा म्हणाली.

" म्हणजे ती तुझ्यासोबत नव्हती ?" सुरेश कापऱ्या स्वरात म्हणाला.

" नाही. तिचं कॉलेजमध्ये काही काम होतं त्यामुळे तिला उशीर झाला निघायला." ती म्हणाली.

" बाळा, ताईचा अपघात झाला आहे. तु तातडीने सरकारी दवाखान्यात पोहच. मी निघतो आहे." तो रडकुंडीला येऊन म्हणाला.

" बाबा, तुम्ही काळजी करू नका. ताई ठिक असेल. मी लगेच निघते तिकडे. तुम्ही व्यवस्थित या. मी असेन ताईसोबत." लहान असूनही मोठ्या धीराने ती म्हणाली.

मनात मात्र नानाविध शंका आकांडतांडव घालू लागल्या. 

रिक्षा पकडत ती तशीच दवाखान्याकडे निघाली.

इकडे सुरेशच्या आवाजाने त्याची पत्नी गीताही झोपेतून उठली. त्याला रडवेलं झालेलं पाहून तिच्या काळजात धस्स झालं.

" आहो, काय झालं ?" ती त्याला आधार देत म्हणाली.

" आपल्या आज्ञाचा अपघात झाला आहे." म्हणत सुरेश रडू लागला.

त्याचे शब्द ऐकून आता त्यालाच तिला आधार द्यावा लागला.

" सांभाळ गीता. मी जातो दवाखान्यात.आपल्या आज्ञाला काहीच होणार नाही." तिला सावरत तो म्हणाला.

" मी येते तुमच्यासोबत.मला घरात थारा लागणार नाही. नेहा कुठे आहे ?" ती हट्ट करत म्हणाली.

" नेहा तिच्यासोबत नव्हती.मी दादाच्या गाडीवर होतो पुढे.दिनेश कामावरून येईलच.तो आला की त्याच्यासोबत ये.मी निघतो." म्हणत सुरेश तसाच घराबाहेर पडला. त्याचा मोठा भाऊ गाडी घेऊन बाहेरच थांबला होता. तात्काळ ते दवाखान्याकडे निघाले.

मोठ्या भावाची पत्नी तातडीने गीताजवळ पोहचली.

" गीता, काळजी करू नकोस. आपली आज्ञा ठिक असेल. " म्हणत तिने गीताला समजावले.

गीता तिच्या कुशीत शिरत रडू लागली. हा हा म्हणता पूर्ण गावात आज्ञाच्या अपघाताविषयी समजलं.

सारे जण चौकशी करण्यासाठी तिच्या घरी येऊ लागले.

तोवर गीताचा छोटा दिर दिनेशही आला. त्याने तात्काळ तिला घेऊन दवाखान्याचा रस्ता धरला.

इकडे नेहा सर्वात आधी दवाखान्यात पोहचली. काळजीने कातर झालेली नजर आज्ञाला शोधू लागली. तोच स्ट्रेचरवरून आज्ञाला बाहेर आणण्यात आले. गाडीच्या काचा तिच्या डोक्यात रुतल्या होत्या.ऑक्सिजन मास्क लावूनही अडखळणारा श्वासोच्छ्‌वास तिच्या हालचालींवरून स्पष्ट जाणवत होता. तिचं रक्ताळलेलं शरीर पाहून नेहा रडतच तिच्यापाशी पोहचली.

क्रमश:

🎭 Series Post

View all