प्रकाशकिरण

निराश आणि हतबल मन माणसाला अनेकदा चुकीचे निर्णय घ्यायला लावते.म्हणून नेहमी सकारात्मकता पाहावी

सुजय हातात आलेलं टर्मिनेशन लेटर पाहून सुन्न झाला होता.सगळा भोवताल अवती भोवती फिरतोय असं त्याला वाटलं.त्याच मनस्थितीत तो कंपनीतून बाहेर पडला.विमनस्क स्थितीत तो तसाच चालत होता.नुकतंच घेतलेलं घर,गाडी चे हप्ते मुलांच्या शाळा सगळं कसं होणार डोक्यात असंख्य प्रश्न होते.

सुजय साठे,एका मल्टिनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर असणारा.खुप हुशार आणि बुद्धिमान.सुजय एका छोट्या गावातून हुशारीवर इथवर पोहचला होता.त्याचे बाबा गेल्यावर आईने त्याला किती जिद्दीने वाढवलं होत.सुजयला परिस्थितीची जाणीव होती.आईचे कष्ट लक्षात ठेवून अभ्यास केला.उत्तम कॉलेज ,नोकरी आणि मिनल सारखी सुस्वभावी बायको व दोन गोंडस मुलं. सामान्य माणसाच्या सुखाच्या सगळ्या कसोट्यांवर सुजय परिपूर्ण होता.

परंतु गेले काही महिने अचानक अमेरिकेत आलेल्या मंदीमुळं पगरकपात,नोकऱ्या कपात हे वादळ येऊ घातलं होत.त्यामुळं सुजय हल्ली टेन्शनमध्ये थोडी ड्रिंक्स घेत असे.त्याला आई,मुलं आणि मिनल सगळे आठवून खूप दुःख व्हायचं.आपण या सर्वांना सुखी कसे ठेवणार.जर नोकरी गेली तर ???हा प्रश्न सुजयचे मन सतत पोखरत असे.

आई आणि मिनलने अनेकदा विचारूनसुद्धा सुजय काहीच बोलत नसे.फक्त गप्प राही.गेले अनेक दिवस वाटणारी भीती आता सत्य झाली होती.सुजय वाट फुटेल तिथे चालत होता.चालून दमल्याने तो एका ठिकाणी थांबला.भूकसुद्धा लागली होती पण आता जगणंच संपलं असं त्याला वाटत होत.एवढ्यात एक तरुण जोडपे त्याच्या पासून थोड्या अंतरावर बसले होते.सुजयला त्यांचे बोलणे ऐकू येत होते."रखमा आग तीन दिस झालं हाताला काम नाय,काय खायचं?काय करायचं?त्यावर ती बाई म्हणाली,"काम मिळलं व नका घाबरू माझ्याकडं हायेत थोडं पैस. काही दिस जे मिळेल ते खाऊ की.आग पर म्या तुम्हाला सुखी नाय ठेवू शकत ग!!!सुख म्हंजी काय फक्त चांगलं चुंगल खायला आणि कपडालत्ता नाही,आपली माणसं बरोबर असली की सगळे दिस बरोबर निभावून जात्यात बगा.

त्यांचं बोलणं ऐकताना सुजय ला मिनल आठवली,अशीच समजूतदार,सोशिक आणि समजावून सांगणारी.खुद्द त्याच्या आईने तर कितीतरी कष्ट करून त्याला मोठं केलं होतं.हळूहळू सुजयच्या मनावर दाटून आलेले अंधाराचे साम्राज्य मावळले कारण त्याला योग्यवेळी प्रकाशकिरण दिसले होते.

सुजय उठला आणि नव्या उमेदीने घराकडे चालू लागला प्रकाश किरणांच्या साथीने....

अनेकदा आयुष्यात अपयश,निराशा ,दुःख,हतबलता येते त्यावेळी अवती भवती पाहावे असे अनेक प्रकाशकिरण आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवतात.